ध्यानीमनी नसताना त्याने व्हाॅट्स ऍपवर मेसेज पाठवला." मिसिंग यु अलाॅट". ते वाचून मी मनांतल्या मनांत म्हटलं इतकं मिसिंग होत असेल तर मग भांडायचं तरी कशाला. ह्यावेळी मी ठरवलं होतं की आपली चूक नसताना माघार घ्यायची नाही. त्याला सुद्धा आपली चूक कळली पाहिजे. एखादेवेळी त्याने माफी मागितली तर बिघडलं कुठे. इतके दिवस त्याने भांडायचं आणि मी जाऊ दे जाऊ दे करून माफी मागायची हेच चाललं होतं.
ह्यावेळी मी मुद्दामच काही न झाल्यासारखे उत्तर दिले,
"मिसिंग यु अलाॅट म्हणजे नेमकं काय" 🤔
"ते नाही सांगता येणार "
"हे बरंय तुझं. मिसिंग म्हणजे नेमकं काय हे जर कळत नाही तर मग मेसेज पाठवून मोकळा बरा झालास. मेसेज पाठवला तेव्हा काय होतं तुझ्या मनांत? काही तरी असेलच ना. ते काय होतं तेच विचारतोय मी तुला."
"तुझ्या असण्याची सवय झाली आहे "
"मग मोडून टाक ती सवय."
"अशी कशी मोडायची "
"माझ्या जागी दुसऱ्याला शोध"
"तुला पर्याय नाही अजून तरी कोणी. माझ्या आयुष्याच्या हाॅटेलच्या टेबलावरचं मेन्यू कार्ड आहेस तू".
आज खुप दिवसांनी माझा जुना उल्लेख केला त्याने म्हणून हसायला आलं मला मनांतल्या मनांत. आजवर कितीतरी वेळा भांडलो आम्ही अगदी हमरातुमरीवर येऊन. पण दुसऱ्याच दिवशी पठ्ठ्या काल काहीच झालं नाही अशा थाटात माझ्या खांद्यावर हात टाकत कटिंग प्यायचा. त्याची ही कृती मी बघत बसायचो तेव्हा म्हणायचा तो,"मला बघतोस काय असा पहिल्यांदाच भेटल्यासारखा."
मी डोक्यावर हात मारून म्हणायचो त्याला ,"अरे इतका कसा निर्लज्ज तु. काल येवढा भांड भांड भांडलास विनाकारण आणि आज परत काहीच झालं नाही अशा आविर्भावात माझ्या सोबत चहा प्यायला मोकळा."
एव्हाना मला देखील त्याची सवय झाली होती. रात गयी बात गयी हा त्याचा जगण्याचा फंडा होता.
त्याच फंड्याचा एक भाग म्हणून सकाळी सकाळी त्याने केलेला मेसेज होता बहुतेक मिसिंग यु अलाॅट.
खुप वेळाने पुढचा मेसेज आला
"अनेबल टु टाईप फास्ट फ्राॅम हाॅस्पिटल बेड. नो वन अराऊंड. दॅट्स व्हाय मिसिंग यु अलाॅट."
मेसेज वाचल्यावर मला धक्काच बसला. हा खरंच हाॅस्पिटलमध्ये आहे का मला शेंड्या लावतोय ते कळण्यासाठी नाईलाजाने शरणागती पत्करून मी त्याला फोन लावला.
फोनवरचा त्याचा आवाज ऐकला आणि पोटात धस्स झालं. हाॅस्पिटलचं नांव आणि पत्ता विचारून घेऊन शक्य तितक्या लौकर पोहोचण्याचे सांगून मी फोन ठेवला.
धापा टाकत मी हाॅस्पिटलमध्ये पोहोचलो. त्याला बॅंडेज मध्ये गुंडाळून ठेवलं होतं. खोलीत नुकतेच त्याचे दोन नातेवाईक आल्याचं खाली रिसेप्शन मध्ये सांगितले होते मला. त्याने मग माझी ओळख करून दिली. ते दोघे त्याचे दादा वहिनी होते.
"बरं झालं तुम्ही आलात कालचा राग मनांत न ठेवता. त्याचा दादा मला म्हणाला.
"कालचा राग " मी गोंधळून विचारले.
"हो. कालचा राग. काल तुमच्यात झालेल्या भांडणाचं सविस्तर वर्णन मी ऐकलं ह्याच्या तोंडून."
मी रागावून त्याच्याकडे बघितले. बॅंडेज मधल्या दोन्ही हातांनी जोडून त्याने मला नमस्कार केला आणि त्या क्षणी माझ्या भावनांना मी रोखू शकलो नाही.
त्याचे जोडलेले हात पकडत मी त्याला जरा अधिकारवाणीने म्हणालो," असाच आहेस तू. शांत बसावं तरी बसवत नाही. मैत्री तोडावी म्हटली तर तोडता येत नाही. तुला माझी काळजी नसते कधीच. तु तुझ्याच विश्वात गुंग असतोस."
माझं बोलणं मध्येच तोडत त्याचा भाऊ मला म्हणाला की," तुमचा राग स्वाभाविक आहे. पण तो तुम्हाला त्याची सावली मानतो. तो फटकळ जरूर आहे. मनांत आलं की तोंडावर बोलून मोकळा होतो. पण तुम्ही एकमेव असे आहात की तुमच्यावर घेतलेलं तोंडसुख हे खरंतर त्याचं तुमच्यावरचे प्रेम असतं.फक्त ते व्यक्त करण्याची त्याची पध्दत फार वेगळी आहे. बंगल्यात ऐशोआरामात रहाणारा तो आणि चाळीत रहाणारे तुम्ही. असं असूनही तुमची आजवरची मैत्री किती खोलवरची आहे हे ही डायरी वाचल्यावर चटकन लक्षांत येते. तुमची सच्ची मैत्री, प्रामाणिकपणा आणि निष्ठा ह्या आजकालच्या जगात खरोखरच दुर्मिळ असणाऱ्या गोष्टी तुमच्याकडे भरभरून आहेत ह्याचा त्याला खुप अभिमान आहे. त्याची आयुष्य जगायची बेफाम, बेधुंद, आणि बेधडक पध्दत आमच्या घरी कायम चिंतेचा विषय असतो. जेव्हा जेव्हा ही चिंता व्यक्त झाली घरच्यांकडून तेव्हा तेव्हा त्याने तुमचा उल्लेख सावली म्हणून केला आहे. जोपर्यंत माझी सावली माझ्या सोबत आहे तोपर्यंत माझं काही बरं वाईट होणार नाही तुम्ही निश्चिंत रहा असं म्हणून प्रत्येकवेळी त्याने आम्हाला गप्प केलं. पण काल त्याच्या गाडीच्या अपघाताची बातमी पोलिसांनी दिली तेव्हा त्याला कितपत लागलं असेल हा विचार मनांत यायच्या आधी त्याची सावली त्याच्या सोबत नव्हती ह्याचं आश्चर्य मला वाटलं होतं. हाॅस्पिटलमध्ये त्याच्या तोंडून तुमच्या कालच्या भांडणाविषयी ऐकून मी डोक्याला हात मारून घेतला. तुमच्या तुटलेल्या मैत्रीसाठी खुप दुःख झाले मला. आता काही तुम्ही येणार नाही त्याला भेटायला असं मी त्याला निक्षून सांगितले. तेव्हा तो मला म्हणाला दादा जस्ट वेट अँड सी. असं म्हणून त्याने तुम्हाला व्हाॅट्स ऍपवर मेसेज पाठवला, "मिसिंग यु अलाॅट ".
पुढचं सगळं तुमच्यासमोरच घडलं आहे. रियली हॅट्स ऑफ टू युवर ट्रु फ्रेंडशिप."
हे सगळं ऐकून मी सुन्न झालो. निःशब्द झालो. त्याच्या वहिनीच्या तोंडून बाहेर आलेल्या हुंदक्याने खोलीतलं वातावरण आणखी भावनिक झाले.
इतका वेळ मनांत थोपवून ठेवलेले माझे विचार खडकांवरून स्वतःला बेधडकपणे खाली झोकून देण्याऱ्या प्रपातासारखे बाहेर आले.
"काल रागाच्या भरात अतिवेगाने गाडी चालवताना माझा विचार केलास तू? नशीब थोडक्यात निभावलं सगळं. पण तुला गंभीर जखमा झाल्या असत्या तर मी स्वतःला माफ करू शकलो नसतो रे. सावलीला सोडून जाताना काहीच कसं नाही वाटलं तुला.
पण ह्या पुढे मात्र मी असं होऊ देणार नाही. तु कितीही भांडलास तरी तुला एकटं सोडून जाणार नाही कुठे मी."
येवढ्या शारीरिक वेदना होत असताना देखील माझं बोलणं ऐकून तो हसला आणि म्हणाला,
नसेल जर जवळ माझ्या सावली
समजेन मी जाण्याची वेळ आली
पुढचं तो काही बोलायच्या आधीच मी माझा हात त्याच्या तोंडावर ठेवून म्हणालो,
तुझी सावली बनून राहीन
आज देतो मी तुला वचन.
वेळ आलीच तर तशी तुझ्या
संगे मी देखील संपून जाईन.
भांड तुला पाहिजे तेवढे
मी सगळं शांतपणे ऐकीन.
सावलीचे काम निमुटपणे
मी शेवटपर्यंत करीन.
त्याने दोन्ही हात जेमतेम वर करून मला जवळ यायची विनंती केली. मी देखील हसत हसत जाऊन त्याची गळाभेट घेतली.
दादा वहिनींच्या चेहऱ्यावरचं समाधान मला बरंच काही सांगून गेले.
© सतीश बर्वे
०१.०५.२६.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा