गुरुवार, २५ जून, २०२६

2976. कॅफे

 “बा, मला ‘कॅपे ह्येवन’मदी जायचया” दहा वर्षाचा बाबू त्याच्या वडिलांचा खांदा गदागदा हलवत ‘कॅफे हेवन’कडे बोट दाखवत होता.
“बाबू, ल्येका, इथं विष प्याया पैका न्हाय. अन् तुला काफी प्याया भारीच्या दुकानात जायाचंय? येड लागलं का काय? एक कप काफीला निदान २०० रुपये पडत्यात तितं…!” सखाराम बाबूवर खेकसला.
मेन रोडवर ‘कॅफे हेवन’च्या समोरच सखाची चहाची टपरी होती. शाळेतून आल्यावर बाबू वडिलांना मदत करून तिथंच शाळेचा अभ्यास करत असे.
मेन रोडच्या पलीकडच्या बाजूला एकाहून एक भपकेदार कॅफे व नवी हॉटेलं आली होती पण अलीकडल्या बाजूचा एक भाग मात्र बेताचाच राहिला होता. त्या भागात काही कपड्यांची दुकानं, चहाच्या टपऱ्या, भेळेच्या गाड्या दाटीवाटीनं उभ्या होत्या.
“आरं, डोळं फाडून काय बघतुयास सारखं त्या दुकानाकडं? हे भांडं विसळ मुकाट...” सखा लेकावर परत खेकसला.
बाबू खाली मान घालून बापाला मदत करू लागला. त्याच्या अर्ध्या चड्डीला लावलेली ठिगळं वाढत चालली होती. पांढरा शर्ट कधी खरंच पांढरा होता का, असं वाटत होतं.
आई चार बुकं शिकलेली होती. दिसेल ते वाचणाऱ्या आईकडून त्यानं वाचनाची गोडी घेतली होती. सतत स्वप्नं बघणारे त्याचे तरतरीत डोळे आजूबाजूचं सारं पटकन आत्मसात करत होते. उत्तम बुद्धीचं वरदान लाभलं होतं.
‘कॅफे हेवन’ रोज कॉफी बीन्स दळून त्यांच्या मशिनमध्ये घालून कॉफी करतात हे बाबू अधूनमधून बाहेरच्या काचेतून बघत उभा राहायचा.
“काय हवंय रे? जा… इथे उभं नाही रहायचं…” म्हणून ओरडणाऱ्या ‘कॅफे हेवन’च्या वॉचमनकडे बघत तो परत फिरायचा.
एक दिवस त्यानं दोन कप चहा सोबत घेतला व तो वॉचमनजवळ गेला. 
“काका, मी समोरच्या चहावाल्या सखाचा मुलगा… तुमी लय काम करताय नव्हं, म्हणून च्या घ्यून आलोय.”
वॉचमन खूष झाला.
“तुमाला या ह्येवनची काफी आवडतीया?” बाबूनं खडा टाकला.
“नाही बाबा… कडू जहर करतात काहीवेळा. मला चहाच लागतो.” इंटर सायन्सपर्यंत शिकलेला वॉचमन सखाचा अमृततुल्य चहा पिऊन सुखावला होता.
बाबूनं चहाचे पैसे घेतले नाहीत, म्हणून सखा ओरडला…
“असं पैका घालव तू ल्येका! आपण ज्यागिरदार लागून गेलोय नव्हं फुकट च्या वाटाया?”
बाबूनं आपलं अस्त्र बाहेर काढलं…
“बा, आपल्या घासातला घास दुसऱ्याला द्यावा म्हणतोस ना! त्येच मी केलं…”
वॉचमन काकांशी गप्पा मारताना बाबूची भाषा सुधारत गेली. मालकाच्या मुलानं दिलेली एक शर्ट-पॅन्ट काकानं बाबूच्या बाराव्या वाढदिवसानिमित्त बाबूला भेट दिली. ते कपडे घालून एकदम टकाटक दिसणाऱ्या बाबूला काकांनी ‘कॅफे हेवन’मधे नेलं. बाहेरून कॅफे बघणाऱ्या बाबूला आज ‘कॅफे हेवन’चा दरवाजा उघडला गेला होता.
बाबू डोळे मोठे करून बघत राहिला. आतलं मंद संगीत, शांतपणे लुकलुकणारे दिवे, एसीची थंडगार हवा, ताज्या कॉफी बीन्स दळून येत असलेला कॉफीचा गंध… ती मऊशार कॉफी पावडर मशिनमध्ये घालताच मशिनमधून लागलेली ब्राऊन रंगाची कॉफीची संतत धार त्याला वेगळ्या विश्वात घेऊन गेली…
सर्व कॉफी कराफे भरले गेले. तो हवाहवासा वाटणारा कॉफी अरोमा त्यानं श्वासात भरून घेतला. कोलंबियन कॉफी, त्यात उकळलेलं दूध, साखर, त्यावर फोम हार्ट व वर भुरभुरलेली दालचिनी युक्त कॉफी काकांनी बाबूसमोर ठेवली…
“पी… तुला इथली कॉफी प्यायची होती ना?”
बाबूनं पहिला घोट घेतला… सिल्क सारखी मुलायम कॉफी आत जाताना ‘कॅफे हेवन’ नावाचा अर्थ त्याला कळला. फोम जिवणीच्या दोन्ही बाजूस लागून त्याला कॉफीची मिशी आली होती; ती बघून काका मिशीतच हसले. 
“काका, मला इथली कॉफी प्यायचीच होती पण… पण… त्यापेक्षा मला अस्सं कॅफे हवंय… स्वत:चं… माझ्या मालकीचं! त्यासाठी काय करावं लागेल सांगा…”
बाबूच्या नजरेची धार काकांना जाणवली.
“मेहनत! अभ्यास! देवावर श्रद्धा…!! उत्तम शिक्षण घे. तो ‘कॅफे हेवन’चा मालक माझ्या वर्गात होता पण मेहनतीनं तो आज आत बसलाय… आणि मी बाहेर उभा आहे! आत बसलेला शेठ व बाहेर राखण करणारा मी यातला फरक आहे, मेहनत! कष्ट! ध्यास!” काकांचा अनुभव बोलला.
....
बाबू नववीत असताना सखाची तब्ब्येत ढासळली म्हणून बाबूच टपरी चालवत होता. साहजिकच नववीच्या परीक्षेत कमी मार्क पडले. सखा बरा झाला व सोळा वर्षांचा बाबू आता ‘कॅफे हेवन’मधे नोकरी करत रात्री बारा-एकपर्यंत अभ्यास करताना दिसे व त्या श्रमाचं चीज झालं! 
…..
‘चहावाल्याचा मुलगा १० वी च्या गुणवत्ता यादीत!’
वर्तमानपत्रात बातमी झळकली. बाबू उर्फ अक्षयचं कौतुक झालं. बारावीनंतर अमेरिकेत ‘व्हार्टन स्कूल ऑफ बिझनेस’ कडून आमंत्रण व शिष्यवृत्ती मिळालेला अक्षयबाबू आता जगातील उत्तम युनिव्हर्सिटीची डिग्री मिळवून भल्यामोठ्या पगाराची नोकरी करत होता.
….
अक्षयबाबूनं मेन रोड वरच्या ‘कॅफे सोल’चं शटर उघडलं. 
‘जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे…’
म्हणत गणेशाच्या प्रतिमेसमोर हात जोडले. 
सर्व प्रकारची वेस्टर्न कॉफी विकणाऱ्या कित्येक कॅफेमधे पूर्ण भारतीय कॉफी मिळत नव्हती. उकळलेलं दूध, कमी साखर, वेलदोडा व जायफळ घातलेली, बराच वेळ फेटून एकजीव केलेली कॉफी व तिचे अनेक प्रकार अक्षयबाबूनं कॅफेमधे ठेवले होते…
ती ‘ओरिजनल भारतीय कॉफी’ प्यायला आबालवृद्ध गर्दी करत होते… त्या बरोबर मिळणारे फिंगर सँडविचेसचे अनेक प्रकार… चटणी, काकडी, टोमॅटो, क्रिम चीज, अंडी, कॉम्प्रेस वगैरेला प्रचंड मागणी होती.
सर्व स्त्रीधन मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी विकणारी आई, टपरी विकून बाबूला जमेल तेवढं भांडवल उभं करून देणारा बा ‘कॅफे सोल’ बघून धन्य झाले होते. वॉचमन काका मॅनेजरच्या पदावर विराजमान झाले होते…
अमेरिकेत भरपूर पगाराची नोकरी करून अक्षयबाबू भारतात परतले होते व स्वतःच्या कॅफेचं स्वप्न त्यांनी साकार केलं होते. ‘कॅफे सोल’ अनेकांच्या विसाव्याचं स्थान बनलं होतं.
त्या दिवशी एक पत्रकार चहाची टपरी ते ‘कॅफे सोल’ हा प्रवास कसा केलात हे अक्षयशेठला विचारायला आली होती…
अक्षयशेठनं आपली ‘ओरिजनल भारतीय कॉफी’ पत्रकार बाईंना दिली. 
“चहाची टपरी व ‘कॅफे सोल’ यातलं अंतर… फक्त हा मेन रोड क्रॅास करणं एवढंच होतं. उत्तम अभ्यास केला. सतत मेहनत केली. द्रोणाचार्यांनी घेतलेल्या परीक्षेत अर्जुनाला जसा फक्त पक्ष्याचा डोळा दिसला, तसं मला फक्त माझं कॅफे दिसतं होतं…
“या ध्येयपूर्तीसाठी देवानं अनेक माणसं माझ्या मार्गात पेरली, ज्यांनी मला माझं स्वप्न कसं साकार करायचं हे शिकवलं… कारण सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर असतो!
“मी अनेक शाळांमधल्या मुलांसोबत काम करतो. स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी उत्तम शिक्षण आणि कष्ट कसे करावेत हे शिकवतो. मी अमेरिकेतली उत्तम नोकरी सोडून परत आलो कारण आपल्या शाळांतूनच आपण सुंदर पिचाई, सत्य नाडेला वगैरे सारखे अनेक यशस्वी उद्योजक तयार केले आहेत व करणार आहोत! 
“नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है,
चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है।
मन का विश्वास रगों में साहस भरता है, 
चढकर गिरना, गिरकर चढना न अखरता है।
आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती।
कोशिश करने वालों की कभी हार नही होती॥
“हे आपल्या मुलांना शिकवायचंय… Life is like a cup of coffee; it’s all about what you make of it… तुम्ही तुमच्या आयुष्याची कॉफी कशी बनवणार आहात…? कडू की गोड… हे आपल्यावर आहे!”
पत्रकारबाईंनी कॉफीचा घोट घेतला व बातमी तयार करण्यास सुरुवात केली.
‘टपरी ते ‘कॅफे सोल’च्या प्रवासाचे सोल-फुल वर्णन करणाऱ्या अक्षयबाबू यांच्या यशाचा मंत्र आहे..
कोशिश करनेवालोंकी कभी हार नही होती !’

- ज्योती रानडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...