गुरुवार, २५ जून, २०२६

2972. वाल्या कोळी

 त्यांच्यासाठी कपडे लत्ते,
तिच्यासाठी साडी चोळी.
कुटुंबाच्या भल्यासाठी,
झटत होता वाल्या कोळी.

कुटुंबाचा कर्ता होता,
‘वाल्या’ला खूप मान होता.
वाल्या कोळी कुटुंबाची,
दिल-ओ-जिगर जान होता.

त्यांच्यासाठी… फक्त त्यांच्यासाठी
वाल्या कोळी जगत होता.
भली बुरी सारीच कामं,
वाल्या कोळी करत होता.

सकाळी खांद्यावर,
बर्ची घेऊन निघत असे.
नाक्यावर उभा राहून,
सावज आपलं हेरत असे.

खून, चोरी, डाका, दरोडा,
त्याला कसलंच भान नव्हतं.
‘पाप’ शब्द नाही असं,
आयुष्यात एकही पान नव्हतं.

एकदा त्याला नारद भेटले,
म्हणाले “वाल्या, काय करतोस?
का असा जाणून बुजून,
नरकाची तू वाट धरतोस?

“जा एकदा कुटुंबाला,
शांतपणे भेटून ये.
‘पापात वाटा घेता का?’
एव्हढं त्यांना पुसून ये.”

वाल्या उठला, बर्ची घेतली,
घराकडे चालू लागला.
‘नारदाची जिरणार’ म्हणून,
हळूच शीळ घालू लागला.

वाल्या घरी आला तेव्हा,
तिन्हीसांज झाली होती.
ताई, माई, अक्का सारी,
घराकडे आली होती.

वाल्यानं हात धुतले,
पाटावरती बसता झाला.
पहिला घास घेता घेता,
सवाल आपला पुसता झाला.

“अगं बाई, बाळांनो,
जरा सारे इकडे या.
मी काय सांगतो ऐका,
त्याच्याकडे लक्ष द्या.

“मी तुमचं रोज ऐकतो,
आज माझं ऐकणार का?
डोंगराएवढ्या ‘पापां’मधला,
थोडा वाटा घेणार का?”

सवाल ऐकताच कुटुंबात,
एकच हाहाकार झाला.
त्या दिवशी वाल्याला,
नवाच साक्षात्कार झाला.

किलबिल थांबली, हसू थांबलं,
सारे एकाजागी जमले.
आणि मग सारे जण,
एका सुरात म्हणू लागले.

“अरे वाल्या, नीट ऐक.
तुझ्याशिवाय अडत नाही,
‘पापामध्ये वाटेकरी?’
असं कधीच घडत नाही.

“खरं-खोटं, पाप-पुण्य,
तुझं काय ते तूच ठरव.
आम्हा फक्त एकच ठावं,
आमच्या तोंडात घास भरव.

“ह्या साऱ्या भाकडकथा,
आम्हाला तू सांगू नकोस.
हिशोब पाप-पुण्याचा,
आमच्या पुढं मांडू नकोस.

“आमचं पालनपोषण करणं,
हाच तुझा धर्म आहे.
आमच्यासाठी जगणं,
हेच तर तुझं कर्म आहे !”

फार पूर्वी बालपणी,
अशी कथा वाचली होती.
पण कधीकधी उगाच वाटतं,
ती ‘त्याची’ नव्हे ‘आपली’ होती !

जीवन ‘मिथ्या’ हे कळतं,
परंतु मनाला पटत नाही.
पैसा पैसा जमवण्याचा,
मोह काही सुटत नाही.

पैसा पैसा जमवताना,
आपण पार झिजून जातो.
आपल्या देखील नकळत,
एके दिवशी विझून जातो.

तसबिरीत गेलो की,
आठवण कुणी ठेवत नाही.
तेरा दिवस संपले की,
दिवा देखील तेवत नाही.

वाल्याला हे कळलं.
तुम्हाला कधी कळेल का?
वाल्यासारखा साक्षात्कार,
तुम्हालाही होईल का?

कुणा हाती असते झोळी,
कुणा माथी असते मोळी.
पण सत्य शेवटी एकच-
आपण सारेच ‘वाल्या कोळी’!

- अनामिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...