➖➖➖➖➖
गेल्या पंधरा दिवसात असं काही घडेल याची मी कल्पनाच केली नव्हती. त्या पंधरा दिवसातल्या घटना परत परत माझ्या डोळ्यांपुढे येत होत्या. आणि केवळ पंधरा दिवसातल्याच नव्हे, तर मला कळायला लागल्यापासूनच्या, म्हणजे जवळ जवळ पस्तीस वर्षातल्या अनेक गोष्टी माझ्या डोळ्यांपुढे तरळू लागल्या.
नुकतंच नानांच्या अस्थींचं विसर्जन करून मी मुंबईस परतत होतो. मुंबई गाठायला अजून तीन चार तास तरी लागणार होते. परत परत मी मोबाईल मधले काही फोटो बघत होतो. माझ्या डोळ्यांतून अखंड अश्रुंच्या धारा लागल्या होत्या.
नाना म्हणजे माझे वडील. आजूबाजूचे सगळे त्यांना नाना म्हणत असावेत, म्हणून आम्हीपण, म्हणजे मी आणि माझा धाकटा भाऊ अविनाश, त्यांना नानाच म्हणत होतो.
लहानपणापासून नाना आणि माझ्या आईच्या स्वभावातला फरक माझ्या मनावर ठसला होता. दोघेही अगदी विरुद्ध स्वभावाचे. आई म्हणजे मूर्तिमंत प्रेमळ व्यक्तिमत्व. आणि नाना म्हणजे थोडेसे हेकेखोर, चिडके, मुख्य म्हणजे दुर्मुखलेले. मी त्यांना मनापासून हसताना कधी बघितलेच नाही. आणि आई त्यांच्या विरुध्द, सदा हसतमुख. टापटीपिने संसार करणारी काटकसरी बाई.
तसं हे अगदी विजोड जोडपं होतं. पण तरी त्यातल्या त्यात समाधान म्हणजे, नाना विक्षिप्त असले तरी आमच्या खाण्यापिण्याची कधीच आबाळ झाली नाही. शाळेची फी भरणे, कपडेलत्ते यातही कधीच मागे पुढे किंवा टाळाटाळ झाली नाही. जे मागितलं किंवा ज्याची गरज होती त्या वस्तू वेळच्यावेळी मिळत होत्या.
आई, नानांसारख्या काही विजोड जोड्या मी आमच्या मित्रांच्या घरीपण बघितल्या होत्या. पण त्यात वडील एकतर जमदग्नीचा अवतार किंवा तळीराम असायचे. आणि त्यातून उद्भवणारी मारझोड आणि भांडणे देखील ऐकली होती.
पण नानांना दारुचच काय, सुपारीच्या खांडाचं देखील व्यसन नव्हतं. आणि मारझोड म्हणाल तर त्यांनी आईच्याच काय तर आमच्याही अंगाला कधी हात लावलेला आम्हाला आठवत नाही. अगदी कधीच नाही. तसच त्यांनी कधीच आम्हाला उचलून खांद्या, कडेवर घेतलं नाही की कधी गालगुच्चे घेतले नाही, की कधी कामावरुन येताना आमच्यासाठी खाऊ आणला नाही. ती सगळी खाती आईकडे होती. नाना कधीच आम्हाला शाळेत आणा पोचवायला देखील आले नाहीत. आईच कधीतरी यायची. त्यामुळे आम्हाला बाकीच्या मुलांचा हेवा वाटायचा. जवळ घेणं सोडाच पण आम्हाला बरं नसताना देखील त्यांनी कधीच आमच्या कपाळावर हात ठेवून ताप बघितला नाही की डॉक्टरांकडे घेऊन गेले नाही, वा काही औषध आणलं नाही. ते सगळं आईकडे. शाळेची फी वेळच्या वेळी भरायची एवढाच त्यांचा आणि आमच्या शाळेचा संबंध. त्यांनी कधी आम्हाला शाळेच्या अभ्यासविषयी विचारलं नाही. चांगले मार्क मिळाले तरी कौतुक नाही की कमी मिळाले तरी ओरडणं नाही. शाळेतल्या घडामोडींची आमच्याकडे कधी साधी चौकशीही केली नाही. प्रगतिपुस्तकावर पण नेहमी आईच सही करायची. आम्हाला याचं फार वैषम्य वाटायचं. पण ती सगळी भरपाई आई करत असल्यामुळे आम्ही ते फारसं मनावर घेतलं नाही. शिक्षण संपल्यावर आम्हाला नोकरी लागली त्याचीही त्यांनी कधी चौकशी केली नाही. आमचं लग्न पण आईनेच जुळवलं आणि पुढाकार घेऊन लावून दिलं. नाना फक्त शोभेच्या बाहुली सारखे बरोबर होते.
आई आणि नानांमधला हा फरक दिवसेंदिवस आमच्या मनात कोरला जात होता. आई म्हणजे अमर्याद उत्साह तर नाना सदानकदा निरुत्साही, त्रासलेले. आई आम्हाला चांगले चांगले पदार्थ करून खायला घालायची. पण नानांनी आम्हाला कधीच हॉटेलमधे नेलं नाही. कसलेच लाडकोड नाहीत.
जे आमच्या बाबतीत तेच त्यांचं आईच्या बाबतीत. दोन वेळेला पोटभर जेवायला घातलं आणि अंगभर कपडे पुरवले की त्यांची इतिकर्तव्यता संपत होती. या पलीकडे त्यांच्यात माणूसपण ही गोष्टच नव्हती. आईला कितीही बरं नसलं तरी ते तिला एका शब्दानेही विचारत नसत. आईच हळूहळू तिला झेपेल तसं आणि आमच्या मदतीने घरातली कामं करायची. अशावेळी आम्हाला नानांचा खूप संताप यायचा. पण आई दटावत असल्यामुळे आम्ही कधीच मर्यादा ओलांडली नाही.
तिलाच नव्हे तर आम्हा दोघांनाही याची सवय झाली होती. आम्ही कधीच या बाबतीत तिला तक्रार करताना पाहिलं नव्हतं. हे सगळं समजण्या इतपत मोठे झाल्यावर मी आईला या बाबतीत विचारलंही होतं, पण तिने त्यावेळी उडवाउडवीची उत्तरं दिली होती. मीही नंतर त्याचा पाठपुरावा केला नाही.
नानांमधे इतका सगळा, केवळ तुसडेपणा असताना त्या दिवशी घडलं ते अघटितच.
पंधरा दिवसांपूर्वी आईचा पासष्टावा वाढदिवस आम्ही घरच्या घरी साजरा केला. अर्थात सहभाग फक्त आमच्या तिघांचा आणि नवऱ्यासह आलेली आमची मावसबहिण म्हणजे सुलू आणि अजयचा. ती दोघं बरेच वेळा आईच्या आणि आमच्या मदतीला यायचे. पण नाना नेहमीप्रमाणे कशातच नव्हते. त्यांनी आईला वाढदिवसाच्या तोंडदेखल्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. भेटवस्तू देणं तर दूरच राहिलं. पण काही बोलण्यात अर्थ नव्हता.
वाढदिवस झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आईला बरं वाटेनासं झालं. ताप यायला लागला. पण नेमका त्या दिवशी रविवार. त्यामुळे एकही दवाखाना उघडा नव्हता. मग घरात होती ती ताप उतरायची गोळी देऊन तिला झोपायला सांगितलं. कपाळावर पाण्याच्या घड्या ठेवल्या. बायकोने आल्याचा चहा करून दिला. उद्या दवाखान्यात नेऊ आणि डॉक्टरांकडून औषध आणू , असं ठरवून त्यावेळी सुचलं ते घरगुती केलं.
पण सकाळपर्यंत ताप उतरला नाही. ठरल्याप्रमाणे जवळच्याच आणि आमच्या नेहमीच्या रानडे डॉक्टरांकडे जाऊन नंबर लावला. थोड्या वेळात डॉक्टर आले. तिला नेण्यासारखं नव्हतंच म्हणून त्यांना तिच्या तापाबद्दल माहिती देऊन औषध आणलं. पण त्या औषधाने देखील संध्याकाळपर्यंत तिचा ताप उतरला नाही. आणि तिच्या पोटातही काही गेलं नाही.
म्हणून मग संध्याकाळी डॉक्टरांना घरीच बोलावलं. ते आले आणि तिला तपासल्यावर म्हणाले, ह्यांना ताबडतोब हॉस्पिटलमधे हलवावं लागेल. तिथे सलाईन लावू आणि काही टेस्ट करु. म्हणजे आजाराचं नक्की निदान करता येईल.
त्याप्रमाणे धावपळ करून जवळच्या हॉस्पिटलमधे हलवलं. ती रात्र तशीच काळजीत गेली. पण ह्या सगळ्याचा नानांवर काहीच परिणाम नव्हता. ते नेहमीप्रमाणेच ढीम्म होते.
दुसऱ्या दिवशी आईचा ताप उतरायच्या ऐवजी अजून वाढला. तिच्या अंगाला हात लावला की चटके बसत होते. तिथले डॉक्टर देखील २/३ वेळा येऊन गेले. पण अजूनही ते नक्की निदान करु शकत नव्हते. दुपारी चार नंतर तर तिला श्वास घ्यायला देखील खूप त्रास होऊ लागला. धाप लागू लागली. आता आय सी यू त हलवणं भाग होतं. लगेच ते ही केलं. नळ्या लावून ऑक्सीजन द्यायला सुरुवात केलं. तिची अवस्था बघवत नव्हती. पण आम्ही केलं त्यापेक्षा जास्त काहीच करु शकत नव्हतो. ती रात्र देखील तशीच चिंतेत गेली.
दुसऱ्या दिवशी पुन्हा डॉक्टर आले आणि त्यांनी तिला तपासले. आता त्यांच्या चेहऱ्यावर देखील काळजी स्पष्ट दिसत होती. मला त्यांनी त्यांच्या खोलीत बोलावलं आणि म्हणाले, मला ह्यांची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत. मी माझ्याकडून शक्य ते सगळे प्रयत्न करतोय पण तुमच्या आईकडून काहीच प्रतिसाद मिळत नाहीये. कदाचित् ती कोमात जाण्याचीही शक्यता आहे. आणि ते म्हणाले तसच झालं. संध्याकाळी चार साडेचार वाजता जेव्हा डॉक्टरांनी पुन्हा तपासलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ती जवळपास कोमात गेलीय. आता तिचा फक्त कृत्रिम श्वास चालू होता. डॉक्टरांनी आम्हाला तिथेच बाहेर बसायला सांगितलं. तसेही आम्ही त्या परिस्थितीत घरी जाणारच नव्हतो. कोणी तरी आळीपाळीने तिथेच थांबणार होतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी तिची तब्येत आणखीनच खालावली. डॉक्टरांनी तपासल्यावर मला पुन्हा त्यांच्या खोलीत बोलावले आणि सगळी कल्पना दिली. आणि आता त्यांच्या हातात वाट बघण्याशिवाय काहीच नाही असं स्पष्ट सांगितलं. कदाचित अजून दोन तास किंवा जास्तीत जास्त दोन दिवस. त्यांचं ते निर्वाणीचं बोलणं ऐकून माझ्या हातापायातलं त्राणच गेलं. आत्तापर्यंत आमच्या आयुष्यात आईचाच सर्वथा आधार होता. तिच्याशिवाय आम्ही काही कल्पनाच करु शकत नव्हतो. आणि आता तोच आधार हातातून निसटू पहात होता. तो देखील इतक्या तडकाफडकी. सावरायला जराही उसंत न देता. माझं डोकं काम करेनासं झाले. तरीदेखील मला धीर देऊन डॉक्टर म्हणाले, आता तुम्हीच बाहेर जाऊन सगळ्यांना याची कल्पना द्या. आणि अजून एक. जर तुमच्यापैकी कोणाला तिच्याजवळ पाच मिनिट बसायचं असेल तर मी तशी परवानगी देतो. फक्त तिला कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. स्वतःला सावरा. ठरवा कोण जातंय ते, आणि मला तसं सांगा.
"मी जातो", इतक्यात मागून आवाज आला. मी गर्रकन मागे वळून बघितलं. मागे नाना उभे होते. ते कधी आत आले आम्हाला कळलंच नाही. " डॉक्टर मी ऐकलंय तुमचं सगळं बोलणं. मी जातो तिच्याजवळ पाच मिनिटं बसायला. "
त्या क्षणी मला नानांचा प्रचंड राग आला. गेले तीन चार दिवस आम्ही प्रचंड धावपळ करतोय, इतक्या तणावाखाली आहोत, तेव्हा या माणसाच्या तोंडून तिच्यासाठी एक शब्दही बाहेर पडला नाही. आणि आता डॉक्टरांनी हात टेकल्यावर, हे म्हणतात मी जातो. नाही, खरं म्हणजे मीच तिच्याजवळ जाऊन बसलं पाहिजे. तिचं माझ्यावर खूप प्रेम होतं, मलाच जायला पाहिजे.
पण मी असा विचार करेपर्यंत नाना खोलीच्या बाहेर गेलेसुद्धा. मी त्यांच्या मागोमाग बाहेर पडून त्यांना गाठेपर्यंत नाना गेले ते तडक आय सी यू मधे. बाहेर बसून काचेतून आईकडे पहाणाऱ्या अविला काहीच कल्पना नव्हती. तो आत जाणाऱ्या नानांकडे फक्त पहात राहिला.
आणि त्यानंतर आय सी यू च्या दरवाजाच्या काचेतून आम्ही जे बघितलं त्यावर आमचा विश्वासच बसला नाही. नाना बाजूचं स्टूल ओढून आयुष्यात पहिल्यांदा आईच्या बाजूला बसले. जेव्हा ती म्हणायला जिवंत होती पण जाणीव नेणीवेच्या पार गेली होती.
आणि त्यांनी चक्क तिच्या कपाळावर हात ठेवला. हळुवारपणे तिचा हात हातात घेतला. आम्ही थक्क होऊन आयुष्यात कधीच न पाहिलेलं दृश्य पहात होतो. त्याचवेळी त्या अवस्थेत, मला आईची मान नानांकडे वळल्याचा भास झाला. आणि अगदी हळूहळू आईने किंचित डोळे उघडल्याचाही. जणू ह्याच क्षणाची ती आयुष्यभर वाट पहात होती. अखेर तो क्षण आला.
आई आणि नाना एकटक एकमेकांकडे पहात होते. जणू डोळ्यांनीच आयुष्यभराचं बोलत होते. अशीच पाच सात मिनिटे गेली. आणि सगळं संपलं. आईची मान कलंडली आणि ती आम्हाला पोरकं करून गेली.
मी धावत जाऊन डॉक्टरांना बोलावून आणलं. मला लांबून, काचेआडून जे समजलं ते बरोबर होतं. त्यांनी तिला शेवटचं तपासून माझा अंदाज खरा ठरवला. नंतर आम्हाला आत बोलावून नानांना बाहेर घेऊन जायला सांगितलं. आणि पुढील सोपस्कारासाठी नर्सला बोलावलं.
अवी नानांना धरून बाहेर गेला. कधी नव्हे ते नानांच्या डोळ्यातून अश्रू पाझरत होते. नाना सुलू आणि अजय बरोबर घरी गेले.
हॉस्पिटलमधले सगळे सोपस्कार आटपून मी आणि अवि आईचा मृतदेह घेऊन घरी आलो. आणि जड मनाने पुढचे सारे अंत्यविधी पार पाडले. नानादेखील आमच्याबरोबर स्मशानात आले. पण शेवटपर्यंत ते कुणाशीही एक चकारही शब्द बोलले नाहीत.
सगळं आटपून आम्ही घरी आलो. बरोबर आलेले सगळे लोक आमचा निरोप घेऊन, आमचं सांत्वन करुन आपापल्या घरी गेले.
आता आम्ही घरात पाच सहा जणच उरलो. कुणीही काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. आणि इतक्यात आतल्या खोलीतून मला नानांनी हाक मारली. मनात नसतानाही मी मुकाट नानांच्या खोलीत गेलो. मला म्हणाले "बैस माझ्याजवळ". निरीच्छेने मी त्यांच्या बाजूला बसलो. ती वेळ वाद घालण्याची नव्हती. आणि अचानक मला कधी नव्हे ते मिठी मारून नाना अगदी लहान मुलासारखे हमसून हमसून रडू लागले. मला आधी कसतरी वाटलं. आयुष्यात पहिल्यांदाच अंगाला त्यांचा वडीलस्पर्श होत होता. तरीही कसं कोणास ठावूक, पण मी देखील त्यांना थोपटू लागलो. त्यांचं सांत्वन करु लागलो.
रडता रडताच ते बोलू लागले
" काल मालती माझ्या स्वप्नात आली, आणि म्हणाली मला तुमची क्षमा मागायची आहे."
काय? आई आणि नानांची क्षमा? हे काय उलट? माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना.
मी नानांना विचारणार, इतक्यात नानाच पुढे बोलू लागले, " मी तिला म्हंटलं, आता कशाला क्षमा वगैरे ? झालं ते झालं. आणि आता तशीही तू बोलण्याच्या अवस्थेत नाहीस." तर मालती म्हणाली. " तुम्ही उद्या हॉस्पिटलमधे या. मला बघायला. फक्त पाचच मिनिटं माझ्याजवळ बसा. माझी शपथ आहे. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आपण डोळ्यांनीच बोलू."
"तिचा मृत्यु मला डोळ्यांसमोर दिसत होता. आणि तिच्याशी बोलण्याची वेळ आता आयुष्यात पुन्हा येणार नाही, म्हणून मी होकार दिला. माझ्या होकाराने तिच्या चेहऱ्यावर मला कधी नव्हे इतका आनंद दिसला. तुम्हाला ती आनंदी दिसत होती. पण तिचं दुःख मलाच माहीत होतं."
"तिला कबूल केल्याप्रमाणे आज मी हॉस्पिटल मधे आलो. नेमके डॉक्टर त्यावेळेस तुझ्याशी तिला कोणीतरी शेवटचं भेटण्याबद्दल बोलत होते. तुला ते डॉक्टर दिसत होते. पण मला त्यांच्या आडून मालती खुणावत होती. मी ओळखलं हीच ती वेळ. आणि मी तडक तिच्याजवळ गेलो. आता वचन पाळण्याची तिची वेळ होती. आणि तिने तिचे वचन पूर्ण केलं. त्या अवस्थेत तिने माझ्याकडे मान वळवली आणि थोडे का होईना पण डोळे उघडून माझ्याशी बोलू लागली. "
" मला माहितेय, तुम्ही आयुष्यात माझं एकदाच ऐकलंय. पण ते मला आयुष्यभर पुरलं. मी कधीच गर्भार राहू शकत नाही, हे कळल्यावर, तुमच्या मनात नसताना, केवळ माझ्या हट्टाखातर, जर त्या वेळेस ह्या दोघांना दत्तक घेण्याची तुम्ही मला परवानगी दिली नसती तर मी वेडी झाले असते. मला मुलं होण्याची अनिवार इच्छा होती, पण नशिबाने माझा घात केला होता. तुम्ही मला घटस्फोट देऊ शकला असतात, दुसरं लग्न करु शकला असतात. पण तसं न करता, अनिच्छेने का होईना, ह्या दोघांना तुम्ही आपल्या घरी येऊ दिलत. भले त्यांच्यावर कधीच प्रेम केलं नाहीत, त्यांना जवळ घेतलं नाहीत, पण त्यांना काही कमी पडू दिलं नाहीत, आमच्या तिघांच्या मधे आला नाहीत, हे तुमचे माझ्यावर फार मोठे उपकार आहेत. मी जन्मभर तुम्हाला माझ्या शब्दात बांधून ठेवलं त्याबद्दल मला क्षमा करा. आणखी एक. मला वचन दिल्याप्रमाणे ह्या दोघांना, हे सगळं, मी जिवंत असेपर्यंत कळू दिलं नाहीत, हा देखील तुमचा खूप मोठेपणा. "
"इतके दिवस तिच्या मनात हे सारं साठलं होतं आणि मी ही ते मनात खोलवर दाबलं होतं. पण आज मी तिला दिलेल्या शब्दातून मुक्त झालो. "
" जिवंत असताना ती जे माझ्याशी कधीच बोलू शकली नाही, ते इतकं सारं मरणाच्या दारात उभी असताना, फक्त पाच मिनिटात आणि ते सुद्धा डोळ्यांनी माझ्याशी बोलली."
" तुम्ही मला दिलेला शब्द पाळलात. आता मी तुम्हाला एक शब्द देते. पुढल्या जन्मी परत आपण दोघे लग्न करू. आणि तेव्हा आपल्याला आपली स्वतःची मुलं असतील. मी इतक्यात जन्म घेणार नाही. तुमची वाट बघते. तुम्ही येईपर्यंत. तुमच्या मनाला वाटेल तेव्हा या. आणि पुढल्या जन्मात मला तुमच्या ऋणातून मुक्त होण्याची संधी द्या."
" आणि ह्या वेळेस मनापासून मी तिला तसा शब्द दिला. माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास नसेल तर ती कॉट खालची ट्रंक काढून बघ. त्यात तुमच्या दोघांच्या दत्तक विधानाची सगळी कागदपत्र आहेत. "
" तिला मी शब्द दिलाय. मला पण आता जावं लागेल. ती माझी वाट बघत असेल. मी तिला जास्त ताटकळत ठेऊ शकत नाही"
इतकं सगळं एका दमात बोलून ते पुन्हा रडू लागले.
माझं डोकं बधीर झालं. नानंकडून मी काय ऐकलं यावर माझा विश्वासच बसेना. तसाही मी त्या मनस्थितीत नव्हतोच.
नानांच्या अंगावरून हात फिरवताना मला जाणवलं, त्यांचं अंग गरम लागतंय. सर्रकन माझ्या अंगावर काटा उभा राहिला. नानांच्या बोलण्यातला खरेपणा माझ्या लक्षात आला आणि पुढचं दृश्य मला दिसायला लागलं.
पुन्हा सगळं तेच झालं. फक्त या वेळेस आई ऐवजी नाना होते.
आणि आई गेल्यानंतर चौथ्याच दिवशी, तसच तापाचं निमित्त होऊन नाना आईला भेटायला गेले.
मी त्यांच्या अस्थींचं विसर्जन करून येत होतो. आणि पुन्हा पुन्हा मोबाईल काढून आमच्या दोघांच्या आणि नाना, आईच्या चेहऱ्यात काही साम्य आहे का शोधत होतो. पुन्हा पुन्हा, फोटो काढलेले ते दत्तक कागदपत्र बघून, त्यात काही चूक तर नाही ना, तेही शोधत होतो. जे मुळात नव्हतच ते शोधण्याचा माझा तो केविलवाणा प्रयत्न होता.
- राजेंद्र परांजपे, २५ एप्रिल २०२०.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा