बुधवार, ६ ऑगस्ट, २०२५

2135. शेवटची भेट

      पालघरला दिलीपरावांचा छान टुमदार, कौलारू घर होतं. त्याबरोबरच फणस, आंब्याची वाडी आणि नारळाच्या बागा होत्या. 40 वर्षे विमलाताई आणि दिलीप रावांनी ते घर अगदी निगूतीने सजवलं होतं. बागांना, वाडीला अगदी स्वतःच्या मुलासारख जपलं होतं. प्रत्येक फळाला आणि पानाला ते जिवापालीकडे जपत होते कारण आता हेच त्यांच विश्व झालं होतं. विश्वच काय त्यांच्या आयुष्याला या आंब्यांनी आणि फणसांनीच तर पूर्ण केलं होतं. नाही म्हणायला  त्यांना एक मुलगा होता पण शिक्षणाच्या निमित्ताने त्याने गाव सोडलं आणि शहराचा मार्ग धरला आणि पुढे बायकोबरोबर तिकडेच स्थिरावला.एक दिवस विमलाबाई पाय घसरून पडायचं निमित्त झालं आणि त्यांनी अंथरूणच धरलं, कारण कमरेच्या खुब्याला गंभीर मार लागला होता.पण दिलीपराव हरले नाहीत की दुःख करत बसले नाहीत.अगदी लहान मुलीसारखं ते विमलाबाईंना सांभाळू लागले. विमलाबाईंनी मुलाची, सुनेची खूप वाट पाहिली, पण पडल्यावर एकदा मुलगा व सून बघून गेले ते पुन्हा फिरकलेच नाहीत. तसा दोघांचाही मुलावर खूप जीव होता पण विमलाबाई मात्र रोज मुलाची आठवण काढत असत. शेवटी आईच ती.
      विमलाबाईंनी मुलाची आठवण काढली की, दिलीपराव त्यांना गमतीने म्हणायचे, "जो तुझी अजिबात विचारपूस करत नाही, का तुझी आठवण काढत नाही  त्याच्या नावाचा तू जप करतेस आणि मी तुझ्या नावाचा जप करतो तर तू माझ्याकडे बघत पण नाही." दिलीपरावांच्या वाक्यावर विमलाबाई खळखळून असायच्या. पण हसता हसता डोळ्यात केव्हा पाणी यायचं हे त्यांचं त्यांनाच कळायचं नाही. आणि दिलीपराव पुन्हा एखादा विनोद सांगून त्यांना हसवायचे. असेच दोघांचे दिवस सरत होते. दिलीप रावांचा तर दिवस केव्हा सुरू होऊन केव्हा संपायचा कळायचंच नाही. कारण बागेतील कामं, घरातील सगळं आवरण, नाही म्हणायला फक्त शेजारची चिमी येऊन स्वयंपाक तेवढा करून द्यायची. आणि म्हणायची, "तात्या आक्काचा मी देऊ का आवरून "?त्यावर दिलीपराव म्हणायचे,"अगं चीमे लग्नात तुझ्या अक्कांनी वचन घेतलय माझ्याकडून तिची साथ देण्याचं. मग मी माझं वचन कसं मोडू? आधीच तर मी एवढं करून सुद्धा माझ्या आधी पोराचं नाव घेते. पोरगा लाडका आहे ना तिचा, नवरा नाही.काय हो ! मी नाही ना तुमचा लाडका माझं नाव घेते का? विचार बरं चिमे तिला". दिलीपरावांच्या वाक्यावर विमलाबाई लाजून," इश्य! तुमचं आपलं काहीतरीच ".एवढंच म्हणायच्या आणि मग सगळे खळखळून हसायचे.
        विमलाबाई दाखवत नव्हत्या पण त्यांना दिलीपरावांचे हाल दिसत होते. त्यांची कसरत समजत होती.पण त्या शरीराने आणि मनाने सुद्धा हतबल झाल्या होत्या.फक्त दिलीपराव होते म्हणून त्या तग धरून होत्या.नाहीतर त्यांची जीवन यात्रा कधीच संपली असती.मुलाचे एवढं करून पण मुलगा साधं विचारात पण नाही ही सल त्यांच्या मनात आतल्या आत त्यांना खूप बोचत होती. पण दिलीपरावांसाठी त्या खुश असल्यासारखं दाखवायच्या. आणि दिलीप रावांचं पण काही वेगळं नव्हतं.मनातला मुलाविषयीचा राग,दुःख मनातच ठेवून ते विमलाबाईन समोर खुश असायचे.
         एक दिवस रात्री विमलाबाईंना खूप अस्वस्थ वाटू लागलं.तेव्हा त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं.त्या जाताना पुन्हा पुन्हा दिलीपरावांना सांगत होत्या," विजू ला फोन करा मला त्याला एकदा बघायचंय ".पण दिलीप रावांना पुन्हा पहिले पाढे पन्नास करायचे नव्हते,कारण याआधी विमलाबाई जेव्हा आजारी होत्या तेव्हा त्यांनी मुलाला फोन केला तर त्याने रजा नाही मिळणार असं कारण दिलं होतं आणि पैसे पाठवून दिले होते.पण यावेळी त्यांनी मुलाला त्रास द्यायचा नाही हेच ठरवलं आणि फोन केलाच नाही. रात्री दिलीपराव येताच, पुन्हा विमलाबाईंनी मुलाला फोन करायचा तगादा लावला. त्यासारखं म्हणत होत्या,"एकदा माझ्या विजू ला फोन लावा, त्याला म्हणावं,'फक्त एकदा येऊन आईला भेटून जा".हेच वाक्य त्या परत परत बोलत होत्या.पण मग दिलीपरावांनी पण इच्छा नसताना सुद्धा मुलाला फोन लावला. पहिल्यांदा तर त्याने फोन उचललाच नाही. म्हणून त्यांनी पुन्हा फोन लावला, तेव्हा आईचा लाडका विजू त्याच्या बापावर जवळ जवळ खेकसलाच,
"किती वेळा फोन करताय बाबा,मी कामात आहे, कळत नाही का तुम्हाला, काय एवढं अर्जंट काम आहे?"
त्यावर सगळा राग गिळून दिलीपराव म्हणाले,"अरे विजू तुझ्या आईला तुला एकदा बघायचंय रे आजारी आहे ती आणि ती दवा..."  वडिलांचे बोलणे पूर्ण होऊ न देताच आईचा लाडका विजू म्हणाला,
"अहो बाबा उद्या पैसे पाठवतो आणि आता रजा नाही मिळणार आम्ही फिरायला गेलो तेव्हा खूप सुट्ट्या झाल्या. उद्या पैसे पाठवतो, एखादी नर्स ठेवून घ्या." एवढे बोलून त्यांनी फोन कट केला. दिलीप रावांचं म्हणणं त्यांनी ऐकून सुद्धा घेतलं नाही. दिलीपरावांच्या डोळ्यात पाणी आलं पण ते लपवतच ते विमलाबाईंना म्हणाले, 
"अग त्याला ऑफिसचं महत्त्वाचं काम आलय थोड्या दिवसांनी तो तुला भेटायला येणार आहे. यावर विमलाताई एवढेच म्हणाल्या," ठीक आहे काम संपलं की येईल  माझा विजू मला भेटायला बघीन मी त्याची वाट.  त्यांनी दिलीप रावांना जेवण करून झोपायला सांगितलं आणि त्या मात्र कितीतरी वेळ एकटक बघत बसल्या होत्या. सारखी विजूची आठवण काढत होत्या.सारखा विजूचच नाव घेत होत्या.आणि त्याचं नाव घेत घेतच त्या गाढ झोपल्या.
      इकडे रात्री विजू झोपला होता आणि अचानक दार वाजले. त्यांनी वैतागून घड्याळ पाहिले तर रात्रीचे दोन वाजले होते. त्यांनी हळूच फटीतून पाहिले तर त्याला आई दिसली. त्याला जरा नवलच वाटले.त्याने दार उघडले आणि म्हणाला, 
"आई तू एकटीच कशी आली बाबा कुठे आहेत? आणि तू एवढी थकलेली कशी? तू तर चालू पण शकत नव्हती मग आता एवढ्या लांब कशीकाय आली माझ्याकडे? यावर विमलाबाई एवढेच म्हणाल्या, 
"अरे एवढे प्रश्न विचारण्याआधी मला घरात ये तरी म्हण." तो थोडा ओशाळला आणि आईला घरात घेतलं. तिला खुर्चीवर बसवलं आणि पाणी प्यायला दिलं. पाणी पिऊन झाल्यावर विमलाबाईंनी विजूच्या चेहऱ्यावर भरल्या डोळ्यांनीच प्रेमाने हात फिरवला आणि स्वतःला सावरत त्या स्वतः सांगू लागल्या,
"अरे तुझे बाबा मला जाऊच देत नव्हते पण त्यांना झोप लागली आणि तुला भेटायचं म्हटल्यावर विजू मी कसा रे धीर धरू म्हणून त्यांना चुकवून मी आले. ते जागी असते ना तर माझा पाय निघाला नसता रे तिथून.' आता सुनबाईला काही उठवू नकोस, ती पण दमली असेल."
 इतक्यात विजू म्हणाला, "आई तुला भूक लागली असेल ना "! पण यावर विमलाबाई एवढेच म्हणाल्या, 
"अरे तुला बघूनच माझं पोट भरलंय. आता मी निवांत झोपेन, तू जा तुझ्या खोलीत मी इथेच सोफ्यावर झोपते." 
एवढे बोलून त्या सोफ्यावर झोपल्या आणि त्यांना झोपलेल बघून विजू खोलीत जाऊ लागला. विमलाबाई मात्र विजू जाईपर्यंत त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक बघत बसल्या होत्या.
     अचानक रात्री तीन वाजता विजू चा मोबाईल वाजला. बाबांचा फोन होता. त्याला वाटलंच होतं, आई अशी न सांगता आली म्हणून ते वैतागले असतील आणि फोन केला असेल. पण फोन उचलताच बाबांनी रडायला सुरुवात केली आणि म्हणाले,
"विजू तुझी आई गेली रे. आता ती आपल्याला कधीच दिसणार नाही.
यावर विजू जवळपास चिडलाच, "काही पण काय बोलताय बाबा, अहो तुम्हाला झोप लागली म्हणून तुम्हाला चुकवून आई  इकडे आली आहे.आणि आता हॉलमध्ये झोपली आहे ती. माझ्याशी बोलली पण ती रात्री." यावर दिलीपराव एवढेच म्हणाले,
"अरे कसे शक्य आहे. रात्री दोन वाजता गेली रे ती सारखी तुझी आठवण काढत होती. मला रात्री झोपवून आता कायमची शांत झोपली."
        विजूचा स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. त्याने हातात फोन तसाच ठेवला आणि हॉलमध्ये धावत धावत आला पण हॉलमध्ये कोणीच नव्हतं. सोफा रिकामा होता. आणि आईने पाणी पिलेला रिकामा ग्लास शेजारीच ठेवलेला होता. त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता म्हणून तो सारखा सोफ्याला हात लावून बघत होता पण आई कुठेच दिसत नव्हती. तिथे सोफ्यावर बसून त्याने आईचा रिकामा पेला हातात घेतला आणि तो धाय मोकलून रडायला लागला. त्याच्या डोळ्यातून दुःखाचे, पश्चातापाचे आणि प्रेमाचे अश्रू ओघाळत होते. आज त्याच्याजवळ आईसाठी वाहणारे अश्रू होते पण आता आई नव्हती. शेवटी एका आईचं प्रेम जिंकलं होतं कारण मुलाला बघण्यासाठी तिने देवाला सुद्धा दाराशी थांबवून ठेवलं होतं.    
      मित्रानो, आपल्या आईवडिलांना कधीही दूर करू नका. आणि जर तुम्हाला त्यांच्याजवळ राहणे शक्य नसेल तर त्यांच्याशी किमान रोज एकदा तरी फोनवर बोला. कारण तुमचा फक्त आवाज ऐकला तरी त्यांचं पोट भरतं. काम करायला आयुष्य पडलंय पण आई-वडील.
 "आयुष्याच्या प्रत्येक वाळणावर हवं ते, हवं तसं आणि हवं तेवढं मिळेल पण जन्म देणारे आईवडील हे फक्त आणि फक्त एकदाच भेटतात "

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...