एकदा कृष्ण, त्याचा सखा मधुमंगल याच्याबरोबर वनात रपेट मारीत होता. तेव्हा कृष्णाला भूक लागली. कृष्ण मधुमंगलला म्हणाला की मधुमंगल, मला खूप भूक लागली आहे. तिथेच एक झाड होतं आणि त्या झाडाला एकच फळ लटकत होतं. मधुमंगलने जाऊन ते फळ तोडलं आणि कृष्णाला दिलं. त्या फळाचे दोन समान भाग केले गेले आणि ते दोघा मित्रांनी घेतले.
कृष्ण त्याचा तुकडा खाण्याच्या आधी मधुमंगल त्याला म्हणाला की तूच वेदांमध्ये म्हटले आहेस की पहिल्यांदा ब्राह्मणाने खाल्ले पाहिजे. मग आता मी आधी फळ खातो. कृष्ण म्हणाला, ठीक आहे. मधुमंगलने अगदी चवीने त्याच्या वाटणीचं फळ खाल्लं. मग परत मधुमंगल कृष्णाला म्हणाला की कृष्ण, तुला माहीत आहे, जर समोर ब्राह्मण असेल तर आपल्या खाण्यातील अर्धा भाग त्याला द्यायला पाहिजे. यावर कृष्ण म्हणाला, ठीक आहे. मी तुला यातील अर्धा भाग देतो.
अशा पद्धतीने मधुमंगलने त्या फळातील पाऊण भाग खाल्ला आणि आता कृष्णाकडे पाव भाग उरला. आता मधुमंगल म्हणाला, कृष्ण, आता इतका लहान तुकडा तुला कुठे पुरेसा पडणार आहे ? हा तुकडाही तू मला दे.
आता मात्र कृष्ण म्हणाला की तू मला काय मूर्ख समजतोस का की मी तुला माझा सगळाच वाटा देऊन टाकीन आणि असं म्हणत कृष्णाने तिथून धूम ठोकली. त्याच्यामागे "कृष्ण तो तुकडा मला दे", करीत मधुमंगलही धावू लागला.
पण तोपर्यंत कृष्णाने तो फळाचा तुकडा तोंडात टाकला आणि पुढच्या क्षणी थुंकून टाकला. अतिशय कडू फळ. कृष्ण म्हणाला, मधुमंगल, किती कडू फळ ! यावर मधुमंगल म्हणाला, अरे, म्हणूनच तर तुझ्याकडून मागत होतो. तुझ्या तोंडात कडू फळ जायला नको, म्हणूनच तर एवढा आटापिटा करीत होतो.
यावर कृष्ण म्हणाला, पण तू तर फळ अगदी आनंदाने खात होतास, तुला फळ कडू लागलं नाही ? यावर मधुमंगल म्हणाला, इतकं कडू फळ तुझ्या तोंडात जात नाहीये, मी याच गोष्टीचा आनंद घेत होतो. अरे कृष्ण, तुला काही कडू खावे लागावे, ही कल्पनाही मनाला फार दुःख देणारी आहे..
मधुमंगल हा कृष्णाचा एक सखा होता किंवा आहे, ज्याला नेहमी पायाने अधू दाखवले जाते. मराठी गोष्टींमध्ये कृष्णाचा पायाने अधू असणारा मित्र पेंद्या म्हणून जो वर्णन केलेला आहे, तोच हा मधुमंगल.
या पेंद्याला एक विनोदी पात्र दाखवले जाते, विदुषक म्हणा. पण प्रत्यक्षात या (पेंद्या नाही) मधुमंगलची कौटुंबिक पार्श्वभूमी खूप मोठी ज्ञानी लोकांची होती. मधुमंगल स्वतः सतयुगातील होता आणि तो भगवंतांच्या द्वापर युगातील कृष्ण अवताराची वाट बघत होता. भगवंतांच्या या सखावर एक स्वतंत्र लेखन करायचे आहे.
श्री राधारमण लाल की जय 🙌🏻
- मंजुषा जोगळेकर
(अधिक ज्येष्ठ कृष्ण ८, शके १९४८)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा