गुरुवार, २५ जून, २०२६

2945. समर्पण !

 दोघेही तसे खूप लहान होते. तेरा चौदा वर्षांचे. अबोध, अजाण, अडनीड वयाचे !
साहिलचे आई वडील दोघेही शासकीय नोकरीत होते, शासकीय नोकरीमुळे ते ब-यापैकी सुखवस्तू होते आणि नुकतेच त्यांच्याच गावी बदली होऊन ते आले होते. गाव तालुक्याचं होतं तरी ते तसं छोटंच होतं.
सायली ही एक गरीब कुटुंबातली मुलगी होती. दोन वर्षांपूर्वी तिचे वडील वारले होते. घरात ती, तिची आई, एक लहान भाऊ होते. तिची आई तिच्या वडिलांचं किराणा मालाचं दुकान चालवायची. त्यांचा प्रपंच जेमतेमच चालला होता.
साहिलने शाळेत आठव्या इयत्तेत प्रवेश घेतला. त्याच्याच वर्गात सायली होती. पहिल्या दिवशी तो वर्गात शिरला. सायलीने त्याला पाहिले आणि नकळत तिचे दोन डोळे त्याच्यावर रोखले गेले. त्याला काही कल्पना येण्याची शक्यता नव्हती. कुणाही मुलाकडे न पाहाता तो एका रिकाम्या बेंचवर जाऊन बसला. तो अशा बेंचवर बसला होता की डावीकडे मान थोडी तिरकी केली की त्याला सायली दिसावी.
दोन चार दिवसांतच त्याच्या लक्षात आले होते की मान थोडी तिरकी केली की सायली त्याच्याकडेच बघत असते. त्याला कळेना, ती आपल्याकडेच का पाहात असते? थोड्या थोड्या वेळानंतर नकळत त्याचीही मान डावीकडे तिरकी व्हायला लागली. 
सात आठ दिवसांनी न राहवून त्याने तिला विचारलंच ! तो म्हणाला, "काय गं, तू सतत माझ्याकडे का पाहात असतेस ?"
ती चेष्टेच्या स्वरात म्हणाली, "मी कशाला तुझ्याकडे बघू ? तू काय कार्टून आहेस का? आणि तू कशावरून म्हणतोस, मी तुझ्याकडेच बघत असते म्हणून ?"
तो म्हणाला, "मी डावीकडे मान थोडी तिरकी केली की प्रत्येक वेळी तू माझ्याकडे बघतेयंस हेच मला दिसतं."
ती म्हणाली, "पण तू तुझी मान डावीकडेच तिरकी कशाला करतोस ? मी तुझ्याकडे पाहातेय की नाही हे पाहाण्यासाठीच ना ? नाव काय तुझं ?"
तो म्हणाला, "साहिल. तुझं ?"
ती म्हणाली, "सायली."
तेवढ्यात शिक्षक वर्गात आले आणि त्यांचं बोलणं तिथेच थांबलं.
नंतर त्यांचा तो क्रम तसाच चालू राहिला. आठ दहा दिवसांनी साहिलनं तिच्याकडे पाहून स्मित केलं. तिनेही गालभर स्मित करून त्याला तसाच प्रतिसाद दिला. तिच्या गालावर पडलेली खळी त्याला आवडली. नंतर नंतर नजरानजर झाली की दोघेही एकमेकांना स्मित द्यायचे. एकमेकांशी न बोलता त्यांची मैत्री हळुहळू वाढत गेली.
जवळजवळ एक वर्ष असंच जात गेलं. दोघांना एकमेकांबद्दल वाटणारी ओढ कणाकणाने वाढत होती. दोघांमध्ये दोनदाच चार सहा वाक्यांचं बोलणं झालं होतं.
सायलीला शनिवार रविवारच्या दोन वर्तमानपत्राच्या पुरवण्या वाचनाचा छंद लागला होता. अधूनमधून ती ललित मासिकं वाचायची. त्यातले वैचारिक, साहित्यिक लेख वाचून नकळत तिचा प्रगल्भपणा वृद्धिंगत होत होता.
परीक्षेपूर्वी एकदा तो तिला म्हणाला, "तू गणितात खूप हुशार आहेस. तुझं गणिताचं वर्कबुक मला दे. मला काही गणितं समजलेली नाहीत."
ती म्हणाली, "मी सगळ्याच विषयात हुशार आहे. तुला दुस-या सगळ्या विषयांचे वर्कबुक देते पण गणिताचं वर्कबुक तुला कधीच देणार नाही."
नकळत तिचं दफ्तर हिसकावून घेत तो म्हणाला, "देणार नाही म्हणजे काय ? मला हवं ते मी तुझ्याकडून हिसकावून घेईन."
ती म्हणाली, "घे हिसकावून ! मी काय विरोध करू शकणार आहे का तुला ? पण त्या वर्कबुकबद्दल तू माझ्याशी नंतर काही बोलायचं नाहीस हे तू कबूल कर."
तो म्हणाला, "कबूल करतो, नाही बोलणार काही !"
ती गणिताचंच वर्कबुक का देत नव्हती हे जाणून घ्यायला तो उत्सुक होता. घरी जाऊन त्यानं तिच्या वर्कबुकची सगळी पानं चाळली. शेवटच्या पानावर तिने 'साहिल साहिल' असं पूर्ण पानभर बारीक, सुंदर अक्षरात लिहिलं होतं. आपण तिला आवडतो हे तो जाणून होता तरी तिने पूर्ण पान आपल्या नावाने भरून काढलं हे पाहून तो थोडासा चकित झाला तसा खूप सुखावलाही !
तिने लिहिलेल्या पानाच्या मागच्या बाजूला पूर्ण पानभर त्यानेही 'सायली सायली' असं लिहून काढलं तेव्हा त्याला बरं वाटलं.
दुस-या दिवशी तिला तिचं वर्कबुक परत तो म्हणाला, "मला तुझं हे वर्कबुक चार दिवसांनी परत एकदा दे."
घरी गेल्यावर तिने वर्कबुक पाहिलं आणि 'वेडा !' असं म्हणत खुश होऊन तिच्या चेह-यावर हसू उमटलं.
चार दिवसांनी त्याने तिच्या वर्कबुकमधलं ते पान फाडून, घडी करून खिशात ठेवत तो म्हणाला, "आयुष्यभर हे माझ्या पाकिटात जपून ठेवेन."
परीक्षा झाली. आजूबाजूला कुणी नाही हे पाहून साहिल म्हणाला, "सायली, उद्या संध्याकाळी आपण गावाबाहेरच्या आमराईपलिकडच्या नदीवर जाऊ या का ?"
ती म्हणाली, "हो, मला आवडेल !"
दुस-या दिवशी दोघे एका मोठ्या दगडावर बसून नदीच्या पाण्यात पाय सोडून गप्प बसले होते. नकळत त्याने तिला एका हाताने जवळ ओढलं तशी ती मोहोरली होती.
तासभर तिथे बसून दोघे उठले तसं तो म्हणाला, "तासभर आपण गप्प गप्पच होतो. तू काहीच बोलली नाहीस."
ती म्हणाली, "तू तरी कुठे काय बोललास ? नुसता माझ्याकडे पाहात होतास !"
तो म्हणाला, "आणि तू नजर चोरत  राहिलीस. काही तरी बोल ना !"
ती म्हणाली, "काय बोलू ? आपण इथं आलो. तू सोबत आहेस म्हणून मी खूप खुश होते."
त्याने विचारले, "का ?"
चेष्टेच्या स्वरात ती म्हणाली, "बावळट कुठला ! इतकंही तुला समजत नाही का ? एक मुलगी एका मुलाबरोबर असली की का खुश होते ते ?"
तो म्हणाला, "मी तुला चांगलं जाणायला लागलोय पण मला तुझ्या तोंडाने ऐकायचंय !"
ती संकोचत अडखळत म्हणाली, "तू मला खूप आवडतोस."
तिचे हात आपल्या हातात घेऊन तो म्हणाला, "तूसुद्धा मला खूप आवडतेस !"
अजून दोन वर्षे अशीच गेली. दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल पराकोटीचा अनुराग उत्पन्न झाला होता. दोघे एकमेकांमध्ये जास्त जास्त गुंतत गेले होते. शाळेत ते अधूनमधून एकमेकांशी मोकळेपणाने बोलायला लागले होते. अधूनमधून दोघे नदीवर जाऊन त्याच दगडावर शांत बसून राहात.
एकदा ती म्हणाली, "मला ना, तुझ्याशी बोलत राहाण्यापेक्षा तुझ्या डोळ्यांत पाहात बसायला खूप आवडतं. किती बोलके डोळे आहेत ना तुझे ! सरळ माझ्या अंतःकरणाचा भेद घेतात, मी स्वतःला हरवून बसते. बस्, माझ्या हृदयातल्या भावनेनं तुझ्या हृदयाला स्पर्श करायचं आणि तुझ्या हृदयातल्या संवेदनाची अनुभूती घेत बसायचं. माझं मन खूप सुखावतं !"
तो म्हणाला, "तूसुद्धा खूप सुंदर आहेस, मोहक आहेस. तू हलकंसं स्मित करतेस ना, ते पाहून मी तुझ्याकडेच पाहातच राहातो. माझं भान हरपतं. किती सुंदर खळी पडते तुझ्या दोन्ही गालावर !"
दहावीची परीक्षा झाली. निकालही आला. दोघांनाही नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळाले होते. गावात काॅलेज नसल्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला पुण्याला चांगल्या काॅलेजात शिकायला पाठवायचं ठरवलं होतं.
नदीच्या पात्रात पाय सोडून बसल्यावर तो म्हणाला, "सायली, तुला सोडून मला पुण्याला शिकायला जावं लागणार आहे. मेडिकल शिक्षण घेऊन, नंतर पीजी करून तज्ज्ञ डाॅक्टर बनायची माझी इच्छा आहे. आई बाबांचीही तशीच इच्छा आहे. मी खूप मेहनत करून डाॅक्टर झालेलं तुला दाखवून देईन. गेली तीन वर्ष आपली ओढ कणाकणाने वाढत गेलीय. मी तुला क्षणभरही विसरणार नाही. तुझी आठवण आली की तुझ्या फोटोशी मी बोलत जाईन. मी एक मोठा डाॅक्टर झाल्यावर आपण लग्न करू."
ती म्हणाली, "साहिल, मलाही तुझी नितांत ओढ वाटते. आठवीत आपलं वय इतकं नव्हतं की प्रेम म्हणजे काय हे कळावं तरी पहिल्या दिवसापासून तू मला आवडायला लागला होतास. हळुहळू माझ्या मनातली तुझी ओढ कणाकणाने वाढतच गेली. तू माझं सगळं हृदय व्यापून बसलायेस. माझं भाग्य चांगलं म्हणून दहा दिवसांतच मीसुद्धा तुला आवडायला लागले होते. आपल्या हृदयातली सुरुवातीची अबोल ओढ हळुहळू वृद्धिंगत होत गेली. आज लक्षात येतंय की ती आत्यंतिक ओढ वयात येत असलेल्या मुलामुलीच्या प्रेमाचीच आहे. तुझ्याशिवाय जगणं मला खूप अवघड आहे पण जा तू पुण्याला ! मोठा डाॅक्टर हो. तुझी प्रतिक्षा करतच मी जगत राहीन."
दोघे उठून उभे राहिले. नकळत त्याने दोन्ही हाताने तिला आपल्या जवळ घेऊन तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं. ती मोहरून म्हणाली, "तुझी ही पहिली मिठी आणि माझ्या कपाळावरचा तुझ्या ओठांचा स्पर्श मी आयुष्यभर माझं सुखनिधान म्हणून जपून ठेवेन. मला एक सांगून ठेव."
त्यानं विचारलं, "काय ?"
ती म्हणाली, "तू मोठा डाॅक्टर होणार आहेस. मी फक्त दहावी शिकलेली असेन, डिम्ड युनिवर्सिटीतून मी बी.ए.; एम.ए. करणार आहे. ही गोष्ट आपल्या लग्नाआड तर येणार नाही ना ? आणि एखादी दुसरी मुलगी तुझ्या आयुष्यात तर येणार नाही ना ?"
तो म्हणाला, "तुझ्यावर प्रेम करताना या गोष्टी आड आल्या होत्या का ? हृदयात उत्स्फुल्लिंगीत होत जाणारी ती प्रेम भावना होती ना ! तसंच या गोष्टी आपल्या लग्नाच्या आड येणार नाही. माझ्या आयुष्यात कुणी मुलगी आली तर ती माझ्या ओळखीची असेल, माझी फक्त मैत्रीण असेल ! प्रेम आणि व्यवहार याची गल्लत मी करणार नाही आणि तूसुद्धा कधी करू नकोस."
ती म्हणाली, "चल, निघू या आता."
दुस-या दिवशी तो त्याच्या आई वडिलांबरोबर पुण्याला गेला.
ती खूप उदास झाली होती पण तिने स्वतःला सावरलं. तो डाॅक्टर झाल्यावर आपण लग्न करणारच आहोत हा दिलासा तिने स्वतःलाच दिला.
साहिलची काॅलेजला अॅडमिशन झाली असेल का, त्याची राहाण्या-जेवणाची नीट सोय झाली असेल का या विचारात ती काहीशी अस्वस्थ होती. शेवटी न राहावून एक आठवड्याने ती त्याच्या घरी गेली.
त्याच्या आईने दार उघडून तिला आत घेतल्यावर ती म्हणाली, "माझं नाव सायली. साहिल माझ्या वर्गातच होता. त्याला पुण्याला चांगल्या काॅलेजला अॅडमिशन मिळाली ना, त्याची राहाण्याची, खाण्या-पिण्याची सोय नीट झाली ना, याची चौकशी करायला मी आलेय."
साहिलच्या आईने पहिल्या नजरेतच जाणलं की ही मुलगी साहिलची जिवलग मैत्रीण असावी. कदाचित ही साहिलवर प्रेम करत असावी आणि साहिलसुद्धा .... इतक्या लहान वयात प्रेम म्हणजे काय हे तरी हिला माहीत तरी असेल का हा प्रश्न तिला पडला. पौगंडावस्थेतल्या बालिश भावना ... दुसरं काय ! पण तिचं सोज्वळ सौंदर्य, चेह-यावरचा निरागस भाव, मवाळ मृदू बोलणं पाहून साहिलच्या आईला ती खूप भावली.
साहिलच्या आईने सगळी माहिती देऊन विचारलं, "तू पुढे शिकणार नाहीस का ?"
ती म्हणाली, "नाही, परगावी शहरातल्या काॅलेजात शिकण्याइतपत आमची आर्थिक परिस्थिति चांगली नाहीये. माझे वडील पाच वर्षांपूर्वी वारले. ते गेल्यावर त्यांचं किराणा मालाचं दुकान आई बघायला लागली. काॅलेजला न जाता मी आईला मदत करणार आहे आणि मी डिम्ड युनिव्हर्सिटीतून बी.ए., एम.ए. करायचं ठरवलंय." असं म्हणून ती खुर्चीवरून उठली.
आई म्हणाली, "साहिलची चौकशी करायला तू आलीस म्हणून मला बरं वाटलं. तू साहिलशी दररोज फोनवर बोलत असशीलच ना ?" 
ती म्हणाली, "नाही. माझ्याकडे मोबाईल फोन नाहीये."
आई म्हणाली, "तुला त्याच्याशी बोलायचं असेल तर मी फोन लावते. फोनचा स्पीकर ऑन करून देते तुला !"
ती म्हणाली, "स्पीकर ऑन करताय ते साहिल काय बोलतो ते ऐकण्यासाठीच ना ? तुम्हाला जे जाणून घ्यायचंय ते मी सांगते. मला लपवाछपव करायला आवडत नाही."
आई म्हणाली, "तुझा पारदर्शीपणा व मोकळेपणा आवडला मला ! सांग, काय सांगणार आहेस मला !"
आठवीपासून काय काय घडत आलं ते सांगून ती म्हणाली, "प्रेम म्हणजे काय ते समजत नव्हतं, त्या अबोध वयात आमची एकमेकांबद्दलची आवड व ओढ कणाकणाने वृद्धिंगत होत गेलीय. ती ओढ म्हणजे मुलामुलीचं प्रेम आहे हे आता आता आम्हाला जाणवायला लागलंय. पुण्याला जाण्याआधी तो मला बोलला की तो डाॅक्टर झाल्यावर आपण लग्न करू."
आई म्हणाली, "एक चांगला पोस्ट ग्रॅज्युएट डाॅक्टर व्हायला त्याला आठ नऊ वर्षे लागतील. तोपर्यंत तू थांबणार आहेस का त्याच्यासाठी?"
ती म्हणाली, "हो, आयुष्यभर मी प्रतीक्षा करायला तयार आहे."
आई म्हणाली, "आणि मला हे पसंत नसलं तर ?"
ती म्हणाली, "साहिल तुमच्या इच्छेबाहेर जाणार नाही याची काळजी मी घेईन. चला, निघते मी !"
आई म्हणाली, "थांब, मी साहिलला फोन लावते."
फोनवर ती संयमाने बोलली पण साहिल भडाभडा बोलून गेला, "तू भेटत नाहीस तर मला खूप सुनं सुनं वाटतं. तुझ्याकडे फोन नाही म्हणून खूप आठवण आली की तुझ्याशी बोलताही येत नाही, तुला पाहताही येत नाही. मग तुझा फोटो पाहात बसतो. कधी कधी मी खूप बेचैन होतो गं ! कशी जातील ही आठ नऊ वर्षे ?"
ती म्हणाली, "साहिल, तुला एक चांगला डाॅक्टर व्हायचंय हे तू ठरवलंस ना, मग तू फक्त आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष दे. तू एक चांगला डाॅक्टर झाल्यावर आपण लग्न करू असं तूच मला बोलला होतास ना !"
तो म्हणाला, "हो, मी अभ्यासाकडे लक्ष देईन. लव्ह यू, सायली !"
ती म्हणाली, "आय टू ! चल, बाय !"
तिने फोन बंद केल्यावर आई म्हणाली, "साहिल काय बोलला ते ऐकलं मी ! तोसुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करतो हेच जाणवलं मला ! सायली, मलासुद्धा तू खूप आवडलीस ! तू मला पसंत आहेस !"
ती पटकन आईच्या पायाशी वाकली. तिला आशीर्वाद देत आई म्हणाली, "तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ दे."
ती जायला निघाली तशी आई म्हणाली, "येत जा अधूनमधून. तुला भेटावंसं मला वाटलं तर मी येत जाईन तुझ्या दुकानावर !"
"बरं !" म्हणून ती बाहेर पडली.
चार दिवसांनी साहिलची आई तिच्या दुकानावर गेली. तिला एक नविन मोबाईल फोन देत ती म्हणाली, "हा मोबाईल फोन तुला माझ्याकडून भेट. यात मी साहिलचा आणि माझाही मोबाईल नंबर फीड करून ठेवलाय. आता त्याचा व्हिडिओ काॅल आला की तुम्ही एकमेकांशी बोलू शकाल, एकमेकांना पाहू शकाल."
आईकडे कृतज्ञतेनं पाहात ती म्हणाली, "थँक यू आई ! मी स्वतःहून फोन करून त्याच्या अभ्यासात व्यत्यय आणणार नाही !"
आई म्हणाली, "तू खूप समजूतदार, पारदर्शी, मनमोकळी आहेस आणि हुशारही आहेस ! म्हणून माझ्या मनातलं ओळखून तू किती सहज कबूल केलंस की तू त्याला फोन करणार नाहीस म्हणून ! मला तुझा हा समंजसपणा खूप आवडला."
दिवाळी सणाला साहिल चार दिवसासाठी घरी आला होता. ती खूप खुश झाली होती. चारही दिवस दोघे नदीच्या त्या दगडावर बसायला गेले. दोघेही तसे अबोलच असायचे.
चौथ्या दिवशी तो म्हणाला, "आपले चार दिवस अबोलपणातच गेले. तुला चुकल्यासारखं नाही वाटलं का ?"
ती म्हणाली, "मला का वाटेल चुकल्यासारखं ? आपण सोबत आहोत ना, एवढं मला पुरे ! तू मला एका हाताने जवळ घेतोस तेव्हा तुझा स्पर्श मला परम सुखाची अनुभूती देतं. अरे, अबोल राहूनही आपण आपल्या भावना एकमेकांच्या हृदयापर्यंत पोहोचवतोच ना ! त्यातही परम खुशी मिळतेच ना आपल्याला ?"
साहिलने अकरावीला सायन्स शाखेत प्रवेश घेतला होता. त्याच्या वडिलांनी अकरावीतच त्याला नीट परिक्षेच्या तयारीसाठी एका कोचिंग क्लासला टाकलं होतं. काॅलेज, कोचिंग क्लास, अभ्यास यात तो खूप व्यस्त असायचा तरी रात्री न चुकता तो सायलीला व्हिडिओ फोन करायचा. सुट्टीच्या दिवशी तो तिला दोनदा तरी फोन करायचा. त्याचा फोन आल्यावर ती खूप खुश व्हायची.
एकदा त्याने विचारलं, "तू मला फोन का करत नाहीस ?"
ती म्हणाली, "माझा फोन मला तुझ्या आईनं दिलाय. त्याच वेळी मी तिला कबूल केलंय की मी त्याला फोन करून त्याच्या अभ्यासात व्यत्यय आणत जाणार नाही."
तो म्हणाला, "हे तू छान केलंस. आईला खूप बरं वाटलं असेल !"
चार दिवसांनी तिच्या आईनं तिला विचारलं, "दररोज या वेळेला कुणाचा फोन येतो गं तुला ?"
ती म्हणाली, "साहिलचा !"
तिने आईला साहिलबद्दल आणि आठवीपासून काय घडत गेलं ते सगळं सांगितलं आणि आपल्या व त्याच्याही मनातल्या भावनाही सांगितल्या.
तिची आई म्हणाली, "नशिबवान आहेस तू ! इतक्या लहान वयातच तुला इतका चांगला जोडदार लाभला. डाॅक्टर होणार आहे तो ! हे देवदुर्लभ अलौकिक नातं आहे. न कळत्या, अबोध आणि अडनीड वयात उपजलेली तुमची एकमेकांबद्दलची ओढ कायम अवीट राहील !"
साहिलच्या आईला ती खूप आवडायला लागली होती. आपल्याला इतकी चांगली सून लाभतेय या भावनेनं त्याची आई खुश असायची. दोन चार दिवसांनंतर ती सायलीला फोन करून तिच्याशी बोलायची.
चार आठ दिवसांनी सायली साहिलच्या आईला भेटायला जायची. कधी कधी त्याच्या घरी जेवायला थांबायची. त्यावेळी ती आईला स्वयंपाक बनवायला मदत करायची. साहिलच्या आईच्या लक्षात आलं होतं की ही छान स्वयंपाक करते.
सायलीने आपल्या आईला दुकानात मदत करायला सुरुवात केली. तिने ग्राहकांना डोअर डिलिव्हरी द्यायचं ठरवलं. तिने तशी पॅम्प्लेट छापून वर्तमानपत्रात टाकून घरोघर वितरीत केली. तिला चांगला प्रतिसाद मिळायला लागला. मग तिने डिलिव्हरीसाठी एका माणसाला कामावर ठेवले. मालाची विक्री चांगलीच वाढली होती. तिला जरा बरे दिवस यायला लागले. आपल्या धाकट्या बहीण भावाला खूप शिकवू असं तिने ठरविलं. दोन वर्षांनी तिच्याच गावात काॅलेज उघडणार होतं. काॅलेजच्या बिल्डिंगचं काम सुरु झालं होतं.
तिने टिळक महाराष्ट्र विद्यापीठात बी.ए. ला प्रवेश घेतला होता. तिचा अभ्यासही चालू होता.
असेच दोन महिने अजून गेल्यावर गेल्यावर एकदा साहिलच्या आईने तिला फोन करून दुस-या दिवशी रात्री जेवायला ये असं सांगितलं.
दुस-या दिवशी सायली त्याच्या घरी जेवायला गेल्यावर थोड्या गप्पा झाल्यावर त्याची आई म्हणाली, "तुझ्यासाठी एक थोडी वाईट बातमी आहे."
काय वाईट बातमी असेल या विचाराने सायलीचं हृदय थरथरलं. ती गप्प झाली.
आई म्हणाली, "आमच्या दोघांची मुंबईला बदली झालीय. इथं बदली होऊन येण्यापूर्वी आम्ही मुंबईलाच होतो. आमचा एक फ्लॅट मुंबईला आहे. त्या फ्लॅटची साफसफाई करून घेण्यासाठी साहिलचे बाबा मुंबईला गेलेत. तेरवा शनिवारी आम्ही मुंबईला जायला निघणार आहोत."
सायलीचे डोळे भरून आले. ती रुद्ध स्वरात म्हणाली, "आई, आता तुम्ही मुंबईला राहायला जाणार म्हणजे साहिल काही मला भेटायला इथं येत जाणार नाही. म्हणजे मी एकटीनंच इथं तुमची, त्याची आठवण काढत एक एक दिवस पुढे ढकलायचा, असंच ना ? आई दोन चार महिन्यांचा प्रश्न नाहीये तर आठ वर्षांचा प्रश्न आहे."
आई म्हणाली, "मी त्याच्याशी बोललेय. आमचं हे घर आहेच ना इथं ! चार सहा महिन्यांनी तो एक दिवस तुला भेटायला येत जाईल हे त्याने मला कबूल केलंय. त्याने नुसतं कबूल केलं असं नाही तर त्याच्याही मनात तेच आहे."
ती म्हणाली, "ठीक आहे आई, तुम्ही म्हणता तसं घडलं तर चांगलंच आहे पण आजचंच बघा ना, तुम्ही इथं आहात तरी गेल्या नऊ महिन्यात तो एकदाही इथं आला नाही. आई, मी समजू शकते की त्याचं काॅलेज, त्याचे क्लासेस, त्याचा अभ्यास यात तो पूर्ण व्यस्त आहे. त्याचं स्वप्न पुरं होण्यासाठी त्याची सगळी धडपड आहे. आई, मी प्रतीक्षा करत राहीन त्याची !"
आई म्हणाली, "तू मला इतकी का भावलीस हे माहीत आहे का तुला ? खूप संयमी व समजूतदार आहेस तू !"
ती खिन्नपणाने हसली. तिचं केविलवाणं हसू पाहून आईच्या काळजात गलबल झाली.
पुण्याला साहिल ज्या क्लासमध्ये नीटचा अभ्यास करत होता त्याच क्लासमध्ये इला येत होती. ती खूप हुशार होती. ती सधन घरातली मुलगी होती. तिचे वडील हार्ट स्पेशालिस्ट सर्जन होते आणि त्यांचं एक हाॅस्पिटल होतं. तिलाही हार्ट सर्जन व्हायचं होतं ते भविष्यात वडिलांच्या हाॅस्पिटलचा व्याप सांभाळण्यासाठी !
क्लासमध्ये तिने साहिलला पाहिलं आणि ती नकळत त्याच्याकडे ओढावली जात गेली. तिने हळुहळू साहिलशी जवळीक वाढवायला सुरुवात केली. क्लासमधली एक मैत्रीण या भावनेनं साहिलही तिच्याशी मोकळेपणाने वागू बोलू लागला. बारावीला गेल्यावर तिच्या आग्रहाने तो सुट्टीच्या दिवशी तिच्या घरी अभ्यासाला जाऊ लागला.
साहिल दररोजच फोन करून पाच दहा मिनिटे सायलीशी बोलायचा. ती खुश असायची. आई बाबा तिथे नसताना साहिल तिला भेटायला दोनदा गेला होता. ती खूप खुश झाली होती. नदीच्या पाण्यात पाय सोडून ते दगडावर बसायचे. साहिल नकळत तिला आपल्या एका हाताच्या कवेत घ्यायचा. ती खूप सुखावायची.
एकदा ती म्हणाली, "साहिल, तुला अभ्यास खूप आहे. तू सुट्टी लागल्यावर वर्षातून एकदा जरी मला भेटायला आलास तरी चालेल. त्यातच तुझी प्रतीक्षा करत मी खुश राहीन. शिवाय तू मला दररोज व्हिडिओ फोन काॅल करतोस. तुला पाहिलं की मी खूप खुश होते. आठ वर्षे अशी सहज निघून जातील. तू मात्र तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. असा चार चार महिन्यांनी मला भेटायला येत जाऊ नकोस."
तिला अजून जवळ ओढत तो म्हणाला, "हो, पण तुझी आठवण मला बेचैन करायला लागली की चार तासांसाठी मी येत जाणार. तुझ्याकडे जेवण करून लगेच निघत जाईन. असंच आपण खुश राहिलो तर आठ वर्षे सहज निघून जातील. मग आपण लग्न करून आयुष्यभर एकत्र राहू."
असंच वर्ष गेलं. दर रविवारी व सुट्टीच्या दिवशी इलाबरोबर अभ्यास करून त्याची बारावी व नीट परिक्षेचा अभ्यास चांगला झाला होता पण त्याच्या हे लक्षात आलं नव्हतं की इला त्याच्या खूप जवळ येत चालली होती. ती त्याच्याकडे ओढली गेली होती तरी ती मर्यादा राखूनच पावलं टाकत होती कारण तिच्या वडिलांनी तिला समज दिली होती की त्याला मेडिकलला अॅडमिशन मिळाले नाही तर तुला त्याच्याशी संबंध तोडावे लागतील. तिलाही ते मान्य होतं कारण वडिलांच्या हाॅस्पिटलचा व्याप सांभाळण्यासाठी तिलाही डाॅक्टर नवराच हवा होता.
बारावीची आणि नंतर नीटची परीक्षा पार पडली. निकाल आले. नंतर अॅडमिशनची गडबड सुरु झाली. इला पहिल्या फेरीतच सिलेक्ट झाली होती आणि तिला पुण्यातलंच मेडिकल काॅलेज मिळालं होतं. त्याला आश्चर्य वाटत होतं की त्याच्यापेक्षा तिला चार मार्क कमी मिळाले होते तरी ती कशी सिलेक्ट झाली आणि आपण का सिलेक्ट झालो नाही. त्याने तिला काही विचारलं नाही पण तो नाराज झाला होता. दुस-या फेरीत तरी आपला नंबर लागेल का अशी धाकधूक त्याला उगीचंच वाटू लागली होती.
इला त्याला घेऊन पप्पांच्या हास्पिटलमध्ये गेली आणि तिने त्यांना साहिलला पहिल्या फेरीत अॅडमिशन मिळाले नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, "डोन्ट वरी ! मी मॅनेज करतो. इलाच्याच काॅलेजला प्लेसमेंट मिळेल हेही मॅनेज करतो."
दुस-या फेरीत तो सिलेक्ट झाला. त्याला इलाच्याच हाॅस्पिटलमध्ये प्रवेश मिळाला. एका गोष्टीचा त्याला मोठा धक्का बसला. दुस-या फेरीच्या यादीत त्याचे नीट परीक्षेचे तेरा मार्क वाढवण्यात आले होते म्हणून तो सिलेक्ट झाला होता. ही किमया इलाच्या पप्पांनी केली होती. नकळत तो तिच्या पप्पांच्या ऋणात बद्ध झाला.
अॅडमिशनचे सोपस्कार होताना त्याचे आई वडील आले होते. इलासुद्धा त्याच्याबरोबरच होती. त्याचे आई वडील मुंबईला परत गेल्यावर तो इलाला म्हणाला, "तुझ्या पप्पांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. मी आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहीन."
ती म्हणाली, "मी तुझ्यावर अतोनात प्रेम करते हे पप्पांना माहीत आहे. मग माझ्यासाठी ते इतकंही करणार नाहीत का ?"
तिचं बोलणं ऐकून तो हादरला. तिने उघड उघड आपलं प्रेम बोलून दाखवलं होतं. त्याच्या डोळ्यांसमोर सायलीचा चेहरा उभा राहिला. इलाला तसंच सोडून तो सायलीला भेटायला गावी आला.
दुस-या दिवशी सकाळी सायलीला भेटून त्याने मेडिकलला अॅडमिशन मिळाल्याचे सांगितले. ती खूप खुश झाली पण तिला जाणवलं की तो खूप विचारात आहे.
तो तिला घेऊन नदीवर आला. तिने विचारलं, "तुला मेडिकलला प्रवेश मिळाला. ही खुश खबर मला द्यायला तू लगेच इथं आलास. मी खूप खुश आहे पण मला जाणवतंय की तू तितका खुश नाहीयेस, खूप विचारात आहेस. काय झालंय असं ?"
एका हाताने तिला जवळ ओढत तो म्हणाला, "हो, एका गोष्टीने माझ्या सगळ्या खुशीला थोडंसं ग्रहण लागलंय. पण ते ग्रहण लवकरच सुटेल. काय झालं ते मी योग्य वेळ आली की तुला सांगेन. आज नको विचारूस ! पण एक खरं, मेडिकलला माझी अॅडमिशन झाली आणि तुला भेटायची तीव्र ओढ मला वाटायला लागली. तसाच तुला भेटायला आलो. तुला भेटलो आणि माझं मन खूप स्थिर, शांत झालं."
ती म्हणाली, "ठीक आहे, तुला वाटेल तेव्हा मला सांग पण तू मनावर कसलाही ताण घेऊ नकोस आणि दडपणही ठेवू नकोस."
तो म्हणाला, "मला इथून मुंबईला जायचंय. तुझ्याकडे जेवण करून तसाच निघतो. दीड वाजताची बस मिळेल मला !"
दगडावरून उठत ती म्हणाली, "चल, निघू या आपण !"
सायलीकडे जेवण करून तो बसने मुंबईला आला.
गप्पा मारताना आईला जाणवलं की तो काहीशा ताणाखाली आहे. बाबा जेवण करून त्यांच्या रुममध्ये झोपायला गेल्यावर आईनं विचारलं, "काय झालं ? तू खुश दिसत नाहीस. कसला ताण आलाय का ?"
इतका वेळ दाबून धरलेला त्याचा संयम सुटला आणि आईला मिठी मारून तो रडायला लागला. आई समजून गेली की काही तरी विपरीत घडलंय पण ती शांतपणे आपला हात त्याच्या केसांवरून फिरवत राहिली.
थोडा वेळ रडून तो शांत झाला तसं आईने विचारलं, "काय घडलंय ते सांग. मन मोकळं करून घे."
त्याने काय घडलं ते बारकाव्यानिशी आईला सांगितलं, आपल्या मनातल्या भावनाही सांगितल्या. ते ऐकून ती स्तब्ध झाली. ब-याच वेळानं ती म्हणाली, "खूप धक्कादायक आहे हे ! तू लगेच सायलीला भेटायला गेलास यावरून तुझ्या मनाच्या अस्थिरतेची कल्पना मला आली. इला तुझ्यावर प्रेम करायला लागलीय याची कल्पना तुला कधीच आली नाही का ?"
तो म्हणाला, "नाही आई. एक चांगली मैत्रीण अशाच नजरेने मी तिच्याबरोबर वावरायचो. माझ्या मनात सायलीच असते म्हणून इलाच्या तशा भावना मला कधी जाणवल्याच नाहीत. मी तर तिला तसे संकेत कधीच दिले नव्हते."
आई म्हणाली, "खरं तर असं काही घडेल याची कल्पना मलाही आली नाही. तू तिच्याकडे रविवारी व सुट्टीच्या दिवशी अभ्यासाला जायला लागलास, दिवसभर तिच्या सहवासात असायचास. तेव्हा माझ्या हे लक्षात यायला हवं होतं पण मीसुद्धा अंदाज करू शकले नव्हते."
तो म्हणाला, "आई, खूप मोठा पेच निर्माण झालाय. इला माझ्यावर प्रेम करते एवढ्यापुरती ही बाब मर्यादित नाहीये तर तिच्या वडिलांनी मॅनेज करून मला मेडिकलला अॅडमिशन मिळवून दिली, तिचंच काॅलेज मला मिळवून दिलंय ही बाब विचार करायला भाग पाडते. त्यांचं खूप मोठं ऋण माझ्यावर आहे याची जाणीव मला त्रासदायक होणार आहे."
आई म्हणाली, "हे बघ, इला तुझ्या मनात नाहीये पण तिच्या मनात तू आहेस. तिच्या वडिलांनी तुला अॅडमिशन मिळवून दिली म्हणून ती तुला हंशील करण्यासाठी एक एक पाऊल पुढं टाकत राहाणारच आहे. तू सायलीवर प्रेम करतोस त्यामुळे सायली की इला हा पेच तुझ्यापुढे निर्माण होणारच नाही. तुझं नशीब तुला हवं तेच घडवून आणेल यावर विश्वास ठेव."
तो म्हणाला, "आई, केवळ नशिबावर सोपवून चालणार नाही. मलाही काही करावं लागेल. मी इलाच्या आहारी गेलो तर सायली कोलमडून पडेल गं !" असं म्हणून तो पुन्हा रडायला लागला.
त्याला शांत करत आई म्हणाली, "हे बघ, असा विचार करू नकोस. काय घडतंय हे वर्ष दोन वर्षात तुझ्या लक्षात येत जाणारच आहे. तू पोस्ट ग्रॅज्युएशन करशील, इलासुद्धा करेल. अजून आठ वर्षे तरी लग्नाचा विचार करण्याची वेळ येणार नाही. तू तिच्या जवळिकीला प्रतिसाद देऊ नको. तू अलिप्तच राहा. आधी तुझ्या मनातली तिच्या वडिलांच्या ऋणाची भावना मनातून काढून टाक. त्यांनी स्वार्थापोटी तुला मदत केलीय हा विचार मनात आणलास तर तुला अलिप्त होणं सहज जमेल. एक वेळ अशी येईल की इला समजून जाईल की तुला तिच्यात काही इंटरेस्ट नाहीये."
तो म्हणाला, "आई, तसंच व्हायला हवं. तुझ्याशी बोललो आणि माझं मन बरंच शांत झालं. इलाच्या वडिलांनी माझ्यासाठी खूप काही केलंय, मी त्यांच्या ऋणात आहे ही भावना आधी मी मनातून काढून टाकतो म्हणजे मला सहज अलिप्त होता येईल. त्यांनी जे काही केलंय ते एक विशिष्ट हेतू मनात ठेवून इलासाठी केलंय. मी निमित्तमात्र आहे. त्यांच्या हेतूचा विचार केला तर त्यांनी माझ्यासाठी म्हणून काही केलं नाही असंच म्हणावं लागेल."
आई म्हणाली, "हो, आधी त्यांच्या उपकाराच्या भावनेपासून मुक्त हो, तू काही त्यांना अॅडमिशनसाठी याचना केली नव्हतीस, त्यांनीही जे केलं ते ते विशिष्ट स्वार्थी हेतूपोटीच केलंय असा विचार केलास तर या पेचातून तू तुझी सुटका सहज करू शकशील. तुझ्या आणि सायलीच्या प्रेमाला ग्रहण लागणार नाही."
तो म्हणाला, "हो आई, आता माझं मन खूप रिलॅक्स झालंय."
त्याचं मेडिकल काॅलेज सुरू झालं. पंधरा एक दिवसांनी इलाचे वडील म्हणाले, "तुम्ही दोघे एकाच काॅलेजला जाता. तू तुझं होस्टेल सोड आणि इथं आमच्या बंगल्यात राहायला ये. इथं तुझ्यासाठी स्वतंत्र रुम आहेच. तू इलासोबत इथं कंफर्टेबली राहाशील. हवं तर मी तुझ्या आई वडिलांशी बोलतो."
इलाने वडिलांचं बोलणं उचलून धरलं. ती म्हणाली, "पप्पा बोलतात ते योग्य आहे. इथून आपण बरोबरच कालेजला जात येत जाऊ, इथं रात्री उशिरापर्यंत एकत्र अभ्यास करू. तू इथंच राहा."
तो कसंबसं बोलला, "मी विचार करून सांगतो."
इला म्हणाली, "त्यात विचार करण्यासारखं काय आहे ? तुझ्या सोयीचं आहे तेच पप्पा सांगताहेत ना ? इथे तुझ्यासाठी स्वतंत्र रुम आहे. इथं कम्फर्टेबली राहू शकतोस. मग तुला अडचण काय आहे ? तुझ्या आई वडिलांची काही हरकत असेल तर पप्पा बोलतील त्यांच्याशी !"
तो गप्प बसला पण त्याच्या मनात विचाराचं काहूर माजलं होतं.
रात्री त्याने आईला फोन करून सगळं सांगितलं. ते ऐकून त्याची आई म्हणाली, "ही खूप मोठी खेळी इला आणि तिचे पप्पा खेळलेत. ती तुझी अवस्था त्रिशंकूसारखी करू पाहातेय. साहिल, तिच्याकडे राहायला तू सरळ नकार दे."
तो म्हणाला, "हो आई, मी होस्टेलवरच राहीन."
आई म्हणाली, "साहिल, तसंच कर. इला तुझं नशिब फरफटत नेतेय. तुला तिच्या कचाट्यातून सुटायलाच हवं. सध्या तिला टोलवत राहा पण तू फार ताणतणाव घेऊ नकोस !"
दुस-या दिवशी सुट्टी होती. सकाळी तो लवकर उठला आणि बस पकडून सायलीकडे आला. अचानक त्याला आलेलं बघून सायली खूप सुखावली.
संध्याकाळी नदीवर गेल्यावर तो म्हणाला, "तुझी खूप आठवण येत होती. तुला भेटलो आणि माझं मन शांत झालं."
सायली म्हणाली, "साहिल, काय झालंय ? तू खूप अस्वस्थ वाटतोस. वीस दिवसांपूर्वी तू मला भेटायला आला होतास तेव्हाही तू खूप ताणतणावाखाली होतास असंच मला जाणवत होतं. काय घडलंय असं ? मला भेटायची तीव्र ओढ तुझ्या मनात अचानक कशी उभरून आली ?"
साहिल थोडा वेळ गप्प बसला. मग म्हणाला, "तसं विशेष असं काही घडलेलं नाही पण विचार करावा असं नक्कीच थोडंसं घडलंय. मी तुला नंतर सगळं सांगेन."
ती म्हणाली, "साहिल, तू सांगत नाहीस तरी जे घडतंय ना, त्याची मला कल्पना आलीय. वीसच दिवसांत तू मला भेटायला आलास त्यावरुनही मला बराच अंदाज आलाय. तू मला सांगशील तेव्हा मीसुद्धा तुला सांगेनच मी काय अंदाज केलाय तो !"
त्याने आपल्या बंगल्यात राहायला यावं यासाठी इला साहिलवर दररोज आग्रह करून दबाव आणायची. तिच्या वडिलांनीही दोन वेळा विषय काढून त्याच्यावरचा ताण वाढवला होता. शेवटी त्याने तिच्या वडिलांना सांगितलं की "माझी आई तुमच्या बंगल्यावर राहायला मला परवानगी देत नाहीये. मी तिला समजावलं पण ती तिच्या मतावर ठाम आहे."
इला नाराज झाली. तिच्या चेह-याकडे पाहात तिचे पप्पा म्हणाले, "तू फार मोठी चूक करतो आहेस. आज तुझ्या लक्षात येणार नाही पण भविष्यात ... हरकत नाही. तुझ्या आईला तू आमच्याकडे राहाणं पसंत नाही तेव्हा हा विषय संपला."
इला म्हणाली, "निदान सुट्टीच्या दिवशी  इथं अभ्यासाला येत जाशील ना ?"
एक मोठा नकार दिलाय, लगेच दुसरा द्यायला नको असा विचार करून तो म्हणाला, "हो, येत जाईन ना !"
रात्री त्याने आईला फोन करून काय घडलं ते सांगितलं. इलाचे वडील काय बोलले तेही सांगितलं.
त्याची आई म्हणाली, "आजची बला टळली ना, मग तिच्या वडिलांच्या बोलण्यातल्या संकेताचा विचार आज तू करत बसू नकोस. तू शांत राहून तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर."
इलानं हार मानायची नाही असं ठरवलं होतं. ती त्याला रिझवण्याची, त्याच्या मनात आपली ओढ निर्माण करण्याची एकही संधी सोडत नव्हती पण तो मात्र मोहात पडत नव्हता म्हणून तिला शंका यायला लागली होती की त्याच्या आयुष्यात कुणी मुलगी असावी आणि तिच्यावर तो प्रेम करत असावा !
एकदा दोघे अभ्यास करत असताना तो बाथरुमला गेला. त्याचा मोबाईल आणि पाकिट टेबलावरच होतं. इलाने त्याचं पाकीट तपासलं. तिला सायलीचा फोटो दिसला. तिने पटकन आपल्या मोबाईलमध्ये त्या फोटोचा फोटो काढला. तिला वर्कबुकचं ते पानही मिळालं ज्यावर सायलीनं व साहिलनं पानभर एकमेकांची नावे लिहिली होती. तिला पूर्ण कल्पना आली की त्याच्या मनात सायली आहे आणि तो तिच्यावर प्रेम करतोय. सायलीसुद्धा त्याच्यावर प्रेम करतेय. तिने त्याच्या मोबाईलमध्ये काॅल हिस्ट्री तपासली त्यावरून तो दररोज सायलीला फोन करतो हेही तिच्या लक्षात आलं.
एका सुट्टीच्या दिवशी त्याच्यासाठी असलेल्या स्वतंत्र खोलीत तो अभ्यास करताना ती म्हणाली, "अकरा वाजले. आता कुठे जात बसतोस तुझ्या हाॅस्टेलवर ? इथंच झोप."
तो म्हणाला, "ठीक आहे."
ती पलंगावर आडवी होत म्हणाली, "ये, झोप इथंच !"
अचानक तो चिडून म्हणाला, "तू इथं झोपणार ? तू तुझ्या खोलीत जा."
ती म्हणाली, "हे माझं घर आहे. मी या बेडवर झोपले तर काय हरकत आहे ? इतका किंचाळतोस कशाला ?"
मनाला स्थिर करत तो म्हणाला, "हे तुझं घर आहे, तू कुठेही झोपू शकतेस."
त्याने आपले कपडे बदलले आणि तिला "गुड नाईट" असं म्हणत बाहेर पडला. त्याने अव्हेरलं म्हणून ती खूप संतापली. त्याच्या वागण्याला सायली कारणीभूत आहे म्हणून ती सायलीवरही खूप चिडली.
दिवस उलटत होते. सायली बी.ए. झाली. तिने एम.ए. ला अॅडमिशन घेतली.
त्यांच्या तीन टर्म झाल्या. त्यांची इंटर्नशीप सुरु होणार होती. एकदा तिच्या वडिलांनी त्याला मुद्दाम बोलावून घेतले. चहा घेत ते त्याला म्हणाले, "साहिल, मला तुझ्याशी बरंच बोलायचंय. तू मोकळेपणाने बोलशील अशी अपेक्षा मी ठेवतो."
त्याला कल्पना आली की ते काय बोलणार आहेत. त्याने आपली भूमिका आधीच ठरवून ठेवली होती. तो म्हणाला, "हो पप्पा, मी मोकळेपणानं बोलेन."
ते म्हणाले, "साहिल, इला तुझ्यावर अतोनात प्रेम करते हे कधी तुझ्या लक्षातच आलं नाही का ?"
तो म्हणाला, "पप्पा, माझ्या फार आधीपासून ते लक्षात आलंय पण मी तिला कधीच प्रतिसाद दिला नाही. मी तिला फक्त माझी जवळची मैत्रीण समजतो. मी तिच्यावर प्रेम करत नाही हे तिच्याही लक्षात आलंय."
तिचे वडील म्हणाले, "हा एक मोठा पेच आहे. ती तुझ्यावर खूप प्रेम करतेय तर तिचं प्रेम सफल व्हावं असं तिचा बाप म्हणून मला वाटणारच ना ! तिच्या भल्याचा विचार करताना तुझ्याही भल्याचा विचार मी करणारच ना ! तुझे नीटचे मार्क्स वाढवून तुला मेडिकलला मी अॅडमिशन मिळवून दिली होती. हिच्याच काॅलेजात तुझी अॅडमिशन करून दिली. तुझ्या लक्षात आलं असेल ना की या मेडिकल फिल्डमध्ये माझे हात कुठवर पोहोचलेले आहेत ते ! साहिल, हे सगळं करताना मी मनात काही हेतू ठेवले असतीलच ना ? तेही मी तुला सांगतो. तुम्ही दोघांनी पीजी करावं, हार्ट स्पेशालिस्ट व्हावं, लग्न करावं आणि नावारुपाला आलेलं माझं हाॅस्पिटल तुम्ही दोघांनी सांभाळावं. साहिल, माझी अपेक्षा वावगी आहे का ? तुम्ही दोघं या हाॅस्पिटलला काम करायला लागलात तर तुम्हाला एक्सपिरिमेंटसाठी वणवण भटकावं लागणार नाही. आधीच नावारुपाला आलेल्या माझ्या हाॅस्पिटलमध्ये तुम्ही अगदी कमी कालावधीत नावारुपाला याल. ही तुझ्यावर अतोनात प्रेम करते मग  माझं विचार चुकीचे आहेत का ?"
थोडा वेळ गप्प राहून साहिल म्हणाला, "पप्पा, तुम्ही एक वडील म्हणून योग्य विचार करता आहात पण मी इलावर प्रेम करत नाही. तिला मी एक जवळची मैत्रीण समजतो."
ते म्हणाले, "तिच्याशी लग्न केल्यावर काही दिवसांनी हळुहळू तू हिच्यावर प्रेम करायला लागशील. ते नैसर्गिक व स्वाभाविक आहे. हिच्याशी लग्न करून तू आयुष्यात काय काय मिळवणार आहेस याचा विचार करून तू निर्णय घे. तू नकार कायम ठेवलास तर असं होऊ नये की तू पीजीसाठी सिलेक्टच होणार नाहीस, तुझं आयुष्य एम.बी.बी.एस.वर कुंठीत होईल. इलाशी लग्न न केल्याचा तुला आयुष्यभर पश्चाताप वाटत राहील."
थोडं थांबून ते म्हणाले, "तुझं भवितव्य निश्चिततेऐवजी अनिश्चिततेत बदलेल. इलाचा अपेक्षाभंग होईल पण ती लग्नच करणार नाही असं नाही. मी हिच्यासाठी योग्य डाॅक्टर मुलगा शोधेनच आणि माझं हाॅस्पिटल हिच्या आणि हिच्या नव-याच्या हवाली करेन."
थोडं थांबून ते म्हणाले, "तू शांतपणे आणि योग्य विचार करून निर्णय घे. मला घाई नाही. एक वर्ष आहे तुझ्या हातात. पण तुमची इंटर्नशीप संपण्यापूर्वी तुझ्या भवितव्याचा विचार करून निर्णय घे. इलाशी लग्न केलंस तर तुझं भवितव्य उज्वल राहील. नाही केलंस तर तू पीजी करू शकणार नाही आणि एखाद्या क्लिनिकमध्ये नोकरी करत राहावं लागेल."
तो बाहेर पडला. इला त्याच्याबरोबर बाहेर गेली. ती म्हणाली, "साहिल, पप्पांनी आपल्या भविष्याचं रेखाटलेले स्वप्न खूप सुंदर आहे. मी तुझ्यावर अतोनात प्रेम करतेय हेही तुला माहीत आहे. आपलं लग्न झालं तर तुझं आणि माझंही आयुष्य खूप सुंदर होईल."
तो म्हणाला, "इला, खरं तर तुझ्या पप्पांनी माझ्यापुढे खूप मोठा डाव टाकलाय. माझ्या भविष्याची दोन टोकं त्यांनी मला दाखवलीत. ते म्हणाले तसं ते घडवून आणतीलच यावर विश्वास ठेवणं मला भाग आहे पण मला साधकबाधक विचार करू दे. माझ्याकडे एक वर्ष आहे, विचार करून निर्णय घ्यायला. चल, बाय."
ती म्हणाली, "तू सारासार विवेकबुद्धीने तुझ्या उज्वल भविष्याचा विचार करून निर्णय घेशील असं मला वाटतं."
रात्री त्याने आईला फोन केला आणि इलाचे पप्पा काय बोलले ते सांगितलं. त्यावर ती म्हणाली, "ही काळजी करण्यासारखी बाब आहे. ते तुझ्या पीजी सिलेक्शनच्या आड येतील अशी सरळ धमकी त्यांनी तुला दिलीय असंच दिसतंय. मी तुझ्या बाबांबरोबर चर्चा करते. तूसुद्धा सारासार विचार करून ठेव."
साहिलने नंतर इलाकडे जाणं बंद केलं. काॅलेजमध्ये दोघांची भेट होत होती. एकदा तिने विचारलं, "हल्ली तू माझ्या घरी येणं बंद का केलंस ? तू काय विचार केलास ?"
तो म्हणाला, "तू माझ्यावर अतोनात प्रेम करतेस असं तू म्हणतेस. मग माझं वाईट करू नये यासाठी तू तुझ्या पप्पांना सांगत का नाहीस ? आपण आयुष्यभर चांगले मित्र म्हणून राहू शकणार नाही का ?"
ती म्हणाली, "आपण चांगले मित्र आहोत या कारणाने पप्पा त्यांचं हाॅस्पिटल आपल्या ताब्यात देणार नाहीत. तू अजूनही विचार कर. माझ्याशी लग्न केलंस तर तुला आयुष्यभर सुख, स्थैर्य, प्रतिष्ठा आणि एक चांगलं ऐशारामी जीवन मिळेल तेव्हा तू गंभीरपणानं विचार करावास अशी माझी इच्छा आहे. मी तुझ्यावर अतोनात प्रेम करते हे विसरू नकोस."
तो मनात म्हणाला, "पण तशा जीवनात मला स्वस्थता, समाधान मिळणार नाही."
नंतरच्या सुट्टीच्या दिवशी आपली कार घेऊन इला साहिलच्या गावी आली. सायलीच्या फोटो पाहून एकाने तिला सायलीच्या दुकानाचा रस्ता दाखवला.
कार ड्राईव्ह करत दुकानात आलेल्या त्या अनोळखी तरुणीला सायलीने विचारलं, "काय हवंय ?"
इला म्हणाली, "मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. आपण कुठे दुसरीकडे बसू या का ?"
सायली चकित झाली. क्षणात विचाराची अनेक आवर्तने तिच्या मनात उमटली. ही साहिलशी संबंधित आहे आणि हिच्यापायीच साहिल मागे अस्वस्थ असायचा याची तिला कल्पना आली. हिच्याशी सावधपणाने वागायला हवं असा विचार तिने केला.
बाजूला असलेल्या तिच्या आईच्याही मनात 'कोण असेल ही ?' हा प्रश्न उमटला होता.
"आई, दुकानाकडे बघ, मी घरी जाऊन येते." असं म्हणून दुकानाबाहेर येत सायली म्हणाली, 'चला, माझ्या घरी बसू या."
घरी गेल्यावर सायली म्हणाली, "आता साडेअकरा वाजले. तुम्ही जेवला नसाल. मी तुमच्यासाठी पटकन स्वयंपाक करते. जेवण झाल्यावर आपण बोलू या का ?"
इला म्हणाली, "ठीक आहे."
सायली स्वयंपाकाला लागली. इला सायलीला व तिच्या दोन खोल्यांना न्याहाळून पाहू लागली. साहिलने हिच्यावर प्रेम करावं अशीच ही आहे हे तिने स्वतःशीच मान्य केलं. खोल्या अगदी नीटनेटक्या व स्वच्छ होत्या, सामानही अगदी गरजेपुरतं होतं. सायलीची परिस्थिति तशी गरिबीचीच असावी याची कल्पना तिला आली.
जेवण करताना इला म्हणाली, "छान केलास स्वयंपाक. आवडलं मला जेवण ! मला तू ओळखत नाहीस तरी मला जेवू घालावं असं तुझ्या मनात कसं आलं ?"
सायली म्हणाली, "तुमचा चेहरा मला काहीसा थकलेला वाटला. चार तास तरी तुम्ही ड्राईव्ह करून आला असाल. शिवाय माझ्याशी सरळ एकेरी बोललात म्हणजे तुम्ही मला ओळखत असणार हा अंदाज मी केला. मग तुमच्यासाठी मी इतकंही करणार नाही का ? बोला, कोण आहात तुम्ही आणि तुम्हाला माझ्याशी काय बोलायचंय ?"
इला म्हणाली, "सायली, मी मनमोकळेपणाने तुझ्याशी बोलायला आलेय. माझं नाव इला. मी पुण्याला असते. मी आणि साहिल आम्ही दोघे एकत्र शिकतो. आम्ही दोघे डाॅक्टर होणार आहोत. नंतर पीजी करणार आहोत. माझ्या वडिलांचं एक मोठं हाॅस्पिटल आहे. मी गेल्या पाच वर्षांपासून साहिलवर प्रेम करते. लग्न करून आम्ही दोघे माझ्या वडिलांचे हाॅस्पिटल सांभाळणार आहोत. साहिलच्या भवितव्याविषयी मला तुझ्याशी बोलायचंय."
इला बराच वेळ बोलत होती. तिचं व साहिलचं लग्न झालं नाही तर साहिलच्या भवितव्यावर कसा विपरीत परिणाम होईल, माझे वडील त्याला पीजी होऊ देणार नाहीत हे तिने सायलीला प्रभावीपणे सांगितलं आणि शेवटी म्हणाली, "हे बघ सायली, त्याच्या चांगल्या भवितव्यासाठी तू त्याला समजावून सांगावंस आणि त्यासाठी तू साहिलपासून दूर जावंस असं मला वाटतं."
तिने विचारलं, "साहिल माझ्यावर प्रेम करतो आणि मीसुद्धा त्याच्यावर प्रेम करते हे त्याने तुम्हाला सांगितलं का ?"
साहिल तिच्यावर प्रेम करतो हे इलानं कसं जाणून घेतलं हे तिने सांगितल्यावर सायली म्हणाली, "इला, तू जे सांगितलंस त्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे आणि ती म्हणजे तू साहिलवर खूप प्रेम करतेस पण तो तुझ्यावर प्रेम करत नाहीये आणि तुझ्याशी लग्न करायला तो तयार नाहीये. खरं ना ?"
इला काही बोलली नाही तशी सायली म्हणाली, "इला, मी साहिलच्या चांगल्या भविष्यासाठी त्याच्यापासून दूर जाईनही पण तो तुला लाभेल का हा विचार तू करायला हवास. हरकत नाही. तुमचं लग्न झालं नाही तर त्याच्या भवितव्यावर कसा विपरीत परिणाम होईल, त्यासाठी तुझे पप्पा काय करतील हे तुझं म्हणणं मला पटलंय पण त्याचं भविष्य हे त्याचंच आहे म्हणून हा विचार त्यानेच करायला हवा ना ? त्याला या गोष्टीची स्पष्ट कल्पना तू आणि तुझ्या पप्पांनी दिली आहे असं तूच सांगितलंस ना, मग माझ्या समजावण्याने तो वेगळा विचार करेल असं तुला वाटतं का ? मी त्याच्या आयुष्यातून दूर जायला तयार आहे. त्याचं भलं कशात आहे याचा विचार मी आधी करेन. माझ्या प्रेमाची परिभाषा वेगळी आहे. माझ्या प्रेमात पूर्ण समर्पण आणि प्रसंगी त्याग हे अंगिभूत आहे. तू त्याला सांग की सायली तुझ्यापासून दूर जायला तयार आहे. मग बघ, तो कसा विचार करतो ते ! तुझ्याबरोबर लग्न करून तो सुखी होणार असेल तर ते मी माझ्या प्रेमाचं साफल्य समजेन."
इला म्हणाली, "मला वाटतं की तू त्याच्याशी बोलावंस, त्याला समजावून सांगावंस की त्याने त्याच्या भवितव्याचा विचार करून इलाशी लग्न करावं. तू दूर जायला तयार आहेस असंही त्याला सांग."
सायली म्हणाली, "इला, त्याच्या भवितव्याचा विचार त्यानेच करावा, तो समंजस आहे, तो सगळ्या बाजूने साधकबाधक विचार करून निर्णय घेईल. मी त्याचा निर्णय स्वीकारेन पण या विषयात मी त्याच्याशी बोलणं मला उचित वाटत नाही."
इला म्हणाली, "याचा अर्थ स्पष्ट आहे की तू त्याच्या चांगल्या भवितव्याचा विचार तू करत नाहीस, तू स्वतः होऊन त्याच्या आयुष्यातून बाजूला जायला तयार नाहीस असंच ना ? त्याने तुला दूर केलं तरच तू दूर होशील, असंच ना ?"
ती म्हणाली, "इला, किती पटकन तू अस्थिर होतेस गं ! माझ्यापायी तू स्वतःला इतकी असुरक्षित समजतेस की काय ? पण सारासार विचार करून हा निर्णय तर साहिललाच घ्यावा लागेल ना ! माझी मतं, माझे विचार मी त्याच्यावर लादू तर शकणार नाही ना ! त्याचा निर्णय मी स्वीकारेन पण मी तुझ्यासाठी त्याच्याकडे मध्यस्थी करणार नाही. तो माझ्याशी बोलायला आला तर तुला मी तुला बोललेय तीच माझी भूमिका असेल हे मला चुकीचं वाटत नाही."
इला म्हणाली, "मला वाटलं होतं की त्याच्या भवितव्याचा विचार करून तूच त्याला समजावून सांगशील."
सायली म्हणाली, "इला, मी त्याला समजावणार नाही असं मी बोलले नाही. तो माझ्याशी बोलला तर तुझ्याशी लग्न करून त्याचं भलं कसं आहे हे मी त्याला समजावून सांगेन पण निर्णय तर त्यालाच घ्यावा लागेल ना !"
इला म्हणाली, "तू खूप हुशार आहेस. बोलताना खूप भान बाळगून बोललीस ! मी इथे येऊन तुला भेटले, तुझ्याशी बोलले हे त्याला कळू देऊ नकोस."
सायली हसत म्हणाली, "नाही कळू देणार !"
इला म्हणाली, "मी तुझ्यावर विश्वास ठेवेन."
सायली म्हणाली, "इला, मीसुद्धा थोडं बोलू का ? तुला ते अप्रिय वाटेल, तुला आवडणार नाही."
इला म्हणाली, "हो, बोल ना ! तू खूप मॅच्युअर्ड वाटतेस. तू बोल, मला रुचलं नाही तरी मी तुझ्या बोलण्याचा विचार नक्की करेन."
सायली म्हणाली, "इला, तुझ्या वागण्या-बोलण्यातून मला जे जाणवलं ते मी सांगते. साहिलवर तू प्रेम करतेस पण तुझं प्रेम शुद्ध, निरपेक्ष नाहीये. तू स्वार्थी आहेस. तुझं प्रेम संधीसाधू व व्यावहारिक आहे."
इला काहीशी चिडूनच म्हणाली, "वाटेल ते अर्थ काढू नकोस. सहा वर्षे होत आली, मी त्याच्यावर प्रेम करतेय. तो मला प्रतिसाद देत नाहीये तरी माझं त्यावरचं प्रेम ढळलेलं नाहीये. तो मला हवाय !"
सायली हसत म्हणाली, "तू जे माझ्याशी बोललीस ना, त्यावरून तुझं अंतःकरण मी जाणून बसलेय. तो तुला हवाय कारण तू आणि तुझ्या पप्पांनी काही व्यावहारिक गणितं मांडून ठेवली आहेत. तू व तो डाॅक्टर होणार आहात. पीजी करणार आहात. मग लग्न करून तुझ्या पप्पांचं हाॅस्पिटल तुम्ही दोघं सांभाळाल. इला, किती स्वार्थी प्रेम आहे गं तुझं ! तुझ्या अंतःकरणाचा मी किती खोलवर भेद घेतलाय ते सांगते. साहिलला मेडिकलला अॅडमिशन मिळाली नसती आणि तो डाॅक्टर होण्याची शक्यता नसती तर तू तुझ्या प्रेमाला चार वर्षांपूर्वीच पूर्णविराम दिला असतास हे खरं आहे ना ? तुझ्या पप्पांनी तुझ्या प्रेमाला संमती देताना तुला तशी अट टाकली असणार हा माझा ठाम अंदाज आहे. तुझं व तुझ्या पप्पांचं व्यावहारिक गणितच होतं ना, इला ?"
सायलीने नेमका अंदाज कसा बांधला या विचारात इला पडली. सायली पुढे म्हणाली, "इला, तू अहंकारी आहेस. श्रीमंत बापाची एकुलती एक लाडकी मुलगी आहेस म्हणून लहानपणापासून तुला हवं ते अट्टाहासाने मिळवत आली आहेस. तू अकरा वर्षांची असताना तुझी आई वारली म्हणून तुला आईचे संस्कार लाभले नाहीत. ऋजुता तुझ्या स्वभावात नाही कारण तू तुझ्या पप्पांच्या व्यावहारिक मुशीत तयार झाली आहेस. स्वार्थी, संधीसाधू ! आताही साहिलला मिळवण्यासाठी तू व तुझे पप्पा अट्टाहासाने कुठल्याही थराला जायला तयार आहात हे  तूच मला सांगितलंस. तो तुझ्याशी लग्नाला तयार होत नाही हे पाहिल्यावर तुझे पप्पा त्याचा पीजीचा मार्ग रोखणार आहेत, पुण्यात त्याला मेडिकल क्षेत्रात कुठे थारा मिळू देणार नाहीत. एका पक्ष्याने आकाशात पहिली गगनभरारी मारण्यापूर्वीच तुम्ही त्याचे पंख छाटणार आहात ! तुमच्या मनासारखं वागून तो तुमच्या व्यावहारिक गणिताला साथ देत नाही म्हणून तुम्ही त्याचा प्रगतीचा मार्ग अडवून त्याला उध्वस्त करणार आहात. इला, किती भयंकर आहे हे ! कल्पना करवत नाही इतकं भयानक आहे हे ! हा आत्मकेंद्रीपणा किती टोकाचा आहे तुमचा ! याला तू तुझं प्रेम म्हणतेस का ? प्रेम असं असतं ? अजून एक लक्षात ठेव, तुझी व तुझ्या पप्पांची भूमिका पाहून आणि आपल्या भवितव्याचा विचार करून अगतिक होऊन त्याने तुझ्याशी लग्न केलं तरी आपल्याला इलाच्या दडपणाखाली तडजोड करून लग्न करावं लागलं या त्याच्या मनाच्या भावनेमुळं मनात खंत बाळगत राहिल्यावर तो सुखी राहील का ? तशी परिस्थिति तू निर्माण करून त्याला माझ्यापासून हिरावून घेतले या विचाराने तो त्याच्या मनात मलाच कवटाळून बसेल ना ? तो विसरू शकेल का मला आणि माझ्या प्रेमाला ? मी समर्पणाच्या भावनेनं त्याच्यापासून दूर गेलं म्हणून त्याचं तुझ्याबरोबर लग्न झालं हे मी स्वीकारेन गं, पण मी कधीच लग्न करणार नाही. माझ्या हृदयाच्या कणाकणात तो सामावलाय. दुस-या कुणाला माझ्या हृदयात जागाच नाही. मी लग्न करत नाही म्हणून त्यापायीही तो आयुष्यभर घुसमटतच राहील ना ? तुझ्याशी लग्न करून त्याच्या भावविश्वाचा चुराडा झाल्याचं दुःख उरी बाळगतच तो जगेल ना ? तुला काय हंशील होईल ? फक्त एक व्यावहारिक गणित तुझ्या व तुझ्या पप्पांच्या मनासारखं सुटल्याचे समाधानच ना ?"
आपल्या लक्षात आल्या नव्हत्या त्या गोष्ट आपल्याला सांगून सायली आपल्या मनाची, विचारांची चिरफाड करतेय हे पाहून इला विचारात पडली होती. तिला गप्प झालेली पाहून सायली म्हणाली, "इला, प्रेम निरपेक्ष, शुद्ध असायला हवं. प्रेमात समर्पणाची, त्यागाची भावना असायला हवी. Total surrender and give up करतं ते शुद्ध प्रेम ! साहिल तुझ्यावर प्रेयसी म्हणून प्रेम करत नाही तर एक मैत्रीण म्हणून प्रेम करतोय. तो तुझा जवळचा मित्र तर आहे ना, मग तू त्याला मित्र म्हणून स्वीकारलंस तरी तुझं प्रेम सफल होईल. त्याच्याबरोबर लग्न करून तू व्यावहारिक पातळीवर जे हंशिल करू पाहातेस ना, ते तू मित्र म्हणून मिळवू शकतेस. त्यालाही पीजी होऊ दे. त्याची जिद्द आहे की तो त्याच्या गुणवत्तेवर पीजीला सिलेक्ट होईल. त्याच्या भवितव्याच्या आड तू येऊ नकोस, जाणूनबुजून त्याचे पंख कापून त्याला हताहत करू नकोस आणि तुझ्या पप्पांनाही तसं करण्यापासून परावृत्त कर. तुझ्या पप्पांचं हाॅस्पिटल तुम्ही दोघे सांभाळा. मित्र म्हणून आयुष्यभर एकत्र राहा, तुला समर्पणाचं आणि त्यागाचं एक वेगळंच समाधान लाभेल ! इला, तुझं नाव तेच पृथ्वीचं नाव आहे. पृथ्वी म्हणजे सहनशीलता, आणि समर्पण, दातृत्व आणि त्याग ! पृथ्वी मानवाला भरभरून देते. मानवाकडून काही अपेक्षा ठेवत नाही. साहील तुझ्या प्रेमाला साथ देत नाही म्हणून तू तुझी सहनशीलता हरवून सुडाकडे वळलीस. तुझे पप्पासुद्धा सुडाचाच विचार करताहेत. ते चूक आहे, अनैतिक आहे. तू सहनशीलेचा स्वीकार कर आणि पृथ्वीचा दुसरा गुण दातृत्व, तो तू अंगी बाणवून घे. तुझ्या प्रेमाचं सार्थक होईल !"
सायलीच्या बोलण्याने इला भानावर येत होती, साहिलला मिळवण्यासाठी आपण व पप्पा किती भयंकर विचार करत होतो आणि कुठल्या भयंकर थराला जाणार होतो आणि साहिलचं भवितव्य बरबाद करणार होतो या विचाराने तिचं मन पश्चातापदग्ध झालं आणि तिच्या डोळ्यांतून आसवं ओघळायला लागली होती. सायलीने सांगितलेली समर्पण आणि त्याग ही प्रेमाची परिभाषा तिच्या हृदयाला भिडली आणि तिचे आंसू अजूनच वाढले. ती मुसमुसू लागली.
तिच्या पश्चातापदग्ध मनःस्थितीची कल्पना सायलीला आली होती. मनसोक्त रडूनच इलाचं मन शांत होईल असं तिला वाटत होतं.
बराच वेळ असाच गेला. आपलं रडणं कसंबसं आवरत उन्मन होऊन इला उठली. तिने सायलीला घट्ट मिठी मारून ती म्हणाली, "सायली, थँक यू ! आज तू माझ्या डोळ्यांवरची आत्मकेंद्रितपणाची झापडं दूर करून मला पाप करण्यापासून परावृत्त केलंस आणि प्रेमाची परिभाषा मला शिकवलीस. याक्षणी मला तीव्रतेनं जाणवतंय की प्रेम म्हणजे फक्त समर्पण ! तेच प्रेम आता मला जगायचंय !"
सायलीने तिला मिठीत घेऊन तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि हसत हसत म्हणाली, "बरं झालं ना, तू इथं आलीस ते ! साहिलला अट्टाहासाने मिळवायला आली होतीस पण त्याचं दान तूच माझ्या पदरात टाकलंस आणि तुझ्या इला नावाचा अर्थ सार्थ ठरवलास ! तू केलेलं समर्पण मी कधीच विसरणार नाही. लव्ह यू, इला !"
इला म्हणाली, "मी रस्ता भटकले होते पण तू मला योग्य मार्गावर आणलंस. घोर पाप करण्यापासून तू मला वाचवलंस म्हणून मी तुलाही समर्पित आहे. लव्ह यू, सायली !"

© रमेश नागपुरे
मुलुंड (पूर्व), मुंबई ४०० ०८१
मोबाईल # 98690 75238

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...