दरवर्षी ही तारीख आली की मन नकळत भूतकाळाच्या वाटेने धाव घेते. नव्या पुस्तकांचा सुगंध, शाळेची घंटा, मित्रांची भेट आणि बालपणीच्या असंख्य आठवणी पुन्हा जिवंत होतात. प्रत्येकासाठी शाळेचा पहिला दिवस खास असतो, पण माझ्यासाठी तो केवळ शाळेचा पहिला दिवस नव्हता; तो माझ्या आयुष्याला दिशा देणारा, आत्मविश्वासाचा पाया घालणारा आणि स्वप्नांना पंख देणारा दिवस होता. आजही त्या दिवसाची आठवण झाली की आईची माया, शिक्षकांचे प्रेम आणि मित्रांची साथ मनाला नव्याने जगण्याची प्रेरणा देऊन जाते.
माझ्या शाळेचे नाव राष्ट्रीय अस्थीव्यंग विद्यालय आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेचा पहिला दिवस हा अविस्मरणीय असतो. काहीजण त्या दिवशी रडतात, काहीजण घाबरतात, तर काहीजण आईचा हात सोडायलाही तयार नसतात. पण माझ्या आयुष्यातील शाळेचा पहिला दिवस सर्वसामान्य मुलांपेक्षा खूप वेगळा होता. मी ८० टक्के दिव्यांग असल्यामुळे माझे शिक्षण दिव्यांग मुलांच्या शाळेत झाले. त्यामुळे माझे बालपण, माझी शाळा आणि माझे मित्र-मैत्रिणी यांचे जगही वेगळेच होते. आजही शाळेचा पहिला दिवस आठवला की मन नकळत भूतकाळात हरवून जाते.
त्या दिवशी माझ्या आईने मला कडेवर घेऊन शाळेत नेले होते. शाळेच्या आवारात पाऊल ठेवताच अनेक अनोळखी चेहरे दिसत होते. नवीन जागा, नवीन वातावरण आणि नवीन माणसे. पण तरीही मनात भीतीपेक्षा कुतूहल जास्त होते. कारण मला शाळेत जायची खूप ओढ होती. खरं तर बहुतेक मुलं शाळेत जाऊ नये म्हणून रडतात, हट्ट करतात. पण माझी कथा याच्या अगदी उलट आहे. मी शाळेत जाण्यासाठी रडलो होतो. शिक्षणाची ओढ माझ्या मनात लहानपणापासूनच होती. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस माझ्यासाठी एखाद्या सणासारखा होता.
शाळेत गेल्यावर माझी भेट माझ्या पहिल्या शिक्षिकेशी झाली. त्या काळात "मॅडम" हा शब्द फारसा प्रचलित नव्हता. आम्ही त्यांना प्रेमाने "बाई" म्हणायचो. आई आणि बाई यांच्यात फक्त एका अक्षराचा फरक असतो, पण त्या दोघींच्या मायेतील ऊब मात्र सारखीच असते. एक आई घरी सांभाळते, तर दुसरी आई शाळेत घडवते. माझ्या त्या बाई अत्यंत प्रेमळ होत्या. त्यांनी मला इतक्या आपुलकीने समजावून घेतले की काही क्षणांतच माझी भीती दूर झाली. त्यांचा प्रेमळ चेहरा आजही माझ्या स्मरणात तितकाच जिवंत आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांवर प्रेम करत होत्या, पण मला मात्र नेहमी वाटायचे की त्या माझ्यावर थोडा जास्तच जीव लावतात. विशेष म्हणजे शाळा सोडल्यानंतरही त्या अनेकदा माझ्या घरी येऊन माझी विचारपूस करायच्या. शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते किती सुंदर असू शकते याची जाणीव मला त्यांच्यामुळे झाली.
पहिल्याच दिवशी मला अनेक मित्र-मैत्रिणी मिळाले. आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी दिव्यांग होते. त्यामुळे एकमेकांच्या अडचणी समजून घेण्याची भावना आमच्यात आपोआप निर्माण झाली होती. दुपारची सुट्टी झाली तेव्हा माझ्याकडे डबा नव्हता. मला किती वेळ शाळेत थांबायचे हे माहिती नव्हते आणि आईलाही त्याची कल्पना नसावी. पण त्या वेळी माझ्या मित्र मैत्रिणींनी त्यांच्या डब्यातील खाऊ माझ्यासोबत वाटून खाल्ला. त्या छोट्याशा कृतीतून मला मैत्रीचा खरा अर्थ समजला. आमच्या शाळेत मुरमुरेही मिळायचे. आजही त्या मुरमुऱ्यांची चव आठवली की बालपण डोळ्यांसमोर उभे राहते. कदाचित त्या मुरमुऱ्यांपेक्षा त्यामागील आनंद आणि निरागसता अधिक गोड होती.
माझ्या शाळेतील शिक्षक आणि शिक्षिका हे माझ्या आयुष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांनी मला केवळ पुस्तकातील धडे शिकवले नाहीत, तर जगण्याचे धडेही दिले. दिव्यांग विद्यार्थी म्हणून माझ्या अडचणी समजून घेत त्यांनी प्रत्येक पावलावर मला आधार दिला. कधी प्रोत्साहनाचे शब्द दिले, तर कधी चूक झाली तेव्हा प्रेमाने समज दिली. माझ्यातील क्षमता ओळखून ती विकसित करण्याचे काम त्यांनी केले.
आज माझ्या लेखनात जे शब्दांचे सौंदर्य दिसते, विचारांमध्ये जी प्रगल्भता जाणवते आणि अभिव्यक्तीत जो आत्मविश्वास दिसतो, त्यामागे माझ्या शिक्षकांचे संस्कार आणि मार्गदर्शन आहे. त्यांनी दिलेली शिकवण हीच माझ्या आयुष्याची खरी शिदोरी आहे. मी पुस्तकातून जितके शिकलो, त्यापेक्षा जास्त त्यांच्या सहवासातून शिकलो. म्हणूनच मी आज जे काही आहे, त्यात माझ्या आई-वडिलांइतकाच माझ्या गुरुजनांचाही मोठा वाटा आहे. हसत खेळत माझा पहिला दिवस कधी संपला ते कळलेच नाही. घरी परतल्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेत जाण्याची ओढ मनाला लागली होती. त्या दिवसापासून शाळा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली.
आज मागे वळून पाहताना अभिमानाने सांगू शकतो की शाळेत असताना मी एकही दिवस विनाकारण गैरहजर राहिलो नाही. शाळा म्हणजे माझ्यासाठी केवळ शिक्षणाचे केंद्र नव्हते; ती माझी दुसरी आई होती, माझे दुसरे घर होते. तिथे मला शिक्षण मिळाले, मित्र मिळाले, प्रेम मिळाले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयुष्याला सामोरे जाण्याचे बळ मिळाले. आजही जेव्हा शाळेच्या आठवणी मनात दाटून येतात, तेव्हा आईची माया, बाईंचा प्रेमळ चेहरा, शिक्षकांचे मार्गदर्शन, मित्र मैत्रिणींची साथ आणि त्या निरागस दिवसांची गोड चव मनाला पुन्हा अनुभवायला मिळते. आयुष्याच्या प्रवासात कितीही मोठे झालो तरी शाळेचा पहिला दिवस आणि त्यातून मिळालेले संस्कार कधीच विसरता येणार नाहीत.
म्हणूनच माझ्या आयुष्यातील शाळेचा पहिला दिवस हा केवळ आठवण नाही, तर माझ्या आयुष्याला दिशा देणारा, आत्मविश्वास देणारा आणि स्वप्नांना पंख देणारा एक सुंदर प्रारंभ आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा