आज आजी रूसून बसली होती. नेहमीप्रमाणे तासाभरात येईल गाडी रूळावर म्हणत आजोबा येरझारा घालत होते. पण आज आजीचा नूर काही वेगळाच होता. आजोबांनी तिच्याकडे बघितलं. सुंदर, नितळ काया असलेली गोरीपान आजी अबोली काठापदराच्या कॅाटनच्या साडीत गोड दिसत होती..सकाळी न्हाऊन केसांचा बुचडा बांधला होता व त्यातल्या चार चुकार बटा तिच्या चेहऱ्यावर सुरेख महिरप करत होत्या.
आज फुलवाती करताना आजी एकदाही म्हणाली नाही की “ही मेली कंबरदुखी आता माझ्या बरोबरच जायची. भेटला ना तो की मी सोडायची नाही त्याला..नक्की विचारेन की बाबा जन्माला घालून काय देतोस रे तुझ्या लेकरांना?
आजोबांना राहवेना..“काय ग! आज गप्प गप्प का?”ते तिच्या शेजारी जाऊन बसले..
“सांगून आहे काही उपयोग? पडतय ना पानात अन्न आणि चालवतेय ना घर मग रूसली तर रूसली! होईल शांत! मला काय होतंय..मला काय वाटतं..याचा विचारच नाही.”
आजीच्या तोंडून शब्द फुटलेला बघून आजोबांना हुरूप आला. “अग काय बोलतेस? काल तर तुझे पाय चेपून दिले. परवा कंबरेला तेल लावून दिलं.. तेरवा..” आजोबा तिरके कलून बघत होते..
“बास बास.. केलेलं अगदी बोलून दाखवायलाच हवं का? आणि ते झाले शरीराचे लाड. मनाचं काय झालंय कधी विचारलंत?”आजीनं फुलवाती पिशवीत भरल्या.
“मग काय झालं सांग की!” त्यांच्या आवाजातला ओलावा आजीला जाणवला..
“सांगू?” आजीनं रूपेरी केस मागे सारले. अगदी लग्न होऊन नवी नवरी असताना करायची तस्से..
“पन्नास वर्ष होतील लग्नाला पुढच्या आठवड्यात.. कधी एकदा तरी “आय लव यु” म्हणालात मला?”आजीचे भरून आलेले डोळे पाहून आजोबांना काय बोलावं कळेना.
“अग काय? हे काय काढलस आता?” आजोबा गडबडले.
“खरं तेच बोलतेय. ते समोरचे आरव आणि रीना बघितलेत?
लग्नाला पाच वर्षं होत आली तरी कसे जाता येता.. आय लव यु..म्हणत असतात! अगदी सिनेमातल्या सारखं. परवा तो तिच्या वाढदिवसाला १२ गुलाब घेऊन आला होता. खालूनच ओरडला,”रीना, आय लव यु!” आजीच्या डोळ्यात कौतुक होतं..
आजोबांनी दीर्घ श्वास घेतला.. आजी कधी आय लव यु चा हट्ट करेल असं कधीच वाटलं नव्हतं. सिनेमात काय वाट्टेल ते दाखवतात.. खरं आयुष्य असं नसतं हे सांगावसं वाटलं तरी ते काही बोलले नाहीत.. म्हणून तर ते सिनेमे बघत नसतं.
“कमल, मी तुला एकदाच नाही तर हजार वेळा आय लव यु म्हटलंय.. तू विसरते आहेस..
आजीनं अचंबित होऊन हात हनुवटीवर ठेवला..हो??
“तू लग्न होऊन घरी आलीस तेव्हा पार्वती काकू सतत तुझ्या चुका काढायची..तू खपून पुरणपोळ्या केल्या होत्यास. काकूनं नावं ठेवायला सुरूवात केली. “आईनं काहीच शिकवलेलं दिसत नाही” तिनं हे म्हणताच मी पानावरून उठलो..”काकू, कमलला असं वेडवाकडं बोललेलं मला चालणार नाही” म्हणालो होतो मी..
तेव्हापासून काकूनं माझ्याशी बोलणं बंद केलं..
तुला गाडीचा अपघात झाला व तू वेदनेने कण्हत होतीस ते मला बघवत नव्हतं.. मी गजाननाला साकडं घातलं..देवा मला दे तिच्या वेदना..आणि त्या दिवसापासून तू बरी होत गेलीस व मला संधीवात जडला. विश्वास ठेवा अगर नको.. पण हे घडल खरं.
आपला सतीश लग्न झाल्यापासून आपल्याकडे फिरकत नाही...तू वाट बघत बसायचीस “फार काम आहे.. वेळच नाही यायला..”असा त्याचा टेक्स्ट आलेला मी तुला सांगायचो पण तो टेक्स्ट मला कधीच आला नव्हता..
एक का दोन गोष्टी आहेत?.. हजारो क्षण आहेत..
आजीचा चेहरा मृदु होत चालला होता.. “अरविंद, ते सारं खरंय हो पण आपलं आयुष्य ना असंच..त पासून ताकभात..समजून घेण्यात जातं. हल्लीची मुलं कशी स्पष्ट बोलतात. त्यातली मजा आपण कधी चाखलीच नाही.. आय लव यु स्पष्ट म्हटलेलं कसं वेगळंच असेल ना?” आजीच्या चेहऱ्यावरचे मिष्किल भाव अरविंदरावांनी टिपले..
ते बेडरूम मधे गेले..नेव्ही रंगाची पॅंट व त्यावर आजीला आवडणारा आकाशी शर्ट घातला..पार्क ॲव्हेन्यू परफ्युम लावला आणि आजीला अतिशय आवडणाऱ्या राजेश खन्नाच्या स्टाईलने ते हॅालमध्ये आले..फोनवर “हमे तुमसे प्यार कितना”.. चे सूर वाजू लागले..
आजोबा कमरेत वाकून म्हणाले..“कमल…आय लव यु!”
“आय लव यु..कमल!”
आजी लाजली.. गडबडली..“बस.. पुरे झालं आता.. कान भरून पावले..” आजी घाईनं आत गेली..छानशी मॅंगो रंगाची प्युअर सिल्क नेसून आली.. हातातील वाईनच्या ग्लास मधे स्पार्कलिंग ग्रेप ज्युस घेऊन आली व एक ग्लास आजोबांना देत म्हणाली, “चिअर्स, अरविंद!”
आणि मग हळूच पुटपुटली, “आय लव यु टू”! इतकी गोड लाजली की आजोबा एवढी वर्षं आपण ही संधी घालवली म्हणून हळहळले..
“एका गोष्टीची आज कबूली देतेय.” आजी एकदम गंभीर झाली.. तुम्ही दर महिन्यात आठ दिवस बेंगलोरला कामाला जायचात ना तेव्हा मी आणि सतीश राजेश खन्नाच्या सिनेमाला जायचो. तुम्हाला सिनेमे कधीच आवडले नाहीत पण मला थेटरात जाऊन सिनेमा बघायला फार आवडायचं.. आजवर सांगायचं धाडस झालं नाही..
हं आणि पार्वती काकूना पॅरॅलेसिसचा अटॅक येऊन गेल्यावर
मी त्यांना जेवण पाठवत असे..बिचाऱ्या एकट्या पडून आहेत असं कानावर आलं होतं. म्हटलं झालं गेलं ते विसरून आपण त्यांना मदत करू..
हो आणि एक..माझं मंगळसूत्र विकून मी आईच्या ॲापरेशनसाठी पैसे पाठवले होते.. व हे चांदीवर सोन्याचं पाणी लावलेलं मंगळसूत्र घेतलं.. ती एका दमात बोलली.
आजोबांनी आजीचा हात हातात घेतला..ते काही बोलले नाहीत.. फक्त तिचं बोलणं ऐकत राहिले.. लहान मोठ्या कसोटीच्या काळात टिकून परिपक्व झालेलं प्रेम अनुभवत शांत बसून राहिले..
क्या क्या जतन करते है, तुम्हे क्या पता
ये दिल बेकरार कितना..
मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना..
गाण्याचे सूर ऐकत एकमेकांच्या बोटात बोटं गुंतवून ग्रेप ज्युसचे बुडूबुडे बघत दोघांनी आज मनं मोकळी केली होती..
आजोबा आतून एक लाल रंगाची डबी घेऊन आले..त्यातून हिऱ्याचं मंगळसूत्र बाहेर काढलं..”आपल्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला पुढच्या आठवड्यात हे देणार होतो पण आजचा दिवसच ही भेट देण्यासाठी योग्य वाटतो आहे.”
त्यांनी ते मंगळसूत्र आजीच्या गळ्यात घातलं..”आय लव यु, कमल!” म्हणत.
©® ज्योती रानडे
2026 JyotiRanade. All rights reserved.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा