बेल वाजली… एकदा, दोनदा, तिनदा… चौथ्या वेळी आतून आवाज आला,
“कोण आहे…? आलेच हं…किती घाई!”
सावकाश, भिंतींना धरत, फर्निचरचा आधार घेत ती दाराजवळ आली. पिप होल मधून हळूच बघितलं. कळलंच नाही कोण ते…
कचरा तर ठेवला मगाशीच… आणि… कामवाली बाई यायला वेळ होता.
इतक्यात आतून ते ओरडले,
“कोण आहे ग…? उघडलंस का दार? की मी येऊ??”
“नको… उघडते मी.”
परत बेल वाजली.
“हो, हो… थांबा उघडते.”
तिनं दार किलकिलं केलं. डोकावून पाहिलं… पटकन ओळख लागेना.
“कोण…?”
“अग, काय तू आजीऽऽऽ… मी ! काय ग, तुझ्या नातवाला विसरलीस???”
“अगोऽऽऽ बाई, ये रे… अगदी आजोबांच्या वर गेलायस. तेही असेच… दार उघडेपर्यंत धीर नाही. किती वेळा बेल वाजवलीस रे…? आणि गॉगलमुळं रे…तुला ओळखलंच नाही !
“अरे, तुझ्या बाबानं कळवलं नाही, तू येणार म्हणून… म्हणजे तयारीत राहिलो असतो…:स्वागताच्या ! आता इकडे भारतात येऊन तुला आठ दिवस झाले असतील ना रे…?”
“जाऊ दे गं आजी… मुद्दामहूनच न कळवता आलो. मॅनर्स पाळून कंटाळलोय !”
“ये हो……” चेहरा खुलला तिचा. हसतच दार पूर्ण उघडलं
आणि जवळपास ओरडलीच,
“अहो, लवकर या बाहेर… बघा तरी कोण आलंय !”
आवाजात कंप आला आणि डोळे पाणावलेले. तो झटकन नमस्कारासाठी वाकला. थरथरत तिनं डोक्यावर हात ठेवले.
“औक्षवंत हो बाळा… सुखी रहा!”
एवढ्यात तेही आले. “आबाऽऽ…” म्हणत तो त्याच्या पाया पडला.
“येस माय डियर, सुखी रहा…” असं म्हणत कडकडून मिठी मारली.
“तगडा आहेस रे चांगलाच. बापासारखा उंचही आणि वाकण्याइतका नम्र माझ्या सारखा.”
“एकदा काय ते ठरवा... मी बाबांसारखा आहे की तुमच्यासारखा?”
तिघंही हसले.
“ये, बस बस... बायको, झक्कपैकी गोडाचा शिरा कर बरं, या आपल्या ‘बब्बड’साठी…”
‘बब्बड’…
तिघंही खळखळून हसले. या घराला कैक वर्षानी आनंदानं हसल्याची कंपनं जाणवली.
“आजी, काही नको. फक्त गप्पा मारायला, भेटायला आलोयं मी. आणि खायला तर नकोच. हेवी ब्रेकफास्ट करुन आलोयं मी. सो… तू बस इकडे…”
“आलाय मोठा शहाणा ! ते काही नाही. अजून हिंडती फिरती आहे हो मी. स्वयंपाक करते आजही. फक्त पोळ्या करायला बाई आहेत.
“आज माझी कढई, झारा सुध्दा खूष होतील. गोडाचा शिरा करणार म्हणून. ह्यांना डायबेटीस. त्यामुळं शिरा करतच नाही, फक्त औषधांचा आग्रह करते. आज मात्र देणार हो तुम्हाला. नातू आलाय ना… म्हणून!”
ती सावकाश चालत आत गेली. त्याचा विरोध क्षणात मावळला. खरं तर त्याला हेच अपेक्षित होतं. पण कसं सांगायचं की, ‘आजी तुझ्या हातचा मस्त पैकी खास प्रसादासारखा केळ घालून शिरा कर.’ पण आजीच ती, तिनं माझं मन ओळखलं.
“आजीऽऽऽ… बरचं काही खायचंय बरं का तुझ्या हातचं. मॉमच्या हातचं जेवण म्हणजे… हम्म…” त्यानं एक सुस्कारा सोडला.
“मी स्वयंपाक शिकलो. नाईलाजानं आणि आता आवडीनं करतो. अगं मॉमला विशेष आवड नाही कुकींगची.”
“तुझ्या मॉमला साधी आवड सुध्दा नाही. ‘विशेष’ कुठली असायला…!”
तो आबांच्या जवळ बसला. मग लगेच म्हणाला, “घर बघून येतो…”
तेही गेले त्याच्यासोबत. “चार खोल्यांच्यात काय आहे बघण्यासारखं.” असं आबांनी म्हणताच लगेच म्हणाला,
“बरंच काही असतं. काही आठवणी.”
बेडरूम, स्वयंपाकघर, बाल्कनी. आहे तसंच. फर्निचर आणि वस्तू जुन्या झालेल्या. पण तरी टिकून होत्या. आबा लगेच बोलून गेले,
“ह्या वस्तूही आमच्यासारख्याच आहेत. धड टाकवत नाहीत आणि कालप्रवाहात जुन्या वाटतात. असून अडगळ, नसून खोळंबा !”
“हे कपाट अजून आहे??”. तो जोरात ओरडलाच, “अरे यावर तुम्ही मला बसवायचात. उडी मारायला शिकवायचात…”
“होय रे ! पण लेका तू ‘लांब उडी’ लवकर शिकलास आणि मारलीस सुध्दा!”
“हम्म…”
लाकडी कपाटाला लागूनच ते जुनं आरशाचं कपाट होतं. त्यावर लावलेले वेगवेगळे स्टिकर्स अजूनही होते. काळे पडलेले, काही फाटले गेलेले. तो स्वतःशीच हसला.
तेवढ्यात आजी मागून येत म्हणाली, “तुझ्या आईला नाही हो चालायचं, असं स्टिकर डकवणं. तिनं तिच्या कपाटाला हात सुध्दा लावू दिला नाही. पण मी सांगितलं, ‘इकडे लाव…’ कित्ती छोटा आनंद होता तुझा आणि या आरशात खरे चेहरे दिसत नसतातच. मुखवटेच सगळे ! त्यापेक्षा स्टिकर्सच बरे. जसं आहेत तसेच दिसतात !” म्हणत हसली.
तोही रमला आठवणीत. ती भन्नाट चित्रांनी सजलेली भिंत. तो बाल्कनीत असलेला झोपाळा. आजीच्या कपाटातली जुनी खेळणी, पाटी. तो बाल्यात हरवला.
“चल बरं, शिरा दे आजी…”
“हो रे, होतच आलाय… मिरगुंड तळू का रे? आवडायची तुला… पण काय ते तुझं पथ्याचं बघ बाबा!”
“हो, चालतील… इनफॅक्ट तळच…”
तिला काय करू नी काय नको असं झालं.
तो आबांना म्हणाला, “एक फोन करून घेतो मॉमला…”
म्हणत त्यानं फोन लावला…
“अजून चार तास तरी मला यायला लागतील. बोलणं व्हायचयं अजून. वाट बघशील म्हणून सांगितलं.”
“काय रे… प्लॅन चेंज? म्हणजे तू हवाच आहेस रे आम्हाला. पण तरी, नजरकैदेतून सुटायचं कसं काय ठरवलंस?” म्हणत आबा जोरात हसले.
“ते होतं आबा. वेळ आली ती आता. बोलू आपण.”
“ओके…”
तेवढ्यात आजीनं बोलावलं…
“आतच ये रे…”
गरम शिरा, मिरगुंड, खाराची मिरची… फक्कड होतं सगळं. मुळात चविष्ट !
“खूप मिस् करतो गं हे सगळं.
“सहावीत हे घर सोडलं. मग अजून मोठ्या घरात. मग काय स्टेटससाठी अजून मोठ्ठं घर घेतलं बाबांनी. एकेका खोलीत एकेक अवयव राहील असं.
“मग काय, बारावी नंतर बाहेरच गेलो. आता फायनली शिक्षण संपलंय.
“जी मजा तुझ्या कुशीत झोपायला यायची ना, ती कशालाच नाही.
“ती गोधडी....
“येस्सस्स… आजी मला गोधडी हवीय. मागं दिली होतीस ती वापरून फाटली… नवी दे!”
“अरे खुश्शाल घेऊन जा…”
“पण मोठी आहे ना? लांब गं… सहा फूट झालोय मी…!”
“हो आणि नसली तर शिवून देईन. मागून मागून काय मागितलं, तर गोधडी !”
“अगं तीच तर नाही मिळत !”
“अरे, साड्याच नेसल्या नाहीत, तर कुठली गोधडी आणि कसलं कायं…! अगदी बापाच्या वळणावर गेलायस. त्यालाही लागायची गोधडी… पण…”
“बायको, आवरतं घ्या. तो शिरा खायला आलाय, गप्पा मारायला आलाय. त्याला भलतेच विषय काढून गप्प करू नका!”
“हो... जसं काही तुम्ही कधी त्यांच्याबद्दल बोलतच नाही...पण ठीक...”
“बरं बाबा, लग्नाचं काय रे तुझ्या? वेळेत कर हो ! कुणी आहे का, माझी नातसून व्हायला तयार?”
“छे, अजून वेळ आहे. बाबा आणि मॉमकडे बघितलं की लग्न नको वाटतं. सारखे वाद,भांडणं. कुठल्याही विषयावर. सुरुवात कशी होते, कोण करतं. तेच कळत नाही. अरे, हे असं कुठे लव्ह मॅरेज असतं का? प्रेम कमी आणि वादच जास्त ! पण हल्ली बाबा बोलतात हं मॉमला… ‘बास कर… किती घालून पाडून बोलतेस? आता बब्बडचं लग्नाचं वय आलंय…’ कंटाळतात बहुतेक!”
“तर… तर… जेव्हा बोलायला हवं होतं, तेव्हा नाही बोलला ‘बास कर’ असं आणि त्यांच लव्ह मॅरेजच हो ! प्रेमासाठी हातापाया पडला होता. जसं काही आमची परवानगी महत्त्वाची होती. असो.
“तुझ्या आई-बाबांना एकंदरीतच वाद घालायला आणि विषय जिंकायला आवडतं. माणसांना हरवून, नात्यांना लाथाडून…”
“बायकोऽऽऽ…!”
“हो कळलं…विषय भरकटतोय. अरे बब्बड, तू बोल…”
“आजी, तुझा तो ‘पिकलं पान’वाला डायलॉग. मी बाहेर गेलो शिकायला तेव्हा म्हणाली होतीस, ‘लवकर ये परत बब्बड… आम्ही पिकलं पान. केव्हाही गळून पडू…’ जाम सेंटी झाली होतीस गं!
‘आणि आता बघ, मी कायमचा परत आलोय. आहेस बघ छान धडधाकट. काही होणार नाही तुला !”
“चल, कर चेष्टा. पण आता काही वाटत नाही. पूर्वी वाटायचं. आता गळून पडायची भिती नाही. मुळात तग धरावं असंच काही नाही !”
तो गूढ हसला. खाणं झालं. तो अचानक म्हणाला,
“महत्त्वाचं बोलायचंय…चला बाहेर बसू.” आजीला हाताला धरून तो घेऊन आला.
“बस…” सावकाश सुरुवात करत बोलायला लागला…
“मी आता कायमचा इकडे परत आलोय. डबल ग्रॅज्युएट झालो, नोकरी केली, अनुभवही घेतला. पैसे मिळवले, लोन फेडत आलंय…
“तिकडे गेलो… खूप आनंदानं नक्कीच नाही. सुरवातीपासून इथंच आवडायचं. तुमचा लळा होता. मस्त वाटायचं… सुरक्षित, आपलं कुणी आहे…
“मोठ्या घरात गेलो, गणित बदललं. मॉमचा जीवघेणा धाक, बाबांचा राग, महत्वाकांक्षी धोरणं. यात सहावीत असताना इथून बाहेर पडलो. कुठंतरी लांब घर घेतलं होतं ते. सगळं छान होतं, स्वतंत्र होतं, ऐसपैस होतं. पण काहीतरी मिसींग होतं. बोलू शकेन, कुणाला सांगू शकेन असं नव्हतं कुणी.
“साधं या घरी यायचं तरी कधीतरी, क्वचित. मला आवडायचं. पण मॉमला पटायचं नाही. राहू द्यायची नाही तुमच्या जवळ.
“मग काय… छंद, क्लास, भारंभर ॲक्टिव्हिटीज्… गुंतवून ठेवलं मला !
“पण त्यात आजीच्या गोष्टी नव्हत्या, लाड नव्हते. त्यानंतर अभ्यास वाढला. हळूहळू लक्षात येत गेलं. पण स्मरणात, विचारात तुम्ही कायम होतात. मार्क्सवादी झालो. यश मिळवत गेलो, बाहेर गेलो. जग बघितलं. आनंद, समाधान शोधत होतो. तुमच्या संपर्कात होतो. पण अंतर जाणवायचं. कुठंतरी वाटायचं, मी परत येईपर्यंत तुम्ही असाल ना या जगात…??
“आता निर्णय घेतला. परत आलोय. इथंच नोकरी मिळालीय. नवं घर घेणार आहे. पण विचारपूर्वक. जिथं तुम्हीही सामावून जाल असं. जिथं आपण एकत्र राहू. मी मॉम आणि बाबांना बघेनच. पण निराळं. ती जबाबदारी माझीच. ते एकत्र रहायला नक्कीच तयार नाहीत. बोललोय मी त्याच्याशी. तुमच्याबद्दलचे त्यांचे विचार माझ्या विचारांपेक्षा निराळे आहेत.
“एक जीवाला जीव देईल अशी मैत्रीण मिळालीय. शिकलेली आहे, मूल्य जपणारी आहे. जिला चकाचक घरं, गाडी, बँक बॅलन्स, छानछोकी, हॉटेलिंग, खरेदी या पेक्षा माणसं, नाती आणि प्रेम हे हवंय. माझ्यासारखीच आहे. वेगळी. म्हणून विचार, मन जुळलं.
“लग्न करणार आहे तिच्याशी. तोपर्यंत मी इथं या घरात रहायला आलो, तर चालेल का तुम्हाला…??? तुमचा सहवास हवाय. मला शक्य आहे ते करायचयं तुमच्यासाठी. पण प्रेम हवंय. माणसं आयुष्यात असतानाच जपायला हवी आहेत. गेलेली वर्षं भरून काढता येणार नाहीत.
“जे काही असेल मनात ते सांगा… स्पष्ट, खरं. आग्रह नाही, जबरदस्ती तर बिलकुल नाही…”
त्या दोघांच्याही डोळ्यात निव्वळ अश्रू होते. मन म्हणत होतं, ‘मुलगा, नातू दोघंही आपलेच… मुलगा वागण्यानं परका झाला; नातवानं आपलेपणानं जवळचं केलं!’
आजी इतकंच म्हणाली,
“बब्बड…
पिकलं पान इतक्यात नाही गळणार…!”
- संजीवनी मराठे खरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा