गुरुवार, २५ जून, २०२६

2903. न बोललेल्या भावनांचे अंतर

     माणसाच्या आयुष्यातील सर्वात गुंतागुंतीची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे “मन”. प्रत्येकाच्या मनात भावना असतात, प्रेम असतं, काळजी असते, अपेक्षा असतात; पण त्या प्रत्येकाला शब्दांत व्यक्त करता येतातच असं नाही. काही लोक प्रेम मोठ्याने बोलून दाखवतात, तर काही लोक शांतपणे ते जगत असतात. पण प्रश्न असा आहे की, जर भावना व्यक्तच केल्या नाहीत तर समोरच्या व्यक्तीला त्या कशा कळणार?
    आपण अनेकदा नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होण्याचं कारण पाहिलं तर त्यामागे “न बोललेले शब्द” असतात. मनात प्रेम असतं, पण ओठांवर येत नाही. काळजी असते, पण ती दाखवली जात नाही. मग समोरची व्यक्ती आपल्या अनुभवांवरून निष्कर्ष काढते. कारण माणूस अंतर्यामी नसतो. कोणाच्याही मनात डोकावून पाहण्याची शक्ती कुणाकडे नसते. आपल्याला जे दिसतं, जे जाणवतं, त्यावरूनच आपण समोरच्याचं प्रेम, आपुलकी किंवा तिरस्कार मोजत असतो.
    एका चित्रपटातील प्रसंगात हिरो म्हणतो, “माझे वडील माझ्यावर प्रेमच करत नाहीत. त्यांनी मला कधी समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही.” त्यावर हिरोईन म्हणते, “तू गैरसमज करून घेऊ नकोस. ते तुझ्यावर खूप प्रेम करतात, पण ते दाखवत नाहीत.” मग हिरोचं उत्तर अत्यंत वास्तव वाटतं “जे मला दिसतं, जे मला जाणवतं, त्यावरूनच मी निष्कर्ष काढणार ना जर त्यांनी मला त्यांच्या मनातलं सांगितलंच नाही, तर मला कसं कळणार?”
     हे वाक्य फक्त चित्रपटापुरतं मर्यादित नाही; ते प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेलं आहे. अनेक घरांमध्ये वडील मुलांवर जीवापाड प्रेम करतात, पण ते कधी मिठी मारून सांगत नाहीत. त्यांचं प्रेम जबाबदाऱ्यांमध्ये दिसतं शिक्षणासाठी केलेला संघर्ष, कुटुंबासाठी घेतलेले कष्ट, मुलांच्या भविष्याची चिंता. पण मुलांना अनेकदा ते प्रेम “दिसत” नाही. कारण भावना केवळ कृतीत नसतात, त्या शब्दांतही असाव्या लागतात.
      आईचं प्रेम सहज जाणवतं, कारण ती ते सतत व्यक्त करते काळजीने, स्पर्शाने, शब्दांनी. पण वडिलांचं प्रेम बहुतेक वेळा शांत असतं. त्यामुळे अनेक मुलं मोठी होताना मनात एक पोकळी घेऊन जगतात की “बाबांनी कधी माझ्यावर प्रेम दाखवलंच नाही.” आणि कदाचित वडीलही मनातून म्हणत असतील, “मी इतकं सगळं केलं, तरी मुलाला माझं प्रेम कळालं नाही.” या दोघांमधील अंतर निर्माण होतं ते फक्त संवादाच्या अभावामुळे.
     भावना व्यक्त करणं ही कमजोरी नसते. उलट ती नातं टिकवण्याची सर्वात मोठी ताकद असते. आजच्या काळात माणसं खूप व्यस्त झाली आहेत. प्रत्येकजण स्वतःच्या संघर्षात अडकला आहे. त्यामुळे “त्याला आपोआप कळेल”, “ती समजून घेईल”, “माझ्या कृतीतून दिसतंच आहे” अशा अपेक्षा ठेवणं धोकादायक ठरतं. कारण प्रत्येक माणसाची समज, अनुभव आणि भावनिक गरज वेगळी असते.
     कधी कधी एखाद्या व्यक्तीला फक्त एवढंच ऐकायचं असतं “मी तुझ्यासोबत आहे”, “मला तुझी काळजी आहे”, “तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस.” हे शब्द साधे असतात, पण त्यांची ताकद प्रचंड असते. हे शब्द नात्यांना उब देतात, विश्वास देतात आणि मनातील शंका दूर करतात. नात्यांमध्ये प्रेम असण्याइतकंच ते व्यक्त होणंही आवश्यक असतं.
     बर्‍याच वेळा आपण अहंकारामुळे भावना लपवतो. “मी आधी का बोलू?”, “त्यालाच कळायला हवं”, “मी इतकं करतो, तरीही समजत नाही का?” अशा विचारांमुळे माणूस शांत राहतो. पण ही शांतता हळूहळू नात्यांमध्ये दरी निर्माण करते. समोरची व्यक्ती आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करते, पण जेव्हा तिला फक्त थंडपणा, दुर्लक्ष किंवा कठोर वागणूक जाणवते, तेव्हा ती दूर जाऊ लागते.
      खरंतर प्रत्येक माणूस प्रेमाची खात्री शोधत असतो. फक्त मनात प्रेम असणं पुरेसं नसतं; ते समोरच्याला जाणवलं पाहिजे. कारण नातं हे केवळ भावना नसून त्या भावनांचा संवाद असतो. जर संवादच नसेल, तर गैरसमज निर्माण होणं स्वाभाविक आहे. आपण अनेकदा गृहीत धरतो की समोरच्याला आपल्या भावना कळतात. पण वास्तवात प्रत्येक माणूस स्वतःच्या वेदना, भीती आणि अपेक्षांमध्ये अडकलेला असतो. त्यामुळे तो आपल्या शांततेचा अर्थ चुकीचा काढू शकतो. कधी कधी एक न बोललेला शब्द आयुष्यभराचं अंतर निर्माण करतो. आणि कधी एक साधं वाक्य “मला तुझी काळजी आहे” एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतं.
     नाती टिकवण्यासाठी प्रेमाइतकाच संवाद आवश्यक आहे. मनातलं योग्य वेळी बोलून दाखवणं गरजेचं आहे. कारण वेळ निघून गेल्यावर अनेक भावना फक्त पश्चात्ताप बनून राहतात. काही लोक आयुष्यभर हेच म्हणत राहतात “काश मी त्या वेळी माझ्या मनातलं सांगितलं असतं.”
      म्हणूनच, आपल्या माणसांना वेळोवेळी सांगायला हवं की ते आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. प्रेम असेल तर व्यक्त करा. काळजी असेल तर दाखवा. कारण नाती मनाने जुळतात, पण शब्दांनी टिकतात. आणि शेवटी माणूस तेच मानतो जे त्याला दिसतं, ऐकू येतं आणि जाणवतं. मनात लपवून ठेवलेल्या भावनांना अर्थ तेव्हाच मिळतो, जेव्हा त्या समोरच्या हृदयापर्यंत पोहोचतात.

©® सचिन कमल गणपतराव मुळे
ज.तु.स.प.जि.प्र.प्र.परभणी, ९७६७३२३३१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...