गुरुवार, २५ जून, २०२६

2956. दरवाजा

 आमच्या ओपिडीत केबिनच्या दरवाज्यावर मोठ्या अक्षरात ‘PULL’ आणि ‘ओढा’ अशी दोन्ही लेबल्स लावलीत. त्याखाली ओढणाऱ्या माणसाचं चित्रसुद्धा आहे.
तरीही दिवसातून अनेक वेळा तो दरवाजा ढकलला जातो. एकदा, दोनदा नव्हे; वर्षानुवर्षं...
आमच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका ज्येष्ठ सफाई कर्मचाऱ्यांचा तर हा कायमस्वरूपी कार्यक्रम. त्या येतात, दरवाजा ढकलतात, तो उघडत नाही. पुन्हा ढकलतात मग मी आतून म्हणतो,
“खाऽला,खिंचोऽऽ…”
यावर त्यांचं उत्तर ठरलेलं असतं,
”मै तो अनपढ हूँ, मुझे पढ़ना-लिखना नहीं आता.”
मी अनेकदा विचार केला… ठीकाय, अक्षरं वाचता येत नसतील. मग एकदा मी त्यांना चित्र दाखवलं… ओढणाऱ्या माणसाचं. पण उत्तर पुन्हा तेच…
“मुझे क्या समझता? मैं तो अनपढ हूँ!”
त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की प्रश्न निरक्षरतेचा नाही. प्रश्न आहे लक्ष देण्याचा; कारण एखादी व्यक्ती अक्षरशत्रू असू शकते पण निरीक्षणशत्रू असण्याची गरज नसते!
माणसाला प्रत्येक गोष्ट माहीत असणं शक्य नाही; हे स्वाभाविक आहे पण एकदा गोष्ट समजावून सांगितल्यानंतरही ती लक्षात ठेवण्याची इच्छा नसणं, हा वेगळाच विषय आहे..
मानसशास्त्रज्ञ याला ‘Cognitive Laziness’ म्हणजे मानसिक आळस म्हणतात.
मेंदूची एक सवय असते… नवीन गोष्ट शिकण्यापेक्षा जुनी सवय पुन्हा पुन्हा करणं त्याला सोपं वाटतं. म्हणूनच अनेक जण दररोज त्याच चुका करत राहतात. कारण त्या चुका सुधारण्यासाठी थोडं लक्ष, थोडा विचार आणि थोडी जबाबदारी घ्यावी लागते.
रस्त्यावर ‘इथे कचरा टाकू नये’ असा फलक असतो. त्याच्या खाली कचर्‍याचा ढीग पडलेला असतो.
रेल्वे फाटक बंद असताना लोक फाटकाखालून घुसतात.
वाहतुकीचा लाल सिग्नल असतानाही काही जण पुढं सरकतात.
मोबाईलवर आलेला ओटीपी कुणालाही सांगू नका, असं शंभरदा ऐकूनही लोक फसतात…
कारण समस्या माहितीच्या अभावाची नसते; समस्या माहितीचा वापर करण्याच्या अनिच्छेची असते!
हॉस्पिटलमध्ये एखादा रुग्ण येतो. डॉक्टर औषधं देतात, आहार सांगतात, तपासण्या सांगतात…
दोन महिन्यांनी तोच रुग्ण परत येतो.
“सगळी औषधं घेतली का?"
“पूर्ण नाही…”
“पथ्य पाळलं का?”
“थोडंफार…”
“तपासण्या केल्या का?”
“नाही.”
मग पुढचं वाक्य मात्र तयार असतं…
“डॉक्टर, यानी काहीच फरक पडला नाही!”
हे अगदी त्या दरवाज्यासारखं आहे. दरवाजा ओढायचा होता पण आपण ढकलत राहिलो आणि मग दरवाज्यालाच दोष दिला!
मानवाची एक अद्भुत क्षमता आहे… यशाचं श्रेय स्वतःकडं घेणं आणि अपयशाची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलणं.
परीक्षेत चांगले गुण मिळाले, तर ‘मी हुशार’!
मार्क कमी आले, तर ‘पेपरच अवघड होता!’
व्यवसाय चालला, तर ‘माझे कष्ट!’
व्यवसाय बुडाला, तर ‘नशीब खराब!’
आरोग्य चांगलं राहिलं, तर ‘मी फिट!’
आजार वाढला, तर ‘डॉक्टर वाईट!’
स्वतःची भूमिका तपासण्याऐवजी बाहेर दोष शोधणं मेंदूला अधिक सोपं वाटतं.
जगात असंख्य निरक्षर लोक आहेत पण ते बुद्धिहीन नसतात. अनेक अशिक्षित शेतकरी हवामानाचा अंदाज सांगतात. कारागीर मोजमाप अचूक करतात. व्यापारी हिशोब लक्षात ठेवतात…
त्यामुळं अक्षरं वाचता न येणं आणि परिस्थिती समजून न घेणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
केबिनचा दरवाजा एक गोष्ट शिकवतो…
जीवनात अनेक दरवाजे असे असतात,
जे ओढल्यावर उघडतात…
पण आपण हट्टानं त्यांना ढकलत राहतो.
मग, ‘दरवाजा चुकीचा आहे’,
‘व्यवस्था चुकीची आहे’,
‘डॉक्टर चुकीचे आहेत',
‘नशीबच चुकीचं…’ असं म्हणत राहतो.
पण कधी कधी प्रश्न इतकाच असतो…
दरवाजा चुकीचा नसतो, फक्त आपण
चुकीच्या दिशेनं जोर लावत असतो
आणि तोपर्यंत कोणताही दरवाजा उघडत नाही,
जोपर्यंत आपण स्वतःला
एक साधा प्रश्न विचारत नाही.
‘मी फक्त दरवाजा ढकलतोय,
की एकदा ओढूनही पाहिलाय?’

- डॉ प्रज्ञावंत देवळेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...