आपण खरंच माणसाच्या मनावर प्रेम करतो की त्याच्या रूपावर? एक प्रामाणिक आत्मपरीक्षण.
"तुमची पसंती कशाला असेल देहाच्या सौंदर्याला की आत्म्याच्या सुंदरतेला?"
हा प्रश्न जेव्हा माझ्यासमोर आला, तेव्हा क्षणभर उत्तर द्यावं असं वाटलं; पण पुढच्याच क्षणी विचारांची चक्र इतकी वेगाने धावू लागली की सरळ उत्तर देणं कठीण होऊन बसलं. मनात एकामागून एक प्रश्न उभे राहू लागले. आपण जे उत्तर देतो ते खरंच मनापासून असतं का? की समाजाला आवडेल असं उत्तर देत असतो?
या प्रश्नावर विचार करताना माझे काही विचार कागदावर उमटू लागले आणि त्या विचारांसोबत काही प्रश्न मलाही पडले.
खरंच आपण एखाद्या व्यक्तीला त्याच्या आत्म्याच्या सुंदरतेसाठी पसंत करतो का?
सोशल मीडियावर एखाद्याचा फोटो पाहताना आपण त्याचा स्वभाव, विचार, संवेदनशीलता आणि माणुसकी पाहतो का, की त्याचा चेहरा, रूप आणि बाह्य आकर्षण?
जर आत्म्याची सुंदरता इतकीच महत्त्वाची असेल, तर शारीरिक कमतरता असलेल्या व्यक्तींना जीवनसाथी म्हणून स्वीकारण्यासाठी लोक सहजपणे पुढे का येत नाहीत?
आणि जर देहाचं सौंदर्य महत्त्वाचं नसेल, तर आपल्या समाजात रूपाला इतकं मोठं स्थान का मिळालं आहे?
या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा एक छोटासा प्रयत्न...
पहिल्या नजरेत हा प्रश्न खूप साधा वाटतो. अनेकजण क्षणाचाही विलंब न करता म्हणतील, "आत्म्याची सुंदरता महत्त्वाची." काहीजण तर यापुढे जाऊन बाह्य सौंदर्याला क्षणभंगुर आणि आत्म्याच्या सुंदरतेला शाश्वत म्हणतील. हे ऐकायला खूप सुंदर वाटतं. पण खरंच आपण जे बोलतो तेच जगतो का? की उत्तर देताना आणि आयुष्य जगताना आपल्या निकषांमध्ये खूप मोठी तफावत असते?
या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःलाच एक प्रश्न विचारायला हवा सोशल मीडियावर आपण एखाद्या व्यक्तीची पोस्ट पाहतो तेव्हा नेमकं काय पाहतो? त्याचा चेहरा, त्याचं रूप, त्याची ठेवण, त्याची स्टाईल, त्याचा पोशाख की त्याचा स्वभाव?
आजच्या काळात कोणालाही "तू मुळात कसा आहेस?" हे जाणून घेण्यापेक्षा "तू दिसतोस कसा?" हे जाणून घेण्यात जास्त रस असतो. म्हणूनच एखाद्या व्यक्तीचा विचार, त्याची संवेदनशीलता, त्याची माणुसकी किंवा त्याचा संघर्ष जाणून घेण्याआधी त्याचा फोटो पाहिला जातो. इतकंच काय, अनेकदा लोक विनोदाने म्हणतात, "माणूस कसा आहे ते पाहायचं असेल तर आधार कार्डचा फोटो पाहा." कारण तिथे फिल्टर नसतात, एडिटिंग नसतं, कृत्रिम आकर्षण नसतं.
हे वास्तव आहे आणि ते स्वीकारायला हवं.
पण मग प्रश्न असा उभा राहतो की, जर आत्म्याची सुंदरता इतकी महत्त्वाची असेल तर शारीरिकदृष्ट्या आकर्षक नसलेल्या व्यक्तींना समाजात तितकीच सहज स्वीकारार्हता का मिळत नाही? एखाद्या व्यक्तीचा स्वभाव उत्तम असला, विचार सुंदर असले, हृदय निर्मळ असलं तरी त्याच्या शारीरिक कमतरतांसह त्याला जीवनसाथी म्हणून कितीजण निवडतात?
हा प्रश्न विचारताना कुणावर आरोप करण्याचा हेतू नाही. कारण बाह्य सौंदर्याकडे आकर्षित होणं हा मानवी स्वभाव आहे. पण त्याच वेळी आपण आत्म्याच्या सुंदरतेचं महत्त्व सांगत असतो. मग या दोन गोष्टींमध्ये समतोल कुठे आहे?
खरं तर देहाचं सौंदर्य आणि आत्म्याची सुंदरता यांची तुलना करणेच कदाचित चुकीचं आहे. कारण देह प्रथम दिसतो आणि आत्मा नंतर उलगडतो. एखाद्या पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहून आपण ते हातात घेतो, पण ते पुस्तक आवडतं त्याच्या आतील आशयामुळे. तसंच माणसांचंही असतं. बाह्य आकर्षण ओळख करून देतं, पण नातं टिकवतं ते व्यक्तिमत्त्व.
तरीही एक गोष्ट मान्य करावी लागेल की आजच्या जगात बाह्य सौंदर्याला जास्त किंमत आहे. सोशल मीडियाने ही प्रवृत्ती आणखी वाढवली आहे. फोटोला हजारो लाईक्स मिळतात, पण विचारांना तितकी दाद मिळत नाही. चेहऱ्यांची चर्चा होते, चारित्र्याची नाही. रूपाचं कौतुक होतं, पण माणुसकीची परीक्षा घेतली जात नाही.
मात्र इथेच आत्मपरीक्षणाची वेळ येते.
जर एखाद्या व्यक्तीचं रूप बदललं तर आपला दृष्टिकोन बदलेल का?
जर एखाद्या अपघातामुळे त्याच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या तर त्याच्याविषयीची आपली भावना तशीच राहील का?
जर तारुण्य निघून गेलं, केस पांढरे झाले, शरीरावर वयाच्या खुणा उमटल्या तर प्रेम तितकंच राहील का?
या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाने स्वतःच्या मनात शोधली पाहिजेत.
कारण खरं उत्तर शब्दांत नसतं, ते वर्तनात असतं.
आत्म्याच्या सुंदरतेबद्दल बोलणं खूप सोपं आहे. पण ती सुंदरता ओळखण्यासाठी संयम लागतो, समज लागते, संवेदनशीलता लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्वग्रह बाजूला ठेवावे लागतात. अनेकदा आपण स्वतःला जितके उदात्त समजतो, तितके प्रत्यक्षात नसतो. म्हणूनच हा प्रश्न इतरांना विचारण्यापूर्वी स्वतःला विचारणं अधिक आवश्यक आहे.
कदाचित म्हणूनच या प्रश्नाचं एकच ठाम उत्तर नाही.
काहीजण देहाचं सौंदर्य निवडतील, काहीजण आत्म्याची सुंदरता. पण जे खऱ्या अर्थाने प्रामाणिक असतील ते कदाचित म्हणतील की माणूस म्हणून आपण दोन्हींकडे पाहतो. फरक एवढाच की काही लोक ते मान्य करतात आणि काही लोक ते लपवतात.
शेवटी, देहाचं सौंदर्य नजरेला भुरळ घालू शकतं; पण आत्म्याची सुंदरता हृदयात स्थान निर्माण करते. रूप आकर्षण निर्माण करतं, पण स्वभाव विश्वास निर्माण करतो. चेहरा लोकांना जवळ आणू शकतो, पण मनच त्यांना आयुष्यभर जवळ ठेवू शकतं.
म्हणून या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापेक्षा कदाचित हा प्रश्न जिवंत ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे.
कारण जोपर्यंत माणूस स्वतःला विचारत राहील
"मी खरंच माणसाच्या मनावर प्रेम करतो की त्याच्या रूपावर?"
तोपर्यंत त्याच्या उत्तरात प्रामाणिकपणाची शक्यता जिवंत राहील.
आणि कदाचित हाच या प्रश्नाचा सर्वात सुंदर अर्थ आहे.
©® सचिन कमल गणपतराव मुळे...
ज.तु.स.प.जि.प्र.प्र.परभणी, ९७६७३२३३१५

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा