सायंकाळ दिवसाच्या काठावर हलकेच येऊन उभी होती. अस्ताला जाणारा सूर्य तिच्याकडे एक हसरा कटाक्ष टाकत डोंगराच्या पल्याड निघण्याच्या बेतात होता. पंजाब मधील चंदीगढच्या एका महाविद्यालयाच्या कॉरीडॉरमधून कुणालाही सहज ऐकू यावे अशा आवाजात विल्यम शेक्सपियरच्या ‘द टेम्पेस्ट’ या नाटकातील तिस-या प्रवेशातील युवराज फर्डिनांड आणि एक युवती मिरांडा यांच्यातील प्रेमसंवाद प्राध्यापिका एम. ए. च्या विद्यार्थ्यांसाठी मन लावून वाचत होत्या. नव्हे अक्षरश: जिवंत करत होत्या. शब्दांच्या दुनियेचा अनभिषिक्त सम्राट असलेल्या विल्यम शेक्सपियरचे शब्द राजपुत्र फर्डिनांडच्या तोंडी असले तरी त्या शब्दांचा मालक स्वत: शेक्सपियरच! सौंदर्याची सजीव मूर्ती,पौर्णिमेच्या चांदण्याचे तेज आपल्या नयनांमध्ये हि-यांतील अलौकिक रत्नांसारखे जडवलेल्या, तिला अलगद स्पर्शून आणखीनच खट्याळ होऊन वाहणा-या वा-याच्या झुळूकेसारखा नेत्रकटाक्ष नजरेच्या भात्यात बाळगणा-या, खळाळणा-या निर्मळ झ-यातील पाण्याचा मऊ सुखद मखमली स्पर्श असणारा आवाज लाभलेल्या,सुगंधी पुष्पांच्या हृदयातील सुवासिक स्पंदनाचे लेणे ल्यायलेल्या एका तरूणीस राजपुत्र फर्डिनांड विचारतोय, “हे सौंदर्यवती,तु जवळ असलीस की अगदी रात्र पडू लागलेली असतानाही मी सकाळ असल्यासारखाच ताजातवाना असतो...तुझे नाव कळेल का मला”?
“मिरांडा”! त्या चेह-यावरच्या ओठांच्या कमलपाकळ्यांतून तीन-अक्षरी शब्दकळ्या उमलल्या ! फर्डिनांडला ‘मिरांडा’ नावाचा अर्थ माहित होता. मिरांडा म्हणजे जिच्याकडे बघत राहावे अशी ती. साक्षात अंतर्बाह्य दर्शनानंद, नेत्रांना सुखद परमानंदाची प्राप्ती!
“मी आजपावेतो अगणित सौंदर्यवती पाहिल्या आणि त्यातील काही मला आवडूनही गेल्या. पण प्रत्येकीत काही ना काही वैगुण्य होतेच. पण तू मात्र अगदी परिपूर्ण आहेस,मिरांडा! ज्या क्षणी मी तुला पाहिले त्याच क्षणी माझे हृदय तुझ्या सेवेत रूजू झालंय ! मी तर माझे काळीज तुझ्या पायांशी वाहिलंय,तुझं हृदय काय म्हणतंय? तुझ्यासाठी मी काय आहे?”
मिरांडा उत्तरते....”फर्डिनांड, तु माझ्यासाठी सर्वस्व ! एकमेवाद्वितीय ! संपूर्ण जगातील सर्व गोष्टींपेक्षा मौल्यवान...जीवाच्या सर्वांत जवळचा आहेस तू…!
नाटकातील संवाद प्राध्यापिका वाचत असताना याच वर्गात हाच संवाद त्याच वेळी दोन कोवळी मने, डोळ्यांच्या माध्यमातून अक्षरश: अनुभवत होती. तिच्यासाठी तो फर्निनांड आणि त्याच्यासाठी ती मिरांडा ! जगाने ठरविण्याआधीच दोन्ही हृदयांचं ठरलं होतं. एकमेकांना आयुष्याभर सोबत करण्याचं! विवाह सप्तपदीच्या प्रत्येक पावलांची आवर्तने मनातल्या मनात कित्येकदा घेऊन झाली होती. या नवयुवतीचं नाव ‘खळी’…गालांवरची गोड खळी ! ही खळी, एका रूबाबदार, राजबिंडे व्यक्तिमत्वाचा स्वामी असलेल्या नवयुवकाच्या प्रेमळ डोळ्यांमध्ये बुडून अगदी तळाशी जाऊन विसावली होती. डोळ्यांनीही खळीला सामावून घेतले. त्यामुळे खळीचीही कळी फुलली होती...!
एखाद्या नाटकाची संहिता असावी तशी ही काळीजकहाणी !
एकमेकांच्या घरी कळणारच ना? खानदानाची दरी मध्ये आली पण हृदयपाखरांना अलगद उडून ती पार करायचीच होती. पंखांत बळ असल्यावर कोसळण्याची भीती कुणी बाळगावी? अक्षता तयार होत्या. फक्त त्या आशीर्वाद देणा-या हातांत पडण्याचा अवकाश तेवढा होता. पण नवरदेव आधीच एका गोष्टीच्या प्रेमात पडलेला होता. भूमातेच्या ! सनईचे सूर हृदयाच्या कवाडातून आत शिरण्याच्या एक क्षण आधीच रणदुंदुभीचा कर्णकर्कक्ष ध्वनी उमटला आणि देह देहभान विसरून सीमेकडे निघण्यास सज्ज झाला. खळी म्हणाली “फक्त चाळीस-एक दिवस झालेत आपल्या या अखंड सहवासाला. इतक्यात दूर जातोयस तू.” तो म्हणाला,” अगं, हा असा गेलो आणि आलोच ! रणभूमीचे आशीर्वाद घेऊन येतो आपल्यासाठी. शत्रूला रक्ताने न्हाऊ घालून येतो, मगच अंगाला हळद लावून घेईन.” खळीच्या डोळ्यांत काळजीचा वणवा पेटला. त्याला त्याची धग जाणवली. शिपाईगडीच तो. त्याने खिशातून धारदार पाते काढले. सर्र्कन उजवा अंगठा पात्यावरून फिरवला. लाल थेंब अवतरले. त्याने ते रुधिरकुंकुम खळीच्या माथ्यावरील केसांच्या मधल्या उभ्या रेषेवर वरपर्यंत रेखले. तिच्या कानांत ‘मंगलम भगवान विष्णू...मंगलम गरूड-ध्वज’ मंत्र घुमला. तो असेच काही करायचा. मुलखावेगळा उमद्या मनाचा माणूस ! दोघेही एकदा गुरूद्वारामध्ये मथ्था टेकण्यासाठी गेलेले असताना या बहादराने तिच्या दुपट्ट्याचे एक टोक हळूच आपल्या पैरणीच्या टोकाला बांधून ग्रंथसाहिबांना सात प्रदक्षिणाही घातल्या. तिच्या लक्षात आले तेंव्हा ‘सात फेरे’ झालेही होते. खळीने हसून डोळे मोठे करून त्याच्याकडे लटक्या रागाने पाहताच तो म्हणाला होता,”लो हो गई शाद्दी....अब आप बन गई एक फौजी अफसर की बिवी ! सॅल्यूट,मॅडम !” तेंव्हा कळी खळखळून हसली होती.
पण आता मात्र वेळ हसण्याची नव्हती. काळजीची होती. सीमेवरून राष्ट्रध्वज पांघरलेल्या शवपेट्या यायला सुरूवात झालेली होती आणि हा तर सीमेवर जायला निघालेला ! “जिंकण्याची जणू सवयच आहे याला. असाच हसत हसत येईल परत आणि मला डोलीत बसवून त्याच्या घरी घेऊन जाईल,” असे स्वत:शीच म्हणत खळी तो दृष्टीआड होईपर्यंत त्याच्याकडे पहात पहात हात हलवत राहिली. त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्यांमध्ये त्याच्या आई, बाबा, भाऊ, बहिणींमध्ये आता खळीही सामील झालेली होती....! धडधडत्या अंत:करणांनी बातम्या पाहिल्या, ऐकल्या जात होत्या. आपले मृत्यूंजय दुश्मनांच्या छाताडावर बसून त्यांना त्यांच्या इप्सित स्थळी इतमामाने धाडू लागले होते.
आणि बातमीत त्याचे नाव कानी पडले आणि पाठोपाठ तो दिसला. दमलेला पण हसत-हसत बोलताना. त्याच्या हातात अग्निशस्त्र. शत्रूला जाळून आलेले ! त्याचे ‘ये दिल मांगे मोअर’ त्याच्याच तोंडून ऐकताना सारा देश हसला होता ! खळी तर आणखीनच शहारून गेली होती. नव-याच्या या पहिल्या प्रेमावर ती खूष होती. भारतीय जवान यशाचे एक एक शिखर जीवाची बाजी लावून पादाक्रांत करीत होते. मध्ये दोन दिवस काहीच खबरबात नव्हती त्याची. बहुदा आणखी एखादा डोंगरकडा जिंकायला गेला असेल गडी म्हणून खळी वरून शांत पण आतून चिंताक्रांत होती. घास ओठी अडत होता. आणि एके क्षणी खळीवर डोंगरकडा कोसळला ! तिच्या उभ्या जीवनबागेचा क्षणात चुराडा झाला होता. “परत तर येणारच आहे. तिरंगा फडकावून किंवा त्याच्यातच लपेटून” असं जाताना सांगून गेलेला देह शवपेटीतून माघारी आला !
हजारो माणसे त्याच्या पाठोपाठ चालत निघाली होती. तो शांतपणे पहुडला होता. बंद डोळ्यांनी आकाशाकडे पहात. त्या आसमानात आपल्या साठी एक छानशी जागा शोधत. जिथून त्याला खळी दृष्टीस पडेल!
खळी हुतात्मा-दाहभूमीकडे जीवाच्या आकांताने धावली. पण त्याला खळीला आपला रक्तबंबाळ चेहरा दाखवायचा नव्हता. तिच्या डोळ्यांत त्याला त्याचा नेहमीचा हसरा चेहरा कायम ठेवायचा होता. खळीला लांबूनच ज्वाळा आसमंती निघालेल्या दिसल्या. ती जागीच थबकली. गुडघ्यांवर बसली. तिने आपले दोन्ही हात जोडले आणि मग उजव्या हाताने आपल्या केसांमधील कुंकू पुसून टाकले. हातांना लागलेले कुंकू अश्रूंच्या प्रवाहात खाली ओघळून गेले.
त्याने मातृभूमीसाठी आपले पंचप्राण अर्पण केले आणि खळीने त्याच्या आठवणींच्या फुलांच्या गालिच्यावर अश्रूंची पखरण केली आणि आयुष्याच्या वाटेवर खळी एकटीनेच चालण्याचा निश्चय करून निघाली ! एका ‘शेर’ची एका वाघाची वाघीण. निश्चयापासून कशी ढळेल? खळी अजूनही वाट चालतच आहे. सोबतीला आठवणींमधला तो आहेच. रक्ताने सिंदुर भरणारा ! खळी मात्र आता कायमची बुजली आहे !
(१९९९ च्या भारत-पाक कारगिल युद्धात कॅप्टन विक्रम बत्रा प्रचंड पराक्रम गाजवून हुतात्मा झाले. त्यांच्या वाग्दत्त जीवनसहाचारिणी ‘डिम्पल चिमा’ यांची ही कहानी. कॅप्टन साहेबांसारख्याच त्यागाची. निस्सीम प्रेमाची ! शेरशहा चित्रपट आल्यानंतर ख-या अर्थाने डिम्पल यांच्या कॅप्टन साहेबांवरील अतीव प्रेमाची माहिती जगाला होऊ शकली. अन्यथा त्यांचा त्याग आपल्या सारख्या सामान्यंच्या नजरेस न पडता ! पूर्णत्वास जाऊ न शकलेल्या या प्रेमकथेच्या नायिकेचा तिच्या आयुष्याचा उर्वरित प्रवास एकट्याने करण्याचा निर्धार असाधारण आणि अढळ आहे. मानवी मनाचा थांग कुणास लागला आहे आजपर्यंत ! व्यक्तीच्या मनाच्या निर्णयाचा आदर करणे एवढेच आपल्या हाती. म्हणूनच डिम्पल यांचेविषयी आदर वाटतो तसेच मनाला वेदनाही होतात. एका शाळेत शिक्षिका म्हणून रमणा-या डिम्पल हेतूपुरस्सर प्रसिद्धीमाध्यमांपासून दूर राहतात. मला ही कथा जशी भावली तशी शब्दांत उतरवली. कॅप्टन विक्रम बत्रा साहेबांच्या शौर्याला वंदन आणि डिम्पल चिमा यांच्या प्रेमाला हृदयापासून नमस्कार ! त्यागाच्या पायावरच आत्मिक प्रेमाचे मंदिर उभे असते, हे खरेच! पण हा अनन्यसाधारण निर्णय आहे. परिस्थिती पाहून आयुष्याला,व्यवहाराला शरण जात पुन्हा संसार थाटणे यालाही निराळी हिंमत लागते. आपण या दोन्ही निर्णयांत आपल्या या लेकींच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे मला वाटते !
जय हिंद (स्वलेखन:- संभाजी गायके. ९८८१२९८२६०)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा