गुरुवार, २५ जून, २०२६

2917. कल्पवृक्ष कन्येसाठी

 ‘घूऽऽऽ… घूऽऽऽऽ…’ उशाशी असलेल्या मोबाईलनं पित्त बाहेर काढल्यासारखा बाहेर लाईट फेकत, कुणाचा तरी मेसेज आल्याची वर्दी दिली.
किलकिल्या डोळ्यांनी पाण्याची बाटली, अमृतांजनची बाटली, रेस्टीलची स्ट्रीप इ.इ. चाचपडत, तिच्या हाताला एकदाचा चश्मा लागला. तेवढ्यातल्या तेवढ्यात आई मनात डोकावून गेलीच.
‘काय तुम्ही आत्ताच्या मुली... बडं घर नी पोकळ वासा नुसता. ऐन चाळीशीत तुम्हाला सुईत दोरा ओवायची पंचाईत. कसं व्हायचं तुमचं आमच्या वयात !’
ही आई अशीच… काळ-वेळ न जुमानता कधीही अतिक्रमण करायची तिच्या मनावर. तिनं डोकं हलवून आईला मनातून पळवून लावलं नी मेसेज पाहू लागली. 
‘Dad got serious. won't b able to come to office today. pls excuse.’
एका सबऑर्डीनेट मुलीचा मेसेज… सकाळी चार वाजता! ती खवळली. ‘माझी झोप मोडून आता झोपेल बया निवांत ‘आज सुट्टी’ या आनंदात… ते काही नाही, घेतेच आता तिला चांगली...’ असं म्हणत तिनं रिप्लाय लिहायला सुरुवात केली… 
‘R u nuts…? today we have pilot run of our project. Day after tmr there is a submission. don't u knw tht? nothing doing… I wnt u in the office tdy at any cost. better u understand the criticality… bye.’
एव्हढं लिहून सेन्ड करण्यापुर्वी तिनं विचार केला की, एकदा पुन्हा वाचू या काय लिहिलंय त्या मुलीनं… मगाशी झोपेत ‘won't b able to come to office’ हे वाक्य तिला ठळक दिसलं होतं… पण पुन्हा एकदा वाचतांना तिला, तिचं ते पहिलं वाक्य ठळकपणे भिडलं– ‘Dad got serious.’ 
ती मनातून हलली. आपण हे काय लिहित होतो… ‘wnt u in the office at any cost…? any cost…??? ‘बाबा’ ह्या आपल्या आयुष्यातल्या ‘अविभाज्य घटका'च्या किमतीत आपण तिला प्रोजेक्ट पूर्ण करायला बोलावतोय? गाॅडडॅम. हे काय झालंय मला? माझं मन हे असं दिवसेंदिवस निबर, असं ‘काॅर्पोरेट’ का होत चाललंय?’
तिच्या मनात असे विचार चालू असतांनाच, एक प्रेमळ हात तिच्या डोक्यावरून फिरला…
“बाबा? तू?? आत्ता… यावेळी… इथं…???” ती ताड्कन उठून बसली. त्यांचं ते एक पेटंट स्माईल देऊन, त्या खोलीत तांबडं फुटायची वाट बघत असलेल्या अंधारात बाबा विरून गेला.

तिचा बाबा… तिचा गुरू, हर ‘अनसंग हिरो’… लहानपणी तिला कुणी विचारलं की, ‘तू लग्न कुणाशी करणार?’ की ती बेधडक सांगत असे… ‘माझ्या बाबाशी !’
त्याच्यावाचून तिचं पान हलत नसे. त्यानं केलेली वाकडी तिकडी ‘वेणी-फणी’ मिरवत ती शाळेत जात असे. आईला याकरता मज्जाव असे.
तिचे फ्राॅक्सही बाबाच आणायचा. “अहो, मोठी होतीये पोर. आता जरा वाढत्या अंगाचे कपडे आणा. गुडघ्यांच्या वर येतायत हे फ्राॅक्स !” आई भुणभुण करी पण तिच्यासाठी बाबानी आणलं म्हणजे विषयच संपला.
तिचा दादा प्रचंड सिन्सिअर. अभ्यासू कॅटेगरीतला. तर ही वांड, उनाड वर्गातली. पण जात्याच हुशार नी एकपाठी असल्यानं, बाबानं कधी तिला अभ्यासासाठी प्रेशराईज्ड केलं नाही. अगदी दहावीच्या बोर्ड एक्झॅमआधीही दोघंच, एक आख्खा रविवार बाहेर उंडारत होते. तिच्या आवडीच्या आमिर खानचा पिक्चर, मग पिझ्झाहट, नंतर महालक्ष्मीला लागलेली फनफेअर. सरतेशेवटी गिरगाव चौपाटीवर हवी ती खादाडी नी मग बॅक टू पॅव्हेलियन. घरी परतल्यावर आईचा चेहरा बघणेबल होता… पण करते काय बिचारी बाबासमोर. 
“एनफील्ड चालवायचीये मला.” ती एके दिवशी ईरेला पेटली. दादाचं समजावून झालं, आईचं धपाटा देऊन झालं. पण छे! ती ठाम होती. बाबानं फक्त पाहिलं तिच्याकडे नी विचारलं, “चॅलेंज दिलंय का कुणी?”
तिनं ओठांचा चंबू करत होकारार्थी मान हलवली. “ये हुवी ना बात. मेरी बब्बर शेर! चल लवकर…” म्हणत बाबानं तिच्या पाठीवर थाप, नी आईनं स्वतःच्या कपाळावर हात एकत्रच मारला.
“अहो कुठं पडली, पाय मोडला तर कोण करेल लग्न?” आईची शंका आणि त्यावर बाप-लेकीचं हसत एकत्र उत्तर.
“बाबा…!”
    मग त्या बुलेटचा झालेला घोडा. रस्ता सोडून शेजारच्या बापट बाईंच्या मागं ती लागल्याने, त्यांची नव्वारीत झालेली पी.टी.उषा. सावंत बाईंच्या वाळवणावरून गेल्यामुळं त्यांच्या झालेल्या चिकोड्या, कुरड्यांचा झालेला चुरा. गांगण आजोबांचं वाळत घातलेलं धोतर तोंडावर घेऊन नागमोडी वळणं घेत हाकारलेली ती बुलेट, अगदी महत्प्रयासाने ब्रेक मारेपर्यंत… आणि नंतर घरी आल्यावर बाबाला टाळ्या देत, ते डोळ्यांतून पाणी येईपर्यंत हसणं.
“आपल्या बैठ्या चाळीला नुसतंच उभं नाही, तर सळो की पळो करुन सोडलंनी हो तुझ्या लेकीनं…” परांजपे आजोबांची अनुनासिक तक्रार आत्ताही तिच्या कानात घुमली.
फर्स्ट अटेम्प्टमध्ये सी.ए. झाल्यावर तिनं पहिला पेढा तिच्या बाबालाच भरवला होता… आणि हाॅस्पिटलच्या बेडवर झोपलेल्या त्याच्या पायाला पहिला हातही तिथंच लावला होता.
तिनं ‘गुरु'चा दर्जा दिलेला एकमेव असा तो, कॅन्सरशी हसतमुखानं लढत होता.
तशातच तिचं लग्नही ठरलं. लग्नाच्या दिवशी टकलू झालेला तिचा बाबा, साग्रसंगीत नटून आला होता. आपल्या काळजाच्या तुकड्याचं अर्ध्य, दुसर्‍या कोणाच्या सुर्याला द्यायला… लेकीचं कन्यादान करायला.
जाताना तिला म्हणाला, “हे बरंय… आमचे केस गेल्यावर पकडलास ना कुणी दुसरा… ‘उडे जब जब जुल्फे तेरी, कुवांरीयोंका दिल मचले…’ करत!”
दोघंही मग एक-दुसर्‍याला मिठी मारून ओक्साबोक्शी रडले होते.
तिचा हनिमुन संपायलाच होता, नी तिच्या दादाचा तिला मेसेज आला होता… याच वेळी साधारण…
‘Dad got serious all of a sudden.’
ती सुन्न झाली. मग फ्लाईट मुंबईला लॅन्ड झाल्यावर ती दोघं तडक पहिलं तिच्याच घरी गेले. बाबा अक्षरशः लेकीसाठीच यमाला थोपवून धरून होता बहुधा… दोघांनी एकमेकांकडे पाहिलं नी…
त्याच रात्री तिच्याच मांडीवर तिच्या बाबानं प्राण सोडले… अगदी विजयी मुद्रेनं !
   तेवढ्यात मोबाईलचा अलार्म वाजला नी तिची भुतकाळाशी जोडली गेलेली साखळी तुटली. साडेपाच वाजले होते. उठून आवरायला घ्यायला हवं होतं. पण त्याआधी एक महत्त्वाचं काम करायचं बाकी होतं.
तिनं आधीचा तिचा खरमरीत मेसेज डिलीट नाही तर डिसकार्ड केला. जणू तिला नव्या पानावर सुरुवात करायची होती. तिनं टाईप करायला सुरुवात केली. 
‘OK… take best care of ur dad & don't rush to resume. Pls let me knw if any help is needed frm my side. May god bless him.’
आता ‘सेन्ड’ वर बोट ठेवतांना ते जडावणार नव्हतं. ‘मेसेज सेन्ट’ची टीक पाहून तिचं मनही खूप हलकं झालं होतं. उठून बेडवर बसत तिनं एक दीर्घ श्वास घेतला नी समोरच भिंतीवर असलेल्या तिच्या बाबाच्या फोटोला सवयीनं हात जोडून,
‘गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात् परं ब्रह्म 
तस्मै श्री गुरवे नमः’ 
मनोभावे म्हणत, तिनं मिटलेले डोळे उघडले.
ती जागची उठली. ऑफिसमध्ये आज खूप काम होतं. प्रोजेक्टचं पायलट रन होतं आणि तिला ठाऊक होतं की बाबाच्या आशिर्वादानं हे सुध्दा यशस्वीच होणार. तिचं मन कुठल्याशा समाधानानं भरून आलं होतं अन् लता तिच्या आतनं गुणगुणू पाहत होती.
‘कल्पवृक्ष कन्येसाठी,
लावुनिया बाबा गेला…
वैभवाने बहरुन आला,
याल का हो बघायाला…!’
 
- सचिन श देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...