गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2748. कोरी पाटी

      त्या ऑफिसमधे एकंदरीत सगळा कारभार नेहमीप्रमाणं गडबडीत आणि तरीही शिस्तीत सुरू होता. ऑफिस प्रचंड मोठ्ठं होतं पण स्टाफ लिमिटेड होता. सहा क्लार्क्स, दोन ऑफिस असिस्टंट्स, दोन डिपार्चर सुपरवायझर्स, दोन अरायव्हल सुपरवायझर्स‌. या सगळ्यांच्या वर चीफ ऑपरेटिंग मॅनेजर आणि सगळ्यात वर हेड मॅडम.
हेड मॅडमचं केबिन वर्षानुवर्षे बंदच असायचं. त्यांच्या केबिनमध्ये जायची परवानगी फक्त चीफ मॅनजरना होती, इतर कुणालाही नाही. तेही कधीतरी अगदी काही महत्त्वाचं काम असेल तरच जायचं. खरं म्हणजे बाकी कुणी इतक्या वर्षात हेडमॅडमना पाहिलंही नव्हतं. अर्थात तोच तिथला प्रोटोकॉल असल्यानं कुणाची काही तक्रार नव्हती..
आणि अचानक काय झालं ते नीट समजलं नाही पण त्या सहा क्लार्क्स पैकी एकजण ताडकन उठला आणि बावचळून इथं तिथं पाहू लागला. त्याच्या चेहर्‍याचा रंगच उडाला होता.
“सर… सर…” तो ऑफिस सुपरिटेंडंटच्या केबिनकडे धावला. काहीतरी घडलं होतं हे नक्की आणि पुढच्या दहा मिनिटांत सबंध ऑफिसमधे न भूतो न भविष्यति असा गोंधळ उडाला.
“हा मूर्खपणा कुणी केला?” चीफ मॅनेजर सगळ्यांवर कडाडले.
“सर… सर, मी फाईल रेडी केली होती सर. सगळ्या एन्ट्रीज परफेक्ट होत्या सर. म्हणजे…” तो डेस्क क्लार्क जेमतेम बोलला.
“तुमच्याकडून ती फाईल डिपार्चर सुपरवायझरकडे सेंड केल्याची एन्ट्री दाखवा…”
त्यानं ताबडतोब ती एन्ट्री दाखवली.
“म्हणजे सगळी चूक डिपार्चर टीमची आहे तर…!”
डिपार्चर सुपरवायझर मान खाली घालून उभे होते.
“मिस्टर… स्पष्टीकरण द्या ! आता हेड मॅडमना काय सांगू मी? तुम्ही गेली कित्येक वर्षं इथं जॉब करताय. ही घोडचूक केलीतच कशी? किरकोळ एक दोन डिटेल्स मिस झाल्या तर मी समजू शकतो. तुम्ही त्या व्यक्तीची फाईलच आत्म्याशी ॲटॅच न करता त्याला क्लिन न्युट्रल करुन पाठवलं? बिनडोक” चीफ रागानं थरथरत होते.
त्यांनी फाईल उघडून पाहिलं. मागच्या जन्मात केलेली असंख्य पापं, भ्रष्टाचार, कुकर्म यांनी ती फाईल अक्षरशः बरबटलेली होती. किरकोळ पुण्यकर्म होती पण उर्वरित फाईल अशी सगळी अशुभ आणि अश्लाघ्य गोष्टींनी भरलेली होती. या जन्मात त्याच्या शिक्षा भोगायच्या होत्या. फॉर्च्यून ब्ल्यूप्रिंट जी त्या आत्म्यासोबत पाठवायची असते, ती इथं ऑफिसातच राहून गेली होती. बिनपत्त्याच्या पत्रासारखा तो आत्मा डिपार्चरहून एव्हाना एक्झिट झाला होता. भयानक झालं होतं एकंदरीत…!
    इतक्यात हेडमॅडमच्या केबिनचा दरवाजा उघडला आणि त्या स्वतःच आत आल्या. सहा सव्वासहा फूट उंच, गौरवर्णी, अत्यंत देखण्या, तरतरीत नाक असणाऱ्या मॅडम ताडताड चालत आल्या. फॉर्मल ओळख करून दिली.
“हॅलो एव्हरीबडी… मी मॅडम डेस्टिनी. आज जे काही घडलं ती चूक ज्या कोणाच्या हातून घडली असेल, त्यानं ताबडतोब चूक कबूल करुन याक्षणी ऑफिस सोडून निघून जायचं.”
मॅडमच्या आवाजात भारदस्तपणा आणि करारीपणा होता. तो डिपार्चर सुपरवायझर काहीही न बोलता शांतपणे मान खाली घालून निघून गेला.
मॅडम पुढं बोलू लागल्या “चीफ, आता आपण काय करू शकतो? आजवरच्या ऑफिस हिस्ट्रीमधे हे कधीच घडलेलं नाही. यावर प्रत्येकानं सजेशन द्या.”
“मॅडम…” चीफ चाचरत बोलू लागले, “आता ॲक्चुअली आपण काहीच करु शकत नाही. कारण त्याच्याकडे आपली ब्ल्यूप्रिंटच नाहीये. हा आत्मा आता संपूर्णपणे फ्री वीलवर सर्व्हाईव करणार आहे. थोडक्यात सांगायचं तर त्याची प्रिव्हिअस कार्मिक फाईल इथंच राहिल्यानं नेव्हिगेशन होणार नाही. म्हणजे ॲक्चुअली रिकामी बॅग घेऊन माणूस जगप्रवासाला निघावा तशी कंडिशन आहे…”
“ठीक आहे. यमदूतांना लायटनिंग कॉल लावा… त्याला गर्भातच संपवून टाका ” मॅडम.
“मी मगाशीच ते करुन पाहिलं. यमदूतांना ब्ल्यूप्रिंट कन्फर्म झाल्याशिवाय आणि विधिलिखिताचं डिकोडिंग झालं तरच ते मृत्यू देऊ शकतात. अदरवाईज नाही. त्यांनी स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, ‘याच्या नशिबात मृत्यू नाही!’
“मी ऑफिसची ब्ल्यूप्रिंट पाठवतो म्हणालो, तर त्यावर म्हणाले, ‘त्याची व्हॅलिडिटी काय? सोल कनेक्टेड फाईलच आम्ही कन्सिडर करतो !’ आणि आपण त्यांना ऑर्डर देऊ शकत नाही. ते फक्त यमलोक आणि कैलास दोन ठिकाणांव्यतिरिक्त इतर ऑर्डर ऐकत नाहीत !”
मॅडमच्या चेहऱ्यावर चिंता पसरली. “आपण या सिच्युएशनमधे काय करु शकतो?”
ऑफिसमधे स्मशानशांतता पसरली. शेवटी कम्प्यूटरवर बरंच सव्यापसव्य करून झाल्यावर घसा खाकरुन चिफच बोलते झाले.
“मॅडम... आता एकच गोष्ट शक्य आहे. मी फॅक्टरीत एक न्युट्रल आत्मा मॅन्युफॅक्चर करतो. एका नव्या डिझाइनर आणि खास ब्ल्यूप्रिंटसह आपण तो पाठवू. तो नवा आत्मा या बिनपत्त्याच्या आत्म्याला काहीही करुन हिमालयात जायला प्रवृत्त करेल… अर्थात काही वर्षानंतर. आणि एकदा तो हिमालयात गेला की तिथं तो तपश्चर्येला बसेल असं त्यावेळी काहीतरी करू. तो गहन ध्यानात उतरला की परत बाहेर येणार नाही. तो तसाच अनंतकाळ राहील.
“याक्षणी दुसरा ऑप्शन नाही… त्याचा देह जिवंत राहील. ब्याण्णव लाख मुंग्यांची एक फौज आपण तिथं पाठवू आणि त्याच्या देहाभोवती वारुळ होईल असं पाहू; म्हणजे तो कुणाच्या नजरेत येणार नाही…
“मॅडम, निदान पुढच्या चारपाचशे वर्षांत तरी चिंता नाही. तोपर्यंत आपली सिस्टीमही कदाचित अपग्रेड होईल. नवीन परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स येतील. तेव्हा बघू काय ते…”
“ठीक आहे, सध्या हाच प्लॅन ठीक आहे. एकच करा. ऑफिसमधे एक नवीन पोस्ट क्रिएट करा. ती पोस्ट खास याच आत्म्यासाठी डेडिकेटेड काम करेल… त्याला मानवी वस्तीपासून शक्य तितक्या लवकर लांब करा. आपण पापपुण्याच्या हिशोबापासून मुक्त आहोत, हे जर त्याला समजलं तर हा आत्मा हैदोस घालेल. त्याला लवकरच आयसोलेट करा… कम ऑन, बॅक टू वर्क गाईज !”
.आणि पुन्हा एकदा ऑफिस कार्यमग्न झालं.

- सचिन मधुकर परांजपे (पालघर)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...