कुसुम आगाशे जानेवारीतच मुंबईला आलेल्या, आपल्या नातसूनेच्या डिलिव्हरीकरता. केशव आगाशे मात्र रत्नागिरीला, त्यांच्या वाड्यावरच थांबणार होते. दोनेक महिने घर बंद ठेवणं पटत नव्हतं, त्या पंच्याऐंशी वयाच्या शरिराला. अर्थात हे देखल्या देवा सादर केलेलं कारण आहे, हे कुसुम बाईंना नक्की कळलं होतं. यजमानांचा पाय घराबाहेर पडत नाहिये, हे पक्क जाणून होत्या त्या. पण त्यांनीही फार काही आग्रह केला नव्हता केशवरावांना... कारण त्या जाणून होत्या, रत्नागिरीच्या या घराबद्दलची अपार ओढ त्यांची. कुसुमबाईंचाही जिव अडकलाच होता खरंतर घरात. पण कर्तव्य पार पाडणं ही, अत्यावश्यक होतं. मुलगा नी सून दोन वर्षांपुर्वीच एका अपघातात गेले होते... त्यांच्यानंतर एकुलत्या एक नातवाला, त्याच्या ह्या रत्नागिरीच्या आजी - आजोबांचाच तर आधार होता.
गणपतीत नातू आणि नातसून, दोघेही रत्नागिरीला आले होते. नातसूनेचं पुढे आलेलं पोट बघून, कोण खूष झाले होते केशवराव अन् कुसुमबाई. सातही दिवस रोज मिठ - मोहरी ओवाळून टाकत होत्या, कुसुमबाई नातसूनेवरुन. मुंबईला निघतांना नातवाने विचारलं होतं आजी - आजोबांना, डिलिव्हरीच्या वेळी मुंबईला येण्याबद्दल. दोघांचेही आई - वडिल हयात नव्हते... त्यामुळे घरात कुसुमबाई - केशवरावांखेरीज मोठं कोणीच नव्हतं... आधार असा ह्यांचाच होता त्या दोघांना... त्यामुळेच त्याना नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. ठरल्याप्रमाणेच जानेवारीला नातसूनेला नऊवा महिना लागला, आणि कुसुमबाई मुंबईला आल्या. ईथे येण्यापुर्वी फक्त एकच काम, न विसरता करायला सांगितलं होतं कुसुमबाईंनी नातवाला. एक छान ऐसपैस सागवानी लाकडाचा, झोपाळा बनवून घ्यायला सांगितला होता त्यांनी. नेरुळला बर्यापैकी मोठं रो हाऊस असणार्या नातवाला, जागेचा तसा काही प्राॅब्लेम नव्हताच. त्यामुळे आजीची आज्ञा शिरसावंद्य मानत, त्याने मस्त झोपाळा तयार करवून... आजीच्याच सांगण्यानुसार अंगणात, म्हणजेच ईकडच्या भाषेत फ्रंट यार्डमध्ये बसवून घेतला होता.
कुसुमबाईंनी निघतांना केशवरावांना बजावलं होतं, पायंडा न मोडण्याबद्दल. रोज रात्रीचं जेवण झाल्यावर शतपावली आटोपून... बरोब्बर दहा वाजता दोघं, रत्नागिरीच्या अंगणातल्या ऐसपैस सागवानी झोपाळ्यावर बसत असत. अगदी तासभर... आजुबाजूच्या निरव शांततेत, ऐकत फक्त एकमेकांना... तर कधी ऐकत, फक्त धडधड एकमेकांच्या हृदयाची... एकमेकांच्या खांद्यावर ठेऊन डोकं, आलटून - पालटून. कुसुमबाईंनी सांगितलं होतं केशवरावांना की, बरोब्बर दहा वाजता आपण आहोत तिथे झोपाळ्यावर बसायचं... नी हळूवार झोके घ्यायचे बाजूच्या कडीवर डोकं टेकून. मनातल्या मनात एकमेकांची ख्याली - खुषाली विचारायची... गुजगोष्टी करायच्या एकमेकांबरोबर... आणि अकरा वाजता कुशीत घेऊन एकमेकांची आठवण, झोपी जायचं.
ठरल्याप्रमाणेच अगदी सगळं चालू होतं. जानेवारीच्या मध्यावर, पणतूचं चंद्रमुख दिसलं होतं कुसुमबाईंना. केशवरावांनीही रत्नागिरीला अख्ख्या आळीत पेढे वाटले होते मग. ऐशी वर्षांच्या कुसुमबाई, जणू काही तरुणाईने सळसळत होत्या आता. अख्खा दिवस भुर्रकन ऊडून जात होता समोरुन, नातसूनेचं नी नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाचं करण्यात. पण दहा वाजता मात्र कुसुमबाई... अगदी क्षणभराचाही विलंब न करता, झोपाळ्यावर येऊन बसत असत. आणि ठरल्याप्रमाणे अगदी तसंच, रत्नागिरीच्या घरी केशवरावही. आता तर परतण्याचे वेधही लागले होते कुसुमबाईंना. केशवरावांचेही डोळे आसुसले होते पत्नीला बघण्यासाठी केव्हाचे. लवकरच दोघं एकत्रपणे एका झोपाळ्यावर बसणार होते. पंचवीस मार्चची तिकिटं काढली होती नातवाने दोघांची... तो स्वतः सोडून येणार होता आजीला रत्नागिरीला. आणि... आणि तिकिटं कॅन्सल करावी लागली होती त्याला. पुढची तिकिटं काढताही येत नव्हती, अनिश्चित कालावधीकरीता.
हा प्रचंड मोठा धक्का होता, दोन्ही म्हातार्या जिवांना. मनाशी पक्की ठरलेली एखादी साधी गोष्टही... जर का पार पडली नाही, की घोर लागतो जिवाला या वयात... मग ही तर अत्यंत महत्वाची गोष्ट होती दोघांसाठीही. एकमेकांना बघण्यासाठी होणार्या विलंबातील प्रत्येक तास, विषारी डंख मारत होता दोघांनाही. आपापल्या ठिकाणच्या झोपाळ्यावर बसून, दोघांनाही भरुन येऊ लागलं होतं सध्या. फक्त रिकामं शरिर जसं काही झोके घेई... दोघांचीही मनं मात्र मध्य वाटेत कुठेतरी, एकमेकांत विलीन झालेली असत. आणि अशाच कुसुमबाई दोन दिवसांपुर्वी... झोपाळ्यावर बसलेल्या असतांना, हाॅलमध्ये वाजलेली फोनची रिंग ऐकू आली त्यांना. त्यांनी त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं... आणि बाजूच्या कडीला डोकं टेकून... जिवणी किंचितशी पसरवत, खिन्न हसल्या त्या. त्यांचा नातू धावतच बाहेर आला होता... आजीला सांगायला की... की आजोबा गेले... दहा मिनिटांपुर्वीच... रत्नागिरीच्या अंगणातील झोपाळ्यावरच... कडीला डोकं टेकून... बसल्या बसल्या. नातू ओरडत, रडत हे सांगू पहात होता आजीला... पण कुसुमबाई गेल्या होत्या, अगदी पाच मिनिटांपुर्वीच... फोनची रिंग ऐकल्या ऐकल्याच... काय ते समजून - ऊमजूनच... सताड ऊघड्या डोळ्यांनी.
तितक्यात जोराची झुळूक आली वार्याची... ईथेही आणि तिथेही. झोपाळाही आपसुकच पुढे - मागे होऊ लागला होता मग, ईथलाही अन् तिथलाही.
- सचिन देशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा