शनिवार, १६ ऑगस्ट, २०२५

2193. श्रीकृष्ण आणि श्री कृष्ण जन्मोस्तव

       कृष्ण खरंतर योगेश्वर होता. शरीरातल्या सोळा सहस्त्र नाड्या त्याच्या ताब्यात होत्या. जणू काय त्याच्या बायकाच.. लगेच आपण त्याला सोळा सहस्त्र बायका चिकटवल्या. ज्ञान फक्त काहींच्याच पोतडीत राहिले. उरलेले त्याला सोळा हजार स्त्रियांशी संग करणारा ठरवून मोकळे झाले. मग त्याचे उदात्तीकरणही केले.
एखाद्याला ‘देव’ बनवण्याच्या प्रक्रियेत हे उदात्तीकरण फार आवश्यक असतं. त्याशिवाय माणसाचा देव होत नाही. ही प्रक्रिया शेवटी माणसाला दगड बनवून मंदिरात कोंडते..!! आणि मग त्याने काय करायचं, काय खायचं, कसं वागायचं, कधी झोपायचं, कधी उठायचं हे त्याचे भक्तगण ठरवतात. तो लाचार होतो. कारण त्याचा देव झालेला असतो. आपण जसे असतो तसे आपल्याला जग दिसते . 
दुसऱ्याच्या पत्नीबरोबर रासलीला खेळणारा कृष्ण आणि आणि स्वतःच्या पत्नीला संशयावरून  वनवासात पाठवणारा राम ही सोयीस्कर रूपे भारतीय पुरुषांनी मनात जपली .पण त्याच्या ज्या रुपाची आज समाजाला गरज आहे त्याचा आपण  खरंच विचार करतो का ?????
 या माणसाने आपल्याला ‘गीता’ दिली.. जगभरातले विद्वान आज गीतेला एक सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान मानतात.. या माणसाने आपल्याला ‘कृष्णनीती’ दिली.. राजकारण कसे खेळावे, खेळवावे याचे धडे स्वत:च्या वागणुकीतून घालून दिले....कृष्णाचे व्यक्तिमत्व इतके बहुरंगी आणि बहुढंगी आहे की,त्याचे पैलू दाखवण्यासाठी हरिवंश,भागवत आणि महाभारत या ३ ग्रंथाची निर्मिती करावी लागली आणि त्यानंतरही कितीतरी ग्रंथ आणि पुस्तके....पाळणा ,दूध ,दही ,रासलीला या पलिकडचा कृष्ण  गिरीश जखोटिया यांनी त्यांच्या  "कृष्णनीती "  या पुस्तकात रंगवला आहे...
 त्याने जपलेली मूल्ये कालातीत आहे असा-
१.तत्वज्ञानी , राजकारणी , मुत्सद्दी...
२.त्यावेळी अस्तित्वात असलेल्या इंद्रपूजेलाही आव्हान देऊन निसर्गाची पूजा करणारा , त्याचे महत्व पटवून देणारा...रूढी आणि परंपरा न पाळणारा बंडखोर , 
३.गवळी असूनही , आपल्या जातीची खंत न बाळगता लोकांना एकत्र करून त्यावेळच्या जुलमी राज्यसत्तेला उलथवणारा क्रांतिकारक....
५.द्वारकेला व्यापारी बाजारपेठ बनवणारा वेल्थ क्रिएटर .....
६. स्थापत्य शास्रज्ञ( इंजिनिअर) आपल्या कलात्मक दृष्टीने द्वारका नगरी बनविणारा...
अशा अनेक रूपात यातील कृष्ण दिसतो........
गीतेची निर्मिती करणारा  विप्र, पांडवांना विजय मिळवून देणारा क्षत्रिय, गोकुळात असताना दही दुधाचे योग्य वितरण करणारा, द्वारकेला बाजारपेठ बनवणारा वैश्य आणि गुराख्याच्या कामालाही प्रतिष्ठा मिळवून देणारा आणि त्यातही कमीपणा न मानता सर्वच समाजाचे स्वकर्तृत्वावर नेतृत्व करणारा  शूद्र अशा  सर्व वर्णात कृष्ण दिसतो आणि भावतो ....
"महाभारताचा" परिपक्व कृष्ण आपल्यासमोर येतो तो एक नेता, योध्दा, तत्त्वज्ञानी,
राजकारणी आणि क्रांतिकारी म्हणून...
"कृष्णकिनारा" मधून तो भेटतो राधा , द्रौपदी आणि कुंतीचा सखा , मित्र ,पाठीराखा म्हणून ...
आणि जितकं मन , मेंदू , मस्तक जागे ठेवाल तितक्या रूपात तो मग भेटतच राहतो....
कृष्णाची ही रूपं समजून न घेता केवळ ‘बाबा वाक्यं प्रमाणं’ला शरण जाऊन ज्या प्रथा,  जशा आहेत तशा पाळणाऱ्या, जे समज जसे होते तसे निर्बुद्धपणे पुढे नेणाऱ्या सुशिक्षित (??)लोकांची चीड येते!!!! निदान या गोष्टींचे भांडवल करतांना त्याची बुद्धिमत्ता, त्याची समज, त्याचा धोरणीपणा.. कलियुगात कसं वागावं याचा त्याने घालून दिलेला वस्तुपाठ तरी समजून घ्यायचा.....
 कृष्ण मस्तीत जगला.. कारण तो माणूस होता.. त्यामुळेच जेव्हा त्याच्या डोळ्यासमोर यादव वंश संपला, तेव्हा तो काही करू शकला नाही आणि खंतावला.. माणसासारखे मरण आले त्याला..!!!!!
माणूस म्हणून त्याचे तेज , त्याचा लढाऊ बाणा त्याचे 'योगेश्वर' रूप.. म्हणजेच खरा "कृष्ण"....त्याला विविध  पुस्तकांतून वाचणं म्हणजेच त्याची भक्ती , माणसाला माणूस म्हणून ज्यांना समजून घेता येत नाही किंवा घ्यायचंच नसतं त्यांना असे पोकळ भक्तीचे देखावे मांडावे लागतात....
ज्यांना समजून घेता येते त्यांच्यासाठी तर तो नेहमीच दीपस्तंभ....
कृष्णा ...तू थोडा तरी समजलास म्हणून आयुष्यातील कितीतरी चक्रव्यूह भेदता आलीत.
-----------------------------------------------------------------------------------------------------

       कृष्ण ही अतिप्राचीन भारतेतिहासातील इतिहासाला कलाटणी देणारी एक वास्तविक व्यक्ती होऊन गेली... विष्णूच्या प्रसिद्ध दशावतारातील मत्स्यापासून वामनापर्यंतचे पाच अवतार जसे काल्पनिक अवतार आहेत, तसा कृष्ण हा केवळ काल्पनिक अवतार नाही. रामही अशीच ऐतिहासिक व्यक्ती असणे फार शक्य आहे, असे पुराणसंशोधकांचे मत आहे.
हिंदुधर्माला मानवदेहधारी साक्षात परमेश्वरच या दोन ऐतिहासिक व्यक्तींच्या रूपातच विशेषतः मिळाला. विष्णू, शिव, देवी, दत्त, गणेश इ. साक्षात परमेश्वस्वरूप मानलेले देव या ऐतिहासिक व्यक्ती होत्या, असे कोणीही मानीत नाही... रामापेक्षाही कृष्णाला हिंदुधर्मात अधिक महत्त्व आले, ते त्याने स्थापन केलेल्या भागवतधर्मामुळे अथवा  भक्तिमार्गामुळे होय. कृष्णाचाच भक्तिमार्ग हा रामभक्तीतही परिणत झाला.
कृष्णचरित्रात अद्‌भुत अतएब काल्पनिक असे प्रसंग व असेच पराक्रम वर्णिलेले आहेत... अशा अद्‌भुत प्रसंगांनी आणि पराक्रमांनी भरलेल्या या चरित्रातही वास्तविक ऐतिहासिक अंश किंवा बीजे सहज अनुमानिता येतात. वास्तवालाच कल्पनारम्य अद्‌भुत रूप दिलेले लक्षात येते. बाल्यावस्थेत कृष्णाने पूतना या साक्षसीचे स्तनपान करतानाच तिचे प्राणापहरण केले या कथेचा ‘पूतना’ नामक बालरोगातून त्याची त्वरित सुटका झाली असा अर्थ लागतो. उखळला दोराने बांधलेल्या बालकृष्णाने दोन अर्जुनवृक्षांमध्ये अडकलेल्या उखळाच्या जोरावर ते दोन अर्जुनवृक्ष पाडले, ही कथाही बांधलेले उखळ त्याने फरफटत नेले आणि बागेतील लहान बालवृक्ष त्यामुळे मोडून पडले, या वस्तुस्थितीशी जुळू शकते. गाडा उलथून टाकणे प्रचंड उन्मत्त बैलाशी झुंज घेऊन त्याची शिंगे मोडून त्याला ठार करणे बेलगाम व बेफाम झालेल्या दांडग्या घोड्याला काबूत आणून व लोळवून ठार करणे इ. पराक्रमही नवतरुण व मल्लविद्येत प्रवीण अशा बलिष्ठ कृष्णाला शक्य आहेत असंभवनीय नाहीत.
शकटासुर, वृषभासुर, केशी दैत्य, मथुरेच्या दरवाजातील कुवलयापीड हत्ती इत्यादिकांच्या निर्दालनाच्या कृष्णाच्या नवयौवनातल्या घटना वास्तविक असू शकतात... त्यांत अलौकिक बुद्धिमत्ता, शरीरसामर्थ्य, चपलता, प्रसंगावधान, धैर्य आणि कुशलता हे गुण कृष्णाच्या ठिकाणी एकत्रित झालेले दिसून येतात. चाणूरासारखे अप्रतिम मल्ल, मल्लयुद्धात खेळ खेळत ठार करण्याचीही शक्ती मल्लविद्येत प्रवीण असलेल्या व्यक्तिला असू शकते.
कृष्णाच्या बाललीलांमध्ये त्याच्या नवयौवनातीस कथांचा अंतर्भाव केला आणि त्या अधिक अद्‌भुत रसात्मक केल्या ही गोष्ट कृष्णाला ‘दिव्यावतार’ मानण्याच्या कालखंडात झालेले परिवर्तन होय... यशोदेला बालकृष्णाने आपल्या मुखात विश्वरूप दर्शन दिले, ही कथा अशा परिवर्तनानंतर प्रविष्ट झाली. गोवर्धन पर्वत करंगळीवर कृष्णाने पेलला अशा तऱ्हेच्याही कथा त्याची दिव्यावतार म्हणून पूजा झाल्यानंतर कथा होत. या कथेतही वास्तवाचे बीज स्पष्ट दिसते.
इंद्रपूजा किंवा इंद्रध्वजोत्सव बाजूला सारून गोप्रचार तसेच भूमीच्या किंवा पर्वताच्या पूजनाचा कृष्णाने पुरस्कार केला, ही गोष्ट कृष्णाच्या नवयौवनात घडणे शक्य आहे... वैदिक श्रेष्ठ देव असलेल्या इंद्राचे माहात्म्य कमी करून जुन्या धार्मिक परंपरांना महत्त्व देऊन त्या सुरू करण्याचा कृष्णाचा यत्न होता. वैदिकेतर व वेदपूर्व हिंदुधर्मातील परंपरांना उजाळा देणारा थोर धर्मसुधारक म्हणूनही कृष्णाचे महत्त्व या कथेने चांगले सूचित होते. वैदिक यज्ञधर्माच्या परंपरेला दुय्यम लेखणारा आणि वासुदेवभक्तिसंप्रदाय, उपनिषदांच्या तत्त्वज्ञानाचा आधार देऊन, दृढ करणारा कृष्ण ही सर्वश्रेष्ठ ऐतिहासिक व्यक्ती होय, असे त्याच्या चरित्रातील अनेक कथांवरून सूचित होते. गोपालन आणि गोमातेची पूजा हा हिंदुधर्मातील एक केंद्रवर्ती आचारधर्म आहे. या आचारधर्माला कृष्णाने प्राधान्य दिले.
कृष्णाचा ‘देवकीपुत्र कृष्ण’ असा उल्लेख छांदोग्य उपनिषदात (३·७·६) आला असून, मनुष्य जीवनच यज्ञ म्हणून चालवावे या यज्ञाच्या दक्षिणा तप, दान, ऋजुता, अहिंसा आणि सत्यवचन ह्या होत असा उपदोश घोर अंगिरस या ऋषीने केल्यामुळे कृष्ण हा तृष्णामुक्त झाला, असे त्यात म्हटले आहे... भगवद्‌गीतेशी हा उपदेश जुळतो. वासुदेव कृष्णाचा अर्जुनाबरोबर उल्लेख पाणिनीने केलेला आहे. क्षत्रिय म्हणून या दोघांनाही पाणिनिकाली मान्यता नसावी. मूळ महाभारत (इ. स. पू. सु. ३००), हरिवंश (इ. स. पू. सु. दुसरे-तिसरे शतक), विष्णुपुराणाचा (सु. पाचवे शतक) पाचवा अंश, भागवताचा (सु. नववे शतक) दशमस्कंध आणि अखेरीस ब्रह्मवैवर्तपुराण (सु. पंधरावे शतक) हे कृष्णचरित्राचे ऐतिहासिक क्रमाने मुख्य आधारग्रंथ होत.
महाभारताच्या सभापर्वामध्ये राजसूय यज्ञात अग्रपूजेचा मान कृष्णालाच का देणे जरूर आहे, याचे समर्थन भीष्माने केले. त्या समर्थनाच्या निमित्ताने जे कृष्णचरित्र भीष्माने सांगितले आहे, ते हरिवंशातूनच जवळजवळ सगळे उचलले आहे, असे ‘भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिरा’ ने प्रसिद्ध केलेल्या हरिवंशाच्या संशोधित आवृत्तीच्या प्रस्तावनेत डॉ. प. ल. वैद्य यांनी सिद्ध करून दाखविले आहे. म्हणून असा निष्कर्ष निघतो, की कौरव-पांडवांच्या संदर्भात सांगितलेल्या कृष्णाच्या कथा ह्या महाभारतातील मूळच्या असून सभापर्वातील भीष्मोक्त कृष्णचरित्र ही हरिवंशातून घेतलेली भर आहे.
विष्णुपुराणातील कृष्णकथा ही हरिवंशांच्याच कथेत काही भर टाकून सांगितलेली आहे... आज भारतात सर्वत्र प्रसृत असलेली कृष्णकथा ही मुख्यतः भागवताच्या दशमस्कंधातील कृष्णकथा होय. दशमस्कंध हा कृष्णकथेला वाहिलेला स्कंध आहे. हरिवंशातीलच कथांना अधिक अद्‌भुत रम्य रूप दिले. वत्सक, अघासुर, प्रलंब आणि शंखचूड या असुरांच्या वधाचे प्रसंग, ही त्यातील हरिवंशापेक्षा निराळी अशी भर आहे. कुब्जेवरील प्रेमाच्या कथेतही अधिक रंग भागवताने भरला आहे. ‘ब्रह्मस्तुती’ आणि ‘वेदस्तुती’ हीही अधिक भर घातलेली प्रकरणे होत.
रूक्मिणीस्वयंवर कथेमध्येसुद्धा रूक्मिणीने कृष्णाला पाठविलेले प्रेमपत्र हरिवंशात नाही, ते येथे आहे... हरिवंशातील केवळ कृष्णाची किर्ती व रूक्मिणीच्या सौंदर्याचे वर्णन कानावर आल्यामुळे, दोघांची प्रीती एकमेकांवर बसली, असे म्हटले आहे. भागवतात गोपी आणि कृष्ण यांच्या शृंगाराचे उत्तान वर्णन आले आहे. तसेच कृष्ण व गोपींची रासक्रीडा खूप खुलवून सांगितली आहे. हरिवंशात हा शृंगार आणि क्रीडा सूचक रूपानेच तेवढी आली आहे. महाभारत, हरिवंश व भागवत यांमध्ये कृष्ण हा गोपींचा प्राणवल्लभ म्हणून निर्दिष्ट केलेला असला, तरी तेथे कोठेही राधेचा निर्देश नाही. हालाच्या गाथासप्तशतीत (सु. पाचवे शतक) राधा  व कृष्ण यांच्या प्रणयाचा उल्लेख आला आहे. राधा ही इतर गोपींप्रमाणेच परकीया आहे, असे एक मत धरून मध्ययुगीन काही काव्ये लिहिली आहेत, तर राधा व कृष्ण यांचा विवाह झाला, असे धरून काही काव्यांमध्ये वर्णन आहे.
राधा ब्रह्मवैवर्तपुराण  व जयदेवकविरचित गीतगोविंदात कृष्णाची परमप्रिया म्हणून चमकते. ब्रह्मवैवर्तात विष्णूची आदिमायाशक्ती हीच राधा बनली. मूळमहाभारतात जशी कालांतराने भर पडत गेली, तशी मूळ हरिवंशातही ती पडत गेली व मूळ ग्रंथ दुप्पट अथवा तिप्पट झाले. वरील सर्व ग्रंथांमध्ये असलेल्या कृष्ण चरित्रांपैकी भागवतातील कृष्णचरित्र हे मध्ययुगीन देशी भाषांमध्ये प्रामुख्याने प्रसृत झाले. कृष्णाच्या बाललीला आणि राधाकृष्णप्रणय मराठी संतांच्याही कवितांचा विषय बनला.

कृष्णचरित्र...:
यदुवंशाच्या वृष्णिकुलात कृष्णाचा जन्म झाला... वृष्णी हा यदुवंशातील भीम सात्वत याच्या चार पुत्रांपैकी एक पुत्र. भजमान, देवावृध, अंधक व वृष्णी या चार भावांमध्ये यादवांचे राज्य विभागले होते. अंधकाकडे मथुरा व तिच्या भोवतालचा परिसर होता. अंधकाचा पुत्र कुकुर. कुकुराच्या वंशातील आहुकाला देवक, उग्रसेन इ. पुत्र झाले. देवकाला चार मुलगे व सात मुली झाल्या. त्यांपैकी देवकी ही कृष्णाची माता होय. उग्रसेनाला नऊ पुत्र व पाच पुत्री झाल्या. उग्रसेनाचा सगळ्यात ज्येष्ठ पुत्र कंस होय. कंसाने आपला पिता उग्रसेन यास बंदिखान्यात टाकून मथुरेचे राज्य बळकावले. वसुदेव उग्रसेनाचा मंत्री होता. वृष्णी, अनमित्र, देवमीढुष, शूर आणि शूराचा वसुदेव अशा पिढ्या सांगितल्या आहेत. वसुदेवाची सख्खी बहीण ‘पृथा’ म्हणजे पहिल्या तीन पांडवांची माता कुंती होय. कुंती ही कुंतभोज राजाला दत्तक गेली होती. देवकाची कन्या देवकी ही वसुदेवाची पत्नी आणि कृष्णाची माता होय. वसुदेवाला देवकी, रोहिणी इ. सात भार्या होत्या.
वसुदेवाच्या विवाहाच्या अखेरीस वसुदेव व देवकी यांची रथावरून मिरवणूक निघाली... या रथाचे सारथ्य कंसाने आपली चुलत बहीण जी देवकी तिच्यावरील प्रेमामुळे केले. या मिरवणुकीच्या प्रसंगी आकाशवाणी झाली, की ‘कंसा तुझा शत्रू, तुझा वध करणारा, देवकीच्या पोटी जन्माला येणार आहे’. हरिवंशातील चरित्रात मात्र असे म्हटले आहे, की नारदमुनींनी कंसाचा आतिथ्यसत्कार स्वीकारल्यावर त्याला भविष्य सांगितले, की ‘देवकीचा आठवा गर्भ हा तुझा अंत करणारा होणार आहे’. वसुदेव हा उग्रसेनाचा मित्र असलेला मंत्री. त्याच्याबद्दल कंसाच्या मनात अढी होतीच. जरासंधाचा कंस हा जावई. जरासंध हा सर्व भारतवर्षातील सर्वश्रेष्ठ सम्राट, राजांचा राजा होता. त्याच्या पाठिंब्यावर कंसाने उग्रसेनाला म्हणजे आपल्या पित्याला पदच्युत करून सिंहासन बळकावले होते. कंस एका मोठ्या सम्राटाच्या पाठिंब्यामुळे अत्यंत उध्दट बनून त्याने प्रजेकडून जबरदस्त करभार वसूल करण्याचा सपाटा लावला. कंस यादवकुलीन होता. यादवांची विशेषतः वृष्णी आणि अंधक कुलांची गणराज्ये होती. स्वतः कंस गणांच्या संमतीने राजा न बनता आपल्या सासऱ्याच्या बळावर राजा बनला. त्यामुळे गणराज्याची पद्धत बिघडविल्या मुळे आणि जुलमी धोरण पतकरल्यामुळे कंसाविरुद्ध असंतोष माजला असावा आणि या असंतोषाचे प्रतिनिधी वसुदेवाचे दोन पुत्र बलराम आणि कृष्ण बनले, असा तर्क करण्यास बरीच जागा आहे.
वसुदेव हासुद्धा या असंतोषाच्या मुळाशी असावा... अनेक यादव कुले ही कृषी व गोपालन या व्यवसायांतील होती. पशुपालन व कृषिकर्म हे जोडधंदे, गंगा यमुनेच्या दुआबात भरभराटीस आले होते. भारी कारभारामुळे पशुपालन करणाऱ्या गणांमध्ये असंतोष माजला व नंदगोप हा वसुदेवाचा मित्र, कंसाचा गोपालक असूनही वसुदेवाच्या पक्षाला येऊन मिळाला. मथुरेच्या तीरावर ‘व्रज’ म्हणजे गोकुळ होते. ही विपुल समृद्धी मिळालेली व्रज्रभूमी होती. नंदगोपाकडे वसुदेवाने आपली दुसरी पत्नी रोहिणी ही सुरक्षिततेकरिता पाठविली होती.
आकाशवाणी वा नारदाची भविष्यवाणी ऐकल्यावर कंस भडकला आणि तो देवकीचा वध करण्यास उद्युक्त झाला... वसुदेवाने त्याची समजूत घातली व स्त्रीवधापासून त्याला परावृत्त केले, असे भागवतात म्हटले आहे. हरिवंशात ही मिरवणुकीतील आकाशवाणी सांगितली नाही. तेथे असे म्हटले आहे, की नारदाची भविष्यवाणी लक्षात ठेवून कंसाने वसुदेवाच्या घरावर गुप्त रक्षक ठेवले त्यांत स्त्रियाही होत्या. देवकीला संतती झाल्याबरोबर कंसाला संदेश येई आणि त्याप्रमाणे तो नवप्रसूत बालकाचा ताबडतोब वध करून निकाल लावी. अशी सहा बालके त्याने नष्ट केली. सातवा गर्भ उदरात आल्याबरोबर देवकीच्या गर्भाशयातून ओढून घेऊन योगनिद्रादेवीने तो रोहिणीच्या गर्भाशयात ठेवला. तोच बलराम म्हणून जन्मला. त्याचे जन्मनाव ‘संकर्षण’ होय. एकीकडून ओढून दुसरीकडे नेलेला म्हणजे ‘संकर्षण’ होय. आठवा गर्भ म्हणजे साक्षात विष्णूने मानवशरीर धारण केलेला कृष्ण होय. हा प्रसूतिकाली चतुर्भुज विष्णूच्या रूपाने देवकीपुढे प्रगट झाला परंतु देवकीच्या प्रार्थनेने त्याने पुन्हा  नवजात बालकाचे रूप धारण केले. हा श्रावण कृष्ण अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर किंवा अभिजित नक्षत्रावर जन्मला.
यावेळी भागवतात सांगितल्याप्रमाणे वसुदेव व देवकी यांच्या पायांत लोखंडी बेड्या कंसाने अडकविल्या होत्या, त्या एकदम निखळून त्यांचे पाय मोकळे झाले. हरिवंशाप्रमाणे बेड्या घातल्याच नव्हत्या. वसुदेवाने मध्यरात्रीच या बालकाला नंदगोपाच्या गोकुळात नेले. नंदगोपाची पत्नी यशोदा नुकतीच बाळंतीण झाली होती तिला मुलगी झाली होती. ती मुलगी वसुदेवाने उचलली, बालकृष्णाला तिच्या कुशीत झोपविले व तिच्या कन्येला घेऊन परत सूर्योदयाच्या आत तो मथुरेत स्वगृही परतला. भागवतामध्ये हा प्रसंग अधिक अद्भुतरम्य करून वर्णिला आहे.
कृष्णजन्माच्या वेळी भर पावसाळा सुरू होता, यमुना दुथडी भरून वाहत होती, तिने दुभंगून वसुदेवाला वाट दिली, असे तेथे म्हटले आहे. सकाळी कंसाला देवकी प्रसूत झाल्याची वार्ता मिळाली... वसुदेवाने आणलेली यशोदाकन्या त्याच्या हाती लागली. त्याने तिला शिळेवर आपटण्याकरिता उचलले. तोच ती त्याच्या हातातून निसटून तिने आकाशात आपले संपूर्ण शारदादेवीचे रूप प्रगट केले आणि कंसाला सांगितले, की ‘तुझा शत्रू अन्यत्र वाढत आहे’. ही योगनिद्रादेवी यशोदेच्या गर्भात आली, कंसाच्या हातून निसटली, विष्णूच्या वरदानामुळे विंध्यवासिनी देवी बनली आणि सर्व मानवांना पूजनीय, विघ्ननाशिनी व सर्वकाम प्रदायिनी बनली, असे सर्व पुराणांतल्या कृष्णचरित्रांत सांगितले आहे.....

याचा अभिप्राय असा, की वासुदेव भक्तिसंप्रदायाने किंवा वैष्णव संप्रदायाने देवीपूजेचा वेदपूर्व धर्म मान्य केला.....

स्त्रोत: मराठी विश्वकोश...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...