गुरुवार, २५ जून, २०२६

3000. अंधारातून प्रकाशाकडे

     मी खूप वर्षांपूर्वी ही तेजस्वी गोष्ट रीडर्स डायजेस्ट मध्ये वाचली होती आणि ती मनाच्या कुपीत कायमची झाली.
तेरा चौदा वर्षांचा  अंध  मुलगा. डेविड हार्टमन (David Hartman)  आपल्या बाबांना मोठया उमेदीने विचारतो - बाबा..एकदम मनापासून सांगा. मी कधी डॉक्टर होऊ शकतो का? स्वभावाने बऱ्यापैकी प्रॅक्टिकल आणि व्यवसायाने बँकर असलेले बाबा आतून हलतात. एकदम गप्प होतात. खोल विचारात पडतात. काय सांगायचं आपल्या या अंध मुलाला.  पण  या अतिशय उत्साही आणि उमद्या मुलाचा तेजोभंग कसा करायचा. म्हणतात.
"A doctor, son? Well, you will never know unless you try, will you? 
डॉक्टर ...मुला .... नक्कीच ... प्रयत्न केल्याशिवाय कसं कळणार? तू करशील ना.. 
    जन्मताच डोळ्यांच्या लेन्समध्ये प्रॉब्लेम घेऊन  जन्मलेला डेविड आठ वर्षांचा होतो तेव्हा त्याला पूर्ण अंधत्व येतं.  तेव्हा पासूनच तो आपल्या बाबांना मी हे करू शकतो का? ते करू शकतो का? अशा अनेक गोष्टी विचारत राहतो. दहा वर्षांचा असताना तो बाबांना विचारतो. बाबा...मी बेसबॉल खेळू शकतो का? वेल, चल .. प्रयत्न करूया. 
"Well, let's try it and see,"... त्याच्या बाबांनी त्याला सुचवलं. त्या दोघांनी मग त्यावर विचार करून मार्ग शोधला ... बाबांनी तो बॉल जमिनीवरून फिरवत त्याच्या दिशेने सोडायला सुरवात केली ... डेविड ...हळू हळू  बॉलच्या गतीचा आवाज ओळखून तो बॉल पकडायला शिकला ... तो बॅटिंग शिकला ... गवतावरून फिरत येणाऱ्या बॉलचा आवाज एकदम आतून ऐकून तो बॉल कॅच करायला शिकला ...काही काळाने प्राविण्य मिळवता झाला .. 
Realm of Possibility? काही अशक्यप्राय गोष्टी शक्य होतात ... या तत्वानुसार डेविडच्या कुटुंबाने दृढनिश्चय केला आणि त्याला कठोरपणे स्वावलंबी करायला सुरवात केली... काही वेळा काहीच दिसत नसल्याने तो रडायचा आणि म्हणायचा "ममा .... मी काही करू शकत नाही ... " मग त्याची आई त्याला त्याला आपल्या कुशीत घेऊन म्हणायची ... माहित आहे रे ... डेविडची बहीण ... बार्बरा मात्र कठोर होती ... अर्थात त्याच्या चांगल्या साठी ... तो त्याचं ब्रेल घडयाळ जर पहिल्या मजल्यावरच्या खोलीत विसरला ... तर तो त्याच्या बहिणीला सांगायचा ... जरा आणून देतेस का ? .... ती त्याला म्हणायची ... तू जा आणि आण... तुला काय वाटतं ... कोणीतरी कायम तुझ्या दिमतीला असणारे का ? 
तर अशा गोष्टींमुळे डेविड मोठा होऊ लागला आणि त्याला नक्की कळलं की अंधत्व ही ट्रॅजेडी नाहीये... आणि नक्कीच त्याला आपण काहीही करू शकतो, हा आत्मविश्वास बळावत गेला. १३व्या वर्षी त्याने आई बाबा आणि बहिणीला सांगून टाकलं की मला डॉक्टर व्हायचंय .... 
त्याने त्याच्या शिक्षणाचा मार्ग निश्चित केला ... आणि त्या नवीन करिअरचा अभ्यास सुरु केला त्याने अंध मुलांसाठी असलेली स्थानिक शाळा सोडली आणि त्याने आपलं नाव Havertown's High School मध्ये घातलं. सगळ्यांना  Realm of Possibility हे माहित आणि मान्य होतं ... तरीही डेविडची डॉक्टर ... त्यातही 
मनोदोषचिकित्सक (Psychiatrist)  होणं ... 
त्या  Realm of Possibility च्या नक्कीच शक्यतेबाहेरचं होतं .. त्यांना वाटतं होतं की डेविड नक्कीच नादान महत्वाकांक्षा बाळगतोय ... कॉलेजमधले त्याच्या शिक्षकांनी देखील त्याला खूप सांगायचा प्रयत्न केला ... तू का नाही इतर विषय बघत जे तुझ्या पात्रतेला योग्य आहेत ... इतिहास ... वगैरे .. डेविड म्हणाला ... मी काही इतर माणसांपेक्षा वेगळा नाहीये .. 
मला दिसत नाहीये, खरं आहे ... पण प्रत्येक माणसात काही ना काही अपंगत्व  असतातच . माझा दृढ विश्वास आहे की जे कोणी काही विशेष किंवा आव्हानात्मक गोष्टी करत नाहीत .... ते खरं तर अपंग आहेत .. मी 
Psychiatrist व्हायचं ठरवलंय कारण मला माझ्यावर ठाम विश्वास आहे .. आणि मी डॉक्टर झाल्यावर  माझ्यासारख्या दृष्टी नसलेल्या असंख्य माणसांना नक्की मदत करू शकतो ..
कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात त्याची भेट अत्यंत हुशार ... हिरवे डोळे असलेल्या चेरील Walker या मेडिकलच्याच विद्यार्थिनींशी झाली.. नंतर त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं ... १९७२च्या वसंत ऋतूत तो कॉलेजच्या चौथ्या वर्षात असतांना त्याला सगळ्यात जास्त मार्क मिळाले ... त्याने दहा मेडिकल कॉलेजमध्ये अर्ज केला ... एप्रिलमध्ये त्यातल्या आठ कॉलेजनी त्याला प्रवेश द्यायला नकार दिला ... 
२७ एप्रिलच्या दुपारी त्याला नवव्या कॉलेजच्या नकाराचं पत्र मिळालं ... त्याला मनातून वाटतं होतं की हे कॉलेज त्याला नक्की प्रवेश देईल ... डेव्ह ... मनातून एकदम खचला आणि हताश झाला .... पण जे फिडाडेल्फीया मधलं दहावं कॉलेज होतं .. Temple University School ऑफ Medicine ...  Dr. M. Prince Brigham, असिस्टंट डीन आणि प्रवेशाचे मुख्य होते ... त्यांनी डेविडच्या अर्जाचं जोरदार समर्थन केलं ... त्यांनी बोर्ड मिटिंग मध्ये सांगितलं की जर आपण ऑलम्पिकच्या समितीत असतो आणि शंबर मीटरच्या शर्यतीत एक पाय नसलेला स्पर्धक आला असता ... तर आपण नक्कीच त्याला धावू दिलं असतं ... डेविडने अगोदरच खूप अशक्यप्राय गोष्टी यशस्वीरीत्या करून स्वतःला सिद्ध केलंय ... आपण त्याला प्रवेश देऊया आणि बघूया तो कुठपर्यंत जातो ... बोर्डच्या सदस्यांनी ते मान्य केलं ...
 दुसऱ्या दिवशी त्याला त्याच्या आईचा फोन आला .. 'तुला एक पत्र आलंय .. ज्याची तू खूप वाट बघत आहेस' .... तिचा आवाज भरून आला ... तिला बोलता येईना ... त्याच्या बहिणीने ... बार्बराने फोन घेतला ... आणि सांगितलं की तू तोडलंस .. You have done it ... आणि तिला देखील अश्रू आवरले नाहीत ... तुला  Temple University ने स्वीकारलंय ... आणि डेविड आपल्या ध्येयाच्या वाटेवर चालायला लागला ... 
वाट नक्कीच बिकट होती आणि त्याला त्याची उत्तम कल्पना देखील होती ... पण त्याला डोंगरमाथा आणि तिथून दिसणारं निसर्गाचं दिव्य रूप .. त्याचं ध्येय दिसत होतं 
सुरवातीलाच त्याला Anatomy च्या इंट्रोडक्टरी कोर्सेच्या वेळीच अनेक अडचणी यायला लागल्या .. हातात रबराचे ग्लोज घालून तो अनेक मोठे अवयव चाचपून ओळखायला लागला ... पण लहान अवयव विशेषतः nerve plexuses ओळखायला त्याला ग्लोज काढावे लागले .. त्याची बोटं formaldehyde preservative मुळे बधिर झाली ... हे सगळं चालू असताना डेविडने आपल्या घरात या विषयाला अनुसरुन असलेल्या अनेक विषयांची असंख्य पुस्तकं विकत घेतली ... घरची लायब्ररी अति समृद्ध करायला सुरवात केली ... या विषयाच्या अनेक ध्वनिमुद्रिका विकत घेतल्या ...
 मेडिकलच्या पहिल्या वर्षात डेविड आणि चेरीने लग्न केलं .. तिसऱ्या वर्षात असताना खरं आव्हान सुरु झालं ... युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये  रोग्यांना तपासणं ... त्यांना ट्रीटमेंट देणं सुरु झालं .. त्याला X-ray बघता येत नसल्याने तो कान ... डोळे ... तोंड आपल्या सहकार्यंवाचून तपासू शकत नसे ... त्याला ते X-ray चं वर्णन त्याचे सहकारी किंवा नर्स सांगेल त्याप्रमाणेच उपचार करावे लागत ... तो त्यांच्यावर अवलंबून होता ... पण डेविड अतिशय समर्थ माणूस होता .. त्याने Stethoscope आणि स्पर्श खूप विकसित केला ... 
२७ मे १९७६ ला त्याला मेडिकलची डिग्री मिळाली ... त्याने एक गोष्ट नक्कीच सिद्ध केली .. तो इतरांपेक्षा वेगळा नाहीये ... त्याला अगोदर नाही म्हणणारे प्रोफेसर्स देखील आले होते ... पदवीदान कार्यक्रमाला ... ते म्हणाले ...Devid is not normal ... he is super normal ...
 अमेरिकेतला तो पहिला अंध डॉक्टर झाला .... त्यानंतर त्याच्यासाठी एक मोठा सत्कार समारंभ झाला ... अनेक लोक त्याच्या जिद्दीवर ... त्याच्या अथक परिश्रमांवर ... दिगंत आत्मविश्वासावर भर भरून बोलले ... 
In presenting the founder's award to David, RFB President John Castles praised him "for exhibiting a triumph of the human spirit .. माणसाच्या अत्युच तेजाचं हे दर्शन आहे ... आपलं भाषण संपवताना ते पुढे म्हणाले ..... "With the example of Dr David Hartman before us, we feel renewed faith in the infinite possibilities of all people...
डेविडच्या या उदाहरणाने आपल्याला नक्कीच एक नवीन विश्वास मिळालाय .... माणसाच्या काहीही गोष्ट मिळवायच्या अमर्याद शक्यतांचा .... " या अतिशय भारावलेल्या शब्दांनी सभागृहात आलेले सगळे लोक त्याला मानवंदना द्यायला उभे राहिले ... These eloquent words brought a standing ovation for David .... 
डेविडने या सगळ्याला शेवटी दोनच वाक्यात उत्तर दिलं ... My Dad was right ..माझ्या बाबांचं बरोबर होतं ...  "You will never know unless you try"....प्रयत्न केल्या शिवाय तुला कळणार नाही ... 
खरंच आपल्याकडे सगळं आणि तेही भरभरून आहे ... तरी आपण हे नाही ते नाही ... म्हणून सारखे रडत असतो ... डेविड सारखे लोक अक्षरशः आभाळाएवढे आहेत ... त्यांच्या या गोष्टीतून आपल्याला किती प्रेरणा मिळते.



2999. ब्रेन डेड

     ती नऊ आठवड्यांची गरोदर असताना तिला मेंदूत रक्तस्राव झाला; डॉक्टरांनी प्रयत्न करूनही तिला वाचवण्यात यश आलं नाही. तिला ‘ब्रेन डेड’ घोषित केलं गेलं मात्र तिच्या गर्भाशयात त्यावेळी दोन चिमुकली हृदयं धडकत होती; हो तिला जुळं होणार होतं. सीटी स्कॅन, सिडेटिव्हस यांच्या माऱ्यामुळे आणि आता तर तिच्या मेंदूने साथ सोडल्यामुळे तिचे गर्भ वाचणे शक्यच नव्हते. ४८ तासांनी ही हृदयं काम करणं बंद करतील आणि मग आई आणि तिची दोन्ही मुलं अशी तीन शवं आम्ही तुम्हाला देऊ असं हॉस्पिटलमधुन तिच्या नवऱ्याला सांगण्यात आलं.
४८ तासांनी तपासल्यावरदेखील दोन्ही हृदयं धडकत होती; किंबहुना उत्तम प्रकारे कार्यरत होती. अजून चोवीस तास थांबण्याचं ठरवण्यात आलं. चोवीस तासांनीदेखील परिस्थिती जैसे थे. विशेष म्हणजे तिच्या मेंदूने कार्य करणं बंद केलं होतं मात्र बाकी सगळे अवयव सुरळीतपणे सुरू होते! डॉक्टरांसाठीही हा धक्काच होता. आता मात्र त्यांनी त्या दोन्ही जीवांना जगवायचे ठरवले; कदाचित तिची शेवटची इच्छा हीच असावी ! तिची ICCU खोली सजवण्यात आली. गर्भातल्या जुळ्यांकरता हॉस्पिटलचे कर्मचारी रोज नित्यनेमाने गाणी गाऊ लागले, वाद्य वाजवू लागले. काही नर्सेस तिच्या पोटाला रोज कुरवाळत होत्या. थोडे थोडके नव्हे तर पुढचे तब्बल १२३ दिवस तिला कृत्रिमरीत्या जिवंत ठेवण्यात आलं आणि दोन गोंडस जुळ्यांना जन्म देण्यात आला. त्यांच्या जन्मानंतरच तिला मृत म्हणून घोषित करून शव कुटुंबीयांच्या स्वाधीन केलं गेलं.
     नाही; ही कल्पनारम्यता नाही. ही सत्यघटना आहे !! ब्राझील येथील फ्रँकलिन दा सिल्वा जम्बोली पाडील्हा असे त्या मातेचे नाव असून ती जग सोडून गेली तेव्हा तिचं वय होतं अवघं एकवीस वर्षं. या घटनेला आईचं प्रेम म्हणा वा भगवंताचा चमत्कार; वैद्यकीय क्षेत्रातली ही अनोखी घटना आहे खरी. तिचे डॉक्टर आणि हॉस्पिटलचे सर्वच कर्मचारी यांचं करावं तितकं कौतुक कमीच. अश्वत्थाम्याच्या अस्त्राच्या प्रभावाने मृत जन्माला येऊनही भगवंताच्या आशीर्वादाने प्राणप्राप्ती झालेल्या परीक्षिताची कथा आपण महाभारतात ऐकतो तेव्हा कित्येक बुद्धीवादींचा त्यावर विश्वास बसत नसतो. मात्र फ्रँकलिनसारख्या अनुभवांवरून आपली बुद्धी हे सर्वोच्च साधन नसून तिच्या पलिकडे बरंच काही अस्तित्वात आहे याचीच जाणीव ठळकपणे अधोरेखित होते.


2998. बहर

 “नाथा, जरा माझा पलंग खिडकीकडे लावशील का? सगळे ओरडताहेत, रागवताहेत मला. ‘फालतू हट्ट करू नको’ म्हणून. पण तुला माहितीये ना सगळं. त्याचा बहर बघूनच डोळे मिटतील माझे. पानगळ होऊन फक्त जाड हिरवीगार देठं उभी आहेत ना दिमाखात. फिकट पांढरी मध्येच सुर्यासारखी पिवळी फुलं बहर होऊन त्याचं रूप अगदी सुंदर दिसत असेल, ते पाहू दे जाण्याआधी शेवटचं.”
आजीच्या वाक्यावर नाथा हसला. ‘बरं आजी,’ म्हणत नाथानं आजीच्या डोक्यावर थोपटलं, “तू ऐकणार नाहीसच ग आजे.” म्हणत त्यानं तिच्यासकट कसरत करत तो पलंग खिडकीशी आणला.
आजी म्हणाली, “मानेखाली थोड्या दोन उश्या घाल, म्हणजे दिसेल चाफा नीट.” म्हणत तिनं मान उचलली. त्यानं हसून तिच्या मानेखाली उश्या ठेवल्या. ती त्या झाडाकडे पाहता पाहता झोपली. त्यानंही खिडकीशी डोकावलं. खरंच एकही पान त्यावर नाही आणि फुलांचा बहर असा भरून आलेला. त्यानं हाताशी असलेलं एक फूल तोडलं आणि त्याची अंगठी बनवली. ती आपल्याच बोटात धरून त्यानं आरश्यात डोकावलं. आरश्यानं त्याला मागच्या काळात नेलं.
टोपलंभर फुलं घेऊन आजी आपल्याभोवती फिरत होती. त्यावेळी आपण आठ एक वर्षाचे होतो. ती म्हणत होती, “हे बघ, आज तुझ्या शाळेतल्या स्पर्धेत तुला कृष्ण करते. ह्या फुलांचा हार, टोप, कानातले. त्याचीच अंगठी. तू बघ तर कसा मस्त दिसशील नाथा ! ह्या रुपात तुला कुणी ओळखायचं नाही.” म्हणत आजीनं भराभर ह्या फुलांचे दागिने केले.
आपण जरा रुसलो, तर म्हणाली “अरे असं काय करतोस? तुझ्या मित्रांच्या भारी ड्रेसला. कुणी पोलीस कुणी राजा जरी झालं, तरी आपल्या चाफ्यानं बघ ना तुला कसं छान सजवलंय !”
आपण तोंड फुगवून शाळेत गेलो. वेशभूषा स्पर्धा सुरू झाली. आजीने शिकवलेलं पद आपण मस्त म्हटलं.
“नका दुःखी होऊ जगी,
नसेल जरी सोबत कुणी.
चाफ्यालाही कुणी नसता
बहरून यावे वाटते किनई !
एकटंच येतो जगी माणूस
जातो ही एकटाच तो.
जगण्याचा बहर टिकवा,
हेच सांगतो नाथ कृष्ण तो !”
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मोठ्या बाईंनी तर विशेष कौतुक केलं आणि आजीला बोलावून म्हणाल्या,
“आजी कमाल आहे तुमची ! एवढं दुःख आयुष्यात आहे, तरी त्या नातवासाठी सगळं दुःख गिळून किती आनंदी, उत्साही जगताहात तुम्ही !”
त्यावेळी आजीनं आपल्याला पटकन पोटाशी धरलं होतं आणि बाईंना म्हणाली,
“बाई, मीही सामान्य बायकांसारखी रडत बसले होते. अपघातात ह्याचा आजा, ह्याची आई, माझा एकुलता एक लेक गेला. त्याक्षणी वाटलं आपण का वाचलो?
“खूप दिवस दगडासारखी होऊन बसून राहायचे दारात. एकदा टपकन चाफ्याचं फूल डोक्यात पडलं. सहज वर पाहिलं तर फांद्या नुसत्याच. एकही पान नाही. पण शेंड्याला भरगच्च फुलं !
“खरंतर किती जून ते झाड. पण असा विचार कधी आला नाही आणि तेव्हा आला; त्याक्षणी वाटलं. झाड निमित्त होऊन देवाचा संदेश मला सांगतंय, ‘काहीही झालं तरी जगण्याचा बहर सोडायचा नाही.’
“मग ह्या लेकरसाठी आता अशी भरभरून जगायला शिकले. मला काही साधन नव्हतं पैसे कमवायला. मग ह्या चाफ्यालाच मनात धरलं आणि गोधडीवर तशीच फुलं विणायला घेतली. हातात कला होती. त्याला बहर आला.
“एकटीला हे सगळं जड चाललं होतं. पण बाई, ह्या शाळेतल्या अनेक शिक्षकांकडून भरपूर ऑर्डर मिळाल्या. व्यवसायाला बहर आला. मग हा बहर शिकवायचं केंद्रच बनवलं आणि ते शिकवलं फक्त अनाथ बायांना. एकीला एक मिळत गेली आणि आता चालू आहे, असं बहरून जगणं !”
आजीची ही सगळी वाक्य त्याला आठवली. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी आलं. टपकन आजीच्या हातावर एक अश्रू पडलाच. आजीला जाग आली. हातानंच आजीनं त्याला खाली वाकायला लावलं.
“नाथा, असा रडत बसू नकोस. आपण ह्या चाफ्याकडून शिकलो ना, तसाच राहा. कठिण परिस्थितीतही फुललेला ! आपण चालवलेलं ‘अनाथ महिला आश्रम’ आणि ‘चाफ्याची गोधडी केंद्र’ असंच पुढं ने. गेले मी जरी तुझ्या आयुष्यातून निघून तरी, चाफ्याचा बहर असाच आयुष्यभर फुलू दे !” 
आजीनं डोळे मिटले. नाथानं एकदा आजीकडे पाहिलं आणि एकदा बहरलेल्या चाफ्याकडे. दोघंही एकच सांगत होते.
‘जगण्याचा बहर जपायचा...!’

- स्वप्ना मुळे (मायी), छ.संभाजीनगर.

2997. ऋण

    एका सुसज्ज कर्करोग रुग्णालयाचा भव्य उद्घाटन सोहळा. डॉ. राही कार्यक्रमाचं निवेदन करत होती. डॉ. अभय, ज्याच्या कर्तृत्वामुळे या रुग्णालयाची प्रशस्त व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज इमारत उभी राहिली होती, त्याचं मनोगत चालू होतं. काळासावळा, सर्वसाधारण शरीरयष्टीचा डॉ. अभय. त्याच्या चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचं तेज ओसंडून वाहत होतं.
    रुग्णालयाच्या समोरील एका मोठ्या प्रांगणात हा सोहळा चाललेला होता. मंचावर डॉ. अभयचे गुरू व इतरही निष्णात कर्करोगतज्ज्ञ, डॉक्टर मंडळी विराजमान होती. बोलता बोलता डॉ. अभयने सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का देत जाहीर केलं, "माझ्या दोन्ही आई. बाई (त्याची जन्मदात्री) व आई यांना विनंती करतो की, त्यांनी मंचावर येऊन डिजिटल पद्धतीने रुग्णालयाच्या नावाच्या फलकाचं अनावरण करावं. नंतर माझे गुरू प्रत्यक्ष फीत कापून उद्घाटन करतील. गणेश, तू त्यांना मंचावर आण."
    ते ऐकून राही अचंबित होऊन पाहतच राहिली, अभयची दुसरी आई?.. कोण? इतक्यात तिला त्या दोघी मंचावर येताना दिसल्या. त्यांना पाहून ती मनात म्हणाली. अरे, या तर कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत बॉटनीच्या ! ही अभयची आई कशी? अशी कोणती गोष्ट आहे, जी मला आजपर्यंत माहीत नाही." तेवढ्यात अभयनं काकाजींना, त्याच्या वडिलांना आणि जिच्या पावलावर पाऊल ठेवून तो 'एमबीबीएस'ला गेला ती त्याची मोठी बहीण डॉ. अंजली, या सर्वांना मंचावर बोलावून कृतज्ञता व्यक्त केली. राहीनं तिच्या उत्सुकतेवर कसाबसा ताबा मिळवला. सोहळा संपल्यावर अभिनंदनाची, सत्काराची, जेवणावळींची एकच गडबड उडाली. इतकं प्रशस्त कर्करोग रुग्णालय बघण्यासाठी सर्वांनी गर्दी केली होती. राहीच्या उत्तम निवेदनाबद्दल तिचंही कौतुक होत होतं. ती मात्र अस्वस्थ होती. डॉ. राही अभयपेक्षा मोठी, मागील ४-५ वर्षांपासून ती अभय आणि त्याच्या कुटुंबीयांना ओळखत होती. परंतु या नात्याबद्दल ती पूर्णपणे अनभिज्ञ होती. उद्घाटन सोहळ्याचं निवेदन करण्यासाठी ती मुंबईहून खास इथे आली होती. न राहवून ती बाईंकडे गेली. बाई हसून म्हणाल्या, "राही, सगळी घाई संपू दे. उद्या आपण निवांत जाऊ रेणापूरचं शेत बघायला. मी सगळी कहाणी सांगेन तुला."
     लातूरच्या दुष्काळी भागातील, छोट्याशा रेणा नदीकाठचं, म्हटलं तर जरा सुपीक जमिनींचं गाव रेणापूर ! दिवाळीच्या सुट्ट्या होत्या. रेणा नदीला बऱ्यापैकी पाणी होतं. अभय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या वर्गाला शिकत असतानाची ही गोष्ट... मित्रवेडा अभय, सुट्टीसाठी रेणापूरला येताना लातूरच्या २-३ मित्रांना घेऊन आला. किशोर, गणेश आणि आनंद. सारेच एकमेकांचे घट्ट मित्र. इतरत्र वैद्यकीय महाविद्यालयात लागले होते, अभयला मात्र मुंबईच्या केईएम'ला प्रवेश मिळाला होता !
    घरी आल्या आल्या तो म्हणाला, "मित्रांनो, तुम्ही एमबीबीएसला नुसता प्रवेश घेतलायत तर बाई-काकांना वाटतंय जणू काही डॉक्टर मंडळीच आलीयत घरी ! बघा बघा त्यांनी तुमच्यासाठी ओसरीच्या एका कोपऱ्यात नवा कोरा बेसीनही बसवून घेतलाय." आणि हास्यकल्लोळात रेणापूरचं घर बुडून गेलं. दुसऱ्या दिवशी मुलांचं ठरलं की, नदीवर पोहायला जायचं अन् दोन वाजेपर्यंत घरी परत यायचं. बाईच्या हातचं भरपेट जेवून मस्त ताणून द्यायची अन् रात्री टीव्हीवरचा हिंदी चित्रपट बघत मजा करायची.
दुसऱ्या दिवशी सकाळी पोरं नदीवर निघताच बाईनी काळजीनं विचारलं, "सगळ्यांना पोहता येतंय ना रे नीट? लौकर या जेवायला. मी स्वयंपाक करायला सुरुवात केलीय." पोरं पडवी वा ढाळजेतूनच उत्तरली, 
"बाई काळजी करू नका, भरपूर जेवण करून ठेवा, आम्ही येतोच."
बाई सगळं आवरून ओसरीवर आल्या, तेव्हा दुपारचा दीड वाजला होता. पोरांच्या आवडीची एसर आमटी, कांद्याची चटणी, गव्हाची खीर असा फक्कड बेत केला होता त्यांनी. तेवढ्यात बाहेर कसला तरी गलका ऐकू आला. शेतातला गंपा धावत धावत ओरडतच आला "बाई-काका पळा पळा, पोरं नदीत बुडाया लागल्यात." बाईच्या काळजात चर्र झालं, काका तर ऊर बडवत नदीकडे पळत सुटले... 
"कुणी तरी लेकरांना वाचवा रे... वाचवा."
     शेजाऱ्यांनी बाईंना अडवलं, घरी आणलं. दुपारचे ४ वाजले असतील. एव्हाना नदीवरून थेट ॲम्ब्युलन्सने सगळे लातूरला पोहोचले होते. बाईंनाही रुग्णालयात नेण्यात आलं. हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग समोर होता, आभाळ फाटलं होतं जणू. नदीतल्या एका अनपेक्षित भोवऱ्यात सापडून बुडायला लागल्यावर मुलांनी एकमेकांना घट्ट धरलं, पण... किशोर आणि आनंद, दोघे वाहून गेले होते. बाईंच्या समोर होतं ते त्या दोघांचं कलेवर ! "माझा किशोर मला आणून द्या", "माझ्या आनंदला मी कुठं शोधू आता?" दोघांच्या मातांच्या आकांतानं रुग्णालयाचं आवार गलबललं. बाई-काकांनी हाय खाल्ली. अपराधीभावामुळे दोघे पुरते कोलमडले होते. आपल्या घरी आल्यावर दोन लेकरांचे जीव गेले, त्यांच्या मायबापांना आपण पुत्रशोकात ढकललं ही भावना त्यांचं अंतःकरण कुरतडू लागली. त्या दुःखी आईवडिलांना कसं तोंड दाखवावं, त्यांचं सांत्वन कशानं करावं हे त्यांना समजेना.
     या घटनेला काही दिवस उलटून गेले तरी अपराधी भावनेतून अभयला बाहेर पडता येत नव्हतं. कॉलेजला जाऊन अभ्यास होईल का ? किंवा गेलोच नाही तर काय होईल ? आपण आता आयुष्यात काहीच करू शकणार नाही, या विचारांमुळे तो खरं तर नैराश्यातच मुंबईला निघाला होता. त्याला पोहोचवायला म्हणून बाई-काकाही स्टेशनवर आले होते. समोर पाहतात तर किशोरचे बाबा तिथं हजर ! अत्यंत स्थितप्रज्ञासारखे. त्यांनी अभयच्या पाठीवर हात ठेवला, "बेटा अभय, जी स्वप्नं किशोरची होती, आनंदची होती, तीच तुझीही आहेत. ती पूर्ण करण्यासाठी मुंबईला जा. कसलाही विचार करू नकोस. खूप अभ्यास कर आणि एक उत्तम डॉक्टर बनूनच परत ये, आम्ही तुझी वाट पाहू." भावनावेशाने अभयला मिठीत घेऊन ते धाय मोकलून रडू लागले, तेव्हा सर्वांच्याच भावनांचा बांध फुटला. ट्रेन सुटली, अभयला जरा हलकं वाटू लागलं. बाबांचं केवढं मोठं हृदय ते ! असा बाप शोधून सापडणार नाही, त्याला वाटून गेलं. नंतर काही दिवसांनी मनाचा हिय्या करून बाई-काका किशोरच्या आणि आनंदच्या आईवडिलांना भेटायला गेले. काही क्षण जीवघेण्या निःशब्दतेत गेले. एकाएकी किशोरची आई आणि किशोरची मोठी बहीण, दीदी रडू लागल्या. आनंदचे आईवडील, बाई-काकाही रडू लागले, दुःखाचा सागरच उसळला जणू... परिस्थिती सावरत किशोरचे बाबा साऱ्यांना उद्देशून म्हणाले, "हे पाहा, जे घडलं ती परमेश्वराची इच्छा होती. आता अभय हाच आपला किशोर आणि आनंदही आहे असं समजा. गुणी मुलगा आहे तो, आपल्याला कधीही अंतर देणार नाही. बघा, माझे बोल लक्षात ठेवा!" बाबांच्या या बोलण्यानं किशोरच्या आईच्या मनात अभयचा स्वीकार होण्यास मदत झाली.
    काळ पुढे सरकत होता. अभय, आईची व दीदीची काळजी घ्यायला शिकला. जणू त्याची यशोदाच. मायलेकरांमध्ये आणि बहीण-भावामध्ये खेळीमेळीचं नातं रुजायला लागलं. गणेशही अधूनमधून येऊ लागला. जेव्हा केव्हा अभय सुट्टीला घरी यायचा तेव्हा आईला आधी भेटून मगच रेणापूरला जायचा! करता करता दोन्ही घरांतील ऋणानुबंध घट्ट होत गेले. आनंदचे कुटुंबीयसुद्धा नकळतपणे या साऱ्यांशी एकरूप झाले. गणेशही अभयच्या रुग्णालयात त्याच्याबरोबरीनं दाखल झाला. कालपरत्वे दीदीचं लग्न, तिची दोन बाळंतपणं, या सगळ्यात अभय स्वतः व त्याचं पुरतं कुटुंब सर्वार्थानं रमून गेलं. इतर तीन मित्रांचे कुटुंबीयसुद्धा जोडलेले राहिले. सारे एकमेकांना समजून घेत, आधार देत राहत होते. ना कधी जातपात मनात आली, ना आर्थिक स्तर ! दरम्यान, किशोरच्या बाबांचं निधन झालं आणि पुन्हा सर्वांवर शोककळा पसरली. अभय मात्र बाबांचं वाक्य कधीही विसरला नाही. जात्याच बुद्धिमान असलेल्या अभयने कर्करोग शस्त्रक्रियेतील सर्व अत्युच्च कौशल्यं अवगत केली. परदेशातही प्रशिक्षण घेतलं. नंतर भल्या मोठ्या आकड्यांचा पगार देणाऱ्या नोकऱ्या मुंबईत हाताशी असतानाही गावाकडे येऊन लातूरच्या मातीतच बहरायचं ठरवलं ! अल्पावधीतच पंचक्रोशीत, अख्ख्या मराठवाड्यात त्याचं नाव झालं.
     आज सख्ख्या बहिणीपेक्षाही अभय दीदीला जास्त जपतो. नंतर जुळलेली नातीदेखील. बाईंच्या दोन्ही सुना, जावई, नातवंडं. दीदीचे पती, दोन्ही मुली सारे एकमेकांत मिसळून गेले, एक विस्तारलेलं कुटुंब तयार झालं. किशोरच्या बाबांच्या एका वाक्याने अभयला जशी आयुष्याची दिशा मिळाली, तशी आईलाही जगण्याची उमेद मिळाली. आनंदच्या आईवडिलांनीही परिस्थितीचा सकारात्मक दृष्टीने स्वीकार केला. ऋणानुबंधाच्या सगळ्या चौकटी पार करून मनामनाच्या नात्यांची घट्ट वीण तयार झाली. असे अनोखे ऋणानुबंध ज्यांना उमगले, ज्यांनी मोठ्या मनानं परिस्थितीचा स्वीकार करून, उभरत्या अभयला विश्वास दिला, ते केवढे समृद्ध झाले असतील ! नुकताच, आईला झालेला कर्करोगसुद्धा तिच्या या निष्णात डॉक्टर मुलानं अतिशय ममतेनं हाताळला. हातातोंडाशी आलेल्या, डॉक्टर होऊ घातलेल्या मुलाच्या मृत्यूचं अपरंपार दुःख कुठल्या कुठे विरून गेलं होतं. दीदीच्या मुलीचा आयएएसचा 'इंटरव्ह्यू' दिल्लीत होता तेव्हा अभय स्वतः जातीने तिच्या सोबतीला गेला होता. अगदी कालपरवा दीदीच्या मोठ्या मुलीच्या, म्हणजेच भाचीच्या लग्नात मामा म्हणून पाठीशी उभा राहिलेल्या अभय आणि गणेश या दोन भावांनी, मामा असण्याचं चोख कर्तव्यही बजावलं. नवरीच्या पाठीशी उभ्या असलेल्या डॉ. अभयचे पाणावलेले डोळे आईच्या नजरेतून सुटले नाहीत. आपण म्हणतो, जन्मापासून मृत्यूपर्यंत आयुष्यात हजारो नाती असतात. पण असे ईश्वरी बंध अभावानेच अनुभवास येतात. आइनस्टाइन म्हणतो तसं...
"There are only two ways to live your life. One is as though nothing is a miracle. The other is as though everything is a miracle!"
आपण आयुष्यातल्या घटनांचा स्वीकार कसा करायचा हे प्रत्येकानं ठरवायचं असतं !
(सत्य घटनेवर आधारित)
◆ayachitrujuta@yahoo.com
समाप्त
------------------

 लेखिका -
डॉ. ऋजुता अयाचित
------------------
सौ लोकसत्ता चतुरंग पुरवणी 
30.5.2026
------------------

2996. लपंडाव

   दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमातळावर शिकागोहून आलेलं विमान उतरलं आणि हवाई सुंदरीनं अतिशय गोड आवाजात घोषणा केली.
“काही तांत्रिक कारणांमुळे मुंबई ला रवाना होण्यापूर्वी हे विमान इथे अडीच तास विश्रांती घेईल.”
आणि जीत नं चरफडत “ओह् नो डॅम इट !” अशी निराशा व्यक्त केली. इतर कुठल्या विमानप्रवासात जर दुबईच्या विमानतळावर असा अडीच तासाचा मोकळा वेळ मिळाला असता, तर त्यानं नक्कीच मनसोक्त खरेदी केली असती किंवा एअरपोर्टचा फेरफटका मारत काहीबाही खाण्याचा आस्वाद घेतला असता. पण आज मामला वेगळा होता. आज त्याला वेध लागले होते ते त्याच्या जन्मगावी म्हणजे बडोद्याला जाण्याचे !
‘बडोदा.’ जन्मापासून ते अगदी नवतारुण्यापर्यंत त्याचं आयुष्य याच शहरात व्यतीत झालं होतं. कित्येक आठवणी मनात रुंजी घालत होत्या. त्यामुळंच अमेरिकेत स्थायिक झाल्यापासून म्हणजे जवळ जवळ पंधरा वर्षांनी तो मायदेशी येत होता. म्हणूनच त्याला कधी एकदा बडोद्याला पोहोचतोय असं झालं होतं.  
परंतु आता नाईलाजास्तव अडीच तास व्यतीत करावे लागणार होते. मग नकळत त्याची पावलं कॉफी शॉपकडे वळली. एक कॉफी घेऊन शांतपणे तो लाउंजमधल्या एका सोफ्यावर विसावला.
विमान अडीच तास तिथं रखडलं होतं. पण मनाला आठवणींचे पंख लावून जीत मात्र केव्हाच पुढं जाऊन बडोद्याला पोहोचला होता.
मणीनगरची ती गल्ली, गल्लीच्या मागं असणारी गर्द आमराई.  रोजचा तो डझनभर मुलांचा दंगा आणि कोलाहल. होळीत उडणारे रंग आणि संक्रांतीचे पतंग. दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतली ती धमाल आणि त्या वेळचा सर्वांचा आवडता तो लपंडावचा खेळ. हे सर्व त्याच्या मनात आणि डोळ्यांसमोर एखाद्या स्लाईड शोप्रमाणं झरझर पुढं सरकत होतं.
मणीनगरची ती गल्ली तशी जादुईच होती मुळी. उणीपुरी वीसेक घरं असतील, पण सर्वांमध्ये विलक्षण एकोपा आणि मुलांमध्ये जिवलग मैत्री होती.
सगळे सण आणि उत्सव एकत्र येऊन साजरे केले जायचे. या मैत्रीला आणि उत्साही उत्सवांना मग जातीची, धर्माची बंधनं नव्हती… गरिबी आणि श्रीमंतीची कुंपणं आड येत नव्हती. दिवाळीचा फराळ आणि ईदचा शिरखुर्मा सर्व मिळून फस्त करायचे.
‘शिरखुर्मा’ आठवला तसा जीत थोडासा कासावीस झाला. त्याला चटकन त्याचा जिवलग दोस्त जावेद आठवला…
जावेद… गल्लीतल्या रहमत चाचाचा मुलगा आणि जीतचा जिवलग दोस्त. त्यावेळी जीत आणि जावेदची जोडीच होती मुळी! नेहमी एकत्र खेळणं आणि मस्ती करणं. ईदच्या नमाज नंतर जावेदच्या घरी जाऊन हक्कानं पोट भरून शीरखुर्मा चापणारा जीत दिवाळीत आग्रह करून करून जावेदला चकली लाडूचा फराळ खायला घालायचा.
जीत अतिशय बोलक्या स्वभावाचा आणि बिनधास्त होता त्यामुळं जावेदच्या आई वडिलांना तोही ‘अम्मी-अब्बू’ म्हणूनच हाक मारायचा. सहजपणे त्यांच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचा.
त्यामानानं जावेद मात्र फारच शांत, भिडस्त आणि मितभाषी होता. त्यामुळं जीतच्या घरात जाताना त्याला कमालीचा संकोच वाटायचा. तिथं काही खाताना त्याला लाज वाटायची. अर्थात यामागचं एक कारण म्हणजे जीतचे वडील, म्हणजे हिरालाल देसाई हेही होते.
त्यांना जावेद घरी आलेला फारसं रूचायच नाही. त्यांच्या चेहऱ्यावर त्यावेळी मग त्रासिक आठ्या उमटायच्या. जावेदला त्यावेळेस खूप अवघडल्यासारखं व्हायचं.
अर्थात ‘जीत-जावेद’च्या प्रामाणिक आणि निखळ मैत्रीवर याचा काही परिणाम व्हायचा नाही… कारण घराबाहेर त्यांची मैत्री जीवाला जीव देणारी होती.
जावेदच्या अब्बुंचं म्हणजे रहमत चाचांचं मणीनगरच्या गल्लीतच पतंग आणि खेळण्यांचं दुकान होतं. सगळे जण त्यांना ‘पतंग चाचा’ नावानंच ओळखायचे… कारण अतिशय सुंदर सुंदर आणि रंगीबेरंगी असे वेगवेगळ्या आकारांचे अनोखे पतंग तयार करण्याची कला त्यांच्यात होती.
त्यांनी बनवलेल्या पतंगांना संपूर्ण शहरातून मोठी मागणी असायची. उत्तरायण आणि विविध पतंग उत्सवांमध्ये त्यांच्या सुंदर सुंदर पतंगांनी आकाश व्यापून जायचं.
असंच एकदा रहमत चाचांच्या दुकानात शाळकरी जीतला पतंग घेऊन देण्यासाठी त्याची आई त्याला घेऊन गेली होती आणि तिथंच बसून आपल्या अब्बूला पतंगांना खळ लावायला मदत करणाऱ्या जावेद आणि त्याच्या लहान बहिणीशी म्हणजे झीनतची त्याच्याशी ओळख झाली. आणि मग तेव्हापासून पतंग आणि मांज्याप्रमाणं ही मैत्री अतूट झाली होती.
परंतु गेल्या पंधरा वर्षांपासून मात्र मांज्यापासून विभक्त होऊन पतंग कुठंतरी हरवून गेला होता. लपंडावातला भिडू असा कुठंतरी लपला होता की, सापडतच नव्हता… असं वाटतं होतं की, कधी ही मागून येऊन ‘धपका’ असं म्हणत तो भिडू येईल आणि पाठीवर थाप मारून आऊट करेल!
बडोदा सोडून जीतला पंधरा वर्षांचा काळ लोटला होता… पण या पंधरा वर्षांत त्याला जावेदशी कधीच संपर्क करता आला नव्हता. त्याच्याशी साधं बोलणंही होऊ शकलं नव्हतं.
लहानपणी म्हणजे अगदी मिसरूड फुटायच्या वयापर्यंत जावेद मात्र एखाद्या सावलीसारखा जीत सोबत रहात असे… जीतचं बोलणं, त्याचा आत्मविश्वास जावेदला खूप आवडत असे. तो जीतची काळजीही घेत असे.
असाच एका उन्हाळी सुट्टीच्या दुपारी आमराईत लपंडावाचा खेळ रंगला होता… जीत लपण्यासाठी कोपऱ्यातल्या एका दाट झुडूपामागं जाण्याचा प्रयत्न करत होता.
“जीत… तिथं नको जाऊ त्या सांद्रीत… साप असतात तिथं!” जावेद त्याला समजावण्याचा प्रयत्न करत सांगू लागला.
“अरे काही नाही होत यार… इथं लपलो तर आपण सापडणारच नाही बघ!” असं म्हणत त्या झाडीतून वाट काढत जीत आत जाऊ लागला.
त्याच्या काळजीपोटी जावेद तिथंच लक्ष ठेवून उभा राहिला आणि त्यामुळं तो आऊट देखील झाला. पाच-दहा मिनिटांनी मुलांना जीतच्या ओरडण्याचा आवाज आला आणि जीत जिवाच्या आकांतानं त्या झाडीतून बाहेर पळत आला आणि चक्कर येऊन पडला…
जावेदनं निरखून पाहिलं, तर त्याला जीतच्या पायावर सापाच्या दंशाच्या खुणा दिसल्या. तसं बाकी सगळ्या मुलांची भितीनं गाळण उडाली… पण जावेद मात्र शांत होता. त्यानं प्रसंगावधान दाखवून पटकन स्वतः च्या गळ्यातलं कापड त्याच्या पायावर घट्ट बांधलं आणि धाडस करून स्वतःच्या तोंडानं जखमेच्या जागेतून विष शोषून ते थुंकायला सुरुवात केली.
इतर सगळी मित्र मंडळी मात्र हे पाहून भांबावून गेली. त्यानंतर जावेद इतर एक-दोन मित्रांच्या मदतीनं जीतला उचलून गल्लीतल्या हकीमाकडे घेऊन गेला.
जीतच्या घरी हे समजलं आणि त्याचे वडील तडक तिथं दाखल झाले… पुढचा मागचा काही विचार न करता जावेदच्या कानाखाली जोरदार लावून दिली आणि जीतला त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेले.
अर्थात जावेदनं बरचसं विष आधीच काढून टाकल्यानं जीतच्या जीवाला फारसा धोका नव्हता आणि थोड्या वेळात त्याला बरंही वाटू लागलं… पण आपल्यामुळं काहीही चूक नसताना जावेदला मात्र मार खावा लागल्याचं शल्य त्याला बोचू लागले.
त्या अवस्थेतही तो रात्री जावेद कडे माफी मागायला गेला आणि जावेदनं देखील काही झालंच नाही या आविर्भावात “अरे त्यात काय… चालायचंच तेवढं. अंकलना टेन्शन आलं असेल तुझं, म्हणून रागावले असतील…तू विसरून जा.” असं म्हणत त्यालाच समजावलं.
असा हा जावेद मात्र गेल्या पंधरा वर्षांपासूनच्या आयुष्याच्या लपंडावात कुठं लपून बसला होता कुणास ठाऊक…
हे सगळं आठवून जीतचे डोळे नकळत पाणावले. तेव्हढ्यात त्याच्या विमानाच्या पुढील प्रवासाच्या प्रयाणाची घोषणा झाली आणि त्याची पावलं एक्झिट गेटकडे चालू लागली…

‘आता काहीही करून जावेदला शोधून काढायचंच…’ अशी त्यानं खूणगाठ मनाशी बांधली होती. जीत अमेरिकेत असताना त्यानं जावेदला खूप वेळा फोन केला होता पण जावेदच्या घरातला फोन बंदच झाला होता आणि स्वतः च्या घरी फोन करून चौकशी केली, तर जावेद आणि त्याचं कुटुंब ही गल्ली सोडून दुसरीकडे कुठंतरी गेल्याचं जीतच्या वडिलांनी मोठ्या आनंदानं त्याला कळवल होतं.
जीतसाठी मात्र ही गोष्ट वेदनादायक होती… कारण जावेदचे त्याच्यावर खरोखर अनेक उपकार होते!
जीतचे अनेक नातेवाईक अमेरिकेत स्थायिक झाले होते, त्यामुळं जीतचं ग्रॅज्युएशन पूर्ण होताच तिथं हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करून त्यांच्या कुटुंबाचा हॉटेल्सचा व्यवसाय सांभाळण्यासाठी जीतला देखील तिथं पाठवायची खटपट त्याचे वडील करू लागले होते.
अखेर मनासारख्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याला प्रवेश मिळाला. अमेरिकेला जाण्याची तारीख नक्की झाली. तिकिटं देखील आली. गमनाची सर्व तयारी पूर्ण झाली आणि ज्या दिवशी मुंबईला विमान पकडण्यासाठी जाण्यासाठी म्हणून बडोद्याहून त्याची रेल्वे होती, त्याच सकाळी संपूर्ण गुजरातमध्ये जातीय दंगे उसळले! सर्वत्र जाळपोळ आणि दगडफेक सुरू झाली आणि अखेर सरकारला सेना तैनात करून शहरात कडक कर्फ्यु जाहीर करावा लागला.
तरीही दंगल नियंत्रणात येण्याची काही चिन्हं दिसेनात त्यामुळं ‘दिसता क्षणी गोळ्या घालण्या’चे आदेश प्रशासनानं दिले आणि अमेरिका वारी करू पाहणाऱ्या जीत आणि त्याच्या कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडलं.
घरातून बाहेर पडणं शक्य नव्हतं. रेल्वे स्टेशन घरापासून आठ किलोमीटर लांब असल्यानं तिथपर्यंत प्रवास करून जाणं जीवाला धोकादायक होतं. जीतच्या वडिलांनी त्यांची ओळख वापरून जीतला रेल्वे स्टेशनपर्यंत सुखरूप पोहोचण्याची सोय करण्याचे आटोकाट प्रयत्न केले पण सर्वांकडून केवळ नकार घंटा ऐकायला मिळाली कारण आता बाहेरील परिस्थिती चिघळली होती.
त्यामुळं आता हा प्रवास रद्द समजून निराशेनं जीत त्याच्या खोलीत जाऊन बसला होता… तेव्हढ्यात त्याच्या खोलीच्या खिडकीतून जावेद त्याला हाक मारताना दिसला… 
“काय रे जावेद…?? तू काय करतोयस इथं?” खिडकीजवळ जात जीतनं त्याला विचारलं. 
“अरे तुझी ट्रेन आहे ना साडेआठची?” जावेदनं दबक्या आवाजात त्याला विचारलं.
“अरे हो रे… पण आता जाता येणार नाही. बाहेर काय अवस्था आहे बघतोयस ना तू…??”  निराश होत जीतनं उत्तर दिलं.
“ऐक माझं… असा चान्स आयुष्यात एकदाच मिळतो रे! सोडू नकोस… तुला जायलाच हवं!” त्याचा हुरूप वाढवत जावेद म्हणाला.
“अरे पण कसं शक्य……”
जीतचं वाक्य मध्येच तोडत जावेदनं विचारलं, “तुझ्याकडे किती सामान आहे? म्हणजे बॅगा किती आहेत?”
“का रे…??” काहीच न समजुन जीतनं विचारलं. 
“हे बघ, मेन रोडनं रेल्वे स्टेशनवर जाणं अवघड आहे… मी तुला माझ्या स्कूटरवरून आमराईच्या मागच्या रस्त्यानं उस्मानपुराच्या इकडून सोडतो रेल्वे स्टेशनला… चल लवकर!”
इतर वेळी अडखळत बोलणाऱ्या जावेदनं हे वाक्य मात्र एका दमात बोलून दाखवलं.
“अरे वेडा आहेस की काय…?? नको नको… अजिबात नको. अमेरिकेत काय नंतर पण जाता येईल… पण आत्ता बाहेर पडलो, तर गोळ्या घालतील आपल्याला!” जीतनं स्पष्ट नकार दिला.
“अरे, काही नाही होणार… मला रस्ता ठाऊक आहे व्यवस्थित पोहोचू आपण. फक्त तुझ्या मोठ्या बॅगा तुला नीट पकडून स्कूटरवर बसावं लागेल.” जावेद आता इरेलाच पेटला होता.
अखेर बराच वेळ हो-नाही, हो-नाही करून त्यानं जीतला पटवलंच. परंतु जाण्यात धोका असल्यानं घरी न सांगता जाण्याचं दोघांनी ठरवलं. जीतनं मात्र आईला विश्वासात घेऊन हा धाडसी निर्णय सांगितला आणि रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर फोन करण्याचं वचन देऊन दोघं हळूच मागच्या गल्लीतून रवाना झाले.
…आणि खरोखरच एखाद्या निष्णात वाटाड्याप्रमाणं गल्ली बोळातून वाट काढत काढत जावेदनं जीतला वेळेत रेल्वे स्टेशन वर पोहोचवलं. पण तिथंही भरपूर पोलीस बंदोबस्त असल्यानं स्टेशनबाहेरच थांबून जावेदनं कडकडून मिठी मारून भरल्या डोळ्यांनी त्याच्या जिवलग मित्राला निरोप दिला… आणि जीतनं देखील स्टेशनच्या पायऱ्या चढत चढत डोळ्यांमध्ये जावेदला भरून घेतलं, तेच शेवटचं… त्यानंतर मात्र जावेदची काहीच खबर मिळाली नव्हती.

मुंबईला उतरून रेल्वेनं जीत बडोद्याला पोहोचला. या पंधरा वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं… मणीनगरच्या गल्लीचं रुपडं आता पालटलं होतं. जुन्या घरांची जागा अपार्टमेंट आणि शॉपिंग सेंटर्सनी घेतली होती. सर्व मुलाची आवडती आमराई आता एका ‘जॉगिंग ट्रॅक’मध्ये रुपांतरीत झाली होती.
नकळत त्याची पावलं स्वतःच्या जुन्या घराकडे वळण्याआधी जावेदच्या घराकडे वळली. ते घर आता आजूबाजूच्या चकाचक इमारतींच्या मध्ये, थोरा-मोठ्यांच्या कार्यक्रमात गरिब मुलानं अवघडून बसल्यासारखं दबून गेलं होतं. पतंगचाचाचं दुकान आता पाडण्यात आलं होतं.
एकंदरीत ती गल्ली आधुनिक आणि चकाचक झाली होती, तिथला ओलावा, आपलेपणा मात्र नाहीसा झाला होता. जुने रहिवासी फारसे शिल्लक नव्हते आता… त्यामुळं जावेदबद्दल ‘काही माहीत नाही बुवा… पण चौदा-पंधरा वर्षांपूर्वी ती लोकं ही गल्ली सोडून गेले पहा…’ एव्हढीच बिनकामाची अन् त्रोटक माहिती मिळाली.
मग जीतनं आपल्या जुन्या घराकडे मोर्चा वळवला आणि पुन्हा एकदा जुन्या आठवणी मनात ताज्या झाल्या… त्याला हे घर बिल्डरला विकायचं होतं आणि त्याच व्यवहारासाठी तो खास भारतात आला होता कारण त्याचे आईवडिलही पाच वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थलांतरित झाले होते आणि जीत देखील लग्न करून तिथंच स्थायिक झाला होता त्यामुळं हे घर तसच बंद अवस्थेत पडून होतं. दोन वर्षांपूर्वी वडील देवाघरी गेले आणि माय-लेकांनी हे घर विकायचा मानस केला.
बिल्डरसोबत मीटिंग झाल्यावर तो शहरातच राहणाऱ्या त्याच्या मावशीकडे राहायला गेला. मग जुन्या गप्पा, आठवणी… ‘बडोदा आता पूर्वी सारखं राहिलं नाही…’ अश्या पालुपदानं सुरू झालेल्या माहितीची देवाणघेवाण झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी चहा, पोहे आणि खाकरा अश्या नाष्ट्यासोबत वर्तमानपत्राचा आस्वाद घेत असताना एका बातमीनं त्याचं लक्ष वेधून घेतलं…
अहमदाबादच्या वार्षिक ‘पतंग महोत्सवा’ची बातमी होती. ती वाचून एका अनामिक आशेनं त्याचे डोळे चमकले. त्याचा आतला आवाज त्याला सांगू लागला, ‘बहुधा जावेद इथं भेटणार… या पतंग महोत्सवात तो नक्की असणार…’
असंही बिल्डर सोबत कागदपत्र आणि इतर व्यवहार दोन तीन दिवसानंतर होणार असल्यानं त्याच्याकडे वेळ होताच. मग मावसभावाची गाडी घेऊन त्याने तडक अहमदाबाद गाठलं. तिथं पोहोचून पाहतो तर, महोत्सवात माणसांची आणि आकाशात रंगीबेरंगी पतंगांची भव्य गर्दी होती. जीतची नजर मात्र भिरभिरत जावेदला शोधत होती.
‘कसा दिसत असेल तो आता? जाडा झाला असेल का…? तो मला ओळखेल का…??’ असे अनेक प्रश्न मनात तरळत होते. त्यानं संपूर्ण मैदान पालथं घातलं. सगळे स्टॉल पाहून घेतले पण जावेद काही दिसला नाही.
अखेर निराश होऊन तो एके ठिकाणी थांबला. डोक्यावर ऊनाचा तडाखा चांगलाच जाणवत होता. थंड पाण्याची बाटली घेण्यासाठी तो एका खाद्यपदार्थांच्या स्टॉलकडे आला… तेव्हढ्यात त्याला जमलेल्या प्रेक्षकांचा गोंगाट, शिट्ट्या आणि टाळ्यांचा आवाज ऐकू आला.
त्यानं पाहिलं तर एक वीस पंचवीस फुटी भव्य असा भारताच्या नकाशाच्या आकाराचा तिरंगी पतंग आकाशात झेपावत होता आणि त्या पतंगाच्या दोरीला असंख्य छोटे छोटे पतंग चिटकवून एक पतंगांची लांब लचक माळच जणू तयार झाली होती. प्रेक्षक भारावून गेले होते…
ते पाहून मात्र जीतचे डोळे एकदम चमकले. खुश होऊन शीळ वाजवत तो पाण्याची बाटली तिथंच विसरून मैदानाकडे पळाला.
ही अशी पतंगाच्या दोरीला छोटे छोटे पतंग लावून माळ बनवण्याची खासियत रहमतचाचा म्हणजेच पतंगचाचाची होती… येस…! जावेद सापडला…!!!
त्यानं उत्साहानं गर्दीतून वाट काढत काढत त्या पतंगाला नियंत्रित करणाऱ्या दोघा मुलांना विचारलं, “हा… हा पतंग कुणी बनवला सांगू शकाल का?”
त्यावर जीतकडे आपादमस्तक पहात त्यातल्या एकानं उत्तर दिलं… “जावेदभाई ने बनाया है!”
आता मात्र जीतच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. अखेर त्याला त्याचा जीवाचा सखा सापडला होता.
“कहां मिलेंगे जावेद भाई?” त्यानं खुशीत येत विचारलं.
“वो है ना उधर… रहमत काईट शॉप में… ऑफिस के बाजू…” त्या मुलानं डाव्या बाजूला हातानं निर्देश करून सांगितलं आणि पुन्हा पतंग नियंत्रणात गुंग झाला.
झपझप पावलं टाकत जीत त्या रहमत काईट शॉप मध्ये दाखल झाला. दुकानात पतंग विकत घेणाऱ्यांची गर्दी होती . जीतच्या शोधक नजरेला सर्वात आधी एका लहान मुलाला पतंग देणारी ‘झीनत’ दिसली आणि तिथंच पलीकडे एका टेबल खुर्चीचं काउंटर करून पैसे मोजत बसलेला ‘जावेद’ही दिसला…
त्या रात्री रेल्वे स्टेशनवर भरल्या डोळ्यांत दिसल्यानंतर आज पंधरा वर्षांनी पहिल्यांदा… पुन्हा एकदा काहीही न बोलता जीत केवळ एकटक त्याच्याकडे पाहत होता…
थोडा जाड झाला होता तो… पण काळ्या रंगाचा पठाणी, त्यावर पिवळं जरीचं जाकीट अश्या पेहरावात छान दिसत होता. पूर्वीची खुरटी दाढी आता व्यवस्थित आणि कोरीव दिसत होती.
तेव्हढ्यात झीनतचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि नकळत, “जी बाबूजी, क्या चाहिए?” असा प्रश्न तिच्या तोंडून निघाला. 
“पतंगाच्या दोरीला एव्हढी पण ढील देऊ नये जावेद भाई… की पतंग आकाशात कुठंतरी हरवून गेला, तरी लक्षात येणार नाही!”
जीतच्या मुखातून हे वाक्य बाहेर पडलं आणि जावेदनं एकदम चमकून वर पाहिलं… हातातले पैसे तसेच टेबलवर टाकून स्तंभित नजरेनं तो आ वासून जीतकडे पाहू लागला.
“जीत…! जीत…!!!” असे उसासायुक्त उद्गार त्याच्या तोंडून बाहेर निघाले. डोळ्यात पाणी आणि घश्यात आवंढा आल्यानं तोंडून शब्द फुटेना.
झीनतलाही आता चटकन ओळख पटली आणि 
“या अल्ला…! जीत भाई…!!!” म्हणत डोळे पुसत पुसत ती पुढं आली आणि झटकन जीतला बिलगली. दुकानातलं संपूर्ण वातावरण भावपूर्ण झालं होतं.
जावेदकडे पाहत जीत म्हणाला, “साल्या, कुठे हरवून गेला होतास रे? इतक्या वर्षांत एकदा पण मला शोधण्याचा प्रयत्न केला नाहीस तू…?? नालायका… अरे, कुठं कुठं शोधलं मी तुला! बघ शेवटी मीच तुला शोधून काढलं की नाही?”
उत्स्फूर्तपणे मनसोक्त बोलून झाल्यावर आता मात्र जीतचा आवाजही जड झाला होता. त्यानं दोन्ही हात पसरून “लेका, आता तिथंच काय बसून राहिलायस…? ये बाहेर… भेट मला…” असं आवाहन केलं आणि झीनत अन् जावेद एकमेकांकडे पाहू लागले.
जीतला काही समजलं नाही आणि तोही या दोघांची तोंड पाहू लागला आणि तेव्हढ्यात… एका क्षणी त्याची नजर जावेदच्या खुर्चीला टेकवून उभ्या केलेल्या कुबडीवर पडली आणि दुसऱ्या क्षणाला त्याला जावेदच्या ‘पठाणी’च्या पायजम्याचा गुडघ्यापासून खाली हवेत मोकळा हलणारा भाग दिसला, तसं जीत पूर्णपणे हलून गेला.
मोठा धक्का बसला त्याला… “ओह माय गॉड…!” असं चित्कारत तो पुढं जाऊन जावेदच्या तुटलेल्या पायापाशी खाली बसला.
“अरे हे काय…??? हे कधी झालं? आणि काय झालं…?? जावेद, झीनत… का नाही कळवलं मला…???” आता जीत कळवळून बोलत होता.
“ते सोड ना यार… चल, भेट मला…” असं म्हणत जावेद टेबलच्या साहाय्यानं उभा राहिला आणि दोघांनी एकमेकाला कडकडून मिठी मारली, पाठीवरून हात फिरवला… डोळ्यातले अश्रू आता त्सुनामीसारखे वाहू लागले.
दुकानातले लोक मैत्रीचा हा अनोखा सोहळा पाहू लागले. झीनत देखील गहिवरली होती. थोडा आवेग ओसरल्यावर जीतनं जावेदला खाली बसवलं आणि डोळे पुसत पुन्हा तोच प्रश्न झीनतला विचारला.
“जीत भाई… ते मागे दंगलीच्या वेळी…” एक डोळा जीतकडे आणि दुसरा जावेदकडे करून चाचपडत बोलणाऱ्या झीनतला मध्येच थांबवत जावेद म्हणाला, 
“छोड ना यार… होत असतं असं… जिंदगी म्हटलं की हादसे होतातच! ते जाऊ दे, तू कधी आलास ते सांग जीत. घरी कसे आहेत सगळे…?? आणि किती दिवस राहणार आहे तू आता?”
पण नेहमीच्या सवयीनुसार तो विषय टाळायला पाहतोय हे जीतच्या लक्षात आलं.
“तू गप्प बस रे! मार खाशील नाही तर. हं… तू सांग झीनत …” पाहिलं वाक्य जावेदला आणि दुसरं झीनतला उद्देशून होतं.
झीनत सांगू लागली… “जीत भैया, त्या रात्री तुला रेल्वे स्टेशनला सोडून भाई परत येत होता… उस्मानपुराच्या कॅनाल जवळ त्याची स्कूटर एका जमावानं अडवली आणि त्याला मारहाण केली. त्याची स्कूटर जाळून टाकली…” आता पुढं बोलताना मात्र झीनतला रडू आवरेना.
जीत तिचं सांत्वन करायचा प्रयत्न करू लागला… पण तिचं पुढचं वाक्य ऐकून मात्र तो पूर्णपणे हबकून गेला. त्याला बोलण्यासाठी शब्दही सापडेना…
“त्या लोकांनी लाठीनं आणि तलवारीनं भाईच्या पायावर वार केले… तेव्हढ्यात पोलिसांची गाडी आली आणि त्याची सुटका झाली… पण… पण त्याच्या गुडघ्याखालचा पाय मात्र कायमचा गेला…”
काही क्षण तिथं जीवघेणी शांतता पसरली.
“…पण मग आपल्या गल्लीत… किंवा इतर कुणालाही कसं कळलं नाही?” जीतनं मौन सोडलं.
“भैया… त्या रात्री जावेदभाईला अश्या अवस्थेत गल्लीत आणलं आणि पुन्हा दोन्ही समाजातल्या लोकांमध्ये दंगे सुरू झाले… अखेर अम्मी-अब्बूनी ती गल्ली आणि बडोदा पण सोडायचं ठरवलं आणि आम्ही इथं अहमदाबादमध्ये आस्मां खालाच्या घरी राहायला आलो…
“अब्बूनी इथं पतंग दुकान सुरू केलं, पण त्यांना इथं फारसं मानवलं नाही… दोन वर्षांतच अब्बू वारले आणि तीन वर्षांपूर्वी अम्मी पण...” झीनतला पुढं बोलवेना.
जीत बराच काळ शांतपणे बसून होता. मनात लाखो विचार एकाच वेळी वादळ घालत होते. एक प्रचंड अपराधीपणाची भावना त्याला टोचू लागली. आपल्यामुळं जावेदची आणि त्याच्या कुटुंबाची ही अवस्था झाली होती, हा विचार त्याला खूप त्रासदायक ठरत होता.
त्या दिवशी त्या दोघांना भेटून तो बडोद्याला परतला. अमेरिकेत फोन करून आईशी आणि पत्नीशी बोलून त्यांना ही सर्व घटना त्यानं सांगितली आणि एक महत्त्वाची चर्चा केली.
नंतर पुन्हा तीन चार दिवसांनी तो पुन्हा अहमदाबादला परतला आणि जावेद-झीनतला समोर बसवून आपल्या मनातील विचार मांडला…
“हे बघ जावेद, आता तुम्ही दोघांनी इथं राहायचं नाही. माझ्या सोबत शिकागोला चला. तिथं आमच्या फॅमिली बिझनेसमध्ये अनेक हॉटेल्स आहेत. बिझनेस मोठा आहे. त्याला सांभाळण्यात मला तुझी मदत हवीय. व्हिसा आणि इतर कामं मी पूर्ण करतो. अजुन दीड महिन्यांनी तुमची दोघांची तिकिट पाठवतो. तुम्ही आता माझ्यासोबत राहायचं. बास झाला हा लपंडाव…!!”
जावेदनं मात्र स्पष्ट नकार दिला कारण त्याला कुणावर अवलंबून राहायला अवघड वाटत होतं. पण सहजासहजी ऐकेल तर तो जीत कसला? त्यानं लहानपणीची रामबाण युक्ती म्हणजे शपथ घालून अखेर त्याला पटवलंच आणि हेही स्पष्ट केलं की, ही कसली ही मेहेरबानी किंवा उपकार नाहीत. एक बिझनेस पार्टनरशीप आहे !
आणि नंतर यथावकाश वचन दिल्याप्रमाणं जीत त्या दोघांना स्वतःकडे कायमचं घेऊन गेला आणि हा लपंडावाचा खेळ अखेर संपला. या खेळात विजय झाला तो मात्र मैत्रीचा !

- सागर जोशी, पुणे.

2995. पसंत आहे मुलगी

 अन्वी झोपायला म्हणून बेडरूममध्ये आली तर तिची आई मोबाईलवर बोलत होती. आईचे शब्द तिच्या कानावर पडत होतें.
'पण ती नाही म्हणते. तिच्या मनाविरुद्ध आम्ही नाही जाणार. तेंव्हा तुम्ही दुसरे स्थळ शोधा.
अन्वीच्या आईने फोन ठेवला.
'हा कितवा नंबर? अन्वीने हसत विचारले.
'तुला गम्मत वाटते. मला एकएकाला तोंड द्यावे लागते. तीस वर्षे झाली तुला. अजून एक मुलगा पसंत पडत नाही. त्या रोहिणीताई रोज चारपाचतरी स्थळें पाठवतात. एक पण तुला पसंत पडत नाही.
'अग त्या रोहिणीताईचा व्यवसायचं आहे. मुलाला मुली आणि मुलीना मुलगे दाखविण्याचा.
'अग त्यानी तुझ्यासाठी मला वाटते.
अन्वीच्या आईने आपला मोबाईल उघडला आणि जोस्नाताईंनी किती मुलगे अन्वीसाठी पाठविले ते त्या मोजू लागल्या..
'शहात्तर स्थळें त्यानी पाठविली. त्यातील एक स्थळ सोडून बाकी पंचांहत्तर स्थळांना तू नकार दिलास. कोण समजतेस स्वतःला.. आहेस सुंदर आणि हुशार.. म्हणून काय झाले?
उशी डोकयावर घेऊन झोप अनावर झालेल्या अन्वीने तिचे वाक्य ऐकले. त्यातील दोन शब्द तिला झोंबलं..'
'एक स्थळ सोडून..
तिने आईला विचारले..
'आई, एक स्थळ सोडून... म्हणजे..
'अग त्या मुलाने तुझ्याशी लग्न करायला नकार दिला..
'काय सांगतेस? बाकी पंचांहत्तर माझ्याशी लग्न करायला तयार आणि एकजण नकार देतो... मला नकार... माझ्यासारख्या सुंदर आणि या वयात मोठया पोस्टवर पोचलेल्या, आईबाबाच्या एकूलत्याएक मुलीशी लग्न करायला नकार?.. आई, कोण आहे तो? त्याचा पोर्टपोलिओ बघू...
तिच्या आईने त्या मुलाचा पोर्टपोलिओ शोधून तिला दाखवला.. तिने नाव वाचले..
'देविदास आंब्रे...भवानीपेठ.. पुणे.
'देविदास आंब्रे.. भवानी पेठ काय? परवा रविवार आहे ना.. त्याचा पूर्ण पत्ता पाठव मला..
'अग पण कशाला हवा तुला? त्याच्या आईने फोन करून सांगितले.. माझ्या मुलाला तुमची मुलगी पसंत नाही म्हणून..
'जोस्नाताईंनीच माझा पोर्टफोलिओ त्याना पाठविला असणारं आणि त्याचा आपल्याला... बघू बघू त्याचा..
  अन्वीच्या आईने देवदासचे टिपण तिला पाठविले.ती वाचू लागली.
देवदास आंब्रे..
मेक्यानिकल इंजिनीअर.
इंडियन रेल्वे मध्ये नोकरी. सध्या पुणे डिव्हिजन.
'ओके, तर हा देवदास रेल्वेमध्ये नोकरीला आहे.. म्हणजे माझ्या पेक्षा याचा पगार कमी असणारं.. रहातो भवानीपेठेत.. म्हणजे चाळीत रहात असणारं.. तरी हा मला लग्नाला नकार देतो?
'आई.. मी रविवारी या देविदासच्या घरात जाणार आणि त्याला विचारणार.. बाबारे, मला नकार देण्याएव्हडे माझ्यात वाईट काय आहे ते मला सांग..
'अग सोडून दे ग अन्वी.. तू म्हणजे एक डोक्यात घेतलंस कीं घेतलंस.. मी पण उगाचच तुला सांगायला गेले.
'पण तुला माहित आहे ना.. मी हट्टी आणि जिद्दी आहे बाबासारखी.. मी जाणारच.. आई बाबा केंव्हा येणार आहेत?
'बाबा बहुतेक रविवारीच येतील. सिंगापूरहुन जास्तीत जास्त पाच नाहीतर सहा तास लागतात.
रविवारी सकाळी अन्वी आणि तिची आई ब्रेडआम्लेट आणि ब्लॅक कॉफी घेत असताना अन्वीच्या डोक्यात देवदास होता.. या देवदासने आपल्याशी लग्न करायला नकार दिला होता. त्याला जाब विचारायलाच हवा. होय होय.. विचारायलाच हवा.. आपण आजच जावे त्या देविदासच्या घरी..
'आई, मी भवानी पेठेत जाऊन येते... त्या देविदासच्या घरी..
'अग, सोडून दे तो विषय..
'छे छे.. मला समजायला हवं ना माझ्यात काय दोष आहे तो.? मी जाऊन येते...
गाडीची किल्ली घेऊन अन्वी लिफ्टमधून झाली उतरली, पोर्च मधून तिने सराईतपणे गाडी बाहेर काढली, तिने देविदासच्या घराचा मॅप लावला आणि ती गाडी चालवू लागली.
    दहा मिनिटात ती देविदासच्या बिल्डिंगजवळ आली. दोन मजली जुनी बिल्डिंग होती आणि वरच्या मजल्यावर देविदास रहात होता. ती जिना चढून वर गेली आणि दाराच्या पाटीवर आंब्रे हे नाव वाचून तिने दारावर टकटक केली.
एका मध्यमवयीन स्त्रीने दरवाजा उघडला.
'कोण पाहिजे?
'देविदास आंब्रे.....
'देविदास आतल्या खोलीत आहे, त्याला थोडा वेळ लागेल बाहेरयायला... आपण कोण?
'मी अन्वी.. म्हणजे तुम्ही माझ्या आईला फोन करून तुमची सुन करायला नकार दिलेलात ना.. ती मीच..
'अगबाई.. ती अन्वी काय.. मी काय करणार.. तुझे नाव त्याला सांगितले मात्र.. त्याने आधीच 'नकार दे ' असे मला सांगितले.मी त्याला परत परत विचारले. म्हंटले अरे तिचा फोटो तरी बघ.. पण तो परत तेच म्हणाला..'त्याना नकार कळव.. शेवटी मी तूझ्या आईला फोन केला.. बस.. मी चहा आणते..
'नको.. मी घरून कॉफी घेऊन आलेय..
'हो ग.. बस तर.. मी चहा आणते..
ती बाई आत वळली, अन्वी एका लाकडी खुर्चीवर बसली. एक जुन्या बिल्डिंग मधला लहानसा ब्लॉक होता तो.. रंग उडालेल्या भिंती.. एक लोखण्डी कॉट होती.. दोन टेबल्स.. एका टेबलावर लॅपटॉप.. भिंतीला पट्टी मारून त्यावर देव्हारा.. आतमधून कुणा पुरुषाचा आवाज आला..
'कोण आलाय?
'ती मुलगी.. अन्वी.. देऊने नकार दयायला सांगितली ती..
'हो काय.. ती कशी काय आली.. म्हणत ते गृहस्थ बाहेर आले..
'तू काय अन्वी.. छान आहेस कीं.. तुझ्यासारख्या मुलीला देऊने..
एव्हड्यात देविदासची आई चहा आणि खारी बिस्कीट्स घेऊन आली. तिच्या समोरील टेबलावर ठेऊन म्हणाली..
'घे ग.. तुला खारी आवडतात कीं नाही कोण जाणे.. पण देऊला खारीच हवी असतात..
'मला पण आवडतात हो.. आम्ही पुण्यात यायच्या आधी मुंबईत गिरगांवमध्ये रहायचो... असच आमचं चाळीतलं घर होत. बाहेरच्या खोलीत अशीच कॉट असायची आजोबांची.. त्या काळात दारात खारी बिस्कीट्स घेऊन अकजण यायचा.. आई खारी घ्यायची.. मला खूप आवडतात.. पुण्यात टॉवरमध्ये आल्यावर सारेच बदलले..
'घे चहा आणि खारी.. बाहेर आलेले बाबा म्हणाले आणि अन्वी खारी चहात बुडवून खाऊ लागली.
'हं बोल अन्वी...
'तू मला ओळखतॊस याची कल्पना नव्हती.
'होय.. त्या काळात कॉलेजमधील सुंदर, देखण्या मुलींचा ग्रुप होता.. म्हणजे चार पाच मुली.. त्या इतर मुलामुलीशी फारश्या बोलायच्या नाहीत आणि त्त्यांची राणीमाशी तू होतीस अन्वी..
अन्वी हसू लागली..'राणीमाशी? कसली राणीमाशी? अरे मी मुंबईहुन आले होतें, त्यामुळे थोडी स्मार्ट होतें.. त्यामुळे माझ्या मैत्रिणी थोडया दबून वागायच्या एव्हडंच... पण मी आज तुझं घर शोधत आले कारण..
'कारण मला माहित आहे.. त्या जोस्नाताईंनी माझ्यासाठी काही स्थळें पाठविली होती.. त्यात तुझं पण स्थळ होत.. माझ्या आईने मला तुझा फोटो आणि टिपण दाखवलं.. तेंव्हाच मी तिला सांगितलं.. या मुलीशी आपली सोयरीक जमण्यासारखी नाही.. तेंव्हा तूच फोन करून त्यानी नाही म्हणण्याआधी तूच नाही म्हणून सांग.
'पण असं का? माझ्या आईने माझ्यासाठी पंचांहत्तर स्थळे आणली पण एकाही मुलाला मी हो म्हंटले नाही. त्या सर्व मुलांचा माझ्याशी लग्नाचा होकार होता पण तूच एक.. कीं ज्याने माझ्याशी लग्नाला नकार दिला. म्हणून मी तुझा पत्ता घेऊन तुला विचारायला आले.. कीं तू का नकार दिलास..?
'अन्वी.. तुला मी आत्ता म्हणालो.. आपण एकाच कॉलेजला होतो. तू स्कॉलर.. नेहेमी हुशार आणि सुंदर चार मैत्रिणीसोबत असायचीस आणि मी कायम टारगट मुलात. आम्ही ट्रिप्स काढायचो, ट्रेकिंगला जायचो, कॉलेजच्या एकांकिका, नाटकात भाग घ्यायचो आणि दुसऱ्या श्रेणित पास व्हायचो. तू नेहेमी पहिला दुसरा नंबरवाली. ठराविक मैत्रिणीत वावरणारी.. बऱ्याच वेळा फोर व्हिलरघेऊन कॉलेजमध्ये येणारी.. उंची कपड्यात वावरणारी... माझ्या घरी माझे आईबाबा चाळीत राहणारे.. माझे आजोबा बेडवर.. त्त्यांचे सर्व करावे लागते... माझे नातेवाईक भरपूर, अधूनमधून इथे मुक्कामाला येत असतात.. माझे मित्रमंडळ मोठे.. त्यान्च्या तोंडात शिव्या भरपूर.. ही मित्रमंडळी माझ्या अवतीभवती असतात.
'तूझ्या माझ्या पगारात फरक आहे, हे तुला जाचत होत का देविदास?
'नाही खरे म्हणजे.. तू एका कॉर्पोरेट कंपनीत मोठया हुद्दा्यावर आहेस आणि मी रेल्वेत इंजिनीअर.. हा फरक आहेच, पण मी त्याचा बाऊ करत नाही कारण माझ्या आईचा पगार बाबांच्या दुप्पट आहे. पण त्यान्च्या संसारात फरक पडला नाही, पण..
'म्हणजे आपल्या स्टेट्स मध्ये फरक आहे असे म्हणायचेय तुला देविदास.. पण दिसत तस नसतं.. तू समजतेस तशी मी नाही.. मी माझ्या आईवर गेले आहे रूपाने, त्यामुळे सुंदर आहेच.. ते बदलू शकत नाही.. पण देखण्या मुलींना फार सांभाळावे लागते कारण त्त्यांचे नाव कुणाही बरोबर जोडले जाते. त्त्यांची बदनामी केली जाते.. सध्याच्या मोबाईल जमान्यात तर खूपच सांभाळवे लागते स्वतःला. मला का वाटतं नसेल कॅन्टीनमध्ये जाऊन मित्रमैत्रिणीसोबत वडापाव खावा.. कॉफी प्यावी.. ट्रेकिंगला जावे.. ट्रिप्सला जाऊन धिंगाणा घालावा, ग्यादरिंगच्या नाटकात भाग घ्यावा.. अरे सारे मला वाटतच होतें... पण मी मनाला आवरत होतें.. मला माझ्या पप्पासारखे टॉपवर जायचे होतें.. खरी मुळात मी तशी आखडू नाही. मला नातेवाईक हवे असतात. आमच्या गिरगांवच्या घरी भरपूर नातेवाईक यायचे... माझे आजोबा आजी, आई त्त्यांचे सर्व करायचे आनंदाने. पण पप्पा वरवर जात राहिले.. मग आमचे स्टेट्स बदलले.. आम्ही पुण्यात टॉवरमध्ये राहायला आलो.. आमच्यकडे गाड्या आल्या... पैसे आले.. पण त्याने नातेवाईक लांब झाले. त्याना आम्ही कुणीतरी वेगळे वाटू लागलो... मला माझ्या मुळच्या स्वभावात बदल करावा लागला.
मघा तू आजोबांना मालिश करत होतास ना... मला माझे आजोबा.. आजी आठवली... माझ्याकडून मालिश करून घेणारी. मला तूझ्या आईने खारी बिस्कीट्स आणि चहा दिला.. किती छान लागला चहा खारी बुडवलेला.. मघा तुझे बाबा मटार सोलत हॉलमध्ये बसले होतें.. मला माझ्या तरुणपणीचे पप्पा आठवले. आपण वरुन बदललो असे दाखवत असतो रे.. आतून तसेच असतो. हे सारे आपल्या मुळात असते, आपण वेगळा मुखवटा धारण करत असतो.
'पण मी आईला सांगून तूझ्या आईला नकार दयायला लावला याचा तुला राग आला असेल?   
'खरं तर नाही. माझ्या देखणेपणाला, शिक्षणाल मोठया पगाराला भुलून पंचाहत्तर तरुणांनी होकार दिला पण नकार देणारा तू एकटाच..
'मग झाला का मला जाब विचारून? मग मी जाऊ.. मला आजोबांना आंघोळ घालायची आहे.
'पण त्या आधी तूझ्या आईला जाऊन सांग. माझ्या आईला फोन करायला तुमची मुलगी पसंत आहे म्हणून..
'काय?
'मी पसंत आहे ना तुला देविदास?
'अग.. तुला पसंत न करणारा म्हणजे..
ती दोघे ग्यालरीतून हॉलमध्ये आली. त्याचे आईबाबा शांतपणे मटार सोलत होतें. पण त्त्यांचे कान मात्र ग्यालरीत होतें..
'आई. अन्वीच्या आईला फोन करून सांग.. पसंत आहे तुमची मुलगी म्हणून..
 'काय? देविदासचे आईबाबा एकदम किंचाळले...
'होय आई.. मी अन्वीला का नकार देत होतो, हे तिला सांगितले.
'आणि आई, देविदास मला का आवडला हे मी त्याला सांगितले. आमची मने साफ झाली.
देविदासच्या आईने अन्वीच्या आईला फोन लावला.
'हॅल्लो.. मी देविदासची आई बोलते आहे. अन्वी आमच्याकडे आली आहे आणि महत्वाचे म्हणजे पसंत आहे तुमची मुलगी.  
'काय अन्वी पसन्त आहे तुम्हाला? माझा विश्वास बसत नाही.
तेव्हड्यात देविदासच्या आईच्या हातून फोन घेऊन अन्वी आईला म्हणाली.
'म्हंटले होतें ना तुला आई. पंचांहत्तर मुलांनी मला पसंत केले, एकच मुलगा मला नापसंत करतो म्हणजे काय? मी इथे आले आणि त्याला आणि त्याच्या आईला म्हणायला लावले.
पसंत आहे मुलगी.

  प्रदीप रामदास केळूस्कर
  9422381299/9307521152.

2994. मेपल

      ती लग्न होऊन समुद्रकिनारी वसलेल्या आणि निसर्गानं सजलेल्या एका सुंदर गावात आली होती. भारत आता साता-समुद्रापलीकडे राहिला होता. नवा देश, नवी लोकं, नवी भाषा. या सर्व नव्या गोष्टींमध्ये ओळखीचे होते ते फक्त आकाशातले चंद्र-सूर्य, अंगणातली गुलाब-शेवंती आणि देव्हाऱ्यातला बाळकृष्ण ! देशांतरामुळं गोकुळाष्टमीला वृंदावनात जायचं केव्हापासूनचं स्वप्न आता मागं पडलं होतं. ‘घडेल देवाच्या मनात असेल तेव्हा,’ अशी तिनं स्वत:ची समजूत घालून घेतली होती.  तिला नेहमीच माणसांपेक्षा निसर्ग जवळचा वाटे. बाहेरच्या लिली, ट्यूलिप, डॅफोडिल आता तिच्या सख्या बनल्या होत्या. पण अंगणातल्या मेपल वृक्षासोबत तिचं एक वेगळंच नातं जुळलं होतं. 
     मेपल ट्री च्या रसरशीत हिरव्या पानांची सळसळ तिला भारून टाकत असे. कित्येक प्रश्नांची उत्तरं मेपलजवळ बसल्यावर तिला सापडत असत. मेपलच्या पानाचा आकार फार सुंदर होता. अगदी बोटं पसरलेल्या तळहातासारखा! मधूर मेपल सिरप देणारा हा जगप्रसिध्द, औषधी वृक्ष ! वसंत ऋुतू मधला लाल मोहोर, नंतर झालेली रसरशीत हिरवी पोपटी पानं आणि त्यानंतरची केशरी, लाल, पिवळी पानं रंगाची उधळण करताना बघून तिला विधात्याचं कौतुक वाटत असे. दर हिवाळ्यात पानगळ होताना पाहून डोळे भरून येत असत. ‘जेमतेम वर्षाचं आयुष्य असणारी ही पानं केवढा आनंद देऊन जातात जगाला !’
    भारतातून ‘बाबा गेल्या’ची बातमी आली तेव्हा ती उदास होऊन बाहेरच्या पायरीवर बसली होती. बर्फ भुरभुरू लागला होता. पानं गळलेला मेपल त्या बर्फात हिमालयातला योगी वाटत होता. शांत. ध्यानस्थ. तटस्थ !  मेपल कसा या थंडीत तटस्थ उभा राहू शकतो? Acceptance मुळंच ना? मी पण बाबांचं जाणं तटस्थ राहून त्याकडे जीवनाचा अपरिहार्य भाग म्हणून accept करू शकले तर? मेपलच्या खोडावर तिनं प्रेमानं हात फिरवला. डोळे पुसले व ती घरात गेली.  मध्यंतरी तिच्या नवऱ्याला बरं नव्हतं. आजारात त्याचं वजन कमी झालं होतं. नेमक्या त्याचवेळी आलेल्या वादळात मेपल च्या दोन मोठ्या फांद्या तुटून लोंबत होत्या. 
“माणूस बोलावूया का त्या मोडलेल्या फांद्या काढायला?”  तिनं त्याला विचारलं. 
“नको... मला बरं वाटलं की आपणच बेतानं जरूर त्या फांद्या कापू.” तो म्हणाला. तिला ते पटलं. त्या फांद्या कापून काढताना डोळ्यात काहीतरी गेलं, म्हणून दोघं डोळे पुसत घरात आले.  जसजशी मेपलची उंची वाढत गेली, तसतसं त्याचं खोड दुभंगू लागलं. ते फार दुभंगू नये म्हणून त्या खोडात एक मोठा खिळा आरपार मारावा लागला तेव्हा तिच्या पोटात कालवलं होतं. नवरा पण बरं वाटत नाही म्हणून त्या दिवशी झोपून होता. 
ती नवऱ्याला म्हणाली, “मेपल बहरला की आपल्याला पण बहरून आल्यासारखं वाटतं ना रे? आणि तो सुकला की आपणही सुकतो बघ. आपला जीव इतका कसा गुंतलाय त्याच्यात? काय आहे नातं आपलं?” 
तो हसून म्हणाला, “अग,त्याच्या फांद्या तुटणं व माझं आजारानं वजन कमी होणं, हा योगायोग असेल. पण तुझ्या कृष्णालाच विचार ना ! तो देईल उत्तर!”
ती काही बोलली नाही, पण मेपलशी आपलं अतूट नातं आहे याची तिला जाणीव होती. मेपलच्या खालच्या फांदीवर बांधलेल्या झोक्यावर तिची मुलं खेळली होती. ती मुलांना घेऊन मेपल च्या सावलीत निवांत बसली की तिला शांत वाटायचं. त्यानं तिच्या सर्व सुखदुःखात तिला अबोल साथ दिली होती. श्रीकृष्ण आणि कदंब वृक्षाच्या अजरामर नात्याची तिला आठवण होत असे. 
माळी म्हणाला, “ताई, मेपल हे शांतपणा आणि तटस्थतेचं प्रतीक आहे. आयुष्यात गोठवणारी वादळं येणार, तसंच सोनेरी ऊन पण येणार ! वाळवी लागणार व किलबिलणारे पक्षी पण येणार ! 
“काही असो...तो कायम शांत राहतो ! कडक थंडीतून गेल्याशिवाय वसंत ऋतू दिसत नाही, हा निसर्गाचा नियम आहे हे मान्य करून!” 
ती थक्क होऊन ऐकत राहिली. 
     ३० वर्षात मेपल खूप उंच झाला होता. निळ्या आकाशाला जाऊन भिडला होता. तिचा नवरा पण आता साठीजवळ आला होता. त्याला कसलंसं इन्फेक्शन होऊन एकदम ताप आला आणि ताप इतका बळावला की ICU मधे ठेवण्याची वेळ आली. 
‘काही बरं वाईट झालं तर काय?’ असे विचारही तिच्या मनात आले होते.  कृष्णाला हात जोडून सांगितलं, 
“नवरा सुखरूप घरी येऊ दे रे बाबा !”
ती त्याचा डबा करण्यासाठी हॉस्पिटलमधून घरी आली. घरी येताच मेपलकडे पाहताना तिला भरून आलं. ती पानांची सळसळ आणि रसरशीत हिरवा रंग बघताना एकदम तिच्या डोक्यात प्रकाश पडला. मेपलचं एकही पान सुकलं नव्हतं की गळलं नव्हतं! कुठलीही फांदी तुटली नव्हती. नवरा त्या आजारातून पुर्णपणे बाहेर पडणार याची तिला एकदम जाणीव झाली. 
दोन तासांनी मुलाचा हॉस्पिटलमधून फोन आला. 
“आई, बाबांना नव्या औषधानं गुण आलाय. ताप नाही आता. डॉक्टर म्हणाले की धोका टळलाय !”
पुढच्या आठवड्यात गोकुळाष्टमी होती. ती शुचिर्भूत होऊन हिरवी पैठणी नेसून पूजेची थाळी घेऊन मेपलजवळ आली. साता समुद्रापलीकडे असलेलं घराचं अंगण हेच तिचं वृंदावन होतं आणि तो मेपलच तिचा कृष्ण होता. 
“देवा, मेपल हे तुझंच रूप आहे, हे मी विसरून गेले होते. तू आजवर त्याच्या रूपानं आधार दिलास. जरूर ते संकेत देत गेलास. ‘चालविशी हाती धरोनिया’ असा सांगाती राहिलास, पण मी तुला ओळखलं नाही. 
“आज कळलंय...मेपल काय, कदंब काय आणि बोधीवृक्ष काय ! तुझीच रूपं ती ! शेवटी निसर्ग हेच तुझं व्यक्त रूप आहे हे कळायला मला फार वेळ लागला !” 
‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ म्हणत असताना तिला मुकुटात मोरपीस घातलेला, बासरी वाजवणारा आणि मिष्कील हसणारा श्रीकृष्ण मेपल मधे दिसत होता. 
“देवा घडवलीस वृंदावन यात्रा ! मी इच्छा असून वृंदावनात जाऊ शकले नाही, म्हणून तुच माझ्याकडे आलास. तुला काय अशक्य आहे? तुझा साक्षात्कार होण्याची वाट बघणाऱ्या माणसाला तू किती प्रकारे तुझं अस्तित्व जाणवून देत असतोस ! ते बघण्याची दृष्टी फक्त हवी !” ती हात जोडून म्हणाली.  
मेपल पानाची सळसळ करत तिच्याकडे कौतुकानं बघत होता देव्हाऱ्यातला बाळकृष्णही मिष्कील पणे हसत    होता ! 

- ज्योती रानडे



2993. सर्वात मोठं ज्ञान आणि अनुभव

 त्या पावसाळी रात्री कोट्यधीश उद्योगपतीची एकुलती एक मुलगी ऑपरेशन थिएटरमध्ये जीवन - मरणाच्या सीमारेषेवर झुंज देत होती. बाहेर प्रसार माध्यमांच्या गाड्यांची रांग लागली होती, पण आत एका वृद्ध सुरक्षा रक्षकाचे शब्द ऐकायला कुणाकडे वेळ नव्हता.
पुण्यातील नामांकित "आरोग्यम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल"च्या सातव्या मजल्यावर एकच गोंधळ उडाला होता.
ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभे होते देशातील प्रसिद्ध उद्योगपती राघव देशमुख.
कोट्यवधींचे साम्राज्य उभे करणारा तो माणूस त्या रात्री पूर्णपणे हतबल दिसत होता. 
आत त्याची २८ वर्षांची मुलगी अन्विता आयुष्यातील सर्वात मोठी लढाई लढत होती.
अन्विता आठ महिन्यांची गर्भवती होती. अचानक तिला तीव्र वेदना सुरू झाल्या आणि तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले-
"बाळाची नाळ गळ्याभोवती अडकली आहे. आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका आहे."
देशातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावण्यात आले.
एक नाही...
दोन नाही...
पूर्ण नऊ तज्ज्ञ डॉक्टर !
पण प्रत्येक नवीन रिपोर्ट आधीपेक्षा अधिक चिंताजनक होता.
"ब्लड प्रेशर कमी होत आहे."
"बाळाला ऑक्सिजन कमी मिळतोय."
"आता जास्त वेळ थांबता येणार नाही."
संपूर्ण टीम तणावाखाली होती. 
त्याच वेळी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये ६८ वर्षांचे सुरक्षा रक्षक गणपत काका बसले होते.
पांढरी दाढी, वाकलेली पाठ आणि जुना चष्मा.
गेली १५ वर्षे ते रात्रीची ड्युटी करत होते.
सगळे त्यांना प्रेमाने "गणपत काका" म्हणत.
पण फार थोड्या लोकांना माहिती होतं की सुरक्षा रक्षक होण्यापूर्वी ते कोकणातील एका गावात प्रसिद्ध वैद्य होते.
शरीरातील नसांचे ज्ञान, दाबबिंदू आणि पारंपरिक उपचारांची विद्या त्यांनी आपल्या वडिलांकडून शिकली होती.
पण आधुनिक जगात त्यांच्याकडे ना पदवी होती, ना प्रमाणपत्र.
म्हणून लोक त्यांना फक्त एक साधा सुरक्षा रक्षक समजत होते.
अचानक एका नर्सचे शब्द त्यांच्या कानावर पडले.
"बाळाची हृदयाची गती सतत कमी होत आहे !"
गणपत काका सावध झाले.
काही वेळाने दुसरी नर्स म्हणाली.
"नाळ इतकी घट्ट अडकली आहे की बाळ खाली सरकत नाही."
गणपत काकांच्या डोळ्यांसमोर ३५ वर्षांपूर्वीची एक घटना चमकून गेली.
ते हळूहळू ऑपरेशन थिएटरकडे गेले.
दाराजवळ उभ्या डॉक्टरांना त्यांनी नम्रपणे सांगितले.
"मुलीला डाव्या कुशीवर ठेवू नका."
डॉक्टर चकित झाले.
"काय म्हणताय तुम्ही?"
गणपत काका शांतपणे म्हणाले.
"ज्या बाजूने नाळ दाबली जातेय, त्या बाजूचा भार वाढतोय. तिला दुसऱ्या बाजूला वळवा."
डॉक्टरांचा चेहरा लाल झाला.
"तुम्ही सुरक्षा रक्षक आहात की सर्जन?"
आजूबाजूचे काही लोक हसू लागले. 
गणपत काका काहीच बोलले नाहीत.
ते शांतपणे मागे फिरले.
पण त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती.
तेवढ्यात ऑपरेशन थिएटरचे दार उघडले.
एक डॉक्टर धावत बाहेर आला.
"आता तातडीने निर्णय घ्यावा लागेल. आई किंवा बाळ... दोघांपैकी एकालाच वाचवता येईल."
हे ऐकताच राघव देशमुख यांच्या पायाखालची जमीन सरकली.
त्यांची पत्नी सुमन रडू लागली. 
पहिल्यांदाच त्या श्रीमंत कुटुंबाला जाणवलं की काही लढाया पैशाने जिंकता येत नाहीत.
तेवढ्यात मागून एक शांत आवाज आला.
"दोघांनाही वाचवता येईल."
सगळ्यांनी मागे वळून पाहिले.
ते गणपत काका होते.
राघव चिडून म्हणाले.
"तुम्ही इथे काय करताय?"
गणपत काका शांतपणे म्हणाले.
"बाळाला रस्ता नको आहे साहेब..त्याला श्वास हवा आहे."
संपूर्ण कॉरिडॉर शांत झाला.
गणपत काका पुढे म्हणाले-
"माझं चुकलं तर मला लगेच बाहेर काढा. पण एकदा माझं ऐका."
डॉक्टरांनी अनिच्छेने त्यांचा सल्ला मान्य केला.
अन्विताची स्थिती बदलण्यात आली.
सगळ्यांचे डोळे मॉनिटरवर खिळले होते.
एक सेकंद...
दोन सेकंद...
पाच सेकंद...
आणि अचानक बाळाची हृदयगती स्थिर होऊ लागली! 
एक नर्स आनंदाने ओरडली-
"सर ! हार्ट रेट वाढतोय !"
डॉक्टर अवाक झाले.
तासन्तास न समजलेली गोष्ट एका वृद्ध सुरक्षा रक्षकाने ओळखली होती.
त्यानंतर ऑपरेशन सुरू झाले.
दीड तासाच्या तणावानंतर ऑपरेशन थिएटरचे दार उघडले.
नर्सच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते.
"अभिनंदन ! आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत." 
राघव देशमुख यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
काही वेळानंतर त्यांनी पहिला प्रश्न विचारला—
"गणपत काका कुठे आहेत?"
पण गणपत काका शांतपणे आपल्या जागेवर परत गेले होते.
जणू काही घडलंच नव्हतं.
दुसऱ्या दिवशी अन्विताला सर्व घटना सांगण्यात आली.
तिने ताबडतोब म्हटले-
"मला त्यांना भेटायचं आहे."
गणपत काकांना बोलावण्यात आले.
ते आत येताच अन्विताने आपल्या नवजात बाळाला त्यांच्या हातात दिले. 
गणपत काकांच्या डोळ्यांत पाणी आले.
त्यांनी थरथरत्या हाताने बाळाच्या डोक्यावरून हात फिरवला.
अन्विता म्हणाली-
"आज माझं बाळ श्वास घेतंय, ते तुमच्यामुळे."
गणपत काका हसले.
"नाही ग बाळा, देवाने वाचवलं. मी तर फक्त निमित्त ठरलो." 
तेवढ्यात राघव देशमुख आत आले.
काही क्षण ते गणपत काकांकडे पाहत राहिले.
आणि अचानक...
देशातील त्या मोठ्या उद्योगपतीने सर्वांसमोर वाकून गणपत काकांचे पाय स्पर्श केले. 
संपूर्ण खोली स्तब्ध झाली.
"मला माफ करा काका. काल मी तुम्हाला फक्त सुरक्षा रक्षक समजलो."
गणपत काकांनी त्यांना उठवत म्हटलं-
"बाळा, माणसाचं काम लहान-मोठं असू शकतं पण त्याचा अनुभव कधीच लहान नसतो."
हे शब्द प्रत्येकाच्या मनात घर करून गेले. 
काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये मोठा समारंभ आयोजित करण्यात आला.
राघव देशमुख यांनी घोषणा केली की ग्रामीण वैद्यकीय ज्ञान आणि पारंपरिक अनुभवांवर संशोधन करणारे नवीन केंद्र सुरू करण्यात येईल.
त्या केंद्राला नाव देण्यात आले -
 "गणपत प्रसाद मानव सेवा केंद्र"
टाळ्यांच्या कडकडाटात गणपत काकांना मंचावर बोलावण्यात आले. 
त्यांनी माईक हातात घेतला आणि फक्त एवढंच म्हणाले -
"आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली आहे. पदवी ज्ञानाचा पुरावा असू शकते, पण अनुभव हे ज्ञानाचं मूळ असतं. ज्या दिवशी आपण गरीब, वृद्ध किंवा साध्या दिसणाऱ्या माणसाला कमी लेखणं सोडू, त्या दिवशी समाज खऱ्या अर्थाने मोठा होईल."
संपूर्ण सभागृह उभं राहून 
टाळ्या वाजवत होतं. 
समोर बसलेलं ते छोटंसं बाळ हसत होतं.
त्याला माहीत नव्हतं की त्याच्या जन्माने फक्त एका कुटुंबाचं नव्हे, तर अनेकांच्या विचारांचंही पुनर्जन्म घडवला होता... ✨
🌺 संदेश : कधीही एखाद्या व्यक्तीची किंमत त्याच्या कपड्यांवर, पदावर किंवा पैशांवरून ठरवू नका. अनेकदा सर्वात मोठं ज्ञान आणि अनुभव हे सर्वात साध्या दिसणाऱ्या माणसांकडे असतात. 🙏❤️ :::

2992. खरा फादर्स डे

     रोजप्रमाणेच सकाळ उजाडली होती. आज मला थोडी उशिराच जाग आली. मी निवांत चहाचा कप हातात घेतला आणि किचनमधून हॉलकडे आले.
आई नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात सकाळच्या कामात गुंतली होती. बाबांचं आज ऑफिस उशिरा असल्यामुळे घरात एक वेगळाच निवांतपणा होता. मोबाईलवर मंद आवाजात भजन सुरू होतं आणि खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या उन्हाने संपूर्ण हॉल उजळून निघाला होता. तेवढ्यात आजोबांचा हलकासा हसण्याचा आवाज कानावर पडला. मी सहज नजरेने समोर पाहिलं. माझे बाबा खुर्चीवर बसलेल्या आजोबांचे केस अगदी हळुवारपणे विंचरून देत होते.
"बाबा, जरा स्थिर बसा ना...नाहीतर कंगवा अडकेल."
आजोबा लहान मुलासारखे हसले.
"अरे, आता या वयात माझे केस तरी कुठे उरलेत रे?"
बाबांनीही हसत उत्तर दिलं,
"केस कमी झाले म्हणून काय झालं? आमच्या डोक्यावरचं छत्र अजूनही तुम्हीच आहात."
मी चहाचा कप हातातच धरून तिथेच थबकले.
त्या सकाळी मला घरात भजनाचा आवाज ऐकू येत होता, पण समोर दिसत होतं ते त्याहूनही मोठं स्तोत्र होतं. एका मुलाने आपल्या वृद्ध वडिलांवर केलेल्या निःशब्द प्रेमाचं.
थोड्याच वेळात बाबांनी आजोबांच्या हातावर औषध ठेवलं, पाण्याचा ग्लास पुढे केला आणि त्यांच्या आवडीचं भजन मोबाईलवर लावून दिलं.
"आज बरं वाटतंय ना, बाबा?"
आजोबांनी फक्त मान हलवली.
त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं.
दुपारी डॉक्टरांकडे जायचं होतं. संध्याकाळी त्यांना आवडणारं धार्मिक पुस्तक आणायचं होतं. रात्री जेवणात मऊ आमटी आणि गरम भात करायचा होता.
हे सगळं बाबा इतक्या सहज करत होते, जणू ती जबाबदारी नव्हतीच... ती त्यांच्या प्रेमाची रोजची सवय होती.
मी आईला हळूच विचारलं,
"आई, बाबा आजोबांची एवढी मनापासून काळजी कशी घेतात गं?"
आई पोळी लाटत लाटत शांतपणे म्हणाली,
"बाळा, ज्यांनी आयुष्यभर आपल्याला बोट धरून चालायला शिकवलं, त्यांचा हात उतारवयात सोडायचा नसतो."
त्या एका वाक्याने माझ्या मनात अनेक चित्रं तरळली.
लहानपणी आजोबांनी बाबांना शाळेत सोडलं असेल.
सायकल शिकवली असेल.
पहिल्या पगारावर अभिमानाने त्यांच्या पाठीवर थाप मारली असेल.
आणि आज.
आज काळाने फक्त भूमिका बदलल्या होत्या.
आज बाबा त्यांच्या स्वतःच्या बाबांचे आधार झाले होते.
आजोबांना औषधाची वेळ आठवत नव्हती, पण बाबांना प्रत्येक गोळीची वेळ पाठ होती.
आजोबांना मोबाईल वापरता येत नव्हता, पण बाबा त्यांच्या आवडीची भजनं, प्रवचनं आणि जुन्या गाण्यांची यादी तयार करून ठेवत होते.
आजोबांना चालताना आधाराची गरज होती, आणि बाबा सावलीसारखे त्यांच्या प्रत्येक पावलासोबत चालत होते.
त्या क्षणी माझ्या मनात एक विचार अलगद उमलला...
आयुष्यातील सर्वात मोठा वारसा पैसा, जमीन किंवा दागिने नसतात; आपल्या वडिलांचा हात कधीच सुटू न देण्याची सवय हा सर्वात मोठा वारसा असतो."मुलांसाठी वडील आणि वडिलांसाठी सावली होऊन जो जगतो, त्याच्या रूपानेच देव प्रत्येक घरात रोज वावरत असतो."
त्या रात्री सहज मोबाईल हातात घेतला.
सोशल मीडियावर फादर्स डेच्या शुभेच्छांचा पाऊस पडत होता.
कोणी केक कापत होतं...
कोणी फोटो टाकत होतं...
कोणी महागड्या भेटवस्तू देत होतं...
मी मोबाईल शांतपणे बाजूला ठेवला.
समोर बाबा आजोबांना प्रेमाने चादर पांघरून देत होते.
उशी नीट करत होते.
दिवा बंद करण्याआधी त्यांनी हळूच विचारलं,
"बाबा, अजून काही हवंय का?"
आजोबा हसले.
"नाही रे... तू आहेस ना, मग अजून काय हवं?"
त्या चार शब्दांनी माझ्या मनात फादर्स डेचा अर्थ कायमचा बदलून गेला.
त्या दिवशी मला समजलं...
एक पिता होणं म्हणजे फक्त मुलांना जन्म देणं नाही.
आपल्या वृद्ध होत चाललेल्या वडिलांचे पुन्हा वडील होणं, त्यांच्या हट्टांना समजून घेणं, औषधांची वेळ लक्षात ठेवणं, त्यांच्या एकटेपणात त्यांच्यासोबत शांत बसणं, त्यांच्या चालण्याचा आधार होणं आणि त्यांना कधीच ओझं वाटू न देणं... हेच पितृत्वाचं सर्वोच्च रूप आहे.
त्या रात्री मी स्वतःशी एक छोटासा निश्चय केला.
उद्या मी कोणाचा बाबा होईन की नाही, हे काळ ठरवेल.
पण माझे बाबा जेव्हा थकतील, तेव्हा त्यांच्या आयुष्यात मी नक्कीच त्यांचा आधार बनेन.
कारण वडिलांना दिलेला गुलाबाचा गुच्छ एक दिवस कोमेजतो...
महागडी भेटवस्तूही विसरली जाते...
पण उतारवयात त्यांच्या हातात दिलेला आपला हात आणि त्यांच्या डोळ्यांत दिलेला विश्वास आयुष्यभर ताजा राहतो.तृप्ती देव 
मुलांसाठी बाबा होणं ही जबाबदारी आहे; पण आपल्या वडिलांसाठी पुन्हा बाबा होणं हा संस्कार आहे.
आणि जो माणूस एका हाताने आपल्या मुलांचं भविष्य घडवतो आणि दुसऱ्या हाताने आपल्या वृद्ध वडिलांना आधार देतो.
त्याच्यासाठी फादर्स डे कॅलेंडरवरच्या एका तारखेचं नाव नसतं.
त्याच्या आयुष्यातला प्रत्येक दिवसच "खरा फादर्स डे" असतो.

सौ. तृप्ती देव
भिलाई, छत्तीसगड

2991. देणगी...!!!

कॅम्प मध्ये एका चर्च बाहेर अर्धनग्न ( हा शब्द लिहिण्यासाठी योग्य आहे म्हणून वापरला, अन्यथा अवस्था याहून वाईट होती )अवस्थेत बेशुद्ध  पडलेला हाच तो.
गलीच्छ वागतो, काम करत नाही, प्रसंगी आई-वडिलांना शिवीगाळ आणि मारहाण करणारा हाच तो...
शेवटी आई बापालाच नालायक ठरवून, घराबाहेर पडून, भीक मागून -  दारू पिऊन कुठेही पडणारा हाच तो....
दोनेक वर्षे अंघोळ नाही - स्किन इन्फेक्शन - रस्त्यावर उघडे झोपणे - शुद्ध नाही - अंगावर किमान दोन इंचाचा मळ - घोंगावणाऱ्या माशांचे, हक्काचे पार्टीचे ठिकाण.... हाच तो... 
यापुढचे त्याचे वर्णन आता मुद्दाम करत नाही, वाचतानाही घृणा येईल....
दोन वर्षांपूर्वी मी याला जेव्हा पाहिले तेव्हा मला याचा राग आला नाही, वाईट वाटलं....! 
बेफाट वाहणाऱ्या पाण्याला बांध घातला की ते संथ होतं...
बेफाट वाहणाऱ्या मनाला  बांध घातला कि ते संत होतं...
याच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं, याला कुणी बांध घातलाच नाही.... तू नालायक आहेस, निकम्मा आहेस, दारुड्या आहेस, जगण्याच्या लायकीचाच नाहीस, मरत का नाहीस, माझ्या पोटी हि असली अवलाद नको होती.... अशा वाक्यांनी त्याचे खच्चीकरण केले गेले....! 
सगळीकडून धिक्कारला गेलेला तो, हाच तो....
तू तो है अलबेला... हजारो मे अकेला.... असं एकदा तरी, भले खोटं खोटं तरी, कोणीतरी त्याला म्हणायला हवं होतं.... नेमकं तेच घडलं नाही आणि हा बिघडत गेला...! 
लागल्यावर प्रत्येक वेळी औषधाच लागतं असं काही नाही, प्रेमाची एक फुंकर सुद्धा पुरेशी ठरते....! 
Diagnosis झाल्यावरच उपचाराची दिशा कळते. त्याची दुखरी नस मला समजली होती, उपचाराची दिशा नकळत ठरून गेली....
बाळा...माझ्या सोन्या.... म्हणत मी जेव्हा त्याला धुंदीतून प्रथम उठवले होते, तेव्हा त्याने माझा हात पकडून डोळ्यातून अश्रू काढले होते... त्याला वाटलं पोलीस असतील आणि आता काठी मारतील.... 
झालं उलटंच...! मी त्याच्या डोक्यावर मायेनं हात ठेवला होता.
जागा झाल्यावर पहिल्यांदा त्याच्या ओठी शब्द आले, पप्पा तुम्ही इथे कसे....? 
डोळे उघडल्याबरोबर, समोर नसूनही जी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येते तीच आपली...!
वडिलांच्या तो अगदी जवळ आहे हे मला जाणवलं, माझ्यासाठी एवढासा धागा पुरेसा होता आणि तेव्हापासून मी त्याचा "पप्पा" बनण्याचा प्रयत्न करत गेलो. 
मध्ये अनंत गोष्टी घडल्या, ज्या अत्यंत भावुक होत्या, त्या काही आता लिहीत नाही, लेख खूप मोठा होईल. 
सर्वप्रथम त्याला हाताने अंघोळ घातली, ऍडमिट केले, पूर्णतः त्याला माणसात आणले. 
पूर्ण बरा झाल्यानंतर,  तो मला म्हणाला, 'सर तुमी मला पप्पा सारकेच आहात, मी तुमाला कोनच्या स्वरूपात परतफेड करू?
मी चातकासारखी त्याच्या याच शब्दांची वाट पाहत होतो. 
म्हटलं नक्की करशील परतफेड...? 
क्षणाचाही विचार न करता म्हणाला ....'हां सर....'
मग आता कामाला लाग, नोकरी मी शोधतो... त्याच्या डोळ्यात डोळे घालून पहात मी म्हणालो.
काही क्षणांचा अवधी घेऊन, पण निर्धाराने म्हणाला हो सर, करतो .... 
निम्मी लढाई मी येथे जिंकली होती....!
प्रसंग दोन
शनिपार परिसरात असलेले एक मोठे दुकानदार, नेहमी मला फोन करतात आणि म्हणतात, 'डॉक्टर तुमाला मला डोनेशन द्यायचं  हाय, पण साला या कामांमंदी मी अडकून जाते, आनी राहूनच जाते, तुमाला कंदी टायम गावला तर तुमी या ना दुकानी'
(आजवर अकरा वर्षाच्या कामाच्या आयुष्यामध्ये कोणालाही मी देणगी मागितली नाही, पुढे सुद्धा कधी मागणार नाही, पण समाज म्हणून आपण इतके मोठ्या मनाचे आहात, की न मागताच माझ्या झोळीमध्ये आपण इतकं काही टाकता, की मला कुठे जाऊन पदर पसरायची गरजच पडत नाही, यानिमित्ताने माझा प्रणाम आपणा सर्वांना 🙏)
यावेळी आवर्जून मी शेठजींकडे गेलो, मला पाहून त्यांना आनंद झाला, मी त्यांना म्हणालो, 'सर बरेच दिवस डोनेशन द्यायचे म्हणत होतात, ते घ्यायला आज आलो आहे....' 😊
'क्या बात है, आवो ने पधारो....पधारो म्हणत त्यांनी माझं स्वागत केलं, ड्रॉवर मधील चेक काढला, जिभेला बोट लावून, मला न विचारताच त्यांनी एक चेक फाडला. 
मी हात जोडून म्हणालो, 'सर पैसे नको आहेत.... '
मंग....? ते गोंधळून म्हणाले..... 
'दुकान मदली तुमाला पसंत येईल ती कोणचीबी गोष्ट घिवून जावा, कायी वांदा नाय सायेब....'
माझ्याही-वडिलांच्या वयाचे असणाऱ्या त्या शेठजींचे हात मी हाती घेतले, कपाळी लावले आणि म्हणालो, 'माऊली इतके कामगार तुमच्याकडे काम करतात, माझ्या एका मुलाला काम द्या... तेच माझ्यासाठी डोनेशन...!'
सुरुवातीला त्यांना काही कळलं नाही... यानंतर सविस्तर सर्व गोष्टी त्यांना सांगितल्या...
यानंतर ते हसत म्हणाले, 'काय तुमी बी वार्ता करते... पोराला उद्यापासून पाठवून द्या आणि हा चेक बी घेऊन जा....' 
तो चेक पुन्हा कपाळाला लावत मी त्यांना म्हणालो, या चेकवर जी आपण रक्कम लिहिणार होतात, ती रक्कम माझ्या मुलाला दर महिन्याला पगार म्हणून द्या..... हेच माझं डोनेशन....! 
वडिलांच्या वयाचे.... व्यवसाय करून अनुभव सिद्ध झालेले.... सहजासहजी न बधणारे शेठजी.... 
यावेळी चष्म्याआड त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते....!
त्यांचे भरलेले डोळे पाहून, आता माझ्या डोळ्यात पाणी येईल, त्याच्या आत मला दुकानातून बाहेर पडणे आवश्यक होते....! 
निघतो म्हणत, मी त्यांच्या पाया पडलो आणि निघालो...
जाताना ते म्हणाले पोराला द्या पाठवून, कामाला लावतो....!
जाताना म्हणाले, 'आणि हो...पुढल्या वर्षी डोनेशन आणखी वाढवून देईन....  डोळ्यात पाणी घेऊन मी फक्त त्यांना नमस्कार करून निघालो. 
यानंतर या मुलाला तिथे कामाला लावला, त्याने माझे नाव राखले, मनापासून काम केले,, घरी पैसे देऊ लागला, आई-वडिलांचा सन्मान करू लागला, आई-वडिलांनी मनापासून याला स्वीकारलं....
 सुरुवातीला त्याच्या भेटी होत होत्या परंतु पुढे पुढे तो त्याच्या कामात व्यग्र झाला आणि मी माझ्या...
याला एक वर्ष लोटलं ....! 
 प्रसंग तीन
शनिवार दिनांक 13 जून.... परत शनिपार, सर्व कामं आटपली....निघालो..... 
मोटरसायकल वर बसलो आणि एका हँडसम दिसणाऱ्या मुलाने माझ्या मोटरसायकलला त्याची सायकल आडवी लावली....
पुढच्या स्पॉटवर जायचे असल्याकारणाने, गडबडीत मी त्या मुलाकडे नीट पाहिलेच नाही, नेहमीची मवाळ भूमिका घेत मी त्या मुलाला म्हणालो, 'बाळा माझं काही चुकलं का? थांब मी गाडी मागे घेतो....' 
 'हो सर लय चुकलं तुमचं....?' तो गुरगुरुला 
 मी चमकून पाहिलं... 
 हा तोच शेठजींकडे कडे काम करणारा....! 
'अरे तु....? किती बदल झाला आहे....मी ओळखलंच नाही तुला बाळा....! 
'एका जाग्यावर बसत जावा ना वो सर, शोधून पाय आन सायकल थकली.....' तो हसत बोलला. 
'एका जागेवर बसलो असतो, तर तू भेटला असतास का रे नालायका ...? जुन्या गोष्टींची आठवण करून देत,  बाप असल्याचा गैरफायदा घेऊन बोललो. 
तो सुद्धा हसला.... 
'सायकल कोणाची रे...?'
'सर पगारातून नव्वी कोरी सायकल हत्या हप्त्यानं घेतली' त्याच्या चेहऱ्यावर कौतुक आणि समाधानाचे भाव होते. 
मुळचा गोरापान, अंगावर छान कपडे आणि नवीन सायकल....  माझी नजर या पोरावरून हटेना, वाटलं याला माझीच दृष्ट लागेल. 
या नंतर तो माझ्या जवळ आला, खांद्यावर डोकं ठेवून अचानक रडू लागला..... त्याला सर्व जुन्या गोष्टी आठवत होत्या...   सर तुम्ही नसते तर.... वगैरे वगैरे बोलू लागला, मी फक्त हसत त्याची पाठ थोपटत होतो.....! 
बोलता बोलता त्याने माझ्या खिशात काहीतरी टाकले....
मी सहज काढून पाहिले, ते पाचशे एक रुपये होते.... 
माझ्या सर्व गोष्टी माझ्या कमरेला अडकवलेल्या बॅगेत असतात, खिशात काहीही नसते, मग हे 500 रुपये आले कुठून ? 
मी त्याला म्हणालो, 'अरे बाळा हे पाचशे रुपये माझ्या खिशात तू ठेवलेस का ? हे माझे नाहीत.... 
तो म्हणाला, 'सर तुमचेच आहेत....'
'म्हणजे....???'
मागच्या महिन्यामध्ये, कामावर एक वर्ष पूर्ण झालं, माजी बडती झाली, पगार वाडला, मी तुम्हाला कदीपासून शोधतोय तुम्ही सापडले नाहीत, आज शेवटी हितं घावले.... मला तुमाला डोनेशन का काय ते द्यायचे होते ना, बडतीच्या पैशातून...!!!
त्याचं वाक्य संपायच्या आधी माझ्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले.
गाडीवरून उतरून मी त्याला घट्ट मिठी मारली. 
' बाळा किती मोठा झालास रे...?' 
मला खूप काही बोलायचं होतं पण, हुंदक्यांच्या घाटाघाटा मधून शब्दांची गाडी पुढे सरकेना....! 
घासातला घास काढून देऊन, "परतफेड" या शब्दाचा अर्थ, आज मला नव्याने समजला. 
त्यातला एक रुपया माझ्या बॅगेत ठेवून, उरलेले पाचशे मी त्याला परत केले, आणि म्हणालो, 'जेव्हा मला लागतील तेव्हा मी परत मागून घेईन तुझ्याकडून.'
पुण्यात राहणाऱ्यांना माहित आहे, शनिपार हा चौक किती गजबजलेला असतो, इतक्या गर्दीच्या ठिकाणी तो माझ्या आणि मी त्याच्या गळ्यात पडून रडत होतो, लोक थांबून कुतूहलाने  पहात होते.... काय चाललंय हे त्यांना कळत नसावं...! 
माझ्या डोळ्यातून सतत अश्रू ओघळत होते, आणि माझे डोळे पुसत तो निरागसपणे म्हणत होता, 'सर तुमी नगा ना रडू, तुमाला रडताना पायलं की मलाबी लय रडू येतं मंग....' 
एवढ्या गर्दीतही मला फक्त तो आणि तोच दिसत होता... आणि डोक्यात गाणं सुरू होतं, ये तो है अलबेला.... हजारो मे अकेला....!!!
त्याचा निरोप घेऊन मी पुढल्या मुक्कामी निघालो, गाडीवर जाताना सतत त्याचेच विचार.... 
सहज डोक्यात आलं, इतर कर्मचारी सोडून शेठजींनी याच मुलाला एका वर्षात बढती कशी बरं दिली असावी ? आणि पगार सुद्धा वाढवला....? 
आणि झटकन मला शेठजींनी त्यावेळी बोललेलं वाक्य आठवलं, 'आणि हो...पुढल्या वर्षी डोनेशन आणखी वाढवून देईन....'
सहज बोललेल्या त्या वाक्यात किती गहन अर्थ होता, त्याचा उलगडा मला आज एका वर्षानंतर झाला. 
डोळ्यात पुन्हा पाणी आलं.... मनातल्या मनात मी शेठजींच्या पायांना स्पर्श केला....! 
शेठजींनी या मार्गाने दिलेलं हे "डोनेशन" आणि माझ्या पोरानं दिलेली "देणगी" मनातल्या तळ कप्प्यात साठवून, मी निघालो श्रीमंत बाप होऊन....! 

14 जुन 2026
आपले स्नेहांकित,
डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे 
डॉक्टर फॉर बेगर्स
सोहम ट्रस्ट पुणे 
9822267357
*sohamtrust2014@gmail.com
(An ISO 9001: 2015 certified organisation)

2990. निद्रेच्या उंबरठ्यावरचे गूढ ध्यान

 रात्र हळूहळू पृथ्वीवर उतरते. दिवसाचा गोंगाट शांत होऊ लागतो. मनाच्या आकाशात दिवसभर उडणारे विचारांचे पक्षी आपल्या घरट्याकडे परतू लागतात. आणि मग येतो तो क्षण - जेव्हा मनुष्य डोळे मिटतो.
पाहता पाहता एक अद्भुत घटना घडते.
दिवसभर "मी", "माझं", "माझ्यासाठी" या भावनांनी व्यापलेला मनुष्य अचानक सर्व काही सोडून देतो. पद, प्रतिष्ठा, संपत्ती, नाती, चिंता, स्वप्नं, संघर्ष, यश-अपयश - सगळं काही मागे राहतं. झोपेच्या दारातून आत जाताना तो काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही.
हे केवळ झोपणं नसतं.
हे एका अज्ञात शक्तीसमोर केलेलं पूर्ण समर्पण असतं.
कारण झोप म्हणजे एक छोटासा मृत्यू आणि सकाळ म्हणजे एक नवा जन्म. रात्री आपण स्वतःला विश्वाच्या स्वाधीन करतो. आपल्या हृदयाची धडधड, श्वासांची लय, शरीरातील असंख्य प्रक्रिया हे सर्व आपण नियंत्रित करत नसतो. तरीही काही अदृश्य कृपा आपल्याला सांभाळत असते.
कधी विचार केला आहे?
झोपताना आपल्याला खात्री नसते की पहाटे डोळे उघडतीलच. तरीही आपण निर्धास्तपणे निद्राधीन होतो. हा विश्वास कुठून येतो?
कदाचित तो विश्वास आपल्या आत्म्याला त्या परमचैतन्याशी असलेल्या नात्यातून मिळत असावा.
ध्यानात साधक जाणीवपूर्वक स्वतःला शांततेकडे नेतो. पण झोपेत निसर्ग स्वतः आपल्याला त्या शांततेच्या गर्भात घेऊन जातो. म्हणूनच गाढ झोपेत एक अवर्णनीय आनंद असतो. 
त्या क्षणी ना इच्छा असते, ना अपेक्षा, ना दुःख, ना सुख.
फक्त अस्तित्व असतं...
निराकार...
निर्विचार...
निशब्द...
आणि कदाचित त्या गहन शांततेत आत्मा क्षणभर स्वतःच्या मूळ स्वरूपाला स्पर्श करत असतो.
पहाट होते.
पूर्व दिशेला प्रकाशाचा पहिला किरण जन्म घेतो.
आपले डोळे उघडतात.
श्वास अजूनही सुरू असतो.
हृदय अजूनही धडधडत असतं.
आणि जीवन पुन्हा एकदा आपल्याला हाक देतं.
तो क्षण साधा नसतो.
ती कृपा असते.
कारण प्रत्येक सकाळ ही आपल्या पात्रतेमुळे मिळत नाही; ती आपल्याला दिलेली एक नवीन संधी असते.
विश्व जणू हळूच सांगत असतं.
"अजून तुझा प्रवास पूर्ण झालेला नाही. अजून काही अनुभव घ्यायचे आहेत. अजून काही कर्म पूर्ण करायची आहेत."
अध्यात्माची सुरुवात कदाचित याच जाणिवेतून होते.
की जीवनावर आपला अधिकार नाही, फक्त सहभाग आहे.
आपण या विश्वाचे मालक नाही.
आपण केवळ निमित्त आहोत.
जेव्हा मनुष्य रात्री झोपताना संपूर्ण समर्पण करतो आणि सकाळी उठताना कृतज्ञतेने मस्तक झुकवतो, तेव्हा त्याचं प्रत्येक श्वास ध्यान बनतो, प्रत्येक दिवस साधना बनतो आणि प्रत्येक रात्र ईश्वराच्या कुशीत विसावल्यासारखी वाटू लागते.
मग झोप ही फक्त विश्रांती राहत नाही. आणि जाग येणं ही फक्त दिनचर्या राहत नाही.
तो दररोज घडणारा एक गूढ आध्यात्मिक उत्सव बनतो.
जिथे प्रत्येक रात्र अहंकाराचा विसर्जन सोहळा असते आणि प्रत्येक पहाट आत्मजागृतीचा नवीन उदय.
ज्याला या रहस्याची अनुभूती आली, त्याला समजतं की जीवन हे जगायचं नसतं. ते कृतज्ञतेने स्वीकारायचं असतं.

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...