हातात असलेली लाल रंगाची डबी तिला दाखवत तो गुडघ्यावर बसला. त्यानं हळूच डबी उघडली. अंगठीतला हिरा सुर्यकिरणांत न्हाऊन इंद्रधनुष्याचे रंग परावर्तित करू लागला.
ती लाजली. तिचा आरक्त चेहरा त्या इंद्रधनुच्या रंगात चमकू लागला. अन् तोच क्षण कॅमेऱ्यात कैद करावा म्हणून त्यांची मैत्रीण मोनिका फोन घेऊन तयार होती पण नेमकी त्याचवेळी मोनिकाला जोरात शिंक आली व तो क्षण हातून निसटला.
“परत एकदा प्रपोज कर रे, वरूण ! जयू, थोडी राईटला हो !” मोनिका परत कॅमेरा सज्ज करून तयार झाली. पण ऐनवेळी एक कावळा जोरात काव काव करून गेला व पुन्हा शूट करावा लागला.
असेच तीन चार टेक झाले पण पहिल्या वेळचे भाव, ते लाजणं परत निर्माण झालं नाही. शेवटी कसंबसं रील बनलं व ते सोशल मिडिया वर पोस्ट करून तिघंही लाईक्स आणि कॉमेंटसची वाट बघत बसले.
अर्ध्या तासात फक्त दहा लाईक्स आले होते. त्यातल्या एकानं तर, ‘स्टेज केल्यासारखं वाटतंय’ लिहिलं अन् उरली सुरली मजाही गेली. जयू तणतणत घरी आली.
आईनं स्वयंपाकघरातून सांगितलं, “जयू,रविवार मोकळा ठेव हं... काकांच्या साठीचा कार्यक्रम आहे. बारा वाजता तिथं पोचायला हवं!”
“हो ग, माहितीये…!” काकांच्या पार्टीमधे मस्त रील करता येईल या विचारानं ती खूष झाली. कसा नाच करावा विचार करू लागली.
जयू व वरूण कुणालाही न सांगता शनिवारी वर्धनगड या पर्वताच्या उंच सुळक्यावर गेले. प्रपोजलच्या रीलनं केलेलं नुकसान उत्तम रील करून भरून काढायचं होतं! त्या सुळक्यावर ‘टायटॅनिक’सारखी पोज देऊन केलेल्या ‘रील’ला लाईक्स आलेच पाहिजेत!
मोठ्या घेराचा पिस्ता कलरचा लेहेंगा घालून त्या सुळक्यावर उभं राहणं ही कसरतच होती. दोन्ही हात ‘टायटॅनिक’सारखे पसरून पर्फेक्ट शॅाट घेऊन झाला व जयू फोन घेण्यासाठी पुढे सरसावली पण तेवढ्यात वरूणचा तोल जाऊन तो सुळक्याच्या टोकावर लोंबकळू लागला…
तिला घामाच्या धारा लागल्या होत्या. तिच्या डोळ्यातून पाणी वहात होतं आणि जीवांच्या आकांतानं तिनं त्याचा हात घट्ट पकडून ठेवला होता!
पिस्ता कलरचा महागडा लेहेंगा फाटला होता. देवाची कृपा म्हणूनच वरूणनं तिचा हात व जवळ असलेली फांदी यांना पकडून स्वतःला वर उचललं व एक पाय वर टाकून तो कसाबसा वर आला. सगळा पाय खरचटून रक्तबंबाळ झाला होता.
तसाच पाय ओढत ते गाडीतून जवळच्या हॉस्पिटलमधे पोहोचले. नशीबानं फ्रॅक्चर झालं नव्हतं. सर्व जखमांवर उपचार होऊन त्याला खोलीत आणलं… तोवर तिनं केलेल्या फोनमुळं त्याचे आई बाबा तिथं हजर झाले होते.
“काय पडलं होतं अगदी पर्वत चढायचं? निदान सांगून तरी जायचं! आणि हे कपडे घालून का पर्वत चढलात?”
वरूणची आई संतापली होती म्हणून ‘रील’बद्दल जयू काही बोलली नाही.
वरूणला दिवसभर तिथंच ठेवायचं ठरलं व जयू घरी आली. आईला सर्व प्रकार सांगताच आई उखडली. न सांगता मुलं पर्वतावर गेली, असंच तिला वाटत होतं. ‘रील करायला गेलो होतो’, हे तिलाही सांगण्यास जयू धजली नाही.
दुसऱ्या दिवशी काकांच्या घरी शंभर लोक जमले होते. काकूंनी सर्वांना विनंती केली…
“पुढचे दोन तास कुणीही फोन वापरायचा नाही. फोनवर फोटो काढायचे नाहीत. ‘रील्स’ बनवायची नाहीत… ही आम्हा दोघांची विनंती आहे. साठीच्या निमित्तानं आम्ही एक साधा कार्यक्रम करत आहोत व त्यासाठी तुमची साथ हवी आहे! शिंदे फोटोग्राफरना बोलावलंय… ते मोजके फोटो काढतील.”
रील बनवायला उत्सुक झालेला सर्व तरूण वर्ग हे ऐकताच हिरमुसला होता.
काकांनी गणेशाची पूजा झाली. मुलांनी, स्नेह्यांनी काकांच्या आठवणी सांगितल्या. लोक उंधियो-पुरी आमरसाचं जेवण घेत असताना काकांनी जयूला जवळ बोलावलं… काका पोलिस इन्स्पेक्टर म्हणून काम करून रिटायर झालेत, हे ती विसरली होती.
“जरा आतल्या खोलीत ये जयू… एक विडिओ व्हायरल झालाय, एका कपलचा… हे बघ…”
काका बोलले आणि जयू ओक्साबोक्शी रडू लागली. तिथं कुणीच नव्हतं. आणि कुणी असलं तर वरूणला मदत करायला न येता हे रील करत बसले ते? ही तर आजच्या जगातील शोकांतिका आहे, हे काकांना माहित होतं.
काकानी तिच्या पाठीवर थोपटलं. दारातून कुबड्या घेऊन वरूण आत आला. पाहुणे, हा काय प्रकार आहे हे आश्चर्यानं बघत राहिले.
काकांनी घसा खाकरला… “इथं जमलेल्या सर्वांनाच पण विशेषत: तरूण वर्गाला मला काही सांगायचंय… काल रील करायला गेलेले आपले जयू व जावईबापू वरूण देवाच्या कृपेने वाचलेत.
“Gen Z- आजची तरूण मुलं मुली उठसुट रील्स करताहेत. का करतात ते रील? काय मिळतं त्यातून?
“प्रत्येक लाईक, कॉमेंट, व्ह्यूमधून डोपामिनचा डोस मिळत जातो पण हा क्षणिक आनंद आहे हे विसरू नका.
“सोशल मीडियावर दिसणारी मान्यता फार मोठी वाटू लागते… पण लक्षात ठेवा– Nobody cares!
“इतरांच्या परफेक्ट ‘दाखवलेल्या’ जीवनाशी तुलना करून आपलं जीवनही कसं मस्त आहे, असं स्वतःला सिद्ध करणं जरूरीचं वाटतं… पण no life is perfect
“ताण तणाव विसरण्याचा हा उत्तम मार्ग वाटतो पण लक्षात ठेवा… ही पळवाट आहे. हे व्यसन आहे. हा चक्रव्यूह आहे! यातून वेळीच बाहेर पडा. सावध व्हा…
“मी सेवानिवृत्तीनंतर ‘डिजिटल डिटॉक्स’चे किंवा त्याला आपण ‘डिजिटल विश्रांती’ म्हणू… असे वर्ग सुरू करतोय परंतु पहिला वर्ग आपल्याच घरात घ्यावा लागेल याची कल्पना नव्हती!”
आईनं हताश होऊन जयूकडे पाहिलं. काकांनी काकूंकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले,
“आपण दोघांनी कधी रील्स केले नाहीत, की फोटो काढले नाहीत… पण आपल्या आयुष्यातले अर्थपूर्ण क्षण आजही ताजे आहेत, कारण ते आम्ही ‘जगलो’ आहोत. मनापासून… त्यांना पूर्ण न्याय देत! ते आम्ही कॅमेऱ्यात नाही तर मनात साठवले आहेत.”
खोलीत एकदम शांतता पसरली. त्या क्षणी जयूने हळूच वरूणचा हात धरला.
“काका, ‘डिजिटल डिटॉक्स’च्या वर्गांसाठी आम्हालाही काम द्या… आमच्या प्रपोजलच्या ‘रील’ला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आम्ही हे भयानक पाऊल उचललं व यात वरूण गेला असता हे मला जगाला सांगायचंय… हे व्यसन दारूच्या व्यसनापेक्षा भयंकर आहे!”
भिंतीवरले पंचवीस वर्षांचे काका एकवीस वर्षांच्या काकूला सायकल वरून डबलसीट नेत असतानाचा फोटो तिनं हातात घेतला…
साधी सुती साडी नेसलेली काकू केवढी गोड लाजली होती!आयुष्यातले असे कित्येक क्षण पूर्णपणे कधीच न जगता ते सतत कॅमेऱ्यात पकडणारी आपली पिढी…
सारं करावं पण तारतम्य वापरून! फोटो, रील्स, टेक्स्ट्स, व्ह्यूज मध्ये हरवून न जाता. त्यातून नैराश्यात न जाता! हे मृगजळ आहे हे समजून जगायचंय. चारच मित्र असावेत पण जीवाभावाचे... प्रत्यक्ष भेटणारे ! व्हर्चुअल जगातले आठशे मित्र काय करायचेत?
हे शिकण्यासाठी व शिकवण्यासाठी आज ती सिध्द झाली होती. वर्धनगडावर केलेली ‘रील’ पोस्ट न करता ती व वरूण काकांशी विचारविनिमय करत होते!
— ज्योती रानडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा