गुरुवार, २५ जून, २०२६

2949. मुलं असतानाही आई-वडिलांचं असं एकटं पडणं

 "मुलं असतानाही आई-वडिलांचं असं एकटं पडणं..." म्हणजे पालकांची शोकांतिकाच समजावी. 😔
शहरातील एका वृद्ध दाम्पत्याची ही हृदय पिळवटून टाकणारी कहाणी आहे.
शंकरराव लिपिक पदावरून रिटायर्ड झालेले आणि सुमनताई त्यांच्या पत्नी, अर्धांगवायूमुळे बाजेवर खिळलेल्या. मुलगा नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात, तर मुलगी दुसऱ्या राज्यात. त्यामुळे या दोघांना आपल्या घरात एकटे राहण्याशिवाय पर्याय नव्हता. वय झालं होतं आणि हे आजारपण यामुळे मुलगा-सूनदेखील त्यांना ठेवायला तयार नव्हते. सुमनताईंना आजारपणामुळे चालणं-फिरणंही अवघड झालं होतं. त्या पूर्णपणे पतीवर अवलंबून होत्या. आर्थिक स्थिती इतकी नव्हती की केअरटेकर ठेवावी किंवा कामासाठी मदतनीस ठेवावा.
येणारी पेन्शन औषधं आणि घरखर्चात जात होती. मुलगा म्हणायचा, "माझ्या घराचं आणि कारचं लोन आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं पेन्शनमध्येच बघा."
शंकरराव ६५ वर्षांच्या जवळपास असले तरी घरातील सर्व कामं तेच करत असत.
सुमनताईंना हे पाहून वाईट वाटायचं. 😔
शंकरराव नोकरीवर होते तेव्हा सुमनताई त्यांच्या हातात चहा, नाश्ता, डबा, सगळं काही द्यायच्या.
आणि आज त्या अंथरुणाला खिळल्या होत्या.
शंकरराव पतीधर्म पाळत होते. पत्नीची सर्व काळजी घेत होते. तिला भरवून देताना सुमनताई रोज रडायच्या. त्यांना असं हतबल झालेलं पाहून शंकरराव म्हणायचे, "मी आहे ना... तू कशाला काळजी करतेस?"
त्यावेळी पुन्हा त्यांच्या डोळ्यांतून पाणी यायचं.
मुलगा न्यायला तयार नाही, मुलीला कसं म्हणणार? ती तर दुसऱ्याच्या घरी.
त्यामुळे यांच्या नशिबी असा एकाकीपणा आला होता.
या मोबाईलच्या जगात मुलांनी पालकांना फोन करू नये, याहून मोठं दुर्दैव ते कोणतं? 😔
एके दिवशी स्वयंपाकघरात पाण्यावरून पाय घसरून शंकरराव पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. घरात दुसरं कुणी नव्हतं. अंथरुणाला खिळलेल्या सुमनताईंना ना उठता येत होतं, ना कुणाला मदतीसाठी बोलावता येत होतं. शंकरराव पडल्यावर डोक्याला मार लागल्यामुळे जागीच गेले. सुमनताई तर पूर्णपणे हतबल होत्या.
एक दिवस गेला...
दोन दिवस गेले...
तीन दिवस गेले...
भूक, तहान, एकटेपणा आणि असहाय्यता यांच्याशी झुंज देत सुमनताईंनीदेखील त्याच अंथरुणावर प्राण सोडले.
आजूबाजूच्या लोकांना दुर्गंधी येऊ लागल्यावर शेजाऱ्यांनी चौकशी केली. नातेवाईकांना कॉल करून सांगितलं, "घरातून दुर्गंधी येत आहे आणि काका दोन दिवसांपासून बाहेर दिसलेले नाहीत."
तेव्हा ही दुर्दैवी घटना समोर आली.
एका तासात मुलगा आला. नंतर पोलिसांना बोलावण्यात आलं. पंचनामा झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. घरात काहीच संशयास्पद आढळलं नाही. त्यामुळे एकाकीपणामुळे झालेले मृत्यू असा निष्कर्ष काढण्यात आला.
हे सगळं बघून मन हेलावलं...
आणि काही प्रश्न मनाला पडले.
आजकाल मुलं असूनही किती आई-वडील एकटे जगत आहेत?
का राहतात?
दिवसातून एक फोनदेखील एकट्या पालकांना करू नये... का?
कॉल उचलत नाहीत, तर शेजाऱ्यांना किंवा स्वतः येऊन का बघत नाहीत मुलं?
पैसा पाठवणं, महागड्या वस्तू देणं किंवा अधूनमधून फोन करणं यालाच कर्तव्य समजलं जातं. पण वृद्ध आई-वडिलांना सर्वात जास्त गरज असते ती आपल्या माणसांच्या सहवासाची, काळजीची आणि आधाराच्या दोन शब्दांची.
ज्यांनी आयुष्यभर आपल्या मुलांसाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, त्यांच्याच वृद्धापकाळात जर त्यांना एकटेपणा, उपेक्षा आणि असहाय्यता मिळत असेल, तर ती आपल्या समाजासाठी चिंतेची बाब आहे.
आई-वडिलांना फक्त पैशांची गरज नसते.
त्यांना हवी असते आपली उपस्थिती, आपुलकी आणि वेळ.
कारण वृद्धापकाळात औषधांपेक्षा जास्त गरज असते ती आपल्या माणसांच्या हाताच्या आधाराची.
टीप -सत्य घटनेवर आधारित आहे. नाव बदललेली आहे.

लेखांकन :
© ॲड. जयश्री कन्हेरे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...