गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2798. Return Theory

 सहजच एक पुस्तक वाचत असताना.. "Return Theory" बद्दल वाचलं.  आपल्या अनेक अध्यात्मिक ग्रंथामध्ये याबद्दल लिहिलंच आहे..पण मला जे भावलं ते मांडायचा हा छोटासा प्रयत्न..
"Return" म्हणजे “परत येणं”.. खरंतर किती साधा शब्द. पण त्यामागे दडलेलं तत्त्वज्ञान मात्र खूप गहिरं !  आपण आयुष्यात जे काही देतो, ते कुठेतरी, कधीतरी, कोणत्यातरी रूपात आपल्याकडे परत येतंच. पण ते नेहमी तसंच, त्याच रूपात परत येतं का? की त्याचा अर्थ काही वेगळाच असतो?
कदाचित...
आपण ज्या भावना जगतो, त्या विश्वात विरघळून जात नाहीत;  तर त्या एखाद्या प्रतिध्वनीसारख्या आपल्याच दिशेने पुन्हा प्रवास सुरू करतात.
तुम्ही कधी डोंगरकड्यावर उभं राहून आपल्याच नावाची हाक मारली आहे?
पहिल्यांदा आपला आवाज दूरवर हरवतोय असं वाटतं. पण क्षणभरात तोच आवाज परत येतो. 
थोडा बदललेला, थोडा हलका, कधी अधिक गूढ.
Return theory म्हणजे असाच काहीसा प्रतिध्वनी. पण हा आवाजाचा नाही, आपल्या कृतींचा, विचारांचा, आणि सर्वात महत्त्वाचं. आपल्या भावनांचा.
आपण एखाद्याला बहाल केलेला हसरा क्षण, त्याच व्यक्तीकडून परत येणार नाही कदाचित. पण एखाद्या अनोळखी चेहऱ्यावर उमटलेल्या स्मितहास्यातून तो आपल्याला परत मिळेल.
आपण कुणाला तरी दिलेली वेदना सुद्धा तशीच. ती जशीच्या तशी परत येईल असं नाही; पण एखाद्या नात्यात, एखाद्या प्रसंगात, ती आपल्याला अनुभवावी लागेलच.
हे ऐकताना थोडं भीतीदायक वाटतं, नै का?
पण खरंतर, ही भीती नाही तर एक जाणीव आहे. जबाबदारीची जाणीव.
कारण return theory आपल्याला सांगते.
“तू जे काही करतेयस , ते फक्त त्या क्षणापुरतं मर्यादित नाही. ते एक बीज आहे आणि त्या बीजाचं फळ तुला कधीतरी चाखावंच लागणार आहे.”
मग विचार करायला लावणारा प्रश्न असा उभा राहतो..
आपण आपल्या आयुष्यात कोणती बीजं पेरतोय?
रागाची?
अहंकाराची?
की प्रेमाची, समजुतीची, आणि शांततेची?
कारण पेरिले ते उगविले. अस आपण म्हणतोच की.
खरं सांगायचं तर, आयुष्य म्हणजे एक विशाल शेत आहे.
आपण नकळत रोज काही ना काही पेरत असतो. 
शब्दांनी, नजरेने, स्पर्शाने, आणि कधी कधी आपल्या शांततेने सुद्धा.
आणि मग काळ, अगदी शांतपणे, त्या बीजांना अंकुरायला मदत करतो.
काही बीजं लगेच उगवतात.
काही वर्षानुवर्षं मातीत दडून राहतात. हं,पण ती नष्ट होत नाहीत.
Return theory इथेच आपलं खरं रूप दाखवते.
ती आपल्याला घाई करू देत नाही.
ती सांगते, “थांब… वेळ येईल तेव्हा सगळं परत येईल.”
आपण अनेकदा म्हणतो, “मी इतकं चांगलं केलं, तरी माझ्याबरोबर असं का झालं?”
किंवा “मी कुणाचं वाईट केलं नव्हतं, मग मला का भोगावं लागतंय?”
कदाचित...
आपण जे ‘आता’ अनुभवतोय, ते ‘आत्ता’चं नसतंच.
ते आपल्या कालच्या, परवाच्या, किंवा कधी काळी नकळत केलेल्या कृतींचं परतणं असतं.
पण याचा अर्थ असा नाही की आयुष्य  हिशोबाची वही आहे, जिथे प्रत्येक गोष्टीचा ताळेबंद जुळवला जातो.
नाही. आयुष्य इतकं कोरडं नाही.
कारण काही वेळा, आपण दिलेलं प्रेम हजारपट वाढून परत येतंचं की..
आणि काही वेळा, आपण सहन केलेल्या वेदना आपल्याला इतकं मजबूत करून जातात, की त्या वेदनांचं परतणंही आपल्याला सुंदर वाटायला लागतं.
Return theory ही फक्त कर्माची गोष्ट नाही... ती ‘ऊर्जेची’ गोष्ट आहे.
आपण ज्या भावनेने काही करतो, ती भावना विश्वात साठवली जाते.
जर तूम्ही एखाद्याला मदत केली, पण मनात अपेक्षा ठेवली “तो मला परत काही देईल”..
तर तूम्ही खरंतर एक व्यवहार केलाय, ते देणं नव्हे.
पण जर तूम्ही मनापासून, कोणतीही अपेक्षा न ठेवता दिलं
तर त्या देण्याची ऊर्जा इतकी शुद्ध असते, की ती तुम्हाला परत येताना अनेक पटींनी समृद्ध करून जाते.
म्हणूनच, काही लोक खूप कमी मिळालं तरी समाधानी असतात.
आणि काही लोक खूप काही असूनही रिकामे वाटतात.
कारण परत येणारं फक्त ‘काय’ आहे हे महत्त्वाचं नसतं…
तर ‘कसं’ आणि ‘का’ दिलंय हे अधिक महत्त्वाचं असतं.
आयुष्यात काही नाती अचानक तुटतात…
काही लोक अचानक दूर जातात…
आपण विचार करतो, “हे का झालं?”
कदाचित, तेही एक प्रकारचं return असतं.
आपण स्वतःला, आपल्या भावनांना, आपल्या गरजांना विसरून जेव्हा दुसऱ्यांसाठी जगतो…
तेव्हा आयुष्य आपल्याला परत एकटं करून सांगतं,
“आता स्वतःकडे परत ये.”
Return theory म्हणजे फक्त बाहेरचं परतणं नाही…
तर तो स्वतःकडे परत येण्याचा प्रवासही आहे.
आपण अनेकदा बाहेरच्या जगात इतके गुंततो, की स्वतःला हरवून बसतो.
आणि मग एखाद्या वळणावर, एखाद्या प्रसंगात, आयुष्य आपल्याला थांबवतं....
आणि म्हणतं,
“परत ये… स्वतःकडे.”
किती विलक्षण आहे ना हे?
जगात सगळं पुढे जात असताना, ‘परत येणं’ हीच खरी प्रगती ठरते.
Return theory आपल्याला शिकवते,
तू जे देतेयस, तेच तू आहेस.
तू जे अनुभवतेयस, ते तुझंच प्रतिबिंब आहे.
मग जर आयुष्य सुंदर हवं असेल.
तर सुंदर गोष्टींची अपेक्षा करण्यापेक्षा, सुंदर गोष्टी देणं सुरू करायला हवं...
कारण शेवटी, आयुष्य हे एखाद्या आरशासारखंच आहे ना..
त्यात जे दाखवणारं , तेच तुला परत दिसणारं....
 म्हणूनच...
देताना जपून द्या , बोलताना जपून बोला , आणि प्रेम करताना तर अजून जपून प्रेम करा..
कारण प्रत्येक भावना, प्रत्येक शब्द, प्रत्येक स्पर्श..
एक दिवस तुमच्याकडे परत येणार आहे…
कदाचित वेगळ्या रूपात, वेगळ्या वेळी…
पण नक्कीच, अनिवार्यपणे.
आणि त्या दिवशी,
तूम्ही जेव्हा स्वतःकडे पाहाल...
तेव्हा  समजेल..
“मी जे दिलं होतं,
तेच आज मला परत मिळतंय…”

© ®वृंदा दाभोलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...