गुरुवार, २५ जून, २०२६

2906. स्वप्न

 दिडेक वर्षांपुर्वी गेलेले त्याचे बाबा, पहिल्यांदाच त्याच्या स्वप्नात आले होते. तो स्वप्नातच खुश झाला, केव्हाची प्रतिक्षा संपल्याच्या आनंदात. काही बोलले नाहीत बाबा... फक्त त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने, खुर्चीवर बसून चहा पित होते ते. चहा?... अं हंं... काॅफी बहुतेक... छे... कोकम सरबत?... हॅट्ट... बाबांना चहाशिवाय दुसरं काहीच चालत नसे... पण मग हे असं काळसर पितायत तरी काय बाबा?... हा प्रश्न पडला त्याला. आणि तेवढ्यात त्याच्या थेट डोळ्यांत बघत हसले बाबा, वेगळंच... केविलवाणं पण तरिही सुचक. 
आणि खाडकन जागा झाला तो. दूध उतू गेल्याचा वास, अख्ख्या घरभर पसरला होता. त्याने घड्याळात पाहिलं. नऊ वाजायला आले होते. रविवारची सकाळ... वर्क फ्राॅम होम पासून सुटकारा. तो पलंगावरुन खाली उतरत, किचनमध्ये गेला. बायको मनाशीच त्रागा करत, शेगडी पुसत होती. 
"गेलं का उतू दूध?" 
"नायत्तर काय. मेलं समोर उभं असतांना वर येईल तर शप्पथ. जरा हलले माठातलं पाणी प्यायला, नी आलं भस्सकन वर"
त्याला हसू आलं... पण अगदी क्षणभरच. आणि धस्स झालं छातीत त्याच्या. दूध... उतू गेलेलं दूध... म्हणजे वाया गेलेलं दूध... म्हणजेच तोंडी न लागलेलं दूध... अरे देवा... म्हणजे मला दिसलेल्या स्वप्नात, बाबा कोरा चहा पित होते?... दूधाशिवायचा?... पण का?... आणि मला का दिसले ते नेमके असेच? अशा विचारांच्या कल्लोळातच काहीतरी सुचून, तो पुन्हा धावतच बेडरुममध्ये गेला. आणि आईला फोन केला त्याने... 
"हॅलो... कशी आहेस गं?"
"मी बरी आहे... लवकर उठलास तो आज"
"छे गं... लवकर कसला... आत्ताच उठतोय"
"बरं बरं... व्यवस्थित ना सगळं?"
"हो आई... तुझी झाली का काॅफी वगैरे?"
"नाही रे अजून"
"का ग?... आठच्या दरम्यानच होते ना?"
"हो ना... अरे पण आज दूधच आलं नाही दारावर... खाली उतरायला हल्ली, त्राण गोळा करावे लागतात...तेच करतीये... उतरेन आता खाली, नी घेऊन येईन"
हे बोलून हसली आई. आणि त्याचे डोळे मात्र भरुन आले. त्याला कळलं नेमकं, बाबांचं त्याच्या स्वप्नात येण्याचं प्रयोजन. तो थक्क झाला विचारानेच, की अजूनही अडकलाय जिव बाबांचा आईत? आणि आठवलं त्याला आईनेच त्याला सांगितलेला किस्सा, काही वर्षांपुर्वीचा. एकदा घोटभरच दूध शिल्लक असतांना घरी, आईने बाबांना चहा करुन दिलेला. आणि बाबांना हे कळताच... स्वतःच्या चहाचा कप तसाच ठेऊन, बाबा खाली उतरुन दूध घेऊन आले होते. मग आईने स्वतःला काॅफी केली होती, नी बाबांचा चहा गरम केला होता. 
"हॅलो... हॅलो... अरे आहेस की ठेवलास फोन?" 
"अं... आहे आहे... आणि आई ऐक... तू अजिबात खाली उतरायचं नाहियेस... मी दहा मिनिटांच्या आत दूध घेऊन येतोय तुझ्याकडे... आणि आज मीच करणारेय तुला काॅफीसुद्धा... मी ही चहा न पिताच निघतोय... आज काॅफीच पिईन तुझ्यासोबत"
"अरे पण... कशाला उगिच"
"श्शूsss बोलूच नकोस... ठेव फोन... हा बघ मी निघालो."
दोघांनीही फोन कट केला. आणि दोघांनीही पाहिलं एकाचवेळी, दोघांच्याही घरी एकसारख्याच असलेल्या त्या फोटोकडे. त्याच्या बाबांच्या नी त्यांच्या अहोंच्या फोटोकडे. ज्यातून ते हसत होते मिश्किलपणे. अगदी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने.

-सचिन देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...