आज आमची ताई घरी येणार होती. तीन चार महिन्यातून एकदा तिचं माहेरपण होत असतं. कधी तिला आईची आठवण येते तर कधी आईला तिची. त्यामुळे ताई माहेरी येते आणि आम्हा नवरा बायकोच्या आयुष्यात मात्र पण लागतो. वास्तविक स्वाती देखील ताईच्या पाहुणचारात काही कमी करत नाही. पण म्हणतो ना, कितीही केलं तरी कमीच वाटतं. आई आणि ताईचं तसं होतं.
ठरल्याप्रमाणे ताई छोट्या चिनूला घेऊन संध्याकाळी घरी पोचली. मी नुकताच ऑफिस संपवून आलो होतो. स्वाती आणि आई किचन मध्ये. आज छोले भटुरे गुलाबजाम बुंदी रायतं जीरा राईस दाल फ्राय असा मस्त बेत होता.
"दमले रे विजा!" ताईनं हातातली बॅग माझ्याकडे देत उसासा टाकला. "मला वाटलं होतं न्यायला येशील स्टेशनवर!" हे वाक्य म्हणत ताईनं माझ्याकडे तिरक्या कटाक्षानं बघितलं.
"कधी आत्ता! मी न्यायला आलो असतो तर तू अजून तासभर उशिरा आली असतीस की! हा काय आत्ताच आलोय ऑफिस मधून!" म्हणत मी बॅग आत नेऊन ठेवली आणि चिनू ला कडेवर घेतलं.
स्वाती ने ताईला पाणी आणून दिलं आणि माझ्याकडे रागावून बघितलं. ताईबद्दल स्वाती बेडरूममध्ये जे काही बोलते ते तिच्या डोळ्यातूनही आता मला वाचता येत होतं. हे बरं की तिच्या डोळ्यातली भाषा आई आणि ताईला कळत नाही!
"चहा टाकू?" स्वातीने ताईकडे बघून विचारलं.
"अगं घाई काये! बस ना!" ताई कुत्सित हसून म्हणाली. "काय गं आई, नमस्काराची शिस्त गेली वाटतं तुझी!" म्हणत ताईने आईकडे बघितलं.
तेवढ्यात स्वाती तिच्या पाया पडली पण तिनं बघून न बघितल्या सारखं केलं. आईने ही हे बघितलं आणि तिला ही ताईचं हे वागणं खटकलं हे तिच्या डोळ्यातून मला जाणवलं.
"कसा झाला प्रवास?" म्हणत आईने ताईच्या खांद्यावर हात ठेवला आणि जवळ येऊन बसली.
ताई ने काहीही उत्तर न देता सरळ पाय वर घेतले आणि आईच्या मांडीवर पसरले. "खूप दमले ग! चेपून दे ना!" अचानक अंगावर आलेल्या लेकीच्या पायांना बघून प्रथम आई पण दचकली पण नंतर हलकं हसून पाय चेपून देऊ लागली. ताई छान दिवाणावर पहुडली सुद्धा! मी, माझ्या कडेवरचा पाच वर्षांचा चिनू, किचन मधून डोकावून पाहणारी स्वाती आणि लेकीचे पाय चेपत बसलेली आमची आई या सगळ्या वागण्याने जरा गोंधळून गेलो होतो.
https://whatsapp.com/channel/0029VaDinBXFcowDhOwBNW0y
थोड्या वेळाने स्वातीने जेवायला वाढलं तेव्हा ताई उठली आणि थेट जेवणाच्या टेबलवर. तिथेही तेच. हेच बरोबर नाही, तेच चागलं नाही. हे असंच का ते तसंच का. सगळ्याच मुली माहेरी गेल्यावर वहिनीसमोर जरा नाटकं करत असतील पण आज ताई अतीच करत होती. तिचं सासर पुराण सुरु झालं. सासूला नावं ठेवून झाली. सासरचा उद्धार करुन झाला. आणि शेवटी एकदाचं जेवण उरकलं!
ताई आणि चिनू आईबरोबर आईच्या खोलीत झोपायला गेले. किचन आवरुन स्वातीही आमच्या खोलीत आली. दार लावलं आणि आतल्या आवाजात आम्ही बोलू लागलो.
"काय हो! वंस अशा का वागताएत आज!" स्वाती जवळ येऊन पुटपुटली.
"हो काही कळत नाहीये! काहीतरी गडबड असणार!" मी ही दुजोरा दिला.
"जाऊद्या. कोण कधी कसा वागेल सांगता येत नाही. तुमचा खानदानी आजारच आहे!" म्हणत स्वाती हसली आणि चादर अंगावर घेतली. "मला वाटत होतं ह्या आल्यावर ह्यांच्या समोर आईंना मनसोक्त बोलून घेईन! एखादा तरी धडा शिकवेन! चांगला वचपा काढेन! पण कसलं काय! मूडच गेला सगळा! एक बाई काय कमी होती आणखी एक आली! किती दिवस मुक्कामी राहतील कुणास ठाऊक! काय हो, भांडून तर नाही ना आल्या दाजींशी! मी नाही हा राहायची इथे सांगून ठेवते!" वेणीच्या क्लिपा काढत काढत स्वातीची बडबड चालू होती. मी आपला डोळे मिटून स्वस्थ पडलो होतो. कारण ऐकून घेण्या शिवाय मला दुसरं काहीही करता येणार नव्हतं!
माझे डोळे उघडले ते एकदम सकाळीच. स्वाती आधीच उठलेली होती. मी ही पटकन आवरलं आणि ऑफिसला जायला निघालो. जाता जाता चिनुचा पापा घेतला. आईला "येतो ग" म्हणालो, ताईकडे बघून हसलो आणि दारातून बाहेर पाऊल टाकलं इतक्यात मागून हाक आली, "अहो डबा!" म्हणत नॅपकिनला हात पुसत स्वाती डबा द्यायला आली आणि दाराबाहेर काहीतरी कुजबुज करु लागली. "अहो, ऐका की, मी सकाळी उठले तेव्हा आई बाहेर सोफ्यावर झोपल्या होत्या! ताई खोलीत आणि ह्या बाहेर!" सांगताना स्वाती तिला होणारा आनंद लपवण्याचा तितकाच प्रयत्न करत होती जितका मी तिच्या माहेरच्या माणसांना बाय म्हणताना करतो!
"काय!" मी हळू आवाजातच विचारलं. "नक्की का!"
"अहो नक्की म्हणजे! मी खोलीतून बाहेर आले तेव्हा एकदम दचकून जाग्या झाल्या आई. खरं सांगू, मला त्यांचे डोळे ही रडवेले वाटले. मायलेकींचं काहीतरी झालेलं दिसतंय रात्री!"
"बरं, काळजी घे जरा आईची!" म्हणत मी स्वातीच्या हातातून डबा घेतला आणि त्यावर स्वातीच्या तोंडून, "अहो! सोडा हात, तुम्हाला काही लाज! दारात आहोत आपण!" हे ऐकून हसतमुखाने घराबाहेर पडलो.
https://whatsapp.com/channel/0029VaDinBXFcowDhOwBNW0y
संध्याकाळी घरी आलो, बघतो तर काय, स्वाती आईचे डोळे पुसत होती. मला बघताच दोघी गप्प झाल्या.
"आला ग विजा, चहा टाक स्वाती.." म्हणत आईने स्वातीच्या पाठीवर हात ठेवला. डोळ्यानं आईजवळ बसायला सांगायची खूण करत स्वाती किचन मध्ये गेली.
मी आईच्या शेजारी येऊन बसलो. "काय झालं आई" विचारलं.
"काही नाही रे! आम्हा मायलेकींचं काही न काहीतरी." आईनं हळू आवाजात उत्तर दिलं.
"तुझ्या ताईला वाटतंय की तुझ्या बाबांचं नीट केलं नाही, त्यांना त्रास होत होता हे मला आधी कळलं असतं तर ते वाचले असते, आणि त्यांच्या जाण्याला एका अर्थी मी जबाबदार, माझी चूक..." म्हणत आईनं पुन्हा हंबरडा फोडला.
मी आईचे अश्रू पुसायला लागलो. "ताई..." असं म्हणत घरात वाकून बघितलं.
"नाहीये ती घरी, गेलीये मैत्रिणीबरोबर, आज बाहेरंच जेवून येईन म्हणालीये." आईनं स्वतःला सावरत सरळ उत्तर दिलं.
"आई तू ताईचं बोललेलं मनावर घेऊ नकोस बरं! बाबांच्या आठवणीमुळे एकदम निघून आलं असेल तिच्या तोंडून. बाबांबद्दल हळवी आहे ना ताई!" मी आईला आधार देत म्हणालो.
"हो! हळवी आहे ताई म्हणे!" पदराने डोळे पुसत आई बोलली. "बरी गेलेल्या माणसाबद्दल हळवी झालिये. ते जिवंत असताना कुठे एवढा हळवेपणा दाखवलान हिनं! स्वातीला एकदा माहेरी तिच्या आईची तब्येत बघायला जायचं होतं. तू ऑफिसच्या टूर वर होतास. मी ताईला म्हणाले, आम्ही दोघं म्हातारे एकटे नको म्हणून ये चार पाच दिवस सोबत म्हणून तर काहीबाही कारणं देऊन टाळाटाळ केली. शेवटी स्वातीलाच माहेरी जाणं रद्द करावं लागलं!"
तेवढ्यात स्वाती आतून चहा घेऊन आली. चहा देत म्हणाली, "असू द्या आई, जुन्या गोष्टी कुठे काढताय!"
"असू दे कसं! मला माहितीये ना ह्यांच्या साठी तू काय काय केलंय ते! कधी बोलून दाखवलं नाही मी पण ताईला समजायला नको?" स्वातीच्या हातून चहा घेत आईने सहज तिच्या गालावरुन हात फिरवला. मी बघतंच राहिलो. स्वातीच्या डोळ्यात वेगळीच चमक आली!
"ते काही नाही! आपणही आज बाहेरच जेवून येऊ! विजा, एखाद्या चांगल्या हॉटेलात जाऊ रे! सतत राबत्ये ही पोर, एक दिवस विश्रांती, तेवढाच जरा बदल. काय रे?" म्हणत आईनं माझ्याकडे बघितलं.
मी पडत्या फळाची आज्ञा मान्य करत "चहा झाला की फ्रेश होतो, मग निघू." म्हणत मनातल्यामनात गिरकी घेऊन नाच करुन घेतला. स्वाती आईकडे बघून नुसती हसली. तिनं कितीही लपवायचा प्रयत्न केला तरीही मला तिच्या डोळ्यात ओली किनार मात्र दिसली!
किती दिवसांनी आई स्वाती आणि मी आम्ही तिघे बाहेर एकत्र गेलो होतो! जेवण वगैरे करुन घरी आलो. ताई आणि चिनू आमच्या मागोमागच आले. चिनू ताईच्या कडेवरच झोपला होता. कोणीच फार काही न बोलता सरळ झोपायला गेले. ताई चिनुला घेऊन आईच्या खोलीत गेली आणि आई.. आई कालच्या सारखीच बाहेर. आई सोफ्यावर तिचं अंथरुण घालत असताना स्वातीनं माझ्याकडे खूण केली पण मला काही ती समजली नाही. शेवटी दिवे बंद करुन स्वाती आमच्या खोलीत आली. दार हलकं पुढे करुन म्हणाली, "अहो काय हे! मुलगा आहात की कोण!"
मी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत बेडवर आडवा झालो.
"आडवे कसले पडताय!" स्वाती हळू आवाजात ओरडत होती. मोठी सुंदर दिसत होती! मी तिच्याकडे नुसता बघत होतो.
"बघताय काय शुंभासारखे! अहो आई..." स्वाती चिडून बोलत होती, आणखीच सुंदर दिसत होती.
"आता काय केलं आईने!" म्हणत मी स्वातीचा हात धरला.
"मी काय बोलत्ये तुम्हाला काय सुचतंय! परिणाम झालाय का डोक्यावर!" स्वाती पुन्हा हळू आवाजात ओरडली.
"डोक्यावर नाही, मनावर झालाय!" मी हसून उत्तर दिलं.
"आता कपाळावर होईल!" म्हणत स्वातीने एक उशी माझ्या तोंडावर मारली. "अहो, आई अशा बाहेर झोपलेल्या मला नाही आवडत! एक काम करा, तुम्ही बाहेर झोपा. मी आणि आई इथे झोपतो!"
"अगं कशाला!" मी हे म्हणणार इतक्यात स्वाती बाहेर गेली सुध्दा. मी आतून बघतच होतो.
स्वाती सोफ्यावर पहुडलेल्या आईजवळ गेली. दोन वेळा "आई, आई" अशी हळू आवाजात बोलली. पण आईला झोप लागलेली दिसली. स्वाती किचनमध्ये गेली. पाण्याने भरुन तांब्या भांडं सोफ्याजवळ ठेवलं. पायाशी असलेली हलकी चादर उघडून आईच्या कमरेपर्यंत घातली. पंखा बारीक केला. खिडक्या सैलसर उघडल्या. डासांचे मशीन चालू केले आणि खोलीत निघून आली. ती आत आल्यावर मी खोलीचं दार लावणार इतक्यात म्हणाली, "आज दरवाजा उघडाच राहील! गप्प झोपा आता!" म्हणत स्वाती बेडवर आडवी झाली. तिच्या शेजारी येऊन मी माझ्या माझ्याच निराशेनं आडवा झालो!
सकाळ झाली. मी माझं आवरुन बाहेरच्या खोलीत आलो. आई आणि स्वाती किचन मध्ये होत्या. चिनू सोफ्यावर झोपला होता. त्याच्या शेजारी ताई बसलेली होती. चेहरा पडला होता तिचा.
मी बाहेर जाताच ताई म्हणाली, "अरे चिनूला जरा ताप आलाय."
"काल बाहेर फिरलेलं बाधलं असेल." शांतपणे बोलत आई किचन मधून पोह्याच्या प्लेट घेऊन आली.
ताईनं आईच्या हातून प्लेट घेतली आणि म्हणाली, "काय ग आई, ही कुठली अंगठी?"
आईनं लगेच हातावर हात ठेवला. "कुठली ग! ही?" अंगठीकडे बघत आई म्हणाली, "ही तर ह्यांची अंगठी होती ना, तीच लहान करुन घातली बोटात."
"अरेवा! मस्तच! अंगठ्या घाल, बांगड्या घाल, एफडी घे!" पोह्याचा घास घेत ताई बोलली.
हे ऐकून आईच्या हातातला घास भरलेला चमचा मात्र मध्येच स्तब्ध झाला. आत किचन मधून कढईत भाजी परतल्याचा आवाज ही बंद झाला.
"म्हणजे म्हणायचंय काय तुला ताई? स्पष्ट सांग!" आई शांतपणे म्हणाली.
"स्पष्ट कशाला बोलू, कळायचं त्याला बरोबर कळतं! हो की नाही रे विजा!" कुत्सित हसून ताई म्हणाली. "कसंय ना, परकी जवळची झाली की आपली दूर होतात!" किचन मधून आपली पोह्यांची प्लेट घेऊन येत असलेल्या स्वातीकडे बघत ताई म्हणाली.
"तुला काय म्हणायचंय ते स्पष्ट म्हण!" आईने प्लेट समोर ठेवत ठणकावून सांगितलं.
"बरं बाई! बाबांनी माझ्यासाठी एफ डी करुन ठेवलेली! ती मला मिळणार आहे की तिलाही तू बाबांसारखीच देवाघरी पोचवणार आहेस!"
"ताई! काय बोलत्ये कळतंय का तुला!" म्हणत आई ताडकन उठून उभी राहिली.
"का ग एवढं लागलं! मला वाटलं होतं, यंदा मी येईन तर काहीतरी थाटमाट असेल! बाबांचे बरेच पैसे मिळाले असतील ना तुला आई! पण कसलं काय! माझ्या नशिबात आलिशान माहेरपण नाहीच मुळी! आणि नशिबात असेल तरी ते कुणी करत नाही! करुन करुन काय तर नेहमीचे पोहेच" म्हणत ताईने स्वाती आणि आई दोघींकडे रागाने बघितलं.
स्वातीने मान खाली घातली. आई मात्र बोलायची थांबली नाही, म्हणाली, "इतका त्रास होत असेल आणि या माहेरपणाची लाज वाटत असेल तर येऊ नकोस!" म्हणत आई तावातावाने ताई जवळ गेली आणि तिच्या हातून पोह्यांची प्लेट काढून घेतली! मी आणि स्वाती उठून उभे राहिलो. मी "आई..." हळू आवाजात एवढं म्हणालो इतक्यात ताईच चिडून बोलली, "हो नाहीच येणार! तसंही इथे आल्यावर नेहमी चिनू आजारी पडतो, कोणाची दृष्ट लागते कोण जाणे!" म्हणत ताईने स्वातीकडे नजर रोखली.
आईला तिच्या म्हणण्याचा अर्थ कळला. स्वातीच्या डोळ्यात एकाएक पाणी आलं. मलाही ते वाक्य खूप लागलं. पण मी काही विचार करणार इतक्यात आईचा हात ताईच्या गालावर जाऊन आपटला देखील. आई पुढे म्हणाली, "खबरदार! आज बोललीस पुढे कधी असं मनात आणलंस तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेव!" आई थरथरत होती. स्वाती मागून आली आणि तिनं आईला सोफ्यावर बसवलं. मी ताईपाशी थांबलो. तिचा गाल लाल झाला होता. तेवढ्यात चिनू "आई" म्हणत उठला. ताई काहीही न बोलता चिनू पाशी गेली त्याला कडेवर घेतला. खोलीत गेली. दोन मिनिटात सामान भरुन बाहेर आली आणि थेट दारात चपला घालू लागली.
मी ताबडतोब तिच्या मागून निघालो. "ताई, थांब!" करत मी माझी स्कूटर चालू केली आणि ताई आणि चिनूला मागे बसवलं. आधी चिनूला जवळच्या डॉक्टर कडे घेऊन गेलो. "साधा किरकोळ ताप आहे" म्हणत डॉक्टरांनी चार गोळ्या दिल्या. त्या घेऊन पुन्हा तिघे गाडीवर बसलो.
"सरळ बस स्टॅण्डला घे!" ताईने आदेश दिला.
बस स्टॅण्ड ला पोचलो. ताईने तिकीट काढलं. बस दहा पंधरा मिनिटात येणार होती. आम्ही तिकडेच फलाटावर थांबलो. चिनू माझ्याकडे आला. त्याला शेजारच्या स्टॉल वरुन दोन खेळणी घेतली. आणि पुन्हा ताई शेजारी येऊन उभा राहिलो.
आवाज साफ करत हळू आवाजात म्हणालो, "ताई! काय झालंय तुला! तुझं जरा चुकतंय!"
यावर ताई प्रेमानं हसली. परवा आल्यापासून तिचं हे प्रेमळ हास्य आत्ता खुललेलं दिसलं. प्रेमळ हसून तिनं माझ्या खांद्याला हात लावला आणि हळू आवाजात म्हणाली, "चुकायलाच तर आले होते मी!" म्हणत तिनं मला डोळा मारला.
मी गोंधळात पडलो. माझा गोंधळलेला चेहरा बघून ताई पुढे बोलली.
"मी काय बाबांच्या मागे त्यांचे पैसे मागायला येणारी अशी मुलगी वाटले! की भावाशी भांडायला आलेली बहीण वाटले! एवढंच का ओळखलं तू मला!" असं म्हणत स्वतःच हसली.
"म्हणजे हे सगळं तू.." मी अडखळत म्हणालो. "नाटक.."
"हो अर्थातच!" म्हणत ताईने माझ्या डोक्याला थाप मारली. "अरे काय सांगू तुला! हल्ली नेहमी फोनवर बोलताना आई सारखं स्वातीबद्दल वाईट साईट सांगायची. वास्तविक काहीच मोठं नसायचं. पण आई इतक्या गांभीर्याने सांगायची की मला ऐकवलं पण नाही जायचं स्वाती बद्दल कारण ती तशी नाहीये हे मला माहितीये!"
तेवढ्यात चिनू माझ्या कडेवरून ताईच्या कडेवर गेला. मी नुसता ऐकत होतो. ताई पुढे म्हणाली, "आणि असंच स्वाती पण सांगायची हल्ली. आई असं करतात, आई तसं करतात. नाही त्या गोष्टींबद्दल पूर्वग्रह करुन उगाच आईला दोष द्यायची. लहानशा गोष्टीतून वेगळे अर्थ काढून आईने कसा मुद्दामून तिला त्रास दिला, जाच केला असं खूप काही सांगायची. म्हणून मग मी ठरवलं. यंदा सोक्षमोक्ष लावून टाकायचा!"
इतक्यात मागून बसचा आवाज आला. ताईची बस फलाटावर येऊन उभी राहिली.
"असा लावलास सोक्षमोक्ष?" मी तिच्याकडे बघून हसलो.
"मग काय! दोघींना एकमेकींचे चांगले गुण दाखवायला मलाच वाईट बनावं लागलं शेवटी! समुद्र मंथन नाही का! अमृत बाहेर काढायला आधी कोणाला तरी विष प्यावं लागलं, मी तेच केलं! त्या दोघींना मिळालेली वीट कशी मऊ आहे हे त्याचं त्यांनाच कळायला मला दगड व्हावं लागलं. आणि मारही खावा लागला." म्हणत ताईने तिच्या गालावर हात ठेवला आणि पुन्हा हसली.
"ताई! आज बाबा असते तर!" असं म्हणत मी तिच्या गालावरुन हात फिरवला.
"असते तर असाच हात फिरवला असता! आणि आहेच आपल्यात! तुझ्यात! माझ्या माहेरच्या माणसात!" म्हणत ताई बसच्या दाराकडे चालू लागली. मीही तिच्याबरोबर तिचं सामान घेत चालत होतो.
"पण आता तुझ्या साठी तुझ्या माहेरचं दार बंद झालं तर!" मी हसून विचारलं.
"छे! होणारंच नाही! घरातली मनं मोकळी झाली की दार आपोआपच उघडायला वेळ लागत नाही विजा! त्या दोघींची मैत्री व्हायला मी त्यांची शत्रू झाले!" म्हणत ताई बस मध्ये चढली. मागून चिनूने मला गोड पापा दिला आणि ताईने अच्छा करत जोरजोरात हात हलवला. इतक्या गर्दीतही मला तिच्या पापणीतला ओलावा ठळकपणे दिसला!
वेगळ्याच भावना मनात घेऊन मी घरी आलो. स्वाती आईच्या मांडीवर डोकं ठेवून पहुडली होती. मला पाहताच दोघी उठल्या आणि एका सुरात विचारलं, "खूप चिडलीये का ती !" मी काहीही न बोलता दोघींना मिठीत घेतलं आणि आमच्या नव्या शत्रूला मनोमन धन्यवाद दिले !
©️ . सुमेध रानडे . ✍️
( कथा कशी वाटली हा तुमचा मोलाचा अभिप्राय नक्की कमेंट करुन सांगा. आणि तुम्ही ही हे नातं असं अनुभवून बघा!😊)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा