गुरुवार, २५ जून, २०२६

2934. मोत्याच्या बांगड्या

 अंगण झाडून सडा घालताना येणारा मातीचा गंध तिनं श्वासात भरभरून घेतला. 
सकाळचा गारवा होताच आणि त्यात मन प्रसन्न करणारा हा गंध. खरंतर माहेरी कधी सूर्यदर्शन होत नव्हतं कारण तासनतास अंथरुणात लोळत पडायचो आपण.
आई किती ओरडत होती, ‘अग उद्या सासरी जाशील तर अस चालणार नाही... लवकर ऊठ सडा, रांगोळी कर...’
पण आपण हसवून उडवून लावायचो. ‘जा ग झोपू दे, बोर नको करुस... मी सासरी पण नाही करणार हे सगळं...’
आई कंटाळून सोडून द्यायची.
फॉरेनचा जावई मिळाला म्हणून आई अगदी खुश होती.
‘बरं झालं बाई नाहीतरी काही ऐकत नव्हती रितीभाती... आता तिकडे परदेशात काही करा...’
पण काही कारणास्तव आपला कॅन्सल झालेला व्हिसा... मग  लग्नानंतर 6 महिन्यात तो तर गेला सोडून ह्या भरल्या घरात मला.
आता आई आठवायला लागली.
तेव्हाच थोडं फार ऐकलं असतं तर पण छे, नाही जमलं आपल्याला. खरंतर आपण करूनच नाही पाहिलं ना... ती मनाशीच पुटपुटत बागेतल्या झोपाळ्यावर बसली... 
डोळ्यातलं पाणी निग्रहाने परतवत... कारण आता तो सांगून गेला होता, ‘दोन महिन्यांनी माझं काम आहे परत भारतात तेंव्हा मी आलो कि नेतो तुला...’
माणसांना काय जातं असं म्हणायला एकतर नवीन जागा, नवीन माणसं. रितीभाती वेगळ्या पण आता काय करणार ह्या विचारात ती होती.
तेवढ्यात मऊ लुसलुशीत सुरकुतलेले पण सुंदर मोत्याची बांगडी असलेले हात माझ्या खांद्यावर आले. 
‘ए वेडाबाई कसला विचार करतेस ग एवढा...? अग अात्ता जातील 2 महिने मग येईलच तो. तुला आमच्यात रहाणं अवघड वाटतंय का? पण जमेल ग, मी काही तुला सल्ला देणार नाही की जा माहेरी, अग आता शिकून घे सगळ्या रितभात. म्हणजे कायम उपयोगात पडेल.’
माझे डोळे पुसत आजेसासूबाईंनी त्यांच्या मोत्याच्या बांगड्या असलेले हात माझ्या हातावर आश्वासक पणे घट्ट दाबले.
मला सासुबाई नव्हत्या, लवकर वारल्या. पण आजेसासुबाई अगदी तरतरीत होत्या, हसऱ्या, प्रसन्न अश्या शब्दांना शोभणाऱ्या. 
कधीही काम न केलेल्या हातांना त्यांनी वळण लावलं... 
आज त्यांना जाऊनही कितीतरी वर्ष झाली...
मी रुळले, घडले ह्या संसारात ती मुळात त्या दोन सांभाळुन घेणाऱ्या हातांनी... माझ्या चुकांना त्यांनी सुधरवलं पण कधी हिणवले नाही. म्हणून आत्मविश्वास वाढत गेला... 
त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं मला... ‘स्त्री पुरुष समानता हे जरी खरं असलं तरी काही काम खास तिच्यामुळेच देखणी, सुंदर, नाजुक होत असतात. तिनं तिथं ती सहज स्वीकारावी फार झगडत बसू नये. ‘मीच का करू म्हणत?’ आता सकाळची सडा रांगोळी अग प्रसन्न करून जाते आपल्या घरादाराला... तिथं ‘मीच का करू...’ म्हणत जर बायका भांडत बसल्या तर बरंच काही हरवतं गं... ह्या बांगड्यांच्या हातात ना जादू असते. अग ती त्या परमेश्वरानेच भरलेली असते... क्वचित ठिकाणी हा अन्याय वगैरे असू शकतो... पण सतत - ‘मीच का करू...’ - असे झेंडे उगारले कि मग त्या हातातल्या जादूने काहीच जादू घडत नाही... हे जादूचे हात रांगोळी काढू शकतात, अंगणापासून घरातही टापटीप हेच हात आणतात... घरात असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनात जाणारा मार्ग पोटातून जाणारा तो हि जिंकू शकतात... अर्थात पुरुषही करतात स्वयंपाक... पण ओट्यावर जो लक्ख हात फिरतो ना तो ह्या जादूच्याच हाताचा असतो... लेकरांच्या डोक्यावरून मायेने फिरणारे हात घरातल्या बाईचेच असतात... इथंही स्वातंत्र्याच्या नावाखाली आईपण नाकारून बाईपण जिथं जास्त डोकं वर काढतं तिथेही मग लेकरांची आबाळ ठरलेलीच समज... सगळ्या नात्यांना सावरून धरणारे... येणाऱ्या जाणाऱ्या साठी भरभरून करणारे... हे हात थोडे जरी अडखळले ना तर मजा जाते ग... तू असं समजू नकोस मी तुला गुलाम बनवायला शिकवत आहे. नव्हे मी तुला घराची राणी होऊन राज्य करण्याची जादू शिकवत आहे... आपणही शिकत गेलो ती जादु आणि म्हणून तर आजीने जाण्यापूर्वी अगदी जवळ बसवून त्यांच्या मोत्याच्या बांगड्या माझ्या हातात घातल्या आणि म्हणाल्या - ‘ह्या हाताच्या जादुमुळे ह्या बांगडीचे मोती इतके उजळून दिसतात...’ सोन्यात मढवलेल्या ह्या खऱ्या मोत्याच्या बांगड्या मला माझ्या सासुने दिल्या होत्या... माझ्या सुनेला देईपर्यंत ती लवकरच देवाघरी गेली... तू मात्र खरंच समजून घेऊन घरावर राणीसारखं राज्य केलं... हा बांगड्यांचा वसा असाच चालू दे... समर्पणाच्या हातांची जादू दुसऱ्या हातात द्यायला विसरू नकोस...  कारण आपल्या घरात या पुढेही येणाऱ्या सुनेनी राणी होऊन राज्य करावं... गुलाम होऊन गुलामी नाही आणि उगाच राजा बनण्यासाठी नको ती पुरुषी धडपड करून घरात युद्धही करू नाही... त्या हातांना ह्या मोत्याच्या बांगड्यांची चमक समर्पणातून वाढवायची हे नक्की सांग... जशी तू वाढवलीस बघ किती सुंदर दिसत आहेत तुझे हात त्या बांगड्यांनी...’
असं म्हणत आजीने डोळे मिटले होते...
आपल्याला सावरणारे हात मिळाले म्हणून आपण बदलत गेलो...
परदेशात होतो तेव्हाही आणि इकडे परतलो तेंव्हा पण...  आजीसासूबाईंच्या ह्या बांगड्यांनी खरंच ह्या हातांना सत्कारणी लावलं होतं... 
आताही ती झोपाळ्यावर बसून बांगड्याच निरखत होती... तिला हसू आलं आणि नेमकं बागेत गेट वाजलं... 
होणाऱ्या सुनबाई दारात मोगऱ्याची टोपलीभर फुलं घेऊन उभ्या होत्या... 
‘काकू सॉरी हं. मावशीने सकाळीच सांगितलं होतं... तिच्याकडे तुम्ही तुमच्या हाताने लावलेल्या मोगऱ्याचा हा पहिला बहर आहे म्हणून हि फुलं आणून द्यायला. पण मलाच झोप सुधारत नाही ओ जागच नाही आली...’
मी हसून म्हणाले, ‘चालायचंच गं एकदा लग्न झालं की येईल तुझ्याही हातात जादू ह्या मोत्यांच्या बांगड्यांनी...’
ती ओशाळली, बांगडीची जादू हे ऐकून गडबडली आणि लग्नाचं नाव काढताच पळाली. समोरच्या बंगल्यात मावशीकडे... 
चारच दिवस तर झाले होते सगळी पसंती होऊन.
मी मात्र परत एकदा मोत्याच्या बांगड्यांकडे बघितलं.
टपोरे मोती खरंच खुलले होते... माझ्या हातातल्या जादूने आणि समर्पणाच्या मोगऱ्याचा सुवासाने.

-स्वप्ना मुळे (मायी) छ. संभाजीनगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...