गुरुवार, २५ जून, २०२६

2907. खोटं

त्या दिवशी सकाळी जाग आली
ती ‘अलार्म’मुळं नाही…
तर बायकोच्या शांततेमुळं.
लग्नात काही शांतता या धोकादायक असतात.
विशेषतः बायको नेहमीपेक्षा जास्त शांत असेल
तर समजायचं…
आत कुठंतरी ‘चौकशी आयोग’ बसलाय.

ती खिडकीजवळ उभी होती.
हाताची घडी घातलेली.
चेहऱ्यावर हलकंसं स्मित.
भारतीय नवऱ्यांच्या अनुभवात
या एक्स्प्रेशनला
‘वादळापूर्वीची शांतता’ म्हणतात.

दोन सेकंदांनी प्रश्न आला…
“काल रात्री किती वाजता आलास तू?”

हा प्रश्न नसतोच खरंतर…
हा एक ‘सायकोलॉजिकल ट्रॅप’ असतो.
कारण तिला वेळ माहित असते.
तिला ‘लोकेशन’ माहित असतं.
कदाचित ‘सीसीटीव्ही फुटेज’ही असतं.
ती फक्त बघत असते…
आपण किती ‘क्रिएटिव्ह’ खोटं बोलतो ते.

मी डोळे चोळत निरागस चेहरा केला.

हा चेहरा प्रत्येक नवरा लग्नानंतर
‘नॅचरली’ शिकतो…
जसं काही पक्षी ‘मायग्रेशन’ शिकतात,
तसं विवाहित पुरुष
‘इनोसंट एक्सप्रेशन्स’ शिकतात.

मी शांतपणे म्हणालो,
“अगं… बसलो होतो मित्रांबरोबर.”
हे वाक्य भारतीय नवऱ्यांच्या ‘डीएनए’ मध्ये
‘प्री-इन्स्टॉल्ड’ येतं.
सिच्युएशन कोणतीही असो… उत्तर हेच.

तिला माहित होतं मी खोटं बोलतोय.
मला माहित होतं, तिला माहित आहे.
आणि तरीही संसार
अगदी व्यवस्थित चालू होता.

लग्न म्हणजे खरंतर दोन माणसांनी
एकमेकांची काही निवडक खोटी वाक्यं
प्रेमानं दुर्लक्षित करण्याचा केलेला
पवित्र करार असतो...असायला पाहिजे.

मी चहा घेऊन बाल्कनीमध्ये आलो.
मुंबई नेहमीप्रमाणे धावत होती.
एका हातात डबा, दुसऱ्या हातात मोबाईल 
आणि चेहऱ्यावर ‘उशीर झालाय’
हा परमनंट भाव घेऊन लोक पळत होते.

समोरच्या इमारतीतले काका नेहमीप्रमाणे
बाल्कनीमध्ये उभे राहून
सगळ्यांवर लक्ष ठेवून होते. 
आमच्या सोसायटीत ‘सीसीटीव्ही’ची गरज नाही.
समोरचे काका आहेत.

मी चहा घेऊन बसलो.
आई देवाजवळ दिवा लावत होती.
ती माझ्याकडे बघून म्हणाली,
“तुमच्या वेळी बरं होतं. मोबाईल नव्हते…
अभ्यास तरी व्हायचा.”

मी हसलो.

आमच्या जनरेशनला सांगितलेलं
सर्वात मोठं खोटं म्हणजे…
“फक्त दहावीपर्यंत अभ्यास कर.
मग आयुष्यभर मज्जा!”
त्या काळी खरंच वाटायचं…
दहावी म्हणजे महाभारताचं युद्ध आहे. 
ते जिंकलं की पुढे फक्त आनंदी आनंद.

आम्हीही अभ्यास केला. ‘गाईड’ आणल्या.
‘इंपॉर्टन्ट क्वेश्चन्स’ मार्क केले.
काही मित्रांनी तर उत्तरपत्रिकेवर
‘जय बजरंगबली’ लिहिलं होतं.

रिझल्ट लागला. पेढे वाटले गेले.
आणि दोन महिन्यांनी ‘बारावी’ नावाचा
दुसरा राक्षस समोर उभा राहिला.
त्यानंतर करिअर. मग पैसा. 
मग व्यवसाय. मग इएमआय. 
मग ‘कोलेस्टेरॉल’. मग ‘व्हिटॅमिन डी’.
आता तर सकाळी उठल्यावर शरीरात
कुठं दुखत नाही याचंच आश्चर्य वाटतं.
पूर्वी ‘रिपोर्ट कार्ड’ लपवायचो…
आता ‘मेडिकल रिपोर्ट’.

मी केस कापायला गेलो.
आमच्या बार्बरचं नाव राजू.
हा माणूस कात्रीपेक्षा
‘कॉन्फिडन्स’ जास्त वापरतो.
तो माझ्या डोक्याकडे बघत म्हणाला,
“सर, अजून खूप ‘हेअर’ आहेत तुमच्याकडे.”
हे ऐकून मला त्याला प्रेमानं
मिठी मारावीशी वाटली
व त्याचं चुंबन घ्यावंसं वाटलं.
माणूस आयुष्यात कितीही प्रॅक्टिकल झाला
तरी स्वतःच्या केसांबद्दल
तो कायम इमोशनल असतो.
तो पुढं म्हणाला, “थोडं ‘स्पा’ करू?
दहा वर्षांनी यंगर दिसाल.”

केस कापून झाल्यावर त्यानं आरसा दाखवला.
त्या ॲन्गलमध्ये मी स्वतःला
हृतिक रोशन आणि मिलिंद सोमण 
यांच्या मधला काहीतरी वाटत होतो.
घरी आल्यावर मात्र बाथरूमच्या आरशात
मला माझी ‘रिॲलिटी’ दिसली.

बसस्टॉपवर जुना मित्र भेटला.
जुन्या मित्रांचं एक वैशिष्ट्य असतं…
ते तुमच्या वयाचा अजिबात आदर करत नाहीत.
तो लगेच कोपरानं ढोसत म्हणाला,
“ए सोंडक्या… ती बघ…
ती तुझ्याकडेच बघतेय.”

क्षणभर… खरंच क्षणभर…
माझ्यातला कॉलेजमधला ‘मी’ जागा झाला.
मी नकळत शर्टची कॉलर सरळ केली.
पोट आत घेतलं.
हे पोट आत घेणं म्हणजे आमच्या वयातलं
‘ॲडव्हान्स्ड योगा’ असतं.

ती मुलगी जवळ आली.
छातीतील धडधड वाढली.
ती म्हणाली,
“काका, जरा बाजूला व्हाल का?
बस नंबर दिसत नाहीये.”

‘काका……!!!’

हा शब्द म्हणजे पुरुषांच्या तारुण्यावर
सरकारनं मारलेला ‘इनकमिंग वृद्धत्वा’चा
‘ऑफिशिअल स्टॅम्प’ असतो.
त्या क्षणी माझ्या चेहऱ्यावर हास्य होतं…
पण आत कुठंतरी एक छोटासा
‘अमिताभ बच्चन’ बाकावर बसून
शांतपणे वृद्धत्व स्वीकारत होता.

बस आली.
आत एवढी गर्दी होती की
लोक स्वतःच्या पायावर उभे आहेत
की दुसऱ्याच्या हे कळत नव्हतं.
एकाचा डबा माझ्या पाठीला लागला होता.
एक काका माझ्या खांद्यावर
झोपण्याचा प्रयत्न करत होते.
कंडक्टर ओरडला,
“मागची बस रिकामी आहे!”

मुंबईकर आशेवर जगतो.
त्याला माहित असतं समोर खोटं आहे…
तरी तो धावतो.
मीही उतरलो.
मागची बस आली.
ती खरंच ‘रिकामी’ होती…
डेपोत जात होती.

दुपारी एक मित्र भेटला.
नुकताच त्याच्या मुलाला नोकरी लागली होती.
चेहऱ्यावर अभिमान
आणि डोळ्यांत काळजी दोन्ही होत्या.
तो म्हणाला, “पहिला जॉब लागलाय.
पगार कमी आहे म्हणे…
पण शिकायला खूप मिळतं.”

हे वाक्य ऐकलं की मला आयुष्यात भेटलेले
सगळे ‘फ्रेशर्स’ आठवतात.
पहिल्या नोकरीत प्रत्येकाला वाटतं…
ऑफिस म्हणजे ‘फॅमिली’ आहे.
बॉस म्हणजे ‘मेन्टॉर’ आहे
आणि ओव्हरटाईम म्हणजे ‘ग्रोथ’.

दोन महिन्यांनी तोच मुलगा
रात्री अकराला लॅपटॉपसमोर बसून
‘मॅगी’ खात असतो आणि
‘गुगल’वर सर्च करत असतो...
‘स्ट्रेसमुळं केस गळतात का?’

आमच्या काळातला एक मित्र
नोकरी लागल्यावर
भारी उत्साहात म्हणाला होता,
“पॅकेज कमी आहे रे…
पण ‘एक्सपोजर’ भारी मिळेल.”

सहा महिन्यांनी भेटला…
‘एक्सपोजर’ एवढं मिळालं होतं की
डोळ्यांखाली काळी वर्तुळं
आणि हातात ॲसिडिटीच्या गोळ्या होत्या.

मी विचारलं,
“काय रे? शिकायला मिळतंय ना?”
तो शांतपणे म्हणाला,
“हो… आता माणसं ओळखायला शिकतोय.”

दुपारी कपडे घ्यायला गेलो.
ट्रायल रूममधून एक विचित्र रंगाचा
शर्ट घालून बाहेर आलो.
आरशात स्वतःकडे बघून मला वाटलं…
‘हा शर्ट घालून मी चाललो,
तर ट्रॅफिक पोलिस मला
‘सिग्नल’ समजून उभं करतील.’

पण सेल्समन लोकांचा कॉन्फिडन्स
हे जगातलं आठवं आश्चर्य आहे.
तो लगेच म्हणाला,
“सर… हा रंग तुमच्यावर उठून दिसतो.”

‘उठून दिसतो’ म्हणजे काय?
लोकांनी मला पाहून
‘गणपती डेकोरेश मधला
पडदा पळवला का?’
असा प्रश्न विचारावा, 
इतका उठून दिसत होता.

पण गंमत म्हणजे,
आपण तो शर्ट विकत घेतोच.
कारण सेल्समन खरंतर शर्ट विकत नाही…
तो ‘कॉन्फिडन्स’ विकतो!

संध्याकाळी डॉक्टरकडे 
रूटीन चेकअपसाठी गेलो.
डॉक्टर रिपोर्ट्स बघत म्हणाले,
“नथिंग सिरियस… फक्त वॉकिंग करा.”

डॉक्टर लोकांचं ‘फक्त वॉकिंग करा’
म्हणजे प्रॅक्टिकली
‘आयुष्यातली सगळी मजा बंद करा’,
असा अर्थ असतो…
भजी बंद. मिसळ बंद. साखर बंद.
लेट नाईट बंद. स्ट्रेस बंद.

मला नेहमी वाटतं ‘डॉक्टर्स’ आणि ‘वाईव्ह्ज’
यांचं ‘सिक्रेट असोसिएशन’ असावं.
दोघांचं अंतिम टार्गेट एकच असतं.
‘आवडीच्या गोष्टी बंद करा!’

मी बाहेर आलो.
मित्रानं विचारलं, “काय म्हणाले डॉक्टर?”
मी सहज म्हणालो,
“काही नाही रे… सगळं नॉर्मल आहे.”
माणूस ‘रिपोर्ट्स’पेक्षा जास्त खोटं
स्वतःला सांगत असतो.

घरी आलो तर बायको बॅग भरत होती.
“उद्या माहेरी जातेय दोन दिवस.”

आता प्रत्येक ‘मॅरिड’ पुरुषाच्या आत
एक छोटासा ‘बॅचलर’ शेवटचा श्वास घेत
अजून जिवंत असतो.
तो लगेच जागा झाला.
पण वरून मी चेहऱ्यावर दुःखी भाव आणले.
“तू नसलीस की घर खायला उठतं गं…”

ती हसली.
आणि मी आतून ‘फ्रीडम’ची
‘नॅशनल ॲन्थम’ वाजवली.

ती गेल्यावर पहिल्या दिवशी
खरंच मज्जा वाटली.
टिव्हीवर क्रिकेट.
हॉलमध्ये पाय पसरून बसलो.
जेवायला बिर्याणी मागवली.
मित्रांना फोन केले…
मनसोक्त गप्पा मारल्या.
रात्री दोन वाजेपर्यंत मूवी पाहिला.

सकाळी उठलो…
आणि घरात भयानक शांतता.
कुणी ओरडत नव्हतं.
कुणी ‘आंघोळ करून घ्या’ म्हणत नव्हतं.
कुणी ‘कांदे संपलेत’ सांगत नव्हतं.

आणि अचानक जाणवलं…
आपण ज्याला रोज ‘कटकट’ म्हणतो ना,
तीच खरंतर घर जिवंत असल्याची
खूण असते!

मी शांतपणे तिला फोन केला.
“ए… कधी येतेयस?”
ती दोन सेकंद शांत राहिली.
दुसऱ्या दिवशी ती घरी आली.
घरात शिरल्याशिरल्या पहिलं वाक्य म्हणाली,
“हा टॉवेल परत बेडवर टाकलात ना?”

मी तिच्याकडे बघत हसलो.
कारण त्या क्षणी जाणवलं…
हो. घर परत जिवंत झालं होतं!

त्या रात्री मुंबईकडे बघत होतो.
लाखो दिवे चमकत होते.
प्रत्येक घरात कुणीतरी कुणाला तरी
एखादं छोटंसं ‘खोटं’ बोलत असेल.

“मी पोहोचलो.”
“मी ठीक आहे.”
“काळजी करू नको.”
“सगळं ठीक होईल…”

आणि गंमत म्हणजे…
हे बोलताना समोरच्यालाही माहित असतं,
की आपण पूर्ण खरं बोलत नाहीये.

माणूस जगाशी कमी…
स्वतःशी जास्त खोटं बोलतो.
आणि शेवटी…
पूर्ण सत्य पचवायची ताकद कुणातच नसते.

म्हणून बहुतेक देवानंही माणसाला
एक सुंदर देणगी दिली असावी…
थोडा ‘विसर’…
आणि काही गोड ‘खोटी’ वाक्यं !

- आनंद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...