गुरुवार, २५ जून, २०२६

2973. संसार

 संसार फक्त स्त्रियांमुळेच तुटत नसतो.
"घर तुटलं... नक्की बायकोचा स्वभाव कडक असेल"  
"घटस्फोट झाला... बाईला जास्त स्वातंत्र्य हवं होतं"  
अशी वाक्यं आपण रोज ऐकतो. संसार मोडला की बोट सरळ बायकोकडे जातं. पण ताई, आरसा फक्त एका बाजूनं तडकत नाही. दोन्ही बाजूने दाब पडला कीच तो फुटतो.
संसार म्हणजे दोन चाकांची गाडी आहे
एक चाक पंचर झालं की गाडी थांबते. फक्त पुढचं चाक का मागचं चाक याचा वाद करून उपयोग नाही. 
नवरा कमवत नाही, व्यसन करतो, बायकोचा आदर करत नाही... तरी संसार टिकतो का? नाही.  
बायको घर सांभाळत नाही, सतत भांडते, जबाबदारी टाळते... तरी संसार टिकतो का? नाही.  
म्हणजे दोष फक्त एकाचा नसतो. कधी त्याचा 70% असतो, कधी तिचा 70%. पण 100% एकट्या बाईच्या माथी मारणं हा अन्याय आहे.
"बाईमुळेच" हा ठपका का बसतो?
कारण आपली जुनी समज. "बाई म्हणजे घर जोडणारी, बाई म्हणजे सहन करणारी". बाईने सहन केलं नाही की ती "बिघडली" ठरते. 
नवरा रात्री उशिरा येतो, फोन उचलत नाही - "काम असेल त्याला"  
बायको 10 मिनिटं उशिरा जेवायला वाढते - "बाईला घराची कदर नाही"
पुरुषाच्या चुकीला "नैसर्गिक" म्हणायचं आणि बाईच्या तक्रारीला "स्वभावदोष" म्हणायचं... हा दुटप्पीपणा आहे 
संसार तुटतो कधी? जेव्हा...
जेव्हा संवाद मरतो:बोलणं बंद झालं की गैरसमज वाढतात. नवरा बोलत नाही, बायको ऐकत नाही. मग दोघंही एका छताखाली अनोळखी होतात. इथे लिंग नसतं, फक्त अबोला असतो.
जेव्हा आदर मरतो:बायको हट्टी, रागीट, भांडखोर "तू शिकलेली नाहीस म्हणून काही कळत नाही" किंवा "तू फक्त घर सांभाळतोस, बाहेरचं काय कळणार". जोडीदाराला कमी लेखलं की नातं आतून पोखरलं जातं. हा वार बाईही करते, नवरा पण करतो.
जेव्हा विश्वास तुटतो:फसवणूक, खोटं बोलणं, व्यसन लपवणं. हे पाप बाईच करते असं नाही. पुरुष पण करतात. विश्वास गेला की संसाराची भिंत कोसळते.
जेव्हा अपेक्षा एकतर्फी होतात: "तू बदल, मी आहे तसाच राहीन" - असं दोघांपैकी कोणीही म्हणालं तरी नातं दुखावतं. बदल दोघांनाही करावा लागतो.
घटस्फोटाचं आकडेवारी काय सांगते? 
कोर्टात जाऊन बघा नवरा व्यसनी आहे म्हणून बायका केस टाकतात. हुंड्यासाठी, लफड्यासाठी, संशयासाठी मारहाणीसाठी, फसवणुकीसाठी. 
तसंच बायकोला दुसरा आवडला, जबाबदारी नको, सतत भांडण - म्हणून नवरे पण केस टाकतात.
म्हणजे दुखणं दोन्ही बाजूला आहे. फक्त आपण बाईचं दुखणं उघडं बघतो, पुरुषाचं दुखणं "पुरुष आहे ना, सहन करेल" म्हणून दुर्लक्ष करतो.
पुरुषांसाठी:कमावणं म्हणजे जबाबदारी संपली नाही. बायकोच्या मनाचा, घराच्या भावनेचा पगार काढायला शिका. तिचा सन्मान करा. ती नोकरी करते किंवा व्यवसाय करते तर तिला घरी थोडी मदत करा त्यासाठी लाजू नका. ती घरी आहे तर तिच्या कष्टाला "कामच काय आहे" म्हणू नका.
स्त्रियांसाठी:स्वातंत्र्य हवं, पण स्वैराचार नको. नवऱ्याला पण ऐकून घ्या. त्याच्या पण मर्यादा आहेत, ताण आहे. सतत तुलना करू नका. "शेजाऱ्याचा नवरा असा करतो" म्हणजे तुमचा नवरा वाईट नाही. तसेच बायकोला पण मन आहे, शांत स्वभावाच्या नावाखाली दुर्लक्ष करणे म्हणजे शहाणपणा नसतो.
दोघांसाठी:भांडण झाला तरी रात्री एका ताटात जेवायला बसा. ईगो बाजूला ठेवून "सॉरी" म्हणायला शिका. तिसऱ्या माणसाला, सासू-सासऱ्याला, मैत्रिणीला संसारात लुडबुड करू देऊ नका. नवऱ्याची मैत्रीण किंवा बायकोचा मित्र म्हणजे संसार कसरितीच्या दोरिवर. नवऱ्याला सांगत नाही तितके मित्राला आणि बायकोला सांगत नाही तितके मैत्रिणीला सांगणे म्हणजे संशयाला मार्ग मिळवून देणे.
शेवटी एकच...
संसार म्हणजे दोन मातीची भांडी एकत्र बांधलेली आहेत. एक भांडं जोरात आदळलं तरी दुसरं पण फुटतं.  संसार म्हणजे एक विश्वासाचे भांडार. पण विश्वास तुटेल असे वागून जर भाषा करत असाल तर ते पूर्ण चुकीचे आहे. संसारात पारदर्शक ता हवी. एकमेकांपासून लपवून केलेली कृत्य विश्वासाला तडा देतात.
फक्त बाईमुळे संसार तुटतो असं म्हणणं म्हणजे अर्धं सत्य आहे. आणि अर्धं सत्य म्हणजे पूर्ण खोटं.
संसार टिकवायचा असेल तर दोघांनीही हात हात घालून चालावं लागतं. एकाने ओढलं आणि दुसऱ्याने मागे खेचलं... तर दोरीच तुटते.
म्हणून कुणालाही नावं ठेवण्याआधी स्वतःला विचारा - "मी नातं जोडायला काय केलं?"मित्रामैत्रिणीशी गप्पा मारल्या कि संवाद सादला हे बघा. "दिव्याखाली अंधार असतो "
काही चुकलं असेल तर माफ करा. कोणाच्या भावनाना दुखावणे हा माझा हेतू नाही. 🙏

संगीता अवधूत ठोक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...