“डॉक्टर,परवा एका लॅबमध्ये साखर 155 आली आणि काल दुसऱ्या लॅबमध्ये 118. मग नेमकं खरं काय?” म्हणत एका गृहस्थांनी ओपिडीत एंट्री मारली.
रुग्णाच्या चेहऱ्यावरचा संभ्रम आणि नातेवाईकांच्या आवाजातला संशय हे आजच्या आरोग्यसेवेतील फारच परिचित दृश्य आहे.
कुणी म्हणतं, “पहिली लॅब चुकीची आहे.”
तर कुणी ठामपणे सांगतं, “दुसरी लॅब पैसे वाचवण्यासाठी कमी दाखवते.”
पण खरंच का?
दोन पॅथॉलॉजी लॅबचे रिपोर्ट वेगवेगळे येणं, म्हणजे त्यातली एखादी लॅब चुकीचीच असते का?
सदरहू ५२ वर्षीय सद्गृहस्थांना अंमळ थकवा जाणवत होता. जवळच्या लॅबमध्ये त्यांनी उपाशीपोटी रक्तातल्या साखरेची तपासणी केली. लॅब रिपोर्ट अर्थात फास्टिंग ब्लड शुगर आली 155 mg/dL.
हे पाहून ते घाबरले आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या भागातल्या दुसऱ्या लॅबमध्ये पुन्हा तपासणी केली आणि लॅब रिपोर्ट फास्टिंग ब्लड शुगर 118 mg/dL.
आता प्रश्न निर्माण झाला, ‘एका दिवसात साखर कमी झाली? की एखादी लॅब खोटी आहे?’
उत्तर आहे.
बहुतेक वेळा दोन्ही लॅब बरोबर असू शकतात !
हे ऐकून अनेकांच्या भुवया उंचावतील. पण विज्ञान कधी कधी आपल्याला सहज वाटणाऱ्या गोष्टींपेक्षा अधिक गुंतागुंतीचं असतं.
‘लॅब रिपोर्ट’ म्हणजे फोटोग्राफ नव्हे; तो एका क्षणाचा ‘स्नॅपशॉट’ असतो.
आपण अनेकदा समजतो की, रक्तातले घटक हे दगडावर कोरल्यासारखे स्थिर असतात. प्रत्यक्षात तसं नसतं. रक्तातली साखर, हार्मोन्स, पांढऱ्या पेशी, हिमोग्लोबिन. हे सर्व घटक सतत बदलत असतात.
उदाहरणार्थ उपाशी राहण्याचा कालावधी, झोपेची गुणवत्ता, ताणतणाव, व्यायाम, पाण्याचं सेवन, औषधं, अगदी रक्त काढण्याची वेळ. या सर्व गोष्टी रिपोर्टवर परिणाम करू शकतात.
समजा तुमचं वजन सकाळी ७० किलो आहे. संध्याकाळी ते ७०.५ किलो असू शकतं. म्हणजे वजनकाटा खोटा ठरतो का?
तर नाही. याला ‘जैविक फरक’ म्हणतात.
कारण शरीर हे मशीन नाही !
त्याचप्रमाणं शरीराच्या अनेक तपासण्यांमध्येही जैविक फरक असतो. म्हणजेच, एखादा रिपोर्ट कालपेक्षा आज बदलू शकतो आणि तो पूर्णपणे सामान्य असू शकतो.
दोन लॅबमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची यंत्रं असू शकतात. एखादी लॅब अत्याधुनिक ऑटो-अॅनालायझर वापरत असेल तर दुसरी वेगळ्या तंत्रज्ञानावर आधारित यंत्र वापरत असेल !
मोजण्याची पद्धत,अभिकर्मके अर्थात ‘रिएजंट्स’ आणि कॅलिब्रेशन यात सूक्ष्म फरक असू शकतात. म्हणूनच एका लॅबमध्ये हिमोग्लोबिन 12.9g/dL तर दुसऱ्या लॅबमध्ये 13.1g/dL. यात काही वावगं नाही.
फोटो आयफोननं काढता येतो आणि शाओमीनंही. पण रिजॅाल्यूशन बदलतं. कारण सेन्सर, इमेज प्रोसेसिंग आणि वापरलेलं तंत्रज्ञान कारणीभूत असतं. आपण फक्त ‘मेगापिक्सेल’कडं पाहतो. पण त्यामागं बऱ्याच गोष्टी घडत असतात.
याउपर रक्त काढल्यानंतरही विज्ञान संपत नाही.
लॅबमधली तपासणी साधारणत: तीन टप्प्यांत विभागली जाते.
पहिला ‘प्री-अॅनालिटिकल’ अर्थातच तपासणीपूर्व टप्पा. यात…
‘योग्य उपवास केला होता का?’
‘नमुना योग्य प्रकारे घेतला का?’
‘रक्त योग्य तपमानात ठेवलं का?’
‘विलंब झाला का?’
अश्या अनेग गोष्टी निर्णायक ठरतात
आणि अनेक चुका याच टप्प्यात होतात.
उपाशीपोटी बोलवल्यानंतर भारतीय पेशंटची टिपिकल प्रतिक्रिया असते,
“डॉक्टर तुम्ही सांगितलं, तसं उपाशीपोटीच आलोय. फक्त थोडं चहा बिस्किट खाल्लं…”
दुसरा असतो ‘अॅनालिटिकल’ टप्पा’…
यात यंत्राद्वारे तपासणी केली जाते आणि इथं यंत्राची अचूकता, गुणवत्ता नियंत्रण, कॅलिब्रेशन यावर निकाल अवलंबून असतो.
लोकं स्वस्त म्हणून चॅरिटेबल संस्थात रिपोर्ट करतात आणि सन्माननिय अपवाद वगळता इथं या टप्प्यात अनेकदा गडबड होते.
तिसरा येतो ‘पोस्ट-अॅनालिटिकल’ टप्पा…
यात रिपोर्ट तयार केला जातो. डेटा एंट्री, रिपोर्टिंग किंवा संदर्भ मूल्ये यातही फरक असू शकतो.
मग डॉक्टर काय करतात?
तर अनुभवी डॉक्टर एकाच रिपोर्टवर उडी मारून निष्कर्ष काढत नाहीत; ते रुग्णाची लक्षणं पहातात, पूर्वीचे रिपोर्ट डोळ्यांखालून घालतात, पेशंटची शारीरिक तपासणी करतात, गरजेनुसार इतर तपासण्या करतात आणि कालानुरूप बदलही करतात.
वैद्यकशास्त्रात अनेकदा ‘Treat the patient, not the report’ हा सिद्धांत वापरला जातो. म्हणजे रिपोर्ट महत्त्वाचा असतोच पण रुग्ण त्याहूनही अधिक महत्त्वाचा असतो.
परंतू सर्वच फरक सामान्य नसतात. काही परिस्थितीत शंका उपस्थित केलीच पाहिजे… जसं अत्यंत विसंगत निकाल,
क्लिनिकल स्थितीशी अजिबात न जुळणारा रिपोर्ट, वारंवार मोठी तफावत, गुणवत्ता नियंत्रणाचा अभाव, प्रमाणित मानकांचे पालन न करणं…
म्हणूनच तपासण्या शक्यतो एकाच विश्वासार्ह लॅबमध्ये करणं उपयुक्त ठरतं; विशेषतः ‘फॉलो-अप’साठी.
थोडक्यात दोन रिपोर्ट वेगळे म्हणजे एक लॅब चुकीची असं नव्हे जैविक आणि तांत्रिक कारणांमुळं मर्यादित फरक अपेक्षित असतो.
मशीन आहे म्हणजे १००% अचूक निकालच येतो, असंही नव्हे. प्रत्येक मोजमापाला स्वीकारार्ह त्रुटीची मर्यादा असते.
एकाच दिवशी केलेल्या सर्व तपासण्या कायम सारख्याच यायला हव्यात असं होत नाही; शरीरातले बदल अविरत सतत सुरू असतात.
आपल्या समाजात रिपोर्टकडं अनेकदा न्यायालयातील अंतिम निकालासारखं पाहिलं जातं… पण प्रयोगशाळा विज्ञान हे गणिताच्या पुस्तकातलं नेहमीच एकच उत्तर देणारं उदाहरण नाही.
दोन लॅबचे रिपोर्ट थोडे वेगळे येणं हे अनेकदा विज्ञानाचं अपयश नसून विज्ञानाच्या मर्यादा आणि मानवी शरीराच्या गुंतागुंतीचं प्रतिबिंब असतं.
म्हणून पुढच्या वेळी कुणी म्हणालं, “अहो, दोन लॅबचे रिपोर्ट वेगळे आले; म्हणजे कुणीतरी फसवतंय..." तेव्हा शांतपणे सांगा, “कधी कधी फरक हा चुकीचा नसतो; तो विज्ञानाच्या स्वभावाचा भाग असतो.”
कारण ‘पॅथॉलॉजीचा रिपोर्ट’ हा सत्याचा आरसा असला, तरी तो आरसाही योग्य प्रकाश, योग्य कोन आणि योग्य संदर्भातच स्पष्ट प्रतिबिंब दाखवतो.
- डॉ प्रज्ञावंत देवळेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा