आज राघवेंद्राला दुरंतो एक्सप्रेसने दिल्लीला जायचं होतं. पुण्यातल्या ट्रॅफिकचं काही सांगता येत नाही म्हणून आईला घेऊन सकाळी नऊ वाजताच त्यानं घर सोडलं. स्टेशनवर लवकर पोहोचले. ट्रेन सुटायला अजून अवधी होता. त्यानं आईला वेटिंगरूममध्ये बसवलं. पेपरस्टॉलवरून काही मासिकं विकत घ्यायला गेला तेव्हा समोरून येणारी व्यक्ति त्याला ओळखीची वाटली. त्याच्याबरोबर एक वृद्ध गृहस्थ आणि इतर दोघे बॅगा घेऊन चालले होते. ते लोक काहीसे पुढे गेल्यावर, काहीसे आठवल्याने राघवेंद्राने "अहो, महेशसाहेब" म्हणून हाक मारली. त्या गृहस्थानं पटकन मागं वळून पाहिलं आणि थांबून राहिला. तो महेशच होता. त्याला भेटून जवळपास वीस वर्षे झाली होती.
राघवेंद्र आणि महेश एकाच कॉलनीत राहणारे वर्गमित्र आणि अभ्यासात एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. राघवेंद्र नेहमीच महेशहून वरचढ असायचा. कॉलेजला गेल्यावर त्यांचे मार्ग बदलले. महेशच्या बाबांनी बावधनला घर बांधल्यानंतर ते कॉलनी सोडून गेले. त्यानंतर पुन्हा त्यांची कधी भेट झाली नाही. महेश आता सेंट्रल एक्साईजमध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे असं कुणाकडून तरी कळलं होतं. राघवेंद्र त्याच्या जवळ जात म्हणाला,
“साहेब, मला ओळखलंत का?" राघवेंद्रने ‘साहेब’ म्हटल्यामुळे महेशचा अहंकार सुखावला होता.
"का नाही ओळखणार? तुझ्यात तसा काही फारसा फरक पडलेला नाही. आहे तसाच आहेस. ठेविले अनंते तैसेचि रहावे...." असं म्हणून मिश्किलपणे हसत पुढे बोलला, "काय करतोस? कुठल्या डिपार्टमेंटमध्ये आहेस?"
"मी, प्राध्यापक आहे. तुम्ही म्हणता तसे मी आहे तसाच आहे आणि चित्ती समाधानही आहे."
महेश मनातल्या मनात विचार करत होता. आज मी त्याच्याहून कितीतरी उंचावर आहे. आज मी केवढ्या मोठ्या हुद्द्यावर आहे आणि हा मात्र प्राध्यापकच आहे. बोलता बोलता ते वेटिंगरूममध्ये आले.
“राघवेंद्र, तू अव्वल नंबरचा विद्यार्थी होतास ना? पण तुला सरकारी नोकरी मिळवता आली नाही. खरं आहे ना?” महेशनं सहेतुक विचारलं.
“ मी प्रयत्नच केला नाही. एम टेकला गोल्डमेडल मिळाल्यावर प्राचार्यानी मला केबिनमध्ये बोलावलं अन म्हणाले, तुझ्यासारख्या विद्यार्थ्याने स्वत:च्या अर्थाजनासाठी ही पदवी न वापरता विद्यादानासाठी वापरावी. तुझ्या शिकवण्याने कित्येक मुलांचे भवितव्य घडेल. कदाचित मोठ्या कंपनीतल्यासारखा पगार मिळणार नाही. अर्थार्जन कमी होईल. परंतु कित्येक विद्यार्थ्यांच्या आदरास पात्र होशील. मला त्यांचं म्हणणं पटलं. प्राचार्यानी नेमणुकीचं पत्र हातात दिलं. असो."
"आता तुम्ही कुठे निघाला आहात साहेब?” असं म्हणत राघवेंद्रानं नकळत महेशवर मात केली.
“उद्यान एक्सप्रेसने बाबा बेंगलुरूला चालले आहेत, तर त्यांना सोडवायला आलोय.” महेशने सांगितलं.
“ते एकटे जातील काय?” राघवेंद्रने भाबडेपणानं विचारलं.
“त्यांच्या सोबतीला ऑफिसातला एक कर्मचारी आहे. अरे मला अजिबात वेळ नसतो. मी सेंट्र्ल एक्साईजमध्ये असिस्टंट कमिशनर आहे.”
“एवढे मोठ्या हुद्द्यावर आहात म्हटल्यावर तुम्हाला वेळ मिळणे शक्यच नाही.”
“राघवेंद्रा, मघापासून मी तुला अरेतुरे करतोय आणि तू मला अहोजाहो करतो आहेस. बरं, तू कुठे चालला आहेस सांग.”
“महेश, तुम्हा सरकारी अधिकारी लोकांचा मान असतो. चार-चौघात अरेतुरे कसं म्हणणार? कॉलेजच्या बाहेर आम्हाला कोण ओळखतो? बरं असो. अरे, मी आईला घेऊन दिल्लीला चाललोय. माझा धाकटा भाऊ राहुलला ओळखतोस ना? तो दिल्लीला असतो. त्यानं तिथे एक फ्लॅट विकत घेतलाय. आम्ही वास्तुशांतीला चाललो आहोत. आईला सांधेदुखीचा तसंच हृदयविकाराचा प्रॉब्लेम आहे. गेल्यावर्षी बाबा गेल्यानंतर ती थोडीशी डिप्रेशनमध्ये गेली होती.”
“आईला सांभाळणं तुला एकट्याला फारच अवघड जात असेल. तुम्ही दोघे भाऊ सहा सहा महिने सांभाळता वाटतं.”
“छे छे ! महेश मी असा विचार देखील करू शकत नाही. आई-बाबा सुरूवातीपासूनच पुण्यात राहिले आहेत. इथेच वाढले आहेत. त्यांना दुसरीकडे करमत नाही म्हणून ते राहुलकडे कधीच राहायला गेले नाहीत. केवळ पोट भरण्यासाठी म्हणून दर सहा महिन्याला त्यांनी निर्वासितांच्यासारखे बाडबिस्तरा गुंडाळून दुसरीकडे जावं ही कल्पनाच मला पटत नाही. आज आम्ही दोघे भाऊ आहोत म्हणून सहा-सहा महिन्याची वाटणी करावी असं म्हणतोस. जर आम्ही तिघे भाऊ असतो तर आईबाबांना चार-चार महिने वाटून घ्यायचं की काय? माणसाला फक्त दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न नसतो. समाजप्रिय माणसाला कुणाशी सतत तरी संवाद साधावं असं वाटत राहतं. राहुल आणि वहिनी कामावर गेल्यावर दिल्लीसारख्या ठिकाणी ते कुणाशी संवाद साधतील, सांग ना?
“राघवेंद्रा, असं म्हणून कसं चालेल? आईने राहुललासुध्दा जन्म दिलाय. हा व्यवहार आहे. त्यांनं देखील आईला सहा महिने सांभाळायला हवं. तू एकट्यानेच ह्या जबाबदारीचं ओझं का उचलावं? माणसानं असं भावनाप्रधान होऊन चालत नाही. थोडंसं व्यावहारिक असायला हवं. वहिनी काही बोलत नाहीत काय?”
“महेश, मुळात मी आईला सांभाळतो आहे ह्या भ्रमात कधीच नाही. आईबाबांनीदेखील मुलांचा भविष्यकाळ घडवण्यासाठी त्यांच्या वर्तमानकाळाचा बळी दिला आहे. आमचे शिक्षण, आमचं भवितव्य ह्यातच ते गुरफटले होते. त्यांनी स्वत:चा विचार कधीच केला नाही. ज्या आई-बाबांनी निरपेक्ष मनानं मला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं त्यांना मी सांभाळतोय असं कधी मानलंच नाही. त्यांनी आम्हा मुलांना कधी ओझं मानलं होतं काय? मग त्यांच्या वृद्धत्वात मी त्यांना ओझं का समजायचं?
माझी पत्नी रेणुचं म्हणत असशील तर, एकदा ‘आमच्या सासूबाई राहुल भावोजींच्याकडे जायला नाही म्हणतात.' असं ती कुणाशी तरी बोलताना मी ओझरतं ऐकलं होतं. दोन तीन दिवसानंतर मी तिला सहज म्हटलं, “रेणु, आपल्याला दोन मुलं आहेत. म्हातारपणी तू कुणाकडे राहायचं ठरवलंस? मोठ्याकडे की धाकट्याकडे?” तर ती पटकन म्हणाली, 'माझी मर्जी मला ज्या मुलाकडे राहावेसे वाटेल मी त्याच्याकडे राहीन. मला कोण अडवतं बघू.’
मग मी तिला हसत हसत म्हटलं, “रेणु, माझी आई देखील तुझ्यासारखाच विचार करते बघ. ती सुद्धा म्हणते की मी मरेपर्यंत राघवेंद्राकडेच राहणार आहे, मला कोण अडवतं बघू म्हणून.' खरं आहे. इथे माझ्याकडे राहायचं की राहुलकडे राहायचं हे आईच ठरवू शकते. नाही का?’ त्यानंतर रेणु ह्या विषयावर आजवर कधीच बोलली नाही.
“राघवेंद्रा, मुळात आईवडिलांना आपण एकट्यानेच का सांभाळायचं हा प्रश्न आहे.”
“जर मी एकटाच मुलगा असतो तर आईबाबा आणि आम्ही सगळे एकत्रच राहिलो असतो ना? दुसरी गोष्ट, माझा भाऊ राहुल आईला सांभाळायला नाही म्हणतो म्हणून ती माझ्याकडे राहते असं समजू नकोस. आई-बाबा आमच्याकडे राहत नाहीत म्हणून राहुल आणि माझी भावजय मनापासून हळहळ व्यक्त करीत असतात. आजी-आजोबांच्याकडे राहता येत नाही म्हणून माझा पुतण्या व पुतणी सदैव खंत व्यक्त करत असतात. खरं तर सगळीच नाती प्रेमाच्या पायावर उभी असतात. परंतु जीवनयात्रा मात्र तडजोड नावाच्या कुबड्यांच्या साहाय्यानेच पूर्ण करावी लागते. चल, आपण गप्पा मारत बसलो आहोत. इतक्यात आमची दुरंतो एक नंबरवर येईल. बी-नाईन डबा समोरच लागतो. तुला मात्र तीन नंबर प्लॅटफॉर्मवर जावं लागेल. पुन्हा भेटू या. हे माझं कार्ड” असं म्हणत राघवेंद्र आईला घेऊन प्लॅटफॉर्मकडे निघाला.
बेंगलुरूला जाणारी उद्यान एक्सप्रेस उशीराने धावत असल्याने अजून एका तासाचा अवधी होता. महेश अस्वस्थपणे बसून राहिला. राघवेंद्राने महेशवर पुन्हा एकदा मात केली होती. संस्काराच्या बळावर ह्यावेळी त्याने महेशला खुजं ठरवलं होतं. महेश आत्ममग्न होऊन विचार करीत बसला. चार महिने संपून एक आठवडा झाला तरी अविनाश दादाचा बाबांना घेऊन जाण्याविषयी निरोप आला नाही. बाबांना सांभाळायची त्याची पाळी येते त्याचवेळी त्याची रजा मंजूर होत नाही किंवा तो कुठल्याशा टूरवर असतो. ऑफिसचा कर्मचारी बाबांना बेंगलोरला पोचवायला चाललाय. बाबा आजही निघायला आढेवेढे घेत होते. चुकार मुलं शाळा चुकवण्यासाठी काहीतरी कारणं सांगतात ना, तसं तब्येत बरी नाही म्हणून बाबा बेंगलोरला जायला कुरकुरत होते. मी आधीच टू-टायर एसीची रिझर्वेशन करवून घेतली होती म्हणून बरं आहे. मी घरात मात्र खलनायक ठरलो.
‘बाबा, आजोबांना बेंगलोरला पाठवायची एवढी जबरदस्ती कशाला करताय? राहू द्या ना इथंच’ असं दोन्ही मुलं म्हणत होती. काल रात्री मुग्धा तर माझ्याशी चक्क भांडत होती. ‘अहो, मामंजीना त्यांच्या मनाविरूध्द कशाला पाठवताय? त्यांचा तुम्हाला काय त्रास होतोय? माझं ऐका. आपली मुलेही मोठी झाली आहेत. त्यांना सगळं समजतं. पुढे जाऊन त्यांनीही आपल्याला दर सहा महिन्याला असं बस्तान हलवा म्हटल्यावर तुम्हाला सहन होईल का, त्याचा एकदा विचार करा म्हणून विनवत होती. आज हा राघवेंद्र अचानक उगवला आणि मला शाब्दिक चपराक मारून गेला.
महेशचं दुसरं मन म्हणालं, 'राघवेंद्र म्हणतो त्यात काय चुकीचं आहे? माझ्याहून दोघे मोठे बंधू पदवीधर झाले, नोकऱ्या मिळवल्या. दोघांची लग्ने एकाच मांडवात झाली. नोकरीच्या निमित्ताने घर सोडून बाहेर पडले. मी शेंडेफळ असल्याने आईबाबांचा लाडका होतो. आज मी जो काही आहे ते केवळ बाबांच्या प्रोत्साहनानेच. ते सदैव माझ्या पाठीशी असायचे. मी रात्री अभ्यासासाठी जागत असायचो त्यावेळी ते जागे असायचे. नोकरीच्या वेळी देखील त्यांचंच मार्गदर्शन उपयोगी पडलं. माझं लग्नही त्यांनी किती हौसेनं आणि थाटामाटात केलं.
आई गंभीर आजारी होती तेव्हा एका रात्री मी आईबाबांचं संभाषण आडून ऐकलं होतं. मी असं कसं विसरलो? आई म्हणत होती, ‘अहो, मी फार दिवस जगेन असं वाटत नाही. मी गेल्यावर तुमची हेळसांड होईल म्हणून माझा जीव इथेच घुटमळतोय हो.’ बाबा आईला धीर देत म्हणाले, ‘सरस्वती, तुला काही होणार नाही. तू माझी काळजी करू नकोस. महेश आणि मुग्धा मला कधीच अंतर देणार नाहीत. ते मला फुलासारखं जपतील ह्याची मला खात्री आहे.’ बाबांना माझ्याविषयी किती खात्री होती. आई गेली अन पहाडासारखे बाबा खचून गेले. ज्या बाबांनी माझा हात धरून मला पुढे नेलं होतं, त्यांना आज माझ्या आधाराची आवश्यकता आहे आणि मी त्यांना दूर लोटू पाहतोय. आईबाबांच्या आशीर्वादाने देवानेही मला भरभरून दिलंय. बाबांना सांभाळणं काहीच अवघड नाहीये. माझ्यासारखा नतद्रष्ट मीच आहे.
अचानक “ शंभू” या हाकेने महेशची तंद्री भंग पावली. आपला थरथरता हात महेशच्या मनगटावर ठेवत बाबा काकुळतीने म्हणाले, "शंभू, बाळा तू मला न्यायला येशील ना रे? मला बेंगलुरूत अजिबात करमत नाही. अरे, पुण्यातलं घर हे माझं आनंदनिधान आहे. ते घर आम्ही मोठ्या कष्टानं उभं केलंय. ह्या घराचा प्रत्येक कोपरा न कोपरा, त्या खिडक्या, भिंती यांच्याशी माझं अतूट नातं आहे, मैत्री आहे. खिडकीजवळ थांबून मी तुळशी वृंदावनाकडे बघतो, तेव्हा मला तुझ्या आईची आठवण येते. नकळत डोळ्यांच्या पापण्या ओलावतात. मग खिडकीतून येणारा मंद वारा माझे ओघळलेले अश्रू पुसून माझं सांत्वन करून जातो रे."
महेश पटकन जागेवरून उठला आणि म्हणाला, "बाबा, तुम्ही इथेच थांबा. हा मी आलोच." महेश धावतच बाहेर पडला. दुरंतो अजून सुटायची होती. बी-नाईनचा डबा समोरच होता. राघवेंद्रच्या कार्डावरून महेशने मोबाईल लावला. "राघवेंद्रा मी बी-नाईनच्या बाहेर उभा आहे. एका मिनिटासाठी येशील का?”
राघवेंद्र काही क्षणासाठी खाली उतरला. महेशने राघवेंद्रला घट्ट मिठी मारली आणि एवढंच बोलला, "‘मित्रा, आपली ही भेट माझ्या स्मरणात कायमची राहील. दिल्लीहून परत आल्यावर तुम्ही सहकुटुंब माझ्या घरी या. हे माझं कार्ड !” एवढ्यात गाडीने शिट्टी दिली आणि वेग घेतला तसा हळूहळू राघवेंद्र दृष्टीआड झाला.
महेश वेटींगरूमवर परत आला. दोघा कर्मचाऱ्यांना म्हणाला, "चला, घरी जाऊ या. ट्रीप कॅन्सल. बॅगा आपल्या कारमध्ये ठेवा."
बाबा गोंधळून जात म्हणाले, "शंभू बेटा, अचानक असं काय झालं? मी काही चुकीचं बोललोय का? नाराज होऊ नकोस रे बाळा, मी जाईन बेंगलुरूला राहायला."
महेशने हात धरून बाबांना उठवलं. भावूक झालेल्या महेशने कित्येक वर्षानी बाबांना गळामिठी मारली आणि कसंबसं सावरत म्हणाला, "बाबा, मला माफ करा. आपण आपल्या घरी जाऊ या. आता तुम्ही कायमचे पुण्यातल्या घरात राहा. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही, हे माझं वचन आहे."
बाबा पाणावलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे पाहत पुटपुटले, "पाहिलंस सरस्वती, माझं म्हणणं खरं ठरलंय ना? तू उगाच काळजी करत होतीस..." आणि बाबा त्यांच्या लाडक्या शंभूचा हात धरून समाधानाने आपल्या घराकडे जाण्यासाठी परत निघाले.
©️®️ व्यंकटेश देवनपल्ली,
बेंगळुरू.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा