फार जुना काळ नाही. पण तेव्हा एखादा विद्यार्थी ‘गाईड’ वापरतो म्हटलं, तरी शिक्षक भुवया उंचावायचे.
तो एक काळ होता, जेव्हा ‘अभ्यास’ म्हणजे पाठ्यपुस्तक, वही, पेन्सिल, कंपासपेटी आणि आईचा “दिवसभर खेळतोस, जरा पुस्तक उघड…” हा आवाज.
आणि एक आजचा काळ आहे, जिथं अभ्यास सुरू होण्यापूर्वीच मुलगा विचारतो
”पीडीएफआहे का?”
“शॉर्ट नोट्स आहेत का?”
“वन-शॉट लेक्चर आहे का?”
“एआय सारांश देईल का?”
माझ्या पुतण्याला मी दहावीपर्यंत इतक्या प्रिंटआऊट काढून दिल्यात जितक्या आम्ही दोन्ही भावांनी एमडी होईपर्यंत काढल्या नव्हत्या!
काळ बदलला आणि अभ्यासाचं स्वरूपही. शाळेत ‘गाईड’ वापरणं म्हणजे जवळजवळ चारित्र्यभ्रष्टतेसारखं मानलं जायचं.
“स्वतः उत्तर काढा!”
“गाईडवर अवलंबून राहू नका!”
“पाठ्यपुस्तक म्हणजेच गीता!”
हे शिक्षकांचे मंत्र असायचे. एखाद्याच्या दप्तरात ‘गाईड’ किंवा ‘अपेक्षित’ दिसलं तर ती लपवून ठेवायची वस्तू होती.
जसं एखादा विद्यार्थी आज मोबाईलचा स्क्रीन पटकन बंद करतो, तसंच काही मुलं गाईडवर वर्तमानपत्राचं कव्हर चढवून वाचायचे.
त्या काळात ‘क्लास लावणं’ देखील थोडं लाजिरवाणं समजलं जायचं.
“काय रे…? क्लास लावलास… गणितात कच्चा दिसतोस!”
आज मात्र परिस्थिती अशी आहे की, ‘क्लास नाही’ म्हणजे पालकांनच टेन्शन येतं.
आजची मुलं एका क्लिकवर माहिती मिळवतात… तेव्हा माहिती ‘मिळवावी’ लागायची.
एखादा ‘प्रोजेक्ट’ असेल तर घरातलं जुनं ज्ञानकोष काढायचं. ग्रंथालयात जाऊन संदर्भ शोधायचे. मासिकांमधून चित्रं कापायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तर तयार होण्याआधी प्रश्न डोक्यात मुरायचा.
आज उत्तर पटकन मिळतं… पण प्रश्नाशी झुंज देण्याची सवय कमी होत चाललीय.
आजची मुलं हुशार नाहीत असं अजिबात नाही. उलट त्यांची माहिती हाताळण्याची गती अफाट आहे…
मोबाईल स्क्रीनवर ऑनलाईन लेक्चर, टॅबवर नोट्स, पीसीवर एआय, चॅटबॉट आणि मध्येच इअरफोनमध्ये ‘लो-फाय स्टडी म्युझिक’…
आम्ही एका धड्यासाठी तीन दिवस घाम गाळायचो, आता मुलं तीन मिनिटांत ‘समरी’ तयार करतात…
पण या वेगात एक गोष्ट हरवतेय– ‘रेंगाळणं’.
ज्ञान थोडं थोडं मनात साचणं. एका अवघड प्रश्नावर रात्रभर विचार करणं. उत्तर सापडल्यावर होणारा आनंद.
आज सर्वकाही ‘इन्स्टंट’ झालंय… मॅगीसारखा अभ्यास. दोन मिनिटांत तयार, चटकदार पण पोषणमुल्यं नसलेला.
दुर्देव की सुदैवं… नेमकं आमची शाळा संपत आली, तश्या ‘मार्क्स मिळवण्याच्या ट्रिक्स’ शिकवल्या जाऊ लागल्या.
“हा प्रश्न IMP आहे.”
“हेच रिपीट होतं.”
“इतकं लिहिलं की मार्क्स मिळतात.”
“कीवर्ड टाका, पेपर चेकर खुश…”
ज्ञानापेक्षा ‘स्कोअरिंग टेक्निक’ महत्त्वाची झालीय. पूर्वी अभ्यास म्हणजे ‘व्यक्तिमत्त्व घडवणं’ होतं. आज तो अनेकदा ‘परफॉर्मन्स’ झालाय.
पूर्वी विद्यार्थी म्हणायचा,
“मला हे समजलं पाहिजे.”
आज प्रश्न असतो,
”हे एग्झाममध्ये येणारंय का?”
पण सगळंच वाईट आहे का? अजिबात नाही. आजच्या मुलांकडे अफाट साधनं आहेत. एखादा कठीण विषय जगातल्या सर्वोत्तम शिक्षकाकडून ऑनलाईन शिकता येतो. भाषेची मर्यादा राहिलेली नाही. ‘एआय’मुळं वैयक्तिक मार्गदर्शन शक्य झालंय. ज्ञान अधिक लोकशाहीवादी झालंय.
फरक एवढाच…
पूर्वी माहिती कमी आणि संयम जास्त होता,
आज माहिती प्रचंड आणि संयम कमी झालाय!
खरी भीती एआयची बिल्कूल नाही, विचार बंद होण्याची आहे! एआय नोट्स तयार करेल. उत्तर लिहून देईल. प्रेझेंटेशनही बनवेल…
पण प्रश्न विचारण्याची जिज्ञासा?
चुकून पुन्हा शिकण्याची तयारी?
वाचनातून तयार होणारी कल्पनाशक्ती?
हे कोणतंही ‘ॲप’ डाऊनलोड करून मिळत नाही!
कारण शिक्षण फक्त माहिती गोळा करणं नसतं, तर विचार करण्याची क्षमता विकसित करणं असतं.
तेव्हा पुस्तकांना कव्हर घालायचो,
आज मोबाईलला कव्हर घालतात.
आम्ही पुस्तकात मोरपिस ठेवायचो,
आज मुलं पीडीएफमध्ये बुकमार्क ठेवतात.
आम्ही शंका शिक्षकांना विचारायचो,
आज मुलं ‘एआय’ला विचारतात.
काळ बदलतोय. साधनं बदलतायत पण अभ्यासाचं खरं सौंदर्य अजूनही तेच आहे.
एखादी गोष्ट स्वतः समजल्यावर
डोळ्यात ‘चमक’ येणं.
आणि ती ‘चमक’
ना गाईडमध्ये मिळते,
ना गुगलमध्ये,
ना एआयमध्ये.
ती मिळते स्वतः विचार करण्यामध्ये.
— डॉ प्रज्ञावंत देवळेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा