रात्री साधारणपणे नऊच्या सुमारास प्रफुल्ल साहेब ऑफिसमधून आपल्या चकचकीत मर्सिडीज कारने परतले. कार घराच्या मुख्य गेटमधून आत येताच ड्युटीवर असलेला सुरक्षा रक्षक धावत त्यांच्या गाडीपाशी आला आणि सॅल्यूट करत म्हणाला,
“साहेब ! एक महिला आपल्यासाठी कोणीतरी लिहिलेली चिठ्ठी घेऊन इथे बराच वेळ भटकत आहे आणि वारंवार आपल्याला भेटायची विनंती करत आहे. मी तिला कितीही समजावलं, तरी ती जायला तयार नाहीये. तिच्यासोबत एक लहान मूलसुद्धा आहे.”
प्रफुल्लजींना हे ऐकून आश्चर्य वाटले. त्यांनी त्या महिलेला आवाज देऊन बोलावलं आणि विचारलं,
“तुम्ही कुठून आलात आणि मला का भेटायचं आहे? ही चिठ्ठी कोणी लिहिली आहे?”
थरथर कापत, फारसं काही न बोलता त्या महिलेने प्रफुल्लजींना चिठ्ठी दिली आणि सुस्कारा टाकत म्हणाली,
“साहेब ! मी एक दुर्दैवी स्त्री आहे. फार मोठ्या संकटात सापडले आहे. आपल्या वडिलांनीच ही चिठ्ठी मला देऊन आपल्याकडे पाठवलं आहे. माझं एकुलतं एक मूल खूप आजारी आहे. कृपा करून त्याला शासकीय रुग्णालयात भरती करून द्या. तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. गावात योग्य उपचार मिळत नाहीत म्हणून मी शेवटी इथे आले आहे.”
चिठ्ठी देऊन ती महिला प्रफुल्लजींसमोर हात जोडून उभी राहिली.
प्रफुल्लजींनी शांतपणे चिठ्ठी वाचली. काही क्षण ते गंभीर होत गेले.
कधी त्या महिले कडे, कधी चिठ्ठीकडे पाहत ते खोल विचारात बुडाले.
खरंतर त्या चिठ्ठीसोबत आजारी मुलाला घेऊन ती महिला गावाहून शहरात फक्त उपचारासाठी आलेली होती.
प्रफुल्लजींनी लगेच सुरक्षारक्षकाला त्या महिला आणि मुलासाठी गेस्ट रूममध्ये राहण्याची व्यवस्था करायला सांगितली, आणि लगेच दोघांसाठी जेवणाचीही सोय केली.
त्या महिलेने पुन्हा विनंती करत सांगितलं,
“साहेब, कृपा करून माझ्या मुलाला शासकीय रुग्णालयात भरती करून द्या, नाहीतर याचा जीव वाचणार नाही.”
ती त्यांच्या पायावर कोसळली.
“अहो ताई, असं करू नका. आपण माझ्या बहिणीसमान आहात. काळजी करू नका, सगळं ठीक होईल.” प्रफुल्लजींनी तिचं धैर्य वाढवलं.
इतक्यात हॉर्न वाजवत एक दुसरी गाडी आत आली आणि काही क्षणांतच डॉक्टरही पोहोचले.
प्रफुल्लजी म्हणाले, “या डॉक्टरसाहेब, हे मूल आजारी आहे, कृपया काळजीपूर्वक तपासा आणि लगेच उपचार सुरू करा.”
डॉक्टरांनी वेळ न दवडता मुलाला बारकाईने तपासलं. सुमारे वीस मिनिटांनी त्यांनी काही तपासण्या आणि औषधांची यादी प्रफुल्लजींना दिली.
“ही औषधं आणि इंजेक्शन ताबडतोब मेडिकलमधून आणा. मी या मुलाचं रक्त नमुना तपासणीसाठी घेऊन जातो. रिपोर्ट घेऊन उद्या परत येईन.” असं सांगून डॉक्टर निघून गेले.
प्रफुल्लजींनी ड्रायव्हरकडे औषधांची यादी आणि पैसे दिले व औषधं आणायला पाठवलं. ते घरात जायला वळले तेव्हा ती महिला पुन्हा म्हणाली,
“साहेब, आपण फक्त मुलाला सरकारी रुग्णालयात भरती करुन द्या. माझ्याकडे पैसे नाहीत. मी गरीब आहे.”
प्रफुल्लजींनी शांतपणे उत्तर दिलं,
“ ताई आता काळजी करू नका. जरा विश्रांती घ्या. खूप रात्र झाली आहे.” असं सांगून ते घरात गेले.
सकाळी डॉक्टर रिपोर्ट घेऊन आले. त्यांनी मुलाला औषधं दिली.
प्रफुल्लजीनी ऑफिसला निघण्यापूर्वी दोघांसाठी जेवणाची नीट सोय केली व सर्वांना त्यांची काळजी घेण्याचे निर्देश दिले.
डॉक्टर आता रोज येत व योग्य उपचार करत. सुमारे महिन्याभरात ते मूल पूर्णपणे बरे झाले. तेव्हा महिला प्रफुल्लजींसमोर येऊन म्हणाली,
“साहेब, माझं मूल आता अगदी ठणठणीत आहे. आम्ही परत गावाला निघतोय आता. आपण आमच्यासाठी जे केलं, त्यासाठी मी आणि माझं मूल आयुष्यभर तुमचे आणि तुमच्या वडिलांचे ऋणी राहू.”
महिला जेव्हा निघाली, तेव्हा प्रफुल्लजींनी काही पैसे आणि नविन कपडे दिले. त्यासोबतच एक चिठ्ठी दिली आणि म्हणाले,
“ही चिठ्ठी माझ्या वडिलांना द्या, ज्यांनी तुम्हाला इथे पाठवलं.”
महिला हात जोडत, मनापासून आशीर्वाद देत तिथून निघाली. दुसऱ्याच दिवशी ती आपल्या गावात पोहोचली आणि कृष्णकांतजींना चिठ्ठी दिली.
त्या वेळी ती आनंदाने म्हणाली,
“बाबा ! तुमचा मुलगा तर देव आहे ! किती काळजी घेतली त्याने आमची. असा मुलगा नशिबवानालाच मिळतो. देव त्याला आणि त्याच्या कुटुंबाला सुखी ठेवो.”
कृष्णकांतजींनी ती चिठ्ठी वाचली, आणि वाचून स्तब्ध झाले. त्यात लिहिलं होतं.
“परम आदरणीय साहेब,
मी तुम्हाला ओळखत नाही, आणि कधी भेटलोही नाही. पण आता तुमचा मुलगा या पत्त्यावर राहत नाही. काही महिन्यांपूर्वीच त्याने हे घर विकलं आहे. आता मी इथे राहतो.
पण कृपया मला तुमचा मुलगाच समजा.
लहानपणापासून मला वडिलांचं प्रेम मिळालं नाही. फक्त आईनेच वाढवलं.
तुमचं पत्र वाचल्यावर मला असं वाटलं, जसं माझ्या सख्ख्या वडिलांनी काहीतरी करण्याचा आदेश दिला आहे.
कृपया या ताईंना काहीही सांगू नका.
तुमच्यामुळे या ताईंकडून जे आशीर्वाद मिळाले, त्या उपकारासाठी मी तुमचा ऋणी राहीन.
सादर प्रणाम.
आपला धर्मपुत्र
प्रफुल्ल ”
---
चिट्ठी वाचून ते एकदम स्तब्ध झाले.
कृष्णकांतजींचं डोकं त्या अनोळखी सज्जनासाठी आदराने झुकलं.
त्यांच्या मुलाने जुगाराच्या नादात घर विकलं होतं, त्यांची आब्रू धुळीस मिळवली पण एका अनोळखी, सुसंस्कारित व्यक्तीने त्यांना आपलंसं मानलं आणि त्यांच्या सन्मानाची लाज राखली.
धन्य आहे त्याचे संस्कार !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा