एक पोस्ट वाचनात आली त्यात म्हटलं होत की, मेडिकलच्या विद्यार्थ्यांनो, स्पेशालिस्ट पेक्षा Family Doctor व्हा !
आणि मला ते पटलं एकदम कारण त्या वाक्यानेच मी भूतकाळात गेलो आणि मी अनुभवलल्येला माझ्या फॅमिली डॉक्टरच्या आठवणी जाग्या झाल्या !
आणि खरं सांगतो मंडळी...
स्पेशालिस्ट डॉक्टर महत्वाचे आहेतच पण त्या आधी तितक्याच महत्वाचे तुमचे फॅमिली डॉक्टर आहेत. आणि म्हणून काळाच्या ओघात नामशेष होणारी हि "फॅमिली डॉक्टर" संकल्पना पुन्हा रुजली पाहिजे... त्यासाठी हा पोस्ट प्रपंच !
*
मी तसेही सहसा आजारी फार पडत नाहीत. मन चांगलं ठेवावं, स्वच्छ वातावरणात, जंगल खोऱ्यात जमेल तेव्हा भटकून ऑक्सिजन घेऊन यावा... प्राणायाम अर्धा तास आणि पायी चालणे अर्धा तास, वेळच्या वेळी जेवण आणि झोप इतकं केलं तर आजारी पडण्याची शक्यता कमी होते.
चाळीस वर्षांपासून माझी तब्येत स्वतःच्या तब्येतीपेक्षा जास्त जपणारे माझे फॅमिली डॉक्टर म्हणजे डॉ. भगली.... यांचा पुण्यातील सिंहगड रोडवरील हिंगण्यात पण एक दवाखाना होता. दुमजली वाड्याच्या लाकडी जिन्याने चढून जायचे. फी किती ? तर अवघी तीन रुपये.... औषध ? ते स्वतःकडे असलेलेच द्यायचे. त्यामुळे त्याचेही वेगळे पैसे नाहीत. (आता चाळीस वर्षानंतर सुद्धा मला वाटते फक्त पन्नास रुपये फी आहे.... काय सांगू अजून?)
आणि चार दिवसाच्या डोस मध्ये पेशंट टकाटक बरा व्हायचा.
*
मी त्यांचा फॅन झालेला त्या काळात....आता सायबर मधील कामामुळे सायबर मुळे नव्याने ओळख झाली.
तर असे हे डॉक्टर.....
माझं अनियंत्रित वेळापत्रक कारण सतत स्ट्रगल आणि स्वप्नाचा पाठलाग त्यामुळे कधीमधी बाहेरच काहीतरी खाऊन भूक शमवयाची..... आणि काहीवेळा त्याचा साईडइफेक्ट होऊन आजारपण फिक्स ! गपगुमान त्यांच्याकडे जायचो....
ते म्हणायचे... "काय मग देशपांडे... काल काय ? सारस बागेची भेळ खाऊन वर पाणी पिलेलं दिसतंय?"
आणि जणू ज्योतिषी असल्यासारखे मी त्यांच्याकडे पाहायचो....
नंतर नंतर मैत्री वाढली.
कधीतरी त्यांच्याकडे गेल्यावर मी सांगायचो.... डॉक्टर, अंगात अजिबात एनर्जी नाहीय आणि परवा दिवशी लेक्चर आहे.... तेही अमरावतीला... दहा तास प्रवास अन दोन तास लेक्चर ! तर मला चार दिवसाचा डोस नको.... एक दिवसात बरे करा "
ते बिचारे हात जोडायचे.... आणि हसून छान गोळ्या द्यायचे आणि खरेच एक दिवस बरे करायचे !
यावर मी त्यांना बोललो पण की "तुम्ही जादूगार आहात"
त्यावर ते म्हणाले, तसे नाहीय.... मी फॅमिली डॉक्टर असल्याने सर्व पेशन्टची पूर्ण हिस्ट्री, त्याचे वागणे, खाणे, राहणे माहित असते त्यामुळे औषध देताना वेगळ्या काही खास टेस्ट करायची गरज पडत नाही..... तशी तुमची हिस्ट्री माझ्याकडे आहे त्यामुळे हे घडत"
*
काहीवेळा अति काहीतरी आजारपण ओढवलं तर यांनीच स्वतःहून मला व घरच्यांना सांगितलं की, आता डोस काम नाही करणार, त्यांना अमुक तमुक हॉस्पिटल मध्ये दाखल करा.
हा त्यांचा सल्ला फार मोलाचा !!
*
गंमत म्हणजे नंतर भगलीसारखेच इतर काही डॉक्टर्स जणू माझे "फॅमिली डॉक्टर झाले" इतके की यापैकी एकानेही आजवर एक रुपया पण घेतला नाही. अगदी दोन तीन लाखाची दोन ऑपरेशन्स झाली तरी डॉ. गोवर्धन इंगळे (पुणे) यांनी एक रुपयाही घेतला नाही. बिल विचारलं तर म्हणतात, "मला कुठं मर्सिडीज घ्यायची आहे तुमच्या पैशातून ? तुम्ही ठणठणीत राहा बास "
असेच माझ्यासोबत असणारे साठे कॉलेजचे डॉ. अजय असेरकर,विद्यार्थी सहायक समितीचे माझे होस्टेलमेट डॉ. अम्बिकर, कल्याणचे डॉ. अवधूत शेट्ये, नांदेडचा माझा मानलेला लहान भाऊ डॉ. मंगेश नरवाडकर व राजेश नरवाडकर.... वारकऱ्यांची मोफत आरोग्य सेवा करतानाच माझ्यासारख्याला दवाखान्यात पण न बोलावता, फोनवर औषधे लिहून देणारे डॉ. सांडभोर..... कोरोना काळात मी व माझे सहकारी रस्त्यावर उतरून मदत करत होतो त्यावेळी मला कोरोना होऊ नये यासाठी धडपडणारा माझा होस्टेलमेट वैद्य हरीश पाटणकर.... किती किती नाव घेऊ ? हे सगळे फॅमिली डॉक्टरच्या भूमिकेतून जणू देवदूत आले.
*
डॉ,. डीडी क्लास : स्पेशालिस्ट डॉक्टर नक्कीच महत्वाचे आहेत. पण त्यापेक्षाही फॅमिली डॉक्टर हा जास्त महत्वाचा असतो. जो तुमची केवळ हाताची नस नव्हे तर जगण्याची नस ओळखून असतो. "रात्रीची जागरण बंद करा डीडी, नाहीतर ऍसिडिटीने अटॅक येईल !" असं जणू भविष्य भगली डॉक्टरांनी मला एक वर्ष आधीच सांगितलं होत... पण माझ्याकडूनच गलथानपणा झाला अन खरेच अटॅक आला. चक्क दोन दिवस आयसीयू मध्ये !! नशीब बायपास न होता बाहेर आलो.... तेही प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांच्यामुळे ! तेही नंतर माझे स्नेही झाले.
तर वादळाची सूचना देणारे जसे मौसम विज्ञान केंद्र असते तसे मला तरी फॅमिली डॉक्टर वाटतात. जे आगाऊ धोक्याची सूचना आधीच देतात. जर ते आपण ऐकलं. फॉलो केलं तर मोठ्या ऑपरेशनची आणि भयानक खर्चाची वेळच येत नाही, हे नक्की ! विचार करा आणि ज्यांचा फॅमिली डॉक्टर आहे त्याला जपा आणि मेडिकल कॉलेजला शिकणाऱ्या मुलांनो.. स्पेशलिस्ट होण्यापेक्षा काहीजण तरी "फॅमिली डॉक्टर" सेक्टर मध्ये या ! भले पैसे थोडे कमी मिळतील पण हजारोच्या दुवा मिळतील आणि याच दुवा तुम्हाला आयुष्य समृद्ध करतील. माझ्याकडे कुठे काय जास्त संपत्ती आहे ? मॅन बॅलन्स हाच माझा बँक बॅलन्स ! जो आजवर मला प्रत्येक संकटात पाठीशी राहिलाय !
तसे जमले तर विचार करून पहा !
Ⓒ डॉ. धनंजय देशपांडे (dd)
(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा