गुरुवार, २५ जून, २०२६

2911. देणं-घेण

     क्षमाचं लग्न हल्लीच्या पध्दतीने नाच गाण्यात पार पडलं. त्यानं आधीच वैतागलेल्या मंगलताई आता अजूनच वैतागल्या होत्या.
“अहो, ही साडी बघितलीत का? असल्या साड्या देण्यापेक्षा काही न दिलेलं बरं!” त्यांनी ती गुलाबी साडी मधुकर रावांपुढे आपटली. “गुलाबी साडीवर बटबटीत जांभळी मोठ्ठी फुलं असलेली साडी का मला द्यायची?”
मधुकरराव चहा घेत फोनमधे गुंतले होते..काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलले, “आवडत नसेल तर देऊन टाक कुणाला तरी!” मंगल अजूनच भडकली.
“असल्या भेटी मी नाही हो देत..द्यायचं ते उत्तम द्यावं. बघाच आपल्या सुरूचीच्या लग्नात मी कशा भेटी निवडते. अहो, नचिकेत देखील वडिलांना बोलला ना भाकड गाय भेट म्हणून देऊ नका म्हणून?”
“मंगल, आता कठोपनिषद या जगाच्या सामान्य व्यवहारात आणू नको! जन्म मृत्यू समजून घेणाऱ्या नचिकेताचं उदाहरण कशाला? आणि त्यांना ही साडी उत्तम वाटून त्यांनी दिली असली तर? .. 
ते आणखी काही बोलणार तेवढ्यात क्षमाच्या आईचा फोन आला..“मंगल, आवडली का साडी? तुला गुलाबी रंग आवडतो म्हणून मुद्दाम घेतली!”
“हो हो.. आवडली ग ! तू घे विश्रांती. करेन मी तुला चार  
दिवसांनी फोन !” मंगलताईनी आपली नावड कळू नये म्हणून फोन बंद केला.
“कुणाला बाई देणार असली साडी? बटबटीत फुलांची?”
त्यांना राहवेना म्हणून त्यांनी साडीचा फोटो काढून लेकीला पाठवला.
“ममा, मस्त आहे साडी.. got to go.” लेक काहीतरी घाईत खरडून पळाली व मंगलताई कामाला उठल्या. चार वाजता दोन मैत्रीणी यायच्या होत्या.. त्यांनी बटाटावडा करायला घेतला. मटार घातलेला पुलाव तयार होता. टोमॅटोचं सार करून झालं होतं..
चार वाजता शांती व सुजाता आल्या. त्या क्षमाच्या लग्नात भेटल्या होत्या पण गडबडीत बोलणं झालं नव्हतं..
“छान झालं नाही क्षमाचं लग्न?” मंगलाताईंनी विषय काढलाच!
“हो.. फारच छान!” शांती म्हणाली पण मंगलताई ज्या पण..ची वाट बघत होत्या तो पण काही पुढे आला नाही..
पुलाव, सार, बटाटेवड्याची डिश समोर ठेवत त्यांनी गुलाबी साडी समोर ठेवली.  “ही मला आलेली भेट.. “ त्या स्वरातील कडवटपणा जाणवून सुजाताने बरोब्बर प्रतिक्रिया दिली..“तू का नेसणार ही मोठाली फुलं असलेली साडी? अगदी सगळी बाग अंगावर घातल्यासारखी दिसेल. मला तर अगदीच गॅाडी कलर दिलाय. आमच्याकडच्या लग्नात मी सगळ्यांना नारायण पेठ दिली होती. आठवतंय?”
“अगं छान आहे की ही साडी! मला आवडली. नेसलीस की छान दिसतात काही डिझाईन्स” शांतीचा शांतपणा मंगलताईस आवडला नाही. त्यांनी नाक मुरडलं!
“मी सांगू का मंगल? आपल्याला जेव्हा भेट मिळते ना तेव्हा आपण फक्त थॅंक्यु म्हणावं असं मला वाटतं. कदाचित मनासारखी नसेल ती भेट..पण आपण बायका या गोष्टींचा फार काथ्याकूट करतो !  ज्याची जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे ते भेटी घेतात. टेस्ट मधे फरक असतोच!”
मंगसताईंनी आपलं अस्त्र बाहेर काढलं.”शांती, तू एवढी वर्षं भारताबाहेर राहिलीस ना म्हणून तुला कल्पना नाही!”
शांती गोड हसली..”अग, साडी आवडली नाही तर दे एखाद्या गरजू बाईला..टेबल रनर म्हणून वापर नाहीतर एवढी कलात्मकता आहे तुझ्यात ..बनव त्यापासून काही वेगळं! पण त्यांनी आपलं मन वाचावं हा अट्टाहास का? तिनं आपली आठवण ठेवली एवढंच बघावं!” शांती चार युक्तीच्या गोष्टी बोलून गेली. पण तरी मंगलाताईंची जळजळ संपत नव्हती..
असेच काही दिवस गेले अन् एक दिवस एक सुरेख कार्ड चक्क पोस्टानं घरी आलं. क्षमानं सर्व आलेल्या पाहुण्यांना धन्यवाद पाठवले होते. ते ही स्वत:च्या हस्ताक्षरात! हल्ली पत्र येत नाहीत म्हणून या पोस्टानं आलेल्या पत्राची खरंच  अपूर्वाई होती..
मंगलताईंनी ते गुलाबी पाकिट उघडलं.. आतल्या कार्डावरचं क्षमा व तिच्या नवरा अमर यांचा हात जोडलेला फोटो बघून त्यांना बरं वाटलं..आतला मजकूर वाचण्यास सुरवात केली..
मावशी व काका,
सप्रेम नमस्कार
तुम्ही आमच्या लग्नाला येऊन आम्हाला आशीर्वाद दिलेत याहून मोठी भेट खरंतर काही नाही. शिवाय कॅश दिलीत.  तुम्ही दिलेले पैसे इंन्स्टंट पॅाट घेताना वापरले. त्यामुळे खूप वेळ वाचतो आहे!
आणि हो..तुम्हाला आमची कांचन आठवते का? वयाच्या १५ वर्षापासून आईकडे कामाला होती. तिला साड्यांचं छोटंसं दुकान काढायचं होतं. अमरनं व मी तिला एक गाळा घेण्यास थोडी मदत केली आणि बरका तिचं दुकान सुरू झालंय. माझ्या लग्नाच्या सर्व साड्या तिच्याकडूनच घेतल्या ! आता स्वतःच्या हिमतीवर उभी आहे बघा ! नवऱ्यानं सोडलंय पण आम्ही आहोत ना तिच्याबरोबर.
सुरूचीच्या लग्नातल्या साड्या पण कांचनकडून घेता येतात का बघ.. आपल्या लेकीचा संसार सुरू करताना अशाच एका लेकीच्या संसाराला आपला हातभार लागला तर किती छान ना? मला आईचं कौतुक वाटलं..
.
.
.
तुझी,
क्षमा (आणि अमर पण)
मंगलताईंनी चष्मा काढला..पुढचा मजकूर त्या वाचू शकल्या नाहीत. कांचन त्यांच्याकडेही काही वर्षं काम करत होती. जे करेल ते मन लावून करायची! आपल्या मुलीच्या वयाची एक मुलगी झगडून तिच्या संसाराच्या नावेचं शीड पाण्यात बुडू नये म्हणून धडपडते आहे आणि आपण या देण्याघेण्यात अडकलोय? मान, अपमान, स्टॅटस यातून कधी बाहेर पडणार आपण? खरंच शांती म्हणाली तसं.. जी आली ती भेट बघून करबध्द होऊन फक्त थॅंक्यु म्हणावं! वापरा अगर नका वापरू पण तुलना नको, स्पर्धा नको काही नको..
कांचन कडून सुरूचीच्या लग्नाच्या साड्या घेऊ आपण पण! 
त्यांनी भेट आलेली गुलाबी साडी हातात घेतली. भेटीमागील भावना खरंच माहित नसतात. आपली एक आत्या नेहमी अपंगांनी बनवलेल्या भेटी द्यायची. त्या भेटी अगदी उत्कृष्ट नसतील कदाचित पण ज्यांनी बनवल्या त्यांना केवढा आनंद व्हायचा ! पण माणूस नेहमी स्वतःच्या विचारात रमलेला असतो. भेटींना आपले मान सन्मान चिकटवण्यात मग्न असतो.. आपणही त्यातल्याच! 
त्यांनी गुलाबी साडीकडे परत बघितले. त्यावरून हात फिरवला.
कांचनचे कष्ट, अश्रू, व कृतज्ञतेत भिजलेली गुलाबी साडी व त्यावरील जांभळी फुलं फारच सुरेख दिसत होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...