इयत्ता ४ थी. वय वर्ष ९ १/२ जेव्हा तिला पहिली पाळी आली. पाळी काय असते हे कळण्याच्या खूप आधी. तिची आई घाबरलीच. इतक्या लहान वयात पाळी? आता हिचे रक्ताने माखलेले कपडे कुठे वाळत घालायचे? शेजारच्यांना कळेलच. नातेवाईकांना कसं सांगायचं? वगैरे वगैरे. पण हे फक्त तिचं वय लहान असल्यामुळे. तिची आई तशी कितीही घाबरली असली तरी तिने ती भीती मुलीला जाणवू दिली नाही. पाळी म्हणजे फक्त रक्तस्त्राव. तो सुरु झाला कि हे असं पॅड घ्यायचं, या पलीकडे तिच्या आईने तिला काहीही सांगितलं नाही. ती वर्षानुवर्षे तेच करत होती.
अशीच अनेक वर्ष गेली. जवळपास ५-६ वर्ष. ती ९ वी - १० वीत असताना एका ग्रुपसोबत एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गेली होती. ग्रुप मधले सगळेजण तरुण. मॉडर्न-बिडर्न राहणारे, म्हणजे जीन्स-बिन्स घालणारे, मेकअप-बिकप करणारे. त्या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर सगळेजण फिरायला निघाले आणि शहरातल्या एका प्रसिद्ध मंदिरात गेले. मंदिरात आत जाताना, स्वतःला मॉडर्न समजणाऱ्या, वयाने थोड्या मोठ्या असलेल्या तिच्या एका मैत्रिणीने तिला विचारलं, "अगं तू कुठे येते आहेस? तुला तर पाळी आहे ना?" तिला कळलंच नाही. ती म्हणाली, "म्हणजे?" दुसऱ्या मैत्रिणीने परत तोच प्रश्न विचारला, "अगं ती म्हणतेय, तू कुठे येते आहेस? तुला तर पाळी आहे ना?" तिने न कळून परत तेच विचारलं, "म्हणजे?" आता मैत्रिणी वैतागल्या. आणि त्यातली तिसरी, सर्वात मोठी मैत्रीण म्हणालीच, "म्हणजे, म्हणजे काय करतेस? पाळी असताना मंदिरात जायचं नसतं, इतकंही तुला माहित नाही? तुझ्या आईने तुला इतकंही शिकवलं नाही?"
आपल्या आईलाच कोणीतरी असं बोलल्याने तिला राग आला. ती काहीही न बोलता तशीच उभी राहिली. शांत! थक्क! मंदिरातही गेली नाही. हे तिच्यासोबत पहिल्यांदा घडलं होतं. पाळी आली की पोट प्रचंड दुखतं, पोटऱ्या, कंबर, सारं शरीरच खूप दुखतं, इतकं कि आपल्याला आपण नकोसे होतो. पण देवालाही नकोसे होतो? इतक्या वर्षांत आईने हि गोष्ट तिला कधीच सांगितली नव्हती. स्वयंपाकघर, देवघर, घरातले सण- उत्सव सारं सारं पाळी असतानाही तिच्यासाठी खुलं होतं. शरीरात होणारे बदल सोडले, तर बाहेरचं तिचं जग फार काही बदलायचं नाही. तिच्या आईने ते कधीच बदलू दिलं नाही. म्हणूनच कि काय पण पाळीला "प्रॉब्लेम" म्हणतात, हे तिला कित्येक वर्ष माहितीच नव्हतं. पाळीचा समानार्थी शब्द "प्रॉब्लेम" आहे, हे तिला तेव्हा कळलं जेव्हा तिच्या मैत्रिणींच्या आयुष्यात "प्रॉब्लेम्स" सुरु झाले.
मैत्रिणींचं ऐकून ती आईला म्हणायची, "आई बाबांना नको सांगत जाऊस पॅड आणायला, बरं दिसतं का ते?" तेव्हा तिची आई पोटभर हसायची आणि म्हणायची, "ढुंगणं धुतली आहेत त्यांनी तुमची. बाबा आहेत ते. त्यांना नाही तर कोणाला सांगणार?" तिच्या आईने हे पटवून दिलं होतं कि त्रास सुरु झाला कि घरी आई असो कि बाबा, कुणालाही सांगायचं. लाजायचं नाही. दादाला आणि ताईला सुद्धा सांगायचं ते असतील तर. त्यांना सुद्धा हे अगदी सहज पटवून दिलं होतं.
आज मागे वळून बघताना, तिला तिच्या आईचं, बाबांचं कौतुक वाटतं. लहान वयात शरीराने मोठं केलं. निसर्गाने मोठं केलं. पण तिचं कोवळं बालपण तिच्या आईने पुरेपूर जपलं. उगाच नको ती बंधनं, नको ते कृत्रिम अडथळे कधीच निर्माण केले नाही. कळीचं अगदी अलगद फुलं होतं, कुणाला कळतही नाही, तशी ती अलगद उमलत गेली. तिच्या आईने तिचं आकाश नेहमी खुलं ठेवलं.
आजही आपल्यापैकी अनेक महिलांना काही परंपरा, अंधश्रद्धा पटत नसतात. पण लोक काय म्हणतील या भीतीपोटी आपण त्या जपत राहतो आणि आपल्या मुलींवर जबरदस्तीने लादत राहतो. खरंतर काही अंधश्रद्धा मिटवण्यासाठी खूप मोठा लढा उभारला जाण्याची काहीच गरज नाही. आपल्याला जे पटत नाही ते न करणं किंवा पुढच्या पिढीला ते करण्याची जबरदस्ती न करणं, या सोप्प्या गोष्टींनी कितीतरी गोष्टी सहज होऊ शकतात.
चला या महिलादिनी प्रतिज्ञा करूयात - उगाच नको असलेल्या अंधश्रद्धारुपी परंपरांचं ओझं मी माझ्या मुलीवर लादणार नाही !" बस !
- अनघा नंदाने
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा