एका पेशंटसोबत एक शिष्टमंडळ
ओपिडीत आलं होतं..
“बोल की?” शिष्टमंडळाच्या सचिवानं दटावलं.
पेशंट सुरू झाला.
“डॉक्टर मी अधूनमधूनच घेतो.
अगदी कधी मित्रमंडळींमध्ये बसलो तरच.
माझ्यावर कंट्रोल आहे…
मला काही आजार नाही.”
मी : 🤔
“फक्त घेतली नाही की हात थरथरतात,
झोप लागत नाही, चिडचिड होते, घाम येतो.
बाकी काही नाही.”
पेशंटनं नेहमी दिली जाते,
तशी ठेवणीतली माहिती दिली.
ओपीडीमध्ये बसणाऱ्या अनेक डॉक्टरांना
हे संवाद पाठ असतात.
काही पेशंट इतक्या आत्मविश्वासानं
स्वतःची बाजू मांडतात की,
क्षणभर डॉक्टरांनाही वाटावं,
‘खरंच, हा प्राणी प्रामाणिक दिसतोय!’
पण थोडं खोलात गेल्यावर कळतं…
शरीर वेगळी कहाणी सांगत असतं.
मी न पेशंटला नैतिक भाषण देत ना तुम्हाला.
मात्र मानवी मन, व्यसनाची मानसशास्त्रीय बाजू
आणि शरीरातला बदल
यांचा आरसा जरूर दाखवेन.
“तसा काही त्रास नाही…
हे लोकं बळजबरीच घेऊन आलेत…”
“किती पिता?”
“तसं काही नाही… कधीतरी…”
“डॉक्टर, रोज घेतात.”
पाठीमागून कुणीतरी पुटपुटतं.
“रोज म्हणजे रोज नाही… फक्त संध्याकाळी.” बचावात्मक पावित्र्यातला पेशंट सांगतो.
“संध्याकाळी म्हणजे?”
“थोडी…”
“किती?”
“दोन…”
“दोन काय…? पेग?”
“नाही… बाटल्या.”
आणि मग पुढं सुरू होतो
वैद्यकीय तपासणीपेक्षा मोठा विषय…
‘डिनायल’ अर्थात मानसिक नकार.
व्यसनशास्त्रात एक अत्यंत
महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते…
ती म्हणजे, व्यसन असलेली व्यक्ती
अनेकदा स्वतःलाच पटवून देत असते की,
‘सगळं नियंत्रणात आहे.’
हे खोटं बोलणं नेहमी इतरांसाठी नसतं;
अनेकदा ते स्वतःच्या मनाला दिलेलं
आश्वासन असतं.
‘मी पिऊन रस्त्यावर पडतो का?’
‘मी नीट काम करतो…’
‘मी कुणालाच त्रास देत नाही…’
‘मी अमुक माणसासारखा नाही…’
अश्या तुलना सुरू होतात…
पण शरीर तुलना करत नाही.
अल्कोहोलचा दीर्घकालीन वापर मेंदूतल्या
रसायनांच्या संतुलनावर परिणाम करतो.
सुरुवातीला ‘रिलॅक्स’ वाटण्यासाठी
घेतलेली गोष्ट पुढं जाऊन शरीराची
‘नवीन नॉर्मल’ बनते.
मग एक दिवस दारू घेतली नाही,
तर शरीर प्रश्न विचारायला लागतं.
हात थरथरणं, घाम येणं, अस्वस्थपणा,
चिडचिड, हृदयाचे ठोके वाढणं,
झोपेचा बोजवारा आणि काही गंभीर परिस्थितीत
भ्रम, फिट्स, तीव्र विथड्रॉलची लक्षणं…
तेव्हा पेशंटचं अजरामर वाक्य जन्माला येतं…
”डॉक्टर,खोटं बोलणार नाही… मी घेतो.
कारण घेतली नाही की त्रास होतो.”
हे वाक्य विनोदी वाटू शकतं;
पण वैद्यकीय भाषेत ते शरीराच्या अवलंबित्वाचा
महत्त्वाचा इशारा असू शकतो.
व्यसन म्हणजे फक्त
‘किती पिता’ हा प्रश्न नसतो. ते…
‘का पिता?’
‘न घेतल्यावर काय होतं?’
‘आयुष्यावर परिणाम होतो का?’
‘नियंत्रण सुटतं का?’
‘सोडायचा प्रयत्न करूनही होत नाही का?’
याबद्दल असतं.
अनेकदा पाल्हाळिक पेशंट भरपूर बोलतात.
विषय बदलतात. उदाहरणं देतात…
“माझे आजोबा रोज घ्यायचे…
९० वर्ष जगले…”
“थंडी आहे…”
“ताण आहे…”
“बिझनेसचं प्रेशर आहे…”
“डॉक्टर, सगळेच घेतात…
कितीतरी डॉक्टर पण घेतात…”
पण लिव्हर आकडेवारी बघतं.
बीपी कारणं ऐकत नाही.
पोटातली जळजळ समर्थन स्वीकारत नाही.
झोपेचं गणित सबबींवर चालत नाही
आणि घरातली नाती तर अजिबात नाही.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
दारू पिणारी प्रत्येक व्यक्ती
व्यसनाधीन असतेच असं नाही, पण…
‘घेतली नाही की त्रास होतो,’
हा भाग गंभीरपणे तपासण्यासारखा असतो.
कारण अनेक आजार दार ठोठावत नाहीत.
ते हळूहळू घरात राहायला येतात.
म्हणून ओपीडीतील त्या पेशंटला
डॉक्टर शेवटी शांतपणे म्हणतात,
”तुम्ही दारुडे आहात की नाही,
हा प्रश्न नंतर पाहू.
आधी शरीर काय सांगतं ते ऐकू.”
आणि कधी कधी उपचाराची पहिली पायरी
औषध नसते.
ती असते स्वतःशी प्रामाणिक होण्याची तयारी !
- डॉ प्रज्ञावंत देवळेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा