आईने अचानक घेतलेल्या निर्णयाने वैभवच्या पायाखालची जमिनच सरकली होती.संतापाने त्याच डोकं सुन्न झालं होत. त्याला कारणही तसच होत. वैभवला न विचारताच त्याच्या आईने त्याच लग्न तिच्या मैत्रिणीच्या मुलीशी ठरवून टाकलं होत. मोठ्या आनंदाने तिने सरिताचा फोटो वैभव पुढे धरला आणि म्हणाली बघ किती छान सालस आहे मुलगी शिक्षण थोडस कमी आहे पण बाकी अगदी तुला आवडेल आणि शोभेल अशीच आहे हो.
वैभवने रागानेच एका कटाक्षात फोटो पाहिला.बोलके डोळे, हसरा चेहरा व सावळ्या रंगाच्या सरितेची साधी सिम्पल छबी त्याला अजिबात रुचली नाही. भावी पत्नीची काही वेगळीच प्रतिमा त्याच्या मनात कोरली गेली होती.गोरीपान,देखणी,उच्चशिक्षित, करियर ओरिएंटेड, आकर्षक आणि स्मार्ट पर्सनॅलिटी असलेली मुलगी त्याला बायको म्हणून हवी होती. तो स्वतःही रुबाबदार व्यक्तिमत्वाचा धनी होता.गव्हाळ रंग, उंच सडसडीत बांधा,सरळ नाक, काहीसे कुरळे केस,करारी चेहऱ्यावरची त्याची इनोसंट स्माईल कुणाचंही लक्ष सहज वेधून घेई. त्याचा स्वभावही तेवढाच दिलदार असल्याने सगळ्यांनाच तो हवाहवासा वाटत असे.वैभव बंगलोरच्या एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेयर इंजिनियर होता.
सहा महिन्यांपूर्वी हार्टअटॅकने अचानकच त्याचे वडील गेले आणि सगळं छिन्न- विछिन्न झालं. अनपेक्षितपणे बसलेल्या धक्क्याने त्याच्या आईच्या मनावर गंभीर परिणाम झाला आणि हळूहळू ती दुखणेकरीच होवून बसली. तिच्या हयातीत वैभवच लग्न व्हावं ही एकच तिची इच्छा आता उरली होती आणि म्हणूनच आपल्या एक हात व एका पायाने अधू असलेल्या अपंग मुलीसमवेत अख्ख घरदार समर्थपणे सांभाळून घेईल अशी एकच मुलगी ती म्हणजे सरिता तिच्या लक्षात येताच क्षणाचाही विलंब न करता ती हे लग्न पक्क करून मोकळी झाली. ह्या क्षणी आईच मन दुखवणं धोक्याचं ठरू शकत ह्याची जाणीव वैभवला असल्याने अत्यंत नाईलाजाने तो लग्नाला तयार झाला खरा पण त्याचा उफाळलेला भयंकर राग निष्पाप सरितावर एकवटला.
लवकरच अगदी साधेपणाने दोघांचा विवाह पार पडला. सहजीवनाच्या सुंदर मखमली स्वप्नात सरिता स्वतःलाही विसरून गेली होती. तेवढ्यात खाडकन दरवाजा लोटून वैभव तिच्या जवळ आला आणि मनात साठलेला राग अतिशय निष्ठुरतेने एका क्षणात तिच्या समोर रिता केला. संतापाच्या भरात तो तिच्यावर ओरडू लागला, हे लग्न म्हणजे माझ्यासाठी एक दुखरी जखम आहे. फक्त आईच्या सुखासाठी मी होकार दिला पण तू कुठल्याही दृष्टीने मला अनुरूप नाहिस आणि म्हणून तू माझी पत्नी कधीही होवू शकत नाहिस.असं म्हणून पाय आपटत तो निघून गेला. दुःखातिरेकाने सरिता जागीच गोठल्यासारखी उभी राहिली. नियतीने अत्यंत क्रूर शिक्षा तिला दिली होती. सर्वस्व हरवल्यासारखी ती हमसून हमसून रडू लागली. आता काय करू? कुठे जावू ? स्वतःच्या घरातलं संपूर्ण चित्र तिच्या डोळ्यांपुढे उभं राहिलं. काबाडकष्ट करणारी आई, आजारी वडिल, वडिलांची ट्रीटमेंट व स्वतःच्या शिक्षणासाठी जीवाचं रान करून पै न पै कमावणाऱ्या दोन बहिणी कशी जाणार घरी तरी? असहाय व हतबल सरिताला आयुष्यात प्रथमच स्वतःच ओझं वाटू लागलं होत.
पण हार न मानता तिने त्यातूनही मार्ग काढायचं ठरवलं. आता हे घर ही माणसंच आपलं सर्वस्व मानून इथेच रहायचं आजारी सासूची सेवा करायची, नणंदेला स्वावलंबी बनवायचं बाकी परमेश्वर पाठीशी आहेच तो नक्कीच ह्यातून काहीतरी चांगलं जुळवून आणेल असं म्हणून ती दुसऱ्या दिवसा पासूनच कामाला लागली. लवकरच सासू व नणंदेच्या मनात तिनं घर करून घेतलं. त्यांचं सगळं काही ती प्रेमाने व आनंदाने करत असे. वैभव व तिच्यातला स्ट्रेस तिने कधीही उघड केला नाही. त्याचा तिच्यावरचा रोष कायमच होता; पण तिच्या हातचा चविष्ट स्वयंपाक, त्याला मनापासून आवडत असे . जे काम हातात घेतलं त्यात सरिता स्वतःला झोकून देत असे आणि उत्तमरीत्या ते पूर्णत्वास नेत असे हे एव्हाना त्याला कळून चुकलं होत. फावल्या वेळात ती हेमाला म्हणजेच तिच्या नणंदेला दैनंदिन जिवनातल्या छोट्या मोठ्या आवश्यक गोष्टींचं ट्रेनिंग देई. सासूबाई व हेमा ह्या दोघींनाही ती वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्पायरिंग कथा, लेख इ. वाचून दाखवत असे. तिचा स्वतःचाही काही ना काही शिकण्याचा सतत प्रयत्न सुरु असायचा त्यामुळे बऱ्याच कला कौशल्यात ती पारंगत होती. वैभवची आई मंगला ताई आणि हेमा दोघीही तिच्यावर जाम खुश होत्या. मंगलाताईंचं मनोबल वाढल्याने त्यांची तब्येतही आता सुधारू लागली होती. तसाच हेमाचाही आत्मविश्वास वाढीस लागला होता. घरातलं निराशेचा सावट आता आनंद आणि उत्साहात परावर्तित होत चाललं होत.
हा सगळा आश्चर्यकारक बदल वैभवच्या लक्षात आला होताच सरिताची कार्यक्षमता, हुशारी आणि परिस्थिती हँडल करण्याचं स्किल ह्याच त्याला खूप कौतुक वाटू लागलं होत. हळूहळू करत तिच्या व्यक्तिमत्वाने तो भारावत चालला होता. तिच भोवताली असणं त्याला हवस वाटू लागल होत . एखाद्या दिवशी जर ती लवकर दिसली नाही तर त्याला अस्वस्थ वाटत असे. तिची एक झलक दिसावी म्हणून तो काहीही कारण काढून किचन कडे मोर्चा वळवत असे. तिच्या साध्या सात्विक सौन्दर्यात तो आता हरवायला लागला होता. दोघांत अजूनही हवं तस संभाषण नसलं तरी डोळ्यातून मनातले नाजूक भाव व्यक्त होवू लागले होते.
एक दिवस रात्री वैभवला खूप ताप भरला. अचानक तापाची तिव्रता वाढल्याने ग्लानीत तो बरळू लागला आणि बेशुद्ध झाला. प्रसंगावधान राखून सरिताने ताबडतोब डॉक्टरांना बोलावून घेतलं. वेळेवर उपचार मिळाल्याने त्याच्यावरचा धोका टळला. त्यानंतरही तिने वेळच्या वेळी औषधपाणी देवून रात्र रात्र जागून त्याची योग्य ती काळजी घेतली. वैभवला आता पुष्कळ बर वाटू लागलं होत. तसा सरिताच्याही जिवात जिव आला. तिचं त्याच्यासाठी असलेलं प्रेम, काळजी आणि व्याकुळता बघून त्याच मन उचंबळून आलं. आपण तिच्याशी किती दुष्टपणे वागलो आहोत ह्या जाणिवेने त्याला स्वतःची लाज वाटू लागली. तिची माफी मागून मन मोकळं करण्यासाठी तो अधीर झाला होता.
त्याने आज प्रथमच सरिताला नावाने हाक मारले. ती ही त्याच्या साठी जेवणाचं ताट घेवून आलीच. ती येताच त्याने मनापासून तिची क्षमा मागितली. तुझी काहीही चूक नसताना मी जे काही तुझ्याशी वागलो त्याबद्दल मला क्षमा कर सरिता. तू ह्या घरात आलीस आणि इथलं सगळंच बदललं; अगदी मी ही बदललो. अनुरूपतेचा खरा अर्थ मला तुझ्यामुळेच समजला. आपला जोडीदार ज्या गोष्टीत कमी आहे त्याच बाबतीत त्याची ताकद बनून खंबीरपणे त्याच्या पाठिशी उभं रहाणं , त्याची उणीव भरून काढणं ,त्याच खर सामर्थ्य बनून त्याच्या यशात भागीदार बनणं म्हणजेच खर अनुरूप असणं असत हे मला आता चांगलच उमजल आहे. तू तर तुझी श्रेष्ठता पदोपदी सिद्ध केलीस सगळ्या बाबतीत कमी पडलो तो मीच आता मी ही प्रयत्न करेन तुला अनुरूप होण्याचा. तुझ्या बहिणींच्या शिक्षणाची आणि वडिलांच्या ट्रिटमेंटची जबाबदारी आता माझी. तू ही हुशार आहेस, तुझं अर्धवट राहिलेलं शिक्षण आता पूर्ण कर, जे काही तुला शिकायचं आहे ते मोकळेपणाने शिक. फक्त आज एकच गोष्ट सांग, मी तुला गृहीत नाही धरणार पण मला माझी चूक दुरुस्त करण्याची एक तरी संधी देशिल? तुझा इतका राग व तिरस्कार करता करता कधी आणि कसा तुझ्यात गुंतलो आणि तुझाच झालो हे माझं मलाच कळलं नाही . माझ्या जीवनात येवून मला असच कायम सावरत राहशिल? माझी अर्धांगिनी बनशील? खरंच नाही जगू शकत मी तुझ्या शिवाय. सरिताच्या डोळ्यातून आनंदाश्रूंचा अखंड वर्षाव होत होता. वैभवला होकार सांगायला तिला शब्दांची गरजच नव्हती. मना मनाचं संभाषण सुरु होताच शब्दही थिटे झाले आणि ह्या परमोच्च आनंदाच्या आणि विजयाच्या क्षणी वैभवने पहिला प्रेमाचा घास सरिताला भरवला .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा