गुरुवार, २५ जून, २०२६

2984. नाव, नावाडी आणि बेटावरचे लोक

 का विशाल नदीच्या मध्यभागी एक बेट होतं. त्या बेटावर एक गाव वसलेलं होतं. गाव सुंदर होतं, लोक साधे होते. परंतु एक मोठी अडचण होती.  शहरात जायचं असेल तर नदी पोहत पार करावी लागे!
ज्यांना पोहता येत होतं, ते शहर पाहून येत. तिथं बाजारहाट,
नाटकं, शाळा, नवी कल्पना, नव्या संधी पाहत. पण बहुतेक गावकऱ्यांनी जन्मापासून मृत्यूपर्यंत बेटाबाहेरचं जग पाहिलंच नव्हतं..
एके दिवशी काही धडपड्या तरुणांनी विचार केला,
‘प्रत्येकानं पोहणं शिकेपर्यंत वाट बघण्यापेक्षा आपण सगळ्यांना जाता येईल, अशी व्यवस्था का बनवू नये?’
त्यांनी झाडं तोडली, लाकडं गोळा केली, घाम गाळला आणि एक नाव तयार केली. काही जण नावाडी म्हणून प्रशिक्षित झाले.
सुरुवातीला गावात उत्साहाचं वातावरण होतं. वृद्ध शहरात जाऊ लागले. मुले शिक्षणासाठी जाऊ लागली. शेतकरी शहरात जाऊन माल विकू लागले…
लोक म्हणू लागले, ‘ही नाव नाही, हे तर आपल्या आयुष्याचं दुसरं दार आहे !’
पण जिथं माणसं असतात तिथं समस्या असतातच. कधी नावाड्याचा अंदाज चुकला तर लाट नावेत शिरे आणि प्रवासी भिजत.
कधी गर्दीत चढता-उतरता एखादा पाण्यात पडे. कधी ‘नावाडी जास्त भाडं घेतो’ अशी तक्रार येई. कधी प्रवासी वेळ पाळत नसत. कधी भांडणं होत.
एकदा एका संतप्त प्रवाश्यानं रागाच्या भरात नावेची फळी फोडली.
दुसऱ्या वेळी काही लोकांनी नावाड्याला मारहाण केली…
नावाडी घाबरले. त्यांनी नियम कडक केले. आधी पैसे घ्यायला सुरुवात केली. प्रवाशांची संख्या कमी केली. संशयास्पद लोकांना नकार द्यायला सुरुवात केली.
आता प्रवासी संतापले.
‘हे नावाडी स्वतःला राजा समजू लागलेत !’
नावाडी म्हणाले, “आम्ही नाही सांभाळलं तर नावच बुडेल !”
असं करता करता वातावरण इतकं बिघडलं की, नाव बंद पडण्याची वेळ आली.
गावात एक वृद्ध झेनगुरु राहत होते. एक दिवस नावाडी आणि प्रवासी दोघंही त्यांच्याकडे गेले.
दोघंही आपापली बाजू मांडू लागले.
प्रवासी म्हणाले, ‘नावाडी लोभी आहेत !’
नावाडी म्हणाले, ‘प्रवासी बेफिकीर आहेत.’
गुरु शांतपणे ऐकत राहिले.
मग त्यांनी दोघांनाही दुसऱ्या दिवशी सकाळी नदीकिनारी बोलावलं. सकाळी सर्वजण जमले. गुरुंनी नाव पाण्यात सोडली आणि मग त्यांनी विचारलं,
“ही नाव कुणाची आहे?”
प्रवासी म्हणाले, “नावाड्यांची.”
नावाडी म्हणाले,“आमची.”
गुरु हसले. ते म्हणाले,
“म्हणूनच तुमचा वाद संपत नाही !”
सर्वजण गोंधळले.
गुरुंनी पुन्हा विचारलं, “जर नाव फक्त नावाड्यांची असेल, तर प्रवाशांनी तिची काळजी का घ्यावी? आणि जर नाव फक्त प्रवाशांसाठी असेल, तर नावाड्यांनी जीव धोक्यात का घालावा?”
कुणीच उत्तर दिले नाही.
गुरु म्हणाले, “ही नाव नावाड्यांची नाही. ही नाव प्रवाशांचीही नाही. ही नाव नदीचीही नाही. ही नाव ‘विश्वासाची’ आहे!”
गुरुंनी नदीतल्या एका लाटेकडं बोट दाखवलं.
“लाट नावेत आली, तर कपडे भिजतात पण अविश्वास नावेत आला, तर संपूर्ण व्यवस्था बुडते !”
ते पुढं म्हणाले, ”नावाड्यांनी लक्षात ठेवावं, ‘प्रवासी हे ओझं नाहीत. त्यांच्यामुळेच नाव चालते’ आणि प्रवाशांनी लक्षात ठेवावं, ‘नावाडी हे नोकर नाहीत त्यांच्यामुळंच प्रवास शक्य होतो.’
“नियम हवेत, पण नियमांपेक्षा संवाद महत्त्वाचा. 
भाडं हवं पण भाड्यापेक्षा पारदर्शकता महत्त्वाची. 
सुरक्षा हवी, पण सुरक्षेपेक्षा परस्पर आदर महत्त्वाचा!”
एका तरुणाने विचारलं, “मग चूक कुणाची?”
गुरु हसले.ते म्हणाले, “ज्या दिवशी तुम्ही चूक शोधणं थांबवून उपाय शोधायला लागाल, त्या दिवशी नाव वाचेल.”
नंतर गावात काही साधे नियम झाले. भाडं ठराविक झालं. प्रवाशांना सूचना दिल्या जाऊ लागल्या. तक्रारी ऐकण्यासाठी मंडळ बनलं. नावाडी आणि प्रवासी महिन्यातून एकदा एकत्र बसू लागले. हळूहळू भांडणं कमी झाली. नाव पुन्हा भरभरून चालू लागली. अनेक वर्षांनी गुरुंचं निधन झालं. त्यांच्या झोपडीत एकच वाक्य लिहिलेले सापडलं.
‘नाव लाकडाची असते पण ती चालते विश्वासावर !’
आणि त्या बेटावरल्या लोकांना तेव्हा समजलं.
‘व्यवस्था कधीच अपघातांमुळं नष्ट होत नाही. ती नष्ट होते जेव्हा सेवा देणारे आणि सेवा घेणारे दोघंही विसरतात की, ते एकाच नावेत बसलेले आहेत !’

- डॉ प्रज्ञावंत देवळेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...