पंढरपूरच्या दिशेनं आबांची पावलं वळाली. पोटांत ब-यापैकी भूक जागी झाली होती. पंढरीच्या वाटेवर पावलं ठेवण्यापूर्वी चार घास खावेत म्हणून एका ओढ्याजवळील जागा पाहून ते दगडावर विसावले. भवताली गर्द वनराई. थोड्यावेळ आराम करत शिदोरी सोडली. बायकोनं सगळं बांधून दिलं होतं. आजवर 40 वेळा वारी केली. पण बायकोच्या डोळ्यात निरोप देतांना काळजी होती. भाकरी खातांना तिचा चेहरा उगीचच आठवून गेला. आपल्या हट्टाचा तिनं सन्मान केला.
लॉकडाऊनमुळं सगळं बंद. जिल्हाबंदी.पासशिवाय गाडीतून जाणं नाही. इतका लांबचा रस्ता.वारक-याचा वेश केला तर मधे अडवून पुन्हा घरी पाठवतील..! म्हणूनच आडमार्गाने शेतांतील; डोंगर नाल्यातून; मुरबाड जमिनीतून वाट चालत ही वारी करायची निर्णय घेतला अन् तिच्या काळजात धस्स झालं होतं..! तिनं परोपरीनं समजावलं. पुढील वारीला जावा. इतकी लोकं थांबलीत नं? विठ्ठल काय पंढरपूरात आहे का? आपल्याला पटावं म्हणून संतांच्या अभंगाचे दाखले दिले. पण आजवर वारी चुकली नाही. माहिती नाही बुद्धी सांगत होती ती सांगतेय ते बरोबर आहे. सगळं जग महामारीनं त्रस्त आहे. व्यवहार ठप्प झालेत. मग अशावेळी आपण तरी हट्ट का करावा? लाखो वारक-यांना वाटत नसेल? पण ते थांबलेत नं घरी? तरीही हृदय गलबलून येत राहिलं. रात्रभर डोळ्याला डोळा लागंना. उशी भिजत राहिली. माहितीए पांडुरंगाचं मंदिर बंद आहे. पण तरीही त्याच्या मंदिराचं दर्शन घेऊ. कळसाचं घेऊ.चंद्रभागेत स्नान करु..!! तिथं सोडलं नाही तरी लांबून तरी कळस दिसेल..! आंतील ओढ ही महापूराप्रमाणे वाढत गेली. जणूकाही मनांत भक्तिच्या ईंद्रायणीचा डोह हिंदकळत होता त्यालाच पूर आला व पाणी चौदिशेनं वहात चंद्रभागेकडं धांवू लागलं...! मग विठ्ठलावर भार घातला. इतर विचारांना डोहाच्याच जलानं तिलांजली दिली.अन् पावलं गतिमान झाली. वेडेपण होतं माहितीए. पण शहाणपण डिग्रीच्या अहंतेत अडकतं. आम्हाला ते नकोच आहे. बुद्धीची वेस ओलांडली की भक्तीची पेठ सापडते..!
आबांनी हातानं घांस खातांना आपल्या पावलांकडे पाहिलं. खाचखळग्यांचा; काट्या कुट्यांच्या रस्त्यातून पार ठेचकाळून निघालेली. पण तरीही पावलांच्या भेगेतील वेदना आनंदात होती.तक्रार नव्हती तिला..! दोन घांस खाऊन पाणी प्यायलं. शिदोरी बांधून ठेवली. काय काय दिलं होतं बायकोनं. वाटेत मिळणार नाही म्हणून. नको नको म्हणलं तरीही दिलं. म्हणाली आमचा सुदामा चाललाय न्हवं भेटीला. ते वाक्य आठवून आबांना हसू फुटलं. तितक्यात एक तरुण तिथं आला. डोक्यावर मोठ्ठं मुडासं. खांद्यावर अडकवलेली लांब मोठी पिशवी.आबांना पाहून बसला.
"नमस्कार म्हातारबाबा" आबांनी प्रश्नचिन्ह डोळ्यात लेवून नमस्कार केला. मग कोण कुठं चाललंय वगैरे बोलणी झाली. तो व्यापारी होता. लॉकडाऊनमुळे सगळं बंद झालं. म्हणूनच चालत चालत गावोगांव दुकानदारांना माल विकत होता. आबांची ही वारी पाहून तो खळखळून हसला.म्हणाला,
"अहो बाबा. सगळं जग थांबलं. महामारीवर ईलाज निघालेला नाही. देवळं भितीनं आधी बंद झाली. देवच पहिल्यांदा जिथं घाबरला. तो काय करणार? लोकं मरताहेत देव येतोय का तुमचा? कोणताच येत नाहीए. मग तुम्ही कितीही हांका मारा तो काही दार उघडत नाहीए. मग म्हणे पोलिसांच्या ; डॉक्टरांच्या रुपात तोच आहे वा रे युक्तिवाद ..!! म्हातारबाबा मी तुमच्यापेक्षा लहान असलो तरीही भारतात सगळीकडे फिरलोय. चांगलं शिक्षण झालंय माझं. डिग्री होल्डर आहे...!"
त्याच्याकडं दुर्लक्ष करुन आबा उठले.तो ही लगबगीनं उठत म्हणाला,
"तुम्ही ऊत्तर दिलं नाहीत. थांबा थांबा मी पण तिकडंच चाललोय." आबांनी नमस्कार करत म्हणलं,
"मला एकलंच जाऊ दे " तरीही तो ऐकेना..," पण..पण मला ऊत्तर द्या ना "
"मी का ऊत्तर देऊ? ज्या प्रश्नांनाच मुळात अर्थ नाही. मला वेळ वाया घालवायचा नाहीए. माझं नामस्मरण सुरु असतं. त्यांत खंड पडतो." असं म्हणत आबांच्या पावलांनी वेग घेतला..!
तरीही तो मागून आला आबांचा हात धरुन म्हणाला, "बरोबर आहे तुमचं पण कदाचित कदाचित तुमच्या ऊत्तरांनी मला माझे विचार चुकीचे की बरोबर आहेत हे तरी कळेल नं? "
त्यानं हांत जोडले. आबांनी थांबत त्याला म्हणलं,
"एकच सांगतो पोरा. मी तुला ऊत्तर सांगणार आणि निघून जाणार. मला वादविवाद: पत्युत्तरं; मतंमतांतरे यांत रस नाही. मला आवडत नाही..! माझा तो स्वभाव नाही. मी पांडुरंगाचा आहे "
तो लगेच म्हणाला "चालेल "
मग दोघंही चालत राहिले.
"हे पहा हे लोकं ज्या देवाबद्दल; ईश्वराबद्दल बोलतात तो आमचा ईश्वरच नव्हे. हा अर्धवट लोकांनी स्वत:च तयार केलेला देव आहे व ते स्वत:च त्यांवर आरोप करतात. यांनी ना माऊलीची ज्ञानेश्वरी अभ्यासली ना तुकोबारायांची गाथा. ना संतांचं म्हणणं ऐकलं. डिग्रीनं शहाणपण आलं बुद्धीनं अहंकार वाढला आणि मी मोठा झाला..! देवळं निर्माण कुणी रे केली? माणसानं..! देवाची मुर्ती? खांब..देवळाची दारं? इतकंच कशाला कुलूप? मानवानं आणि उघडतं कोण? माणूस. बंद कोण करतं? माणूस ...!! बंद केलं उघडलं. या भाषेनं तो बांधला; कोंडला वा मुक्त झाला. हे मनाचे खेळ झाले. जो अनंत आहे त्याला बांधणारे हे कोण? वारी निमित्य आहे. ज्याला भगवंत अंतरात भेटला त्याला वारीची गरज नाही पण पायरी वारीतही एक गोडी आहे. गोडी साखरेशिवाय राहते काय? तो जो अंतरात्मा आहे; चैतन्य आहे जे मला; तुला; जगताला इतकंच काय नास्तिकांना चालवतं तोच भगवंत. देव कुठंय तुमचा हे विचारणारं चैतन्य तोच..! भगवंतच विचारतोय असं. नास्तिकातील बोलविणारं चैतन्य जाऊ दे.बघा. नुसतं कलेवर उरेल. मग तेव्हा रामनाम सत्य. इतरांनी म्हणायची. मेलेल्याला काय त्याचं..! तो काय देतो? लोकं म्हणतात. वेडेपणा आहे हा सुद्धा. सगळीकडे व्यापाराची भाषा. बायको प्रेम करत नाही. तिथं व्यापार. मुलं व्यापारी. वृद्धाश्रमात ठेवतात.इकडं देवासमोरही व्यापार..!
आनंद अंतरात आहे. भगवंत म्हणजेच आनंद. तोच अंतरी राहिला तर बाहेरील वस्तू व माणसं यावर तो का अवलंबून राहिल? पण देवाला माणूस समजतात. माऊली म्हणते जो मला मानवाचे गुण लावतो तो माझं अवमूल्यन करतो असं भगवंत म्हणतो. प्रयोगशाळेत प्रयोग करतात. तेव्हा अनुमान मांडतात. इथं अनुभव न घेता आधीच नाकारतात. हे अनुभवाचं क्षेत्र. बुद्धीचं नाहीए..! गोडी खाल्याशिवाय कळते का रे? वारी म्हणून हवी. खरंतर ही आंतील वारी आहे. गुदद्वारापाशी मुलाधार चक्र आहे. मेरुदंडातून- म्हणजे तुमच्या भाषेत बॅकबोनमधून वर कुंडलिनी शक्तीचं जाणं ही वारी. योगाची. भृकुटीच्या तिथं ध्यान करतात ते पंढरीच्या वाळवंटीचा खेळच नव्हे का? आनंद आनंद उसळतो तेव्हा मस्तकी सहस्त्रदल चक्र. ते वीटेवरील विठूरायाच्या समचरणी आपलं मस्तक ठेवणं भगवंत भेट.''
इतकं म्हणून आबांनी गती वाढवली...!
तो तरुण मागून येत म्हणाला, "इतकं ज्ञान मिळालं कुठून?"
आबांनी ऊत्तर दिलं, ''संतांना शरण गेलं की मिळतं. संत हे तत्वज्ञानी; मानसशास्त्रज्ञ; महाज्ञानी असतात. पण ग्रंथ वाचणार कोण? माझी ज्ञानदेव माऊली जगताची गुरु आहे..!"
तो तरुण म्हणाला, "तुमचं ज्ञान ऐकून मी धन्य झालो. आजपर्यंत यावर विचार केलाच नव्हता, मी पण ज्ञानोबा ; तुकोबांची पालखी वाहणार."
"असं म्हणून आबांच्या तो पाया पडला. ते बेसावध होते ते मागं सरकले.
"अरे हे काय करतोस? "
"तुमचं जीवन धन्य झालं." तो म्हणला..! त्याच्या डोळ्यात अश्रू होते. आबांना आश्चर्य वाटलं...
"अरे मी संतांच्या पायतळीची धूळही नाही..!" ते म्हणाले.
मग तो मौन झाला. आबांचं नामस्मरण सुरु झालं..!
वाटेत त्यानं आबांना सोडलं नाही. इतकी तरी सेवा घडू द्या म्हणत राहिला. ते संकोचत राहिले. म्हणले पांडुरंगा काय हे लचांड मागे लावलेस..!
एका वळणावर अचानक तो म्हणाला,
"चंद्रभागा आली पहा. ही एक पिशवी ठेवा तुमच्याकडं. मी जातो. मला लवकर हा माल पोहोचवला पाहिजे...नमस्कार "
ते काही बोलायच्या आंत तो गेलासुद्धा. पिशवी कशाला दिली? हा प्रश्न तोंडातच राहिला. पण ते सोडून त्यांनी स्नान केलं. मंदिरात जायला बंदी होती. रस्ते बंद होते.पोलिस सगळीकडे तैनात होते. आबांचा ऊर दाटून आला. डोळे भरुन वाहू लागले. "पांडुरंग इथं येऊनही तू दूर...!! " असं म्हणत आवंढा गिळला..! पुन्हा पुन्हा नमस्कार केला. अन् अचानक स्मरण झालं त्या तरुणाच्या पिशवीचं. त्यांनी उघडली तर आंतून केशर कस्तुरीचा सुगंध प्रकटला. त्यांनी पाहिलं तर आंत ज्ञानेश्वरी ; आणि तुकोबांची गाथा..!! तुळशीमाळ..!!" तो अंगभर शहारले. त्यांना काहीच कळेना.संदर्भ लागेना. हा तर नास्तिक होता मग हे काय?.
तो म्हणला होता, " मी पण ज्ञानोबा तुकोबारायांची पालखी वाहणार "...!!
तो तो पांडुरंग तर नव्हता? या विचारांनी ते खालीच बसले. माझी परीक्षा बघितली? अन् त्यानं माझी सेवा केली?
डोळे भरुन वाहू लागले. अन् चहूबाजूनं आवाज निनादावा तसा आवाज आला,
"होय मी तुझा विठूराया. तुझ्या भेटीनं मिच धन्य झालो. तुझी ही वारी सार्थकी लागली..!"
हे ऐकून आबांनी वाळवंटात साष्टांग दंडवत घातलं.
चंद्रभागेलाही गहिवरुन आलं आज...! तिचा काठ केशरकस्तुरीनं नाहून निघाला..!!
🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा