प्रेम ही मानवी जीवनातील सर्वात सुंदर आणि पवित्र भावना आहे. प्रेम म्हणजे केवळ दोन व्यक्तींमधील आकर्षण नव्हे, तर एकमेकांच्या अस्तित्वाची मनापासून केलेली स्वीकृती आहे. प्रेम जेव्हा मनात जन्म घेतं, तेव्हा माणसाच्या विचारांमध्ये, स्वभावात आणि आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात हळूहळू बदल घडू लागतात. खरं प्रेम माणसाला अधिक संवेदनशील, समजूतदार आणि सहनशील बनवतं.
माझ्या मते खरं प्रेम म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणे. त्या व्यक्तीच्या सुख दुःखाशी स्वतःला जोडून घेणे, तिच्या अस्तित्वाचा आदर करणे आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय तिच्यासाठी चांगलं वाटणं हीच प्रेमाची खरी व्याख्या आहे. प्रेमात मालकी हक्क नसतो, तिथे फक्त जपणूक आणि विश्वास असतो. प्रेम माणसाला बदलतं हे खूप खरं आहे. आपण प्रेमात पडण्याआधी जसे असतो तसे प्रेमानंतर राहात नाही. आपला स्वभाव अधिक मऊ होतो, अहंकार कमी होतो आणि दुसऱ्याच्या भावनांची किंमत समजायला लागते. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो, तेव्हा तिच्या छोट्याशा आनंदासाठीही आपण स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवायला तयार होतो. प्रेम म्हणजे स्वतःला हरवणं नाही, तर स्वतःला अधिक चांगल्या रूपात सापडणं आहे.
प्रेमाला कधीही यशस्वी किंवा अयशस्वी असं मोजता येत नाही. कारण प्रेम हे व्यवहार नाही, तर भावना आहे. अनेकदा लोक प्रेमाचं मोजमाप नात्याच्या शेवटावरून करतात. पण खरं पाहिलं तर प्रेम कधीच संपत नाही. काही नाती वेळेनुसार बदलतात, काही दूर जातात, पण मनात उरलेल्या आठवणी आणि जपलेली भावना हीच त्या प्रेमाची खरी ओळख असते. प्रेमाच्या नात्यात अहंकाराला जागा नसते. जिथे प्रेम असतं, तिथे माणूस स्वतःच्या रागावर, हट्टावर आणि स्वार्थावर नियंत्रण ठेवायला शिकतो. प्रेम म्हणजे दुसऱ्याला समजून घेण्याची तयारी. कधी स्वतः मागे हटणे, कधी समजून घेणे, कधी शांत राहणे या सगळ्या गोष्टी प्रेम शिकवतं.
खरं प्रेम नेहमी निस्वार्थ असतं. त्यात अपेक्षांची मोठी यादी नसते. प्रेम करणारी व्यक्ती फक्त एवढंच इच्छिते की, समोरची व्यक्ती आनंदी असावी. तिचं आयुष्य सुंदर असावं. कधी कधी प्रेमात मिळणंही होतं आणि कधी दूर राहणंही. पण जिथे मनापासून प्रेम असतं, तिथे अंतरही त्या भावनेला कमी करू शकत नाही.
प्रेमाची अजून एक खास गोष्ट म्हणजे त्याला वयाचं, जातीचं, परिस्थितीचं किंवा वेळेचं बंधन नसतं. प्रेम कोणत्याही वयात होऊ शकतं. बालपणातील निरागस मैत्री असो, तरुणपणातील ओढ असो किंवा आयुष्याच्या उत्तरार्धातील शांत साथ प्रेम प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या रूपात दिसतं. पण त्याचा मूलभूत अर्थ एकच असतो, तो म्हणजे मनापासूनची जिव्हाळ्याची भावना.
प्रेम म्हणजे फक्त शब्दांमध्ये व्यक्त होणारी गोष्ट नाही. ते कृतीतून अधिक दिसतं. एखाद्याची काळजी घेणे, त्याची आठवण काढणे, त्याच्या आनंदासाठी प्रार्थना करणे, त्याच्या दुःखात खंबीरपणे उभं राहणे ही सगळी प्रेमाचीच रूपं आहेत. अनेकदा प्रेम मोठ्या घोषणांमध्ये नसतं, ते छोट्या छोट्या कृतींमध्ये असतं. आठवणीही प्रेमाचा महत्त्वाचा भाग असतात. जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो, तेव्हा त्या व्यक्तीशी जोडलेल्या प्रत्येक क्षणाला एक वेगळीच किंमत असते. एक साधं संभाषण, एक स्मितहास्य, एकत्र घालवलेला एखादा साधा दिवस हे सगळं आयुष्यभर मनात जपलं जातं. खरं प्रेम माणसाला मजबूत बनवतं. ते आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांनाही सामोरं जाण्याची ताकद देतं. कारण जेव्हा मनात प्रेम असतं, तेव्हा आयुष्याकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळते.
प्रेमात “मी” आणि “तू” हळूहळू कमी होत जातं आणि “आपण” ही भावना निर्माण होते. दोन वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांमध्ये एक सुंदर समजूतदारपणा तयार होतो. दोघेही आपापल्या वेगळेपणासह एकमेकांना स्वीकारतात आणि त्या स्वीकारातून नातं अधिक घट्ट होतं.
शेवटी असं म्हणता येईल की, प्रेम ही केवळ भावना नाही, तर जीवनाला अर्थ देणारी शक्ती आहे. प्रेम माणसाला माणूस बनवतं. ते आपल्याला संवेदनशील, दयाळू आणि जिव्हाळ्याचं बनवतं. म्हणूनच खरं प्रेम कधी सिद्ध करावं लागत नाही. ते जाणवतं मनात, नजरेत, शब्दांत आणि कृतीत. आणि जिथे मनापासून प्रेम असतं, तिथे आयुष्य खरंच अधिक सुंदर वाटू लागतं. कारण शेवटी एकच सत्य आहे.
प्रेम हे प्रेमच असतं. त्यात तुझं माझं नसतं, तिथे फक्त “आपलं” असतं. ❤️
©® सचिन कमल गणपतराव मुळे.
परभणी, ९७६७३२३३१५

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा