दोन वर्षांपूर्वी मी भारतातून अमेरिकेला परत येण्यासाठी मुंबईच्या विमानतळावर बसले होते. समोरच एक आजी आजोबा बसले होते. त्यांची पहिलीच ट्रिप असावी. आजोबांचं वय असेल साधारण पंचाहत्तर व आजी असेल सदुसष्ठ- आडूसष्टची.
दोघं बावरून गेली होती पण आजी तिचं बावरणं लपवत नव्हती. तिनं आजोबांना काहीतरी विचारलं.
ते खेकसले- “मला काय माहित?”ती हिरमुसली होऊन गप्प बसली. तिनं माझ्याकडे बघितलं.
मी हसून तिला म्हटलं, “बाळंतपणासाठी चाललात का?”
तेवढ्यात आजोबा बाथरूमला गेले त्यामुळे तिला जरा मोकळं वाटत असावं.
“नाही हो.. मुलानं लग्न ठरवलय..अमेरिकन मुलीशी. हे फार चिडलेत. नाहीतरी कोणावरही चिडले की माझ्यावरच राग काढतात. खेकसतात. मला नवं नाही हे. पण त्या सुनेशी आम्ही काय बोलणार हो? आमचं मोडकंतोडकं इंग्रजी तिला कळणार का? आमच्या भावना तिला कळणार का? सगळंच अशुद्ध आणि अवघड झालंय”
“आजी, केवळ अमेरिकन मुलगी आहे म्हणून काळजी करू नका. जगात सर्वत्र चांगले आणि वाईट लोक असतात. मी अशा काही अमेरिकन सुना बघितल्या आहेत ज्या सगळे भारतीय रिती-रिवाज शिकतात. प्रेमानं सगळ्यांचं करतात!” मी खरं तेच सांगितलं.
“अहो पण आता आमच्या मुलाचा भारत संपला.. ती काही त्याला भारतात येऊ देणार नाही.” आजीच्या मनातील कोलाहल चेहऱ्यावर दिसत होता.
ते बाकी खरं होतं म्हणून मी काही बोलले नाही पण माझ्या पोटात तुटलं. ज्या ओढीने भारतीय मुलगी भारतात जाईल त्या ओढीने कोणतीही अमेरिकन मुलगी भारतात जाणार नाही हे खरंच आहे.
“आम्हाला परत परत अमेरिकेत येणं जमणार नाही हो. फार लांबचा प्रवास आहे. झेपत नाही.” आजीनी लहान चेहरा करून सांगितलं..
“आजी, भारतात आई वडिलांपासून जी मुलं लांब रहातात ती तरी दरवर्षी आई वडिलांकडे जातात का? खरं सांगू का तुम्हाला? मुलं घरातून बाहेर पडलं की ती नेहमी भेटतील ही अपेक्षांच ठेवायची नाही म्हणजे असा त्रास होत नाही!”
आजीनी होकारार्थी मान हलवली. आजोबा क्रुध्द चेहऱ्याने बाथरूमहून येऊन आजीजवळ बसले. सारी अगतिकता चेहऱ्यावर दिसत होती..
मी गेली चाळीस वर्षं अमेरिकेत रहात आहे आणि माणूस हा इथून तिथून सारखा असतो हे माझं मत आहे. आड येतात रूढी, परंपरा.. संस्कृती, भाषा, अन्न..कपडे, हवामान आणि या सगळ्यापेक्षाही आपले पूर्वग्रह!
मन मोकळं करणं हा गुन्हा आहे असे समजणाऱ्या पुरूषांपैकी एक आजोबा असावेत..
“आजोबा, कुठलाही पूर्वग्रह न बाळगता सुनबाईचे स्वागत करा. भारतीय माणसं उत्तम इंग्रजी बोलतात. फक्त अमेरिकन ॲंक्सेंट कळण्यासाठी काही लहान मुलांचे शो युट्यूब वर बघा. Sesame Street, Dr Roger’s Neighborhood सारखे. सुनबाईला गेल्या गेल्या सांगा की We welcome you to our family. सगळं उत्तम होईल!” आजोबांनी सगळं ऐकून घेतलं.
“बरं!” एवढा एकच शब्द बोलले पण कपाळावरच्या आठ्या कमी झाल्या होत्या. आजींवर खेकसणं कमी झालं होतं..
विमानात ते दोघे माझ्या मागेच बसले होते..
“हा आमचा मोबाईल नंबर.” दोघांनी मोबाईल नंबर दिले.
“काही लागलं तर मला जरूर फोन करा!” आजीनी माझ्या पाठीवरून हात फिरवला व तुम्हीच करा फोन असं सांगितलं..
दोन महिन्यांनी मी त्यांना फोन केला.
“अहो, चांगली आहे सुनबाई. हो, नाही, नको वगैरे शब्द बोलते आहे. लेक दरवर्षी भारतात येतोच. ते तसचं चालू राहिलं म्हणाला. पण सुनबाई सतत त्या गुडघ्यापर्यंत लांबीच्या चड्ड्या व त्यावर एक टी शर्ट घालते त्याची आम्हाला सवय नाही!” आजीनी हसत सांगितलं..
“अहो, हल्ली भारतात मुली हेच घालतात.. का उगीच
नावं ठेवता?” आजोबा तिकडून ओरडले..पूर्वग्रह ठेवायचा नाही म्हणजे सगळं जमतं.. बरका हो रानडे बाई! Thank you for your advice!”
“Proud of you both! आजी गुडघ्यापर्यंत लांब आहे चड्डी यात धन्यता माना..” ते दोघे मनापासून हसले.. छान वाटलं तुम्ही दोघं खुषीत आहात ते पाहून! Keep watching Sesame Street. आता Bluey and Cocomelon पण बघायला सुरुवात करा! जे कळत नाही ते न लाजता स्पष्ट विचारा आणि सुनबाईला जे हवं नको ते पण स्पष्ट सांगायचं.. ती चार वाजता चहा देईल का याची वाट बघत बसायचं नाही!”
आजी आजोबांना या सुचनांची मदत झाली असं वाटतं. आपल्यापैकीही जे लोकं अमेरिकेला येत आहेत त्यांनाही या सूचनांची मदत होऊदे! लक्षात ठेवायचं की अमेरिकेत वाढलेली भारतीय मुलगी सुद्धा अमेरिकनच असते. भारतीय रूढी परंपरा माहित असल्या तरी विचार करायची पध्दत अमेरिकनच असते. तिलाही हेच नियम लागू आहेत!
Hope this helps! इतर अनेक मुद्दे आहेत पण आत्ता एवढेच!
©® ज्योती रानडे
2025 JyotiRanade. All rights reserved.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा