सकाळची वेळ. वस्तीच्या कोपऱ्यावर रिक्षा थांबताच ती खाली उतरली. हातात आधीच काढून ठेवलेली विसाची नोट रिक्षावाल्याच्या हातात कोंबत. येणाऱ्या जाणाऱ्या ट्रॅफिक मधून वाट काढीत. रस्त्यापलीकडील अरुंद गल्लीतून झपझप चालत. एका खोलीचं कुलूप उघडून ती आत गेली सुद्धा. खोलीचं दार लोटून घेत. कोपऱ्यातल्या माठातून ग्लास भरून घेत जवळच्या जीर्ण बेडवर विसावत. तिने ग्लास तोंडाला लावला. माठातलं थंडगार पाणी घशातून खाली उतरत. घामाघूम झालेल्या थकल्या देहाला गारवा देत. जीवघेणी गर्मी. उकाडा दूर करीत होतं. थोडं बरं वाटल्यावर ती जागेवरून उठली. उघड्या खिडकीचा पडदा सारखा करीत खांद्यावरचा साडीचा पदर खाली सोडत. ब्लाउजच्या गळ्यातून डाव्या हाताला हळुवार हात घालीत. वक्षस्थळाजवळ सुरक्षित ठेवलेला मोबाईल. सोबतच छोटीशी पर्स काढून घेत. मोबाईल चार्जिंगला लावून. घामाने चिंब भिजलेल्या पर्सची चेन उघडून आतल्या नोटा बाहेर काढून. मोजून जवळच्या भांड्याच्या फळीवर ठेवत. तिथे जवळच पडलेला टूथब्रश उचलून घेत त्यावर टूथपेस्ट लावली. खाली सोडलेला पदर अंगाभोवती लपेटून. ब्रश करीत. दार उघडून ती खोलीबाहेर आली. खोलीच्या छोट्याशा ओट्यावर निळ्या ड्रमच्या तोंडाला गुंडाळालेलं फडकं दूर करीत आत तरंगणाऱ्या मग्याने जवळच्या बादलीत पाणी ओतून घेत. पुरेसं पाणी ओतून झाल्यावर. अंघोळीसाठी अडोसा म्हणून अर्धवट उभ्या भिंतीचा कळकट पडदा बाजूला करीत. बादली साबण. दोरीवर वाळत घातलेली धुतलेली साडी-ब्लाउज ओढून घेत. पडदा पुन्हा सारखा करीत. अंघोळ उरकण्यासाठी ती आतल्या बाजूस गेली होती.
🌹
ओलसर केसांना टॉवेल गुंडाळून पुन्हा ती खोलीत आलेली. खोलीभर सर्वत्र साबणाचा मंद सुगधं पसरलेला. खोलीतल्या छोट्याशा कपाट आरश्यात बघून साडी नेसताना मधूनच समोर आरश्यात ती स्वतःला बारकाईने पाहत होती. तोंडावर ओठावर गाल गळ्यावर इथंतिथं ओरबाडल्याच्या खुणा. काही ओल्या तर काही कोरड्या जखमा. ते व्रण न्याहाळत असताना कालचीच काय. त्यापूर्वीच्या अनेक रात्रीं तिच्या डोळ्यासमोर जणू फेर धरित सरकत होत्या. खोलीत आल्यावर पर्स मधून काढून ठेवलेल्या नोटांकडे लक्ष जाताचं. तिचा संपूर्ण देह कसल्यातरी किळसवाण्या ओंगळ. स्पर्शाने शहारल्या सारखा कंप पावला. आरश्यातलं प्रतिबिंब फार वेळ तिला पाहवलं नाही. हरामी लांडगे साले ! दोन पैशे दिले म्हणून काय झालं !पै न पै वसुल करतात xxx शिवी हसडून. भानावर येत तिने दुसरीकडे नजर फिरवली. जमेल तशी साडी लपेटून केसातला रुमाल सोडवत सैलसर अंबाडा घातला. दुसऱ्यांच्या देहाची भूक शांत करता करता तिचं सारं शरीर ठणकत असलं तरी स्वतःच्या उदरातली भूक शमविण्यासाठी काहीतरी खायला बनवून तिला झोप घेणं जरुरी होतं. उद्या उजाडणाऱ्या सकाळ नंतर येणाऱ्या रात्रीला पुन्हा 'त्या' नरकात स्वतःला झोकून द्यायला तयार व्हायचं होतं.
🌹
भाजी फोडणीला घालून तिनं चपातीसाठी पीठ मळायला घेतलेलं. तोचं खोलीचं दार वाजलं. जवळच्या फडक्याला हात पुसत तिने दार उघडलं. दारात साधारण तिच्याच वयाची खाकी वर्दीतली महिला पोलीस उभी. कोण पाहिजे? तिनं विचारलं..सरिता तुचं ना? थोडी चौकशी करायचीय. आत येऊ? वर्दीत उभ्या तिला पाहून ती थोडी भांबावली होती.. अ..! या या आत याना ! दारातून बाजूला होत. तिने जागा करून दिली. खोलीभर एक ओझरती नजर फिरवून. आलेली महिला पोलीस कॉटवर बसली. तोपर्यत तिने माठात पेला बुडवून पाण्याचा ग्लास तिच्या समोर धरला होता.
सरिता ! परवाच्या दिवशी हॉटेल xxx वर धाड पडली ! त्यात तूपण होतीस ना? तुझं संपूर्ण नाव सांग ! मूळची कुठली? ह्या नरकात कशी पोहोचलीस? सगळं खरखर सांगायचं. लपवाछपवी अजिबात नकोय ! काय? चल बोल लवकर..!!!
यापूर्वी सुद्धा सरिता अनेक वेळा असल्या परिस्थितीतून गेलेली. पोलीस रेडमध्ये पकडलं जाणं. पोलीस स्टेशनचं लॉकअप. घाणरेड्या भाषेतली चौकशी. अर्वाच्य शिवीगाळ दमदाटी. दिवसदिवस बसवून ठेवणं. विखारी नजरा. जमलंतर काहीतरी देऊन घेवून करून घेतलेली सुटका. एखादेवेळी पोटासाठी करतात बिचाऱ्या ! म्हणत सहानुभूती चांगल्या वर्तुणुकीच्या हमीवर कोण्या चांगल्या मवाळ अधिकाऱ्याने दाखवलेली दया. कधी नाईलाजाने झालेल्या केसेस. त्यावर पुन्हा तारिख पे तारीख. हे सगळं तिनं भोगलेलं. आता अगदी अंगवळणी पडलेलं. परंतु घरापर्यत येऊन चौकशी. विचारपूस पहिल्यांदाच. का आली असेल ही? एखादी मोठी भानगड लफडं तर नसेल?तिला प्रश्न पडलेला. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तर द्यावी लागणार होती.
सांगते मॅडम ! मी मूळची xxx ह्या गावची..! चोवीसतास पिणारा आईला मारझोड करणारा बाप! रोजचं भांडणंतंटे आरडाओरड. घाणघाण शिवीगाळ.आईला अखेर असह्य झालेलं ! शेवटी मी दहावीत असताना तिने घर सोडलं ! तालुक्याच्या गावी शाळा ! आई गेल्यानं बापाचं वाढत गेलेलं पिणं ! कामधंदा नाही ! घरी आल्यावर खायला वाढ म्हणायचं ! मग कोणाच्या तरी शेतात तर आजूबाजूच्या घरात सांगतील तसली कामं!पोटापुरती भाकर कालवण! बापाला कसलीचं फिकीर नाही!गावातल्या मुलांमुलींसोबत शाळेला जाणंयेणं ! कधी एसटी कधी रिक्षा..बऱ्याचं वेळा पैशाअभावी पायपीट. त्यांत अंगावर तारुण्याच्या खुणा उमटायला लागलेल्या ! पोरांच्या तसल्या नजरा..!! सरिता बोलत होती सांगत होती. तोचं कडक आवाजासरशी तिच्या गालावर पाचं बोटं उमटली. अचानक बसलेल्या जोरदार फटक्यानं तोल जावून ती धडपडली.
त्या धक्क्यातून सावरे पर्यत.थांब ! पुढचं मी सांगते !अगदी तिच्या जवळ येऊन उभी महिला पोलीस तिचे खांदे धरून तिला आधार देत सावरत होती. मुळापासून घाबरल्या अवस्थेत ती भानावर येत असताना. समोरची वर्दीधारी दोन्ही हातांनी तिचा चेहरा आपल्या कडे ओढीत तिच्या डोळ्यात खोलवर पाहत..नीट बघ माझ्याकडे !ओळखलं मला? बोल लवकर !आठव..सरिते !पटते का ओळख? समोर नक्की काय घडतंय?तिला काहींचं अंदाज येत नसला तरी स्तब्ध..अवाक होऊन ती नुसती पाहत होती. नालायक पोरी !तरी आम्ही तुला सांगत होतो !सावर..सावध हो म्हणून !पण तुला मुलांच्या त्या तसल्या नजरा आवडायला लागल्या होत्या ! त्यांच्या ईशाऱ्यांना खुणांना. देवू केल्या गिफ्ट हॉटेलातील खाण्यापिण्याला प्रतिसाद द्यायला लागली होतीस तू ! मैत्रिणीं पेक्षा मुलं जवळची वाटायला लागली होती तुला !काय मिळवलंस यातून !कुठं येऊन पडलीस?
कोण आहात तुम्ही? तुम्हाला कसं सगळं ठाऊक? डोळ्यात जणू अंगार पेटल्या महिला कॉन्स्टेबल समोर हतबुद्ध अवस्थेत उभी सरिता विचारीत होती. अगं ए मॅड !इकडे उजेडात ये !हं !नीट बघ. तुझी गावातील मैत्रीण. आशा आहे मी ! ज्या हॉटेलात तू धंदा करताना पकडली गेलीस ना? तिथं रेड टाकताना आमच्या पोलीस स्टेशन टिम सोबत होते मी ! पाहिल्या बरोबर ओळखलं तुला ! आणि आज तुझी रूम शोधत इथवर आले ! सरिता अगं ! माझ्यासह आपल्या ग्रुपच्या मुलींनी कितीतरी वेळा समजून सांगितलं तुला ! नको मुलांच्या नादी लागूस ! पण शुद्धीवर होतीस कुठं तू!शाळा सुटते ना सुटते कुणाच्यातरी बाईकवर बसून निघून जायचीस!आम्हीपण तुझ्याचं वयाच्या..तूझ्या सारखं निसरड्या वाटेवरून जात होतो. आम्हालापण मुलं आमच्या कडे बघताय पाहून आनंद व्हायचा. वेगळंच काहीतरी जाणवायचं. त्यांच्या सोबत राहवं. बोलावं हसावं तोरा दाखवावा खूप वाटायचं. पण आम्ही संयम दाखवला. पुढचा धोका ओळखला. तुझ्या सारखं वहावत नाही गेलो. ठिकायं तुझ्या घरची हालत जाणून होतो आम्ही. पण आमची आई..घरचे ज्या समजुतीच्या चार गोष्टी सांगायचे शिकवायचे त्याचं तुला अनेक वेळा सांगितल्या. पण तुला तुझ्या उमलणाऱ्या जवानीचा गर्व चढत चालला होता. फक्त मजा करायची होती तुला !शेवटी एकानं पुरतं जाळ्यात ओढलंच तुला !मोठा होता गं तुझ्यापेक्षा !फक्त पैशाला भाळलीस !फार बेफिकीर वागलीस तू!!!..
सरिता अश्रूपातात पूर्ण न्हावून निघाली होती. अतीव भावनाविवश होत.अति अवेगाने तिने आपल्या शाळेतल्या मैत्रिणीला गच्च मिठी मारली होती..अनावर हुंदका..तर मध्येचं धायमोकलून रडत तिने मैत्रिणीचे दोन्ही हात घट्ट धरून ठेवले होते. आशा! आशा !अगं माफ कर गं मला !खरंच तू अशी भेटशील कल्पना नव्हती गं !तसही पोलीस वेषात तू खूप वेगळी दिसतेस !खरंच तुमचं ऐकलं असतं. हे हाल नसते झाले माझे ! आता काय? वेळ निघून गेलीय !जे स्वीकारलं त्यातचं मरायचं !पुरते फसले गं !भुलथापांना मौजमजेला बळी पडले !तुम्ही सगळ्या पास झाल्या. मी फेल झाले ! त्या काळात त्यानं खूप धीर दिला मला. लग्नाचं वचन दिलं. शहरात जावून लग्न करू !घर घेवू! खरं वाटलं! पळाले! शोध घेणारं कोणी नव्हतं. बापाला असली काय नसली काय काहींचं फरक नव्हता. तुम्ही सगळ्या कॉलेजात ऍडमिशन मध्ये व्यस्त. त्याच्या भरवश्यावर घर..गाव सोडलं..ना कशाची जाण ना जाणीव !प्रेमानं बोलणारं आधार देणारं कुणी पहिल्यांदा भेटलेलं. स्वप्न रंगवत राहू लागले. थोड्याचं दिवसांत मोठ्या हॉटेलात नोकरी लावून देतो म्हणाला. सुरवातीला कामं नव्हती फारशी. रूम सर्व्हिस. हॉटेलातल्या बेडशीट्स ब्लॅंकेट्स पिलो नॅपकिन्स बदलणे..रूम अटेंडर..शिफ्टची ड्युटी! दिवसा कधी रात्री! तिथली श्रीमंती धाटमाट..येणाऱ्या जाणाऱ्यांचे राहणीमान.. उंची कपडेलत्ते खानपान! आपल्यालाही कधी असं जगता येईल? स्वप्न पाहण्यात दंग होऊन..त्या दिवसाची वाट पाहत दिवस जात होते..काहीही करायची तयारी होतीचं..आणि एक दिवस हॉटेल मॅनेजरने एक ऑफर दिली.. बदल्यात भलमोठं नोटांचं बंडल !ठरल्या दिवशी ठरल्या वेळी हॉटेलच्याचं उंची रूममध्ये गेलेआणि त्या रात्री पासून मोहाला बळी पडत गेले. पैसा दिसायला लागला. राहणीमान सुधारलं. जे पाहिजे ते मिळायला लागलं. त्यासाठी मी काय पणाला लावलंय ह्याचा विचार करायला. मती गुंग झालेली.
तेचं..! सरिते तुला पहिल्यापासून स्वतःवर बंधने घालता आलीच नाही. तुझ्याचं वयाच्या ना गं आम्ही. नाजूक वळणावरचे धोके ओळखले आम्ही. तुला जमलंच नाही ते. सदांकदा उधळायला उतावीळ तू. मागचा पुढचा विचार कधी केलाचं नाहीस. शेवटी कुठं पोहोचलीस?वाटोळं केलं आयुष्याचं.
तुझा संताप जाणते मी !पुढचं ऐकतर खरं !सगळं मनासारखं घडत होतं !एक दिवस त्याला संशय आला माझ्या वागण्याचा !हॉटेलमधल्या कुणीतरी चुगली केली !दुसऱ्या दिवशी ढोसून आला. मॅनेजरची गच्ची धरली! मारझोड!राडा घातला! मला शिवीगाळ! तुझा माझा संबंध संपला! अशीच मर! वाट्टेल ते कर! पुन्हा तोंड दाखवू नको..!म्हणाला..पोलीस आले..त्याला घेवून गेले! माझाही जॉब गेला.आवक बंद झाली!रस्त्यावर आले. मजाहजा खानपान पैशाची चटक लागलेली. स्वस्थ बसवत नव्हतं. पावलं घेवून जातील तिकडे जात राहिले आणि पुरती गाळात अडकले. रात्र झाली की तसल्या मुलींसोबत वर्दळीच्या सिग्नलवर उभं राहायचं. माणसं हेरायची. स्वतःची बोली लावायची. म्हणेल तिकडं जायचं. वाट्टेल ते करु द्यायचं. पोटापुरातं मिळायचं !इथं भाड्यानं खोली घेतली !रात्र झाली की तोंड रंगवायचं ठरलेल्या जागेवर जावून उभं राहायचं.
बस्स झालं! बंद कर.. ऐकवत नाही ! वाटतं आमच्या पोलिसाच्या लाठीने फोडून काढावं तुला ! बेशरम मुली !काहींचं कसं वाटतं नाही गं तुझं गलिच्छ कर्तृत्व सांगायला? माझ्याकडे बघ ! मी..आपल्या ग्रुपच्या अनेक जणींनी ग्रॅज्युएशन केलं. मन लावून पोलीस भरतीची तयारी केली. फॉर्म भरला. सिलेक्ट झालो. ट्रेनिंग घेतलं. पहिलं पोस्टिंग इथं ह्या शहरात मिळालं. शेअर रूम. एकत्रित राहतो. सैपाक करतो. ड्युटीवर जातो. घराकडं पैसे पाठवतो. तूपण असतीस ना आमच्या सोबत? तुझं काय? तारुण्यांची नशा.गुर्मीत होतीस तू !अखेर तीचं नशा फाजील आत्मविश्वास तुला ह्या अशा दलदलीच्या मार्गाने घेवून गेला ! वाटोळं करून घेतलंस!एक सांगू अजूनही वेळ गेलेली नाहीये. सोड हे नरकातलं जिणं ! चल आमच्या सोबत. सगळी व्यवस्था लावू तुझी. सध्या आमच्या जेवणाचं टिफिनचं बघ. मोबदला घे. आजूबाजूला छोटीमोठी कामं कर !कष्ट कर. पुढचं पुढं पाहू. नीट होईल सगळं !आहे तयारी? की अशीच सडणार आहेस इथं....!!!सरिता बऱ्याचं वेळ मैत्रीण आशासोबत बोलत असताना.आशा मात्र तिला त्याक्षणी तेथून निघायचा आग्रह करीत समजावून सांगत होती.
🌹
'सरिता पोळीभाजी केंद्र' नाक्यावरल्या छोट्याश्या स्टॉलवर पुष्पहार घातलेली पाटी. स्टॉलसमोर काही वर्दीधारी महिला पुरुष पोलिसांची वर्दळ. दुसऱ्या क्षणी गाडीतून उतरून स्टॉलच्या दिशेनं येणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी..कडक सॅल्यूट.. रिबीन कटींग.. टाळ्यांचा निनाद. स्टॉलचं छोटेखानी उदघाटन सपन्न झालेलं..आय एम प्राऊड ऑफ यू गर्ल्स !गुड जॉब !सरितेच्या हातात पुषगुच्छ देणारे पोलीस अधिकारी. तिथंच जवळ युनिफॉर्ममध्ये उभ्या आशा आणि तिच्या मैत्रिणींकडे पाहत बोलत होते. मुलींनो !देहविक्रेय सारख्या दलदलित फसलेल्या एका मुलीची मदत करून तिला समाजात उजळ माथ्याने जगण्यासाठी तुम्ही जेकाही योगदान दिले. आत्मसन्मानाचा मार्ग मिळवून दिला. खरंच खूप चागलं कौतकास्पद काम केलंय तुम्ही !पोलीस ड्युटीचा ताणतणाव सांभाळून. जोडीला सामाजिक बांधिलकीची जाणीव सुद्धा ठेवली. मी तर त्याहीपलीकडे जावून असे म्हणेन सच्ची मैत्री काय असते ह्याचा आम्हां सर्वांसमोर एक आदर्श घालून दिलाय..! निघतो आम्ही! किप-इट-अप!तुम्हां सगळ्यांना शुभेच्छा...!!!
🌹
शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या साहेबांची गाडी हळूहळू दूर जात असताना. स्वप्नवत वाटणारा तो सगळा नजारा डोळ्यात साठवीत उभी सरिता गहिवरली होती. स्वतःशी हरवली होती. तोचं भानावर येत. डोळ्यातून अविरत ओघळणारे अश्रू सावरीत. हातातला बुके सांभाळीत धावत जावून थोडं दूरवर उभ्या आशा आणि इतर मैत्रिणींना तिने घट्ट मिठी मारली होती.
शेखर वैद्य नाशिक
24 मे 2025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा