गुरुवार, २५ जून, २०२६

2954. ऐंशीचे बाबा

 " यंदा ऐंशी कंप्लीट झाले डॉक्टर. माझं कसं आहे, एक वर्ष मी हैदराबादला असलेल्या मुलाकडे असतो अन् एक वर्ष इथे पुण्यातल्या मुलाकडे..!  एकट्यावर भार नको आपला, कोणाकडेही असलो तरी दोघेही खूप लक्ष देतात , जरा काही झालं की लगेच चला डॉक्टरांना दाखवून येऊया म्हणतात , मीच नको म्हणतो, त्यांच्या व्यापात आपली अजून लुडबुड नको करायला असं वाटतं, अलिकडे गुडगे फार दुखतात हो. सहन होत नाही , मग तात्पुरत्या गोळ्या घेऊन टाकतो ..! हैदराबाद चा मुलगा म्हणाला बाबा knee replacement surgery करून टाका आता पुण्यात जातच आहात पुढल्या आठवड्यात तर , इथल्या पेक्षा पुण्यात जास्त चांगल्या होतात ह्या सर्जरीज...! "
****
.......गेल्या आठवड्यातच आलो आहे पुण्यात , आज सकाळी मुलाजवळ बोललो , गडबडीतच होता नेहमी प्रमाणे. तो म्हणे मी ऑफीस हुन लवकर आलो तर जाऊ डॉक्टरांकडे , नऊ वाजून गेले अजून आला नाहीये तो , त्याची वाट बघत बसण्या पेक्षा आपणच जावं म्हटलं म्हणून आलोय तुमच्या कडे, मुलं लागली आहेत हो मागे ऑपरेशन करून घ्या म्हणून पण मीच नाही म्हटलं , ऐंशी वय झालंच आहे, अजून किती असं आयुष्य असणार आहे. कशाला तेवढ्यासाठी ऑपरेशन , कशाला त्यांच्यामागे घोर लावायचा आपल्यासाठी? काढू गोळ्यांवरच , आता तुम्ही दिल्याच आहेत गोळ्या , त्या घेत बसतो झालं , चला येतो मी ..! "
***********
" डॉक्टर साहेब बाबा येऊन गेलेत का आमचे? मी ऑफिस मधून डायरेक्टच येतोय तुमच्याकडे, तुम्ही बंद करता ना क्लिनिक साडे नऊ ला म्हणून म्हटलं त्यांना आणायच्या आधी तुम्हाला भेटून घ्यावं..! 
गुडगे दुखतात हो त्यांचे, आता ह्या वयात दुखणारच ना, निमूट पणे घरी बसावं ना, कशाला कुठे देवळातच जा, भजनी मंडळातच जा, मग आल्यावर तळमळत बसतात गुडगे धरून..!
 एक रिक्वेस्ट आहे माझी , knee replacement surgery बद्दल अजिबात बोलू नका त्यांच्या समोर, आता थोडक्यासाठी कशाला हवीये सर्जरी. अन् आता ह्या वयात झेपणार आहे का त्यांना? त्याचं सोडा आम्हाला तरी त्यांच्यासाठी वेळ काढायला जमणार आहे का? दोघेही आम्ही सकाळी सात ला घराबाहेर पडतो ते बघा ही वेळ होते रोज घरी यायला , काम एवढं आहे की सुट्टी च नाव ही काढता येत नाही बॉस समोर , एकेक वेळ रविवारी सुद्धा जावं लागतं , आम्हालाच कुठे आउटिंग ला जायला मिळत नाही , कोण आणि कसा वेळ काढणार ह्यांच्या साठी..? मी म्हणतो थोडं सहन करावं ना माणसानी ह्या वयात ..! "
 हो  सहन करत आहेत ते, खूप सहन करत आहेत ..! येऊन गेलेत तुमचे बाबा थोड्या वेळापूर्वी, त्यांची काही तक्रार नाही, तुम्ही मागे लागला आहात पण ह्या वयात सर्जरी नको असं तेच म्हणत होते. खूप कौतुक करत होते तुम्हा भावंडांचं की किती लक्ष ठेवता तुम्ही दोघेही त्यांच्याकडे..!
फार आयुष्य उरलं नाहीये रे त्यांचं, थोडा वेळ देत जा त्यांनाही. बोलत जा त्यांच्याशी, वाटतं त्यांना मुलांनी आपल्याशी बोलावं. आपुलकीने विचारपूस करावी, काय हवं नको ते बघावं पण ते इतका विचार करतात तुमचा, की तुमच्या मागे आधीच इतकी धावपळ असते , तुम्हाला वेळ नसतो त्यात  आपलं अजून कुठे सांगत बसायचं म्हणून ते चुकूनही तुम्हाला बोलत नाहीत. वर  तुम्ही किती काळजी घेता त्यांची हे कौतुकाने सांगतात. थोडं लक्ष देत जारे त्यांच्याकडे, वेळ काढून थोडं का होईना बोलत जा. आहेत तोवर प्रेम द्या, खूप बरं वाटेल त्यांना. गेल्यानंतर पश्चात्ताप करून उपयोग नसतो. अर्धं दुखणं हे मानसिक असतं, बघता बघता ते कमी होईल. आयुष्याच्या शेवटी समाधान असणं खूप महत्त्वाचं असतं. ते आपणहून कधीच तुमचा किमती वेळ घेणार नाहीत..!
            
डॉ संजय जहागीरदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...