गुरुवार, २५ जून, २०२६

2951. झेप...!

     लहानपणी अनेक कथा, कादंबऱ्या आणि लेखांमध्ये वाचलेलं गुळगुळीत वाक्य म्हणजे "मुलं मोठी होऊन, त्यांच्या पंखात ताकद येऊन उडून जातात आणि आईवडील अभिमानाने बघत असतात!" साधारण अश्या आशयाचं होतं. ते त्या त्या वयात वाचताना फार परिणामकारण वाटलं नाही. पण गेल्या काही दिवसात घडणाऱ्या घटनांनी आपण ते अनुभवत असल्याचं जाणवून त्याचा खोल अर्थ लक्षात आला. 
     कन्येला उन्हाळ्याची सुट्टी असल्याने ती माझ्या बरोबर ड्रायव्हिंगची प्रॅक्टीस करत होती. तिची आई ही मी पाहिलेल्या काही उत्तम (स्त्री पुरुष दोन्ही) ड्रायव्हर्स पैकी एक असल्याने तिच्या मुलीला ड्रायव्हिंग येणे आणि पुढे तिने उत्तम ड्रायव्हर बनणे ही काळाची आणि आमच्या इच्छेची गरज होती. त्यानुसार माझ्याबरोबर सराव करून अखेर काल आम्ही मुंबईला जात असताना कन्येने मुख्य रस्त्यावर, खऱ्या रहदारीत, हायवेवर गाडी चालवली. सुंदर चालवली. रोज सवय झाली की आणखी सफाई आणि आत्मविश्वास येईल. पण आता ती ट्रॅफिक मध्ये नक्कीच गाडी उत्तम चालवू शकते हे काल सिद्ध झालं! बायकोने लगेच तिचा गाडी चालवत असलेला व्हिडिओ रेकॉर्ड केला. कन्या आयुष्यात पहिल्यांदा चालली त्या क्षणाचा देखील व्हिडिओ आमच्याकडे आहे. कालचा तिच्या ट्रॅफिक मधील पहिल्या ड्रायव्हिंगचा आणि तो पहिल्या पाऊलचा व्हिडिओ एकत्र करून आम्ही बघणार आहोत. त्या व्हिडिओत काही वर्षांपूर्वी तिने माझा हात सोडून पाहील पाऊल टाकल होतं आणि काल स्टिअरिंग माझ्या हातून स्वतःच्या हातात घेत तिने परत एकदा एका नव्या प्रवासात पाहिलं पाऊल टाकलं! 
     सुट्टीत तिला तिच्या शिक्षणाचा भाग म्हणून इंटर्नशिप करणे आवश्यक आहे. मग ती करण्यासाठी उत्तम कंपनी शोधणे, तिथे चौकशी करून अर्ज करणे वगैरे करून अखेर तिला तिच्या आवडीच्या कंपनीत इंटर्नशिप करण्याची ऑफर मिळाली. त्या कंपनीच ऑफिस आमच्या घरापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. तिथे जाण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही विचार करून सर्वात वेगवान तसेच कॉस्ट इफेक्टिव दोन्ही सध्या करणारा पर्याय निवडला. तशी ती घराजवळ एका ngo मधे इंटर्नशिप करत होतीच. पण ही तिच्या शिक्षणाशी संबंधित आणखी एक इंटर्नशिप आहे. 
     ह्या कंपनीचे ऑफिस माझ्या एका पूर्वीच्या एका ऑफिसच्या जवळ आहे. मग गेल्या आठवड्यात मी आणि कन्या live experience घ्यायला ठरवलेल्या मार्गाने त्या ऑफिसच्या दारात जाऊन आलो. किती किती वेळ लागतो वगैरे सर्व map केलं. आज तिचा त्या कंपनीतील पहिला दिवस! बाप कितीही हुशार असला तरी हळवा असतो. विनाकारण काळजी करतो. त्या दिवशी पण खरं तर सगळं पाहून, मोजून झालं होतं. तरीही काल मी कन्येला म्हणालो "उद्या मी तुला सोडायला येतो. पहिला दिवस आहे. काही धावपळ झाली तर मी बरोबर असलेलं बरं!" कन्या समजूतदारपणे ओके म्हणाली! आज सकाळी आम्ही त्याच ठरलेल्या माध्यमातून, ठरवलेल्या रूट ने तिच्या ऑफिसला गेलो. मी त्या प्रचंड इमारतीच्या बाहेर थांबलो. कन्येने आत जाऊन तिची बॅग स्कॅनर मधे टाकली आणि मागे वळून पाहिलं! मला टाटा केला आणि ती त्या काचेच्या प्रचंड कॉर्पोरेट भिंतीमागे दिसेनाशी झाली आणि मला तिचा शाळेचा पहिला दिवस आठवला! गुलाबी दप्तर पाठीला अडकवून, चेहऱ्यावर रडवेले भाव घेऊन आम्हाला टाटा करून शाळेच्या भिंतींच्या आड हरवून जाणारी आमची कन्या आज कॉर्पोरेट विश्वात पाहिलं पाऊल ठेवत होती. अजून खूप शिकायचं आहे, व्यावसायिक जगात कायमचं यायला अजून थोडा अवकाश आहे. तरी हे पहिलं पाऊल तिच्या teenager ते professional ह्या प्रवासाकडे घेतलेलं पहिलं वळण आहे. आणि आमच्या देखील आयुष्यात आणखी एक धागा तुटून कन्या तिच्या वाटेवर जात असल्याची ही जाणीव आहे! 
     बाप ही जमात जितकी निष्ठूर आणि कॉन्फिडन्ट वाटते ना त्याहून कित्येक पट हळवी आणि घाबरट असते. आज मला आनंद, अभिमान तर वाटतोच आहे. पण एक हुरहूर पण वाटते आहे. कुठेतरी एक धूसर टप्पा दिसतोय जो हळूहळू स्पष्ट होत जाणार आहे. जिथे कन्येचे आणि आमचे मार्ग वेगळे होतील. ती तिच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यातील नव्या मार्गावर धावू लागेल, यशस्वी होईल आणि आम्ही दोघे आमच्या मार्गावर असू, तिच्या मार्गाकडे लांबून बघत. आमचा मार्ग काही वर्षांनी आमच्या बरोबर संपेल. पण कन्येचा मार्ग मात्र उत्तरोत्तर अधिकाधिक विशाल, सुंदर आणि आनंददायक होत असेल. आम्ही मागे राहिलेले असू आणि कन्या उत्तुंग झेप घेत असेल! 
     ही माझी एकट्याची कथा, व्यथा किंवा अवस्था नाहीये. जगातील प्रत्येक पालक हे थोड्याफार फरकाने अनुभवत असतात. मला आज जाणवलं म्हणून मी फक्त लिहिलं इतकाच फरक! कारण साला जगातले सगळेच बाप दाखवत नाहीत पण पोरांच्या बाबतीत खूप हळवे असतात! पोरं झेप घेतात आणि तमाम बाप हळूच डोळे पुसतात! 

©मंदार जोग
टीप - लेख आवडल्यास शेयर बटण दाबून अवश्य शेयर करा. कॉपीपेस्ट ही चोरी आहे. कृपया चोरी करू नका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...