दोन भिक्षू नदीत पाय धुत होते. तेव्हा त्यांनी पाहिलं की, एक विंचू पाण्यात अडकलाय, धडपडतोय. विंचू पोहू शकत नाही हे माहीत असूनही वयोवृध्द भिक्षू त्याला वाचवण्यासाठी हळूहळू खाली वाकले आणि त्याला अलगद उचलून किनाऱ्यावर ठेवायचा प्रयत्न करू लागले.
पण जसजसा ते तो विंचू उचलू लागले, विंचूने त्यांच्या हातावर दंश केला. दंश झाल्यामुळे आणि वेदनेने त्याच्या हातून विंचू खाली पडला. तरीही भिक्षूनी पुन्हा प्रयत्न केला. वेगाने पुन्हा विंचू उचलला पण विंचूने पुन्हा दंश केला. असे दोन तीन वेळा झाले. मग त्यांनी तरुण भिक्षूला सांगितले, जरा किनाऱ्यावरून एक झाडाची फांदी आण. त्या फांदीच्या साहाय्याने त्याने विंचूला अलगद उचलून किनाऱ्यावर सुरक्षित सोडलं. हे पाहून तरुण भिक्षू विचारतो, तो विंचू तुम्हाला सतत दंश करत होता. तरीही तूम्ही पुन्हा पुन्हा त्याला वाचवायला का गेलात? तो किती कृतघ्न प्राणी आहे.
त्यावर वयोवृध्द भिक्षू म्हणाले, मी पाण्यात शिरलो तर माझं भिजणं निश्चितच. कारण पाण्याचं स्वभावच भिजवणं आहे. ते तिकडे एक झाड आहे बघ. कोणताही प्राणी, मनुष्य, सज्जन असो वा दुर्जन, त्या झाडाच्या सावलीत निवांत बसू शकतो. ते झाड कधी विचारत नाही; तू कोण आहेस, तुझं वय काय, तुझं आचरण कसं आहे. ते सर्वांना सावली देतं, कारण ते त्याचं नैसर्गिक स्वभाव आहे. तसेच विंचूचं नैसर्गिक स्वभाव आहे दंश करणं. त्याने दंश केला हे त्याच्या स्वभावानुसारच झालं. ते वैयक्तिक नव्हतं, म्हणून त्याचा राग मानू नकोस.
आपण मानव असुन आपला खरा स्वभाव म्हणजे; सर्व सजीवांवर करुणा ठेवणं. जस झाड कोणताही भेद न करता सर्वांवर सावली धरतं; तसंच आपणही कसल्याही भेदभावा शिवाय सर्व सजीवांवर करुणा करायला हवी. तरच आपण आपल्या खर्या स्वभावाशी एकरूप होऊन आपण त्या दुःखांपासून मुक्त होऊ. भेदभाव आसक्तीतून निर्माण होतात.
बोधकथा संकलन : अनिल शेजूळ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा