गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५

2177. राखी पौर्णिमा

 या वर्षी राखीला नको येऊस… मी आणि तुझा भाऊ शिमल्याला जात आहोत…
"नंदिता, या वर्षी राखीला नको येऊस… मी आणि तुझा भाऊ शिमल्याला जात आहोत..."
हा व्हॉट्सअॅप मेसेज होता बिनीतच्या पत्नी रिया कडून... साधा वाटणारा, पण त्यामागे लपलेला होता एक कटाक्ष, एक टोमणा आणि एका बहिणीच्या हृदयावर खोल घाव करणारा शब्दबाण.
नंदिता, जिला राखीच्या दिवशी नेहमी भाऊ - बिनीतला राखी बांधायला सगळ्यांत आधी जायची सवय होती, त्या दिवशी ती खूप वेळ तो मेसेज बघत राहिली. त्या दोन ओळींनी तिचं संपूर्ण आयुष्य जणू ओरबाडून टाकलं.
बालपणापासून आजवर तिचं प्रत्येक सुख-दुःख बिनीतसोबतच होतं. आई-वडिलांच्या जाण्यानंतर तर तोच तिचं सगळं विश्व बनला होता.
नंदिता आणि बिनीत यांच्यात फक्त दोन वर्षांचं अंतर होतं. आईच्या सावलीत दोघं वाढले, पण नियतीनं लवकरच ती सावली हिरावून घेतली. वडील आधी गेले, मग आईने कॅन्सरशी लढत असतानाही दोघांची काळजी घेतली. आई गेली, तेव्हा नंदिता फक्त २० वर्षांची आणि बिनीत १८ चा.
नंदिताने स्वतःचं शिक्षण अर्धवट सोडलं, ट्युशन्स घेतल्या, आणि बिनीतला इंजिनीयर बनवण्याचं स्वप्न आईप्रमाणेच स्वतःच्या डोळ्यांत साठवून ठेवलं. स्वतःचे सगळे स्वप्नं विसरून ती फक्त बिनीतच्या डोळ्यांतली चमक बघत राहिली.
जेव्हा बिनीत इंजिनीयर झाला आणि शहरात नोकरीला लागला, तेव्हा त्याने पहिल्यांदा नंदिताला सांगितलं,
"ताइ, आता तुझी सगळी स्वप्नं मी पूर्ण करीन."
नंदिता फक्त हसली... कारण तिला माहित होतं, तिचा बिन्नू अजूनही तसाच आहे... छोटा, निरागस.
पण जेव्हा बिनीतचं लग्न झालं, तेव्हा सारं काही हळूहळू बदलायला लागलं.
रिया एक मोठ्या घरातली, शहरी विचारांची मुलगी होती. तिला नंदिताचं वारंवार येणं खटकत होतं. तिनं बिनीतला हळूहळू समजावलं, "तुझ्या बहिणीनं आता तिच्या आयुष्यात लक्ष द्यायला हवं... आता आपलं आयुष्य आपल्यापुरतंच असावं."
लग्नाच्या पहिल्या वर्षी नंदिता राखीला आली. रियानं गोडगोड बोलून तिचं स्वागत केलं, पण नंतर बिनीतला म्हणाली,
"इतकं मोठं गिफ्ट का दिलंस ? दरवर्षी राखीला एवढं काही करणं गरजेचं आहे का?"
बिनीत फक्त हसून म्हणाला,
"ताईनं माझ्यासाठी सगळं केलंय, रिया. ती फक्त एक दिवस मागते, तेवढं तरी देऊया ना."
पण त्या नंतरच्या वर्षांपासून रियानं अडथळे निर्माण करणं सुरू केलं…
आणि या वर्षी तर थेट मेसेजच... "या वर्षी राखीला नको येऊस… मी आणि तुझा भाऊ शिमल्याला जात आहोत..."
त्या एका मेसेजनं नंदिताचं हृदय फाटलं. तिनं हातात फोन घेतला, थरथरत्या बोटांनी नंबर डायल केला.
“हॅलो, ताई..”
“शिमल्याला जाताय?”
“हो ताई, अचानक प्लॅन झाला...”
“ठीक आहे, आनंदी रहा…”  एवढंच बोलून नंदितानं फोन ठेवला.
पण डोळ्यातून ओघळणारे अश्रू थांबले नाहीत… जणू त्या अश्रूंमध्ये तिची राखी विरघळून गेली होती.
त्याच रात्री तिनं आईच्या फोटोसमोर दिवा लावला आणि शांतपणे म्हणाली,
"आई… बघ, तुझा बिनीत आता मोठा झालाय… त्याला आता बहिणीची गरज नाही."
शिमल्यात, त्या रात्री बिनीतला झोप लागेना. त्याला नंदिताच्या आवाजात काहीतरी तुटतंय असं वाटत होतं.
रिया हसून म्हणाली,
“आता आपण आपल्याच कुटुंबात आहोत ना? प्रत्येक वेळी त्या जुन्या नात्यांना ओढत ठेवायचं काय कारण?”
बिनीत गप्प राहिला… पण मन अस्वस्थ होतं.
राखीच्या दिवशी सोशल मीडियावर सर्वजण त्यांच्या बहिणींसोबतच्या फोटो टाकत होते… बिनीतचं मन उदास होत चाललं होतं.
अचानक त्याला एक पोस्ट दिसली —
"काही नाती कच्च्या दोऱ्यांनी नाही तर त्यागानं बांधलेली असतात... पण जेव्हा एक त्याग करतं आणि दुसरं विसरतं, तेव्हा ते नातंही तुटून जातं..."
ही पोस्ट होती नंदिताची.
बिनीतचे हात थरथरले. त्याचं हृदय धडधडू लागलं.
त्याने रियाकडे पाहून सांगितलं,
“रिया, मला नागपूरला जायचंय… ताईकडे"  रिया आश्चर्यचकित झाली, “अरे पण आपण तर शिमल्याच्या सुट्ट्या प्लॅन केल्या आहेत ना?”
“रिया, तू जे समजशील ते समज… पण मी फार मोठा विश्वासघात केलाय. माझी ताई जी आईसारखी होती, जिनं माझ्यासाठी सर्व काही सोडलं… तिला मी एका मेसेजनं दूर केलं.”
रिया नाराज होऊन दुसरीकडे बघू लागली, पण बिनीतनं सामान घेतलं आणि नागपूरच्या दिशेने रवाना झाला.
नागपूरला पोहोचल्यावर.... 
नंदिता तिच्या छोट्याशा खोलीत बसली होती. डोळे लाल, मन तुटलेलं.
डोअरबेल वाजली… दरवाजा उघडला आणि तिथे बिनीत उभा होता... हातात राखी घेऊन.
नंदिता रडत रडत त्याच्या मिठीत शिरली.
“ताई... माफ कर... मी फार छोटा ठरलो रियासमोर... तुझ्या प्रेमाला विसरलो…”
“नाही रे बाळा... तू लहान नाहीस, फक्त दुनियेच्या धक्क्यांत हरवलास. पण आजही तू तोच आहेस.. माझा बिन्नू… शाळेत डब्बा विसरून परत येणारा!”
बिनीतनं तिचा हात हातात घेतला...
“ताई, चल माझ्यासोबत. तुझ्याशिवाय माझं घर अपुरं आहे.”
त्या वर्षी रियानं राखी एकटीने साजरी केली… पण पुढच्या वर्षी जेव्हा नंदिता आली,
रिया स्वतः दरवाज्यापाशी आली आणि नम्रपणे म्हणाली..
“नमस्कार ताई… तुमचं स्वागत आहे.”
---
कधी कधी राखी फक्त एक दोरा नसतो… तो एक इतिहास असतो — प्रेम, त्याग आणि नात्यांची कसोटी असतो.
जर बहीण असेल तर नंदितासारखी आणि भाऊ असेल तर बिनीतसारखा — जो चुकून हरवला, तरी शेवटी परत आलाच.
---
कथा आपल्याला शिकवते की कुटुंबाची नाती वेळेवर किंवा अंतरावर नाही, तर हृदयावर चालतात.
राखीचं नातं तुटलं तरी, मनं पुन्हा ते दोरे  बांधू शकतात. 💕💕

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...