गुरुवार, २५ जून, २०२६

2921. लव्हवॉल

      नुकत्याच नवीन राहायला आलेल्या बाजूच्या फ्लॅटमधल्या गॅलरीत संध्याकाळी लाडात आलेल्या कपलकडे पर्णिकाचं लक्ष गेलं. तो आणि ती... ती त्याच्या अंगाला खेटली होती, आणि त्याने तिच्या कमरेत हात टाकला होता. ती काहीतरी लाडात त्याच्या खांद्याशी मान नेऊन बोलत होती. तो लाजत होता, उलटा तिला प्रतिसाद देत होता.
गॅलरीत वाळलेले कपडे काढायच्या कामात आहे, हे दाखवत पर्णिका ते चोरून पाहत होती. तेवढ्यात त्या कपलमधल्या ‘त्या’चं लक्ष पर्णिकाकडे गेलं, तशी पर्णिका चमकून एकदम, त्यानं पाहू नये अशी मागं सरकली. तिच्या छातीत धडधडायला लागलं. जणू ती काहीतरी मोठी चोरीच करत होती.
तिनं रस्सीवरचे जेवढे कपडे निघाले तेवढे काढले आणि ती घाबरी-घुबरी होऊन हॉलमध्ये आली. कपडे सोफ्यावर बाजूला ठेवून हताश होऊन बसली… पण तिचं सगळं लक्ष मात्र तिच्या हॉलच्या उडणाऱ्या पडद्यामागे आता त्या गॅलरीत ते काय करत असतील, इथं लागलेलं होतं.
तिला उठून बघावसं वाटत होतं… पण असं कसं बघायचं, बरं दिसत नाहीत ते… असं वाटून ती सोफ्यावरून उठली. कपड्याच्या घड्या घातल्या. पडद्यामागून तिनं हळूच पाहिलं. ते तिथंच होते… एकमेकांच्या जवळ-जवळ… एकमेकांच्या सानिध्यात.
ती उसासा सोडून आत आली आणि तिने ओट्याजवळच्या सिंकचा नळ सोडला. उगाच… भांडी तशी ओलीच होती. रात्रीच्या जेवणात काय बनवायचं, असं म्हणून फ्रीज उघडला. फ्रीजमधून थंड हवा बाहेर आली.
‘फरसबी, परागला आवडत नाही, फ्लॉवर कालच झालाय, तोंडली डाळ घालून करावी का?’ या विचारात तिनं सिंकच्या नळाकडे पाहिलं… ‘काय तरी मी…!’ असं म्हणत तिनं फूल प्रेशरचा सिंकचा नळ बंद केला.
मग फ्रीजकडे पाहिलं… दार तसंच सोडून दिल्यानं ते बंद झालं होतं, पण नीट लागलं नव्हतं. ती हसल… केविलवाणी. ‘आपल्यासारखंच… बंद तर करून टाकतो आपण विचार! पण ते पूर्ण  बंद होत नाहीत… आणि डोकावत राहतातच अधूनमधून.’
तेवढ्यात खाली भाजीवाला आला, त्यानं आवाज दिला. पर्णिका गॅलरीत गेली. ती मघाची दुसऱ्या गॅलरीत उभी असणारी स्त्रीही खाली होती. तिनं पटापट भाज्या खरेदी केल्या. भाजीवाल्याच्या टोपलीत शेपू, चवळी होती. मस्त हिरवीगार, ताजीतवानी… पण परागला आवडत नाहीत पालेभाज्या! ‘काय गवत खातेस!’ म्हणतो तो.
त्याला तशी तर तोंडलीही आवडत नाहीत. मला आवडतं ते बहुतेक काहीच त्याला आवडत नाही… ‘का?’ ह्याचं उत्तरही नाहीये त्याच्याकडे… ती तंद्रीत असल्यासारखी खाली बघत राहिली.
पायाला रग लागली, तसं आपण बराच वेळ उभे आहोत हे तिच्या लक्षात आलं आणि तिनं घाईघाईनं आत येता-येता घड्याळात पाहिलं. जेवण बाकी आहे… आणि पराग आला तर, हे कारण काढून चिडचीड करेल, हे आठवून ती नाराज झाली. सिंकमधली भांडी घासता घासता तिला कालचा प्रसंग आठवला…
मिस्टर शर्मा, परागचे बॉस… त्यांच्याकडे पार्टी होती. पराग हाफ डे टाकून घरी आला होता, तिनं भांडी आवरली, आणि परागला संध्याकाळी काय-कसं जायचं हे विचारायला हॉलमध्ये गेली. पराग कम्प्युटरवर काम करत होता. अर्जंट असावं… तिच्याशी बोलायचं नसेल, तर अर्जंटच काम असतं, नेहमीसारखंच!
“अहो, संध्याकाळी साडी नेसावी लागेल? की सलवार कमीज चालेल?” तिने त्याच्या जवळ जात विचारलं. 
“साडी, सलवार वगैरे नाही…! प्रोटोकॉल असतात!” त्यानं कम्प्युटरमधून बाहेर न पाहताच उत्तर दिलं… “आणि साडेपाचला निघायचंय. पोहचायला दोन-अडीच तास लागतील. सरांना उशीर आवडत नाही… सो, काय ते वेळेवर करा! केस धू… कसले चपटे बसलेत…! काही वेगळी हेअरस्टाईल जमेल का? येत असेल तर करा, ती! एकच लुक…!! आणि वेळेत निघायचंय…”
“हो, आवरते…” ती म्हणाली आणि जायला म्हणून वळली. तसा पराग फिसकन हसला. ती थबकली.
““काय झालं? मला हसलात…?”
“हो तुलाच हसलो. म्हणे आवरते… कशी दिसतेस गं तू… आवरते, चेहरापट्टी नावाचा प्रकार असतो. एवढंस नाक, तेही खालून उचलेलं… आवरून काय अशी वेगळी दिसणार आहेस…? जा… तुझ्याकडे बघावंसंही वाटत नाहीये मला!”
“अहो पण… आता रूप काय आपल्याला निवडता येतं…?”
“हो, मान्य…! पण बायको निवडता येते! आणि ती आपण निवडली नाही की, असं… हे असं गळ्यात पडतं… काहीही!” तो अतिशय तुच्छतेनं म्हणाला.
“पण होकार तर तुम्हीच कळवलेलात…!” ती आश्चर्यानं म्हणाली.
“तुला पडद्याच्या मागच्या गोष्टी माहीत नाहीत! तशी तुला गरजही नाही म्हणा… दॅट इज नन ऑफ युवर बिझिनेस! सोड…! ते बॉसनं सगळ्यांना, ‘आपापल्या स्पाउजबरोबर या’ सांगितलंय, म्हणून तुला घेऊन जायचंय! अदर वाईज, मला तुला कुठंही माझ्याबरोबर न्यायची मला लाज वाटते! यु गेट इट? लाज वाटते…!”
“लग्नच करायचं नव्हतं मग!” ती नाराज होऊन म्हणाली.
“ओ… पर्णिका बाई, आता रडारडी नको हं… पटापट आवरा आणि चला. नाही तो तमाशा नकोय मला! तुला तेवढंच कारण मिळेल, मला ही मिटिंग मिस करायची नाहीये…!”
ती आणि पराग आवरून वाळकेश्वरला गेले. जाण्यासाठी उबर मागवलेली, त्यातही, _‘पदराची पिन बघ कशी लावलीये’, ‘मोठ्यानं हसू नकोस… दातांच्या वरच्या हिरड्या दिसता कामा नये’, ‘हळू बोल’, ‘काही आवडलं नाही तर नाक मुरडू नकोस...’ वगैरे सूचना देण्याइतपतच बोलणं झालं… पण तरीही पर्णिका परागसोबत जायला मिळतंय म्हणून मनातून खूश होती. 
तिथं गेल्यावर परागनं जास्त ड्रिंक घेतलं, पर्णिका काही बोलली नाही. बोलूच शकत नव्हती. त्याचे बॉस म्हणाले की ‘पराग तुम्ही कामाचा लोड घेऊ नका…!’ पण पर्णिकाला नेमकं माहीत होतं की पराग का जास्त पितोय…
पार्टी झाली. पर्णिका जुजबी बोलली. पुन्हा उबर केली. आता मात्र पराग ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसला, आणि पर्णिका मागं एकटीच.
कसाबसा चालत तो वर आला, आणि एकदम शूज घालून बेसिनमध्ये गेला. तिथं तो भळाभळा ओकला. पर्णिका घाबरली. त्याला पकडायला गेली, तसा तो त्यातही तिला ओरडला,
“हे बघ, नाही आवडलं तर असं उलटी करून काढून टाकता येतं… पण तुला नाही काढून टाकता येत! साली जिंदगी झ्याट झालीये! तुझ्याबरोबर जगता येत नाही… आणि ॲक्सेप्ट करता येत नाही…!”
पर्णिका मागं सरकली… स्वत:चीच शिसारी आल्यासारखी. तसा तो किंचाळला, “जा टॉवेल आण…”
त्यानं तिथंच बाथरूमच्या बाहेर शूज-सॉक्स काढले, आणि अंघोळीला गेला. 
पर्णिकानं त्याचे शूज, सॉक्स शू-रॅकमधे नेऊन ठेवले. मग बाथरूमच्या बाहेरूनच परागला, “दूध वगैरे काही घेणार आहात का?” म्हणून विचारलं.
परागनं दारावर जोरात मूठ मारली. पर्णिका दचकली.
“ए मला काही नकोय! तू जा इथून… किती निर्लज्य आहेस ग तू? साली बीच! तूच कारण आहेस माझ्या फ्रस्ट्रेशनचं. साली अग्ली!”
आणखीही तो काहीतरी बोलत होता. पर्णिकाचे डोळे झरत होते. ती शांतपणे बेडरुममध्ये गेली आणि तिनं कपडे चेंज केले. तो आला आणि बेडवर झोपला… पालथा.
बेडरूमच्या मंदप्रकाशात त्याचा साईडकट चेहरा दिसत होता. गोरा, सरळ मोठं नाक, शरीराचा बांधा… हँन्डसम. हो, देखणाच होता तो! मग यानं का आपल्याशी लग्नं केलं…? अशी काय मजबुरी नडली…?
पर्णिका खूप दु:खी झाली. ती ड्रेसिंग टेबलासमोरच्या स्टुलावर बसली. तिनं लिपस्टिक ओठांवर घासली… वेडीवाकडी. ती आणखी भेसूर दिसू लागली. डोळे वाहत होते, पण रडण्याचा आवाज नव्हता… पराग उठेल म्हणून ती रडत होती आतल्या आत…!!
मग बाथरुममध्ये गेली, आणि शॉवर घेतला.  खसाखसा अंग पुसलं आणि पुन्हा आरशात पाहिलं… ‘इतके का आपण भेसूर दिसतो…?’ कपडे केले, आणि विचारात तिनं बेडवर अलगद पाठ टेकली... रडून थकल्यामुळं तिला लगेच झोप लागली. 
सकाळी,व… पराग उठल्यावर वातावरण शांत होतं, जसं नेहमीच इतर दिवशी असतं. बोलणे तर नाहीच होत आमच्यात… नाश्ता करताना त्यानं एकदाही तिच्याकडे पाहिलं नाही. डबा देताना ओझरती नजरानजर झाली तेवढीच काय ते… आणि तो ऑफिसला गेला.
पर्णिकानं या विचारात कुकर लावला, पीठ मळलं. तरीही अस्वस्थता वाढतच होती. शेवटी नाईलाजानं आईकडे मन मोकळं करावं म्हणून तिनं तिच्या आईला फोन लावला.  
“परागला मी आवडत नाही बहुतेक…” इथून तिनं सुरुवात केली. आईनं समजावलं, “असं असतंच दुनियेत… बाळा, दोन अनोळखी चेहरे एकमेकांना आवडतीलच असं नाही. काही वेळ द्यावा लागतो नात्यात… पराग चांगले आहेत, चांगली नोकरी आहे, घर आहे स्वत:चं, लाईफस्टाईल आहे. मुळात देखणा नवरा आहे… चार-चौघांत उठून दिसतो…”
पर्णिकानं काहीतरी बोलायचा प्रयत्न केला पण आईनंच उपदेशाचे चार खडे बोल सुनावले. पर्णिकाने ते सगळं ऐकून घेऊन फोन ठेवून दिला. 
जेवण बनवून झालं. टीव्हीवरच्या सिरीअलमध्ये पर्णिका स्वत:ला रमवायचा प्रयत्न करत होती, तेवढ्यात संध्याचा, तिच्या मैत्रिणीचा कलिकाचा तिला फोन आला. पर्णिका खऱ्या अर्थानं खूष झाली. बोलता-बोलता कलिका म्हणाली, 
“तुझ्या नवऱ्यानं तुला एव्हाना सांगितलंच असेल ना, त्याचं अफेअर होतं लग्नाआधी… स्ट्रॉन्ग… चुम्मा-चुप्पी टाईपचं! पण पोरगी भलतीच चालू निघाली. तिनं लग्न दुसऱ्याशीच केलं… मग पराग वेडापिसा झाला.
“तिचा नवरा डीवायएसपी… त्यानं परागला असा दम दिला की, परत त्याच्या बायकोच्या पुढं-मागं दिसलास तर बघ! ह्याची फाटली. मग काय संपलं अफेअर! पराग बोलला की नाही…? लक्ष ठेव हं बारीक.”
“ही कधीची गोष्ट आहे?” पर्णिकानं विचारलं. 
“असेल तुमच्या लग्नाच्या आधी, चार-पाच वर्षांपूर्वीची… तुला बोलला नाही तो?”
“ती सुंदर होती का…?” पर्णिकानं चाचरत विचारलं.
“काय जाळायचंय त्या सुंदरतेला! नखरेल, श्रीमंत बापाची मुलगी! लग्नाच्या आधीचं थ्रील…! आणखी काय? अशा मुली अफेअर वगैरे बाबतीत सिरीअस नसतात गं…! जाऊ दे, दॅटस् अ पास्ट… तो तुझ्याबरोबर चांगला वागतो ना… मग झालं. पण माहिती पाहिजे… तो बोलला का गं…?”
“कलिका, पास्ट असला तरीही तो माझा वर्तमानकाळ सडवतोय…! मी डायव्होर्स देईन त्याला…” पर्णिका निर्धारानं म्हणाली.
“ए पर्णिका, अगं वेडीबिडी आहेस का तू? अशी अफेअर्स असतात, ल्ग्नाआधी… त्यासाठी कुणी सोडून देतं का? तुला माहीत होतं ना? तुझ्या आई-वडिलांना तर हे माहितीये. त्याच्या आईनंच सांगितलं होतं, लग्नाच्या आधीच…” कलिका म्हणाली.
“काय…?” पर्णिका किंचाळलीच. 
“शीट… सगळं बरं चाललेलं… मला काय अवदसा सुचली, हे मी बोलले तुला… यार, आय एम सॉरी…! तू… तू हे विसरून जा पर्णु… प्लीज विषय वाढवू नकोस… प्लीज…!!” कलिका घाबरून म्हणाली.  
“नाही कालिका, मी अग्ली नाहीये… अग्ली तर हा आहे! ह्याचं फ्रस्ट्रेशन वेगळं आहे. हा ट्रान्सपरन्ट नाहीये… आपण नाकारलो गेलो या विचाराने तो कुरूप झालाय…”_
कलिका आणखी गोंधळली. “तू काय बोलतेयस, ते मला अजिब्बात कळत नाहीये पर्णु… प्लीज फरगिव्ह मी! आय एम रिअली सॉरी! ते डायव्होर्स वगैरे मनात आणू नकोस हं… माझ्या नवऱ्याची लग्नाआधी तीन -तीन अफेअर्स होती… त्यानं काय फरक पडला? तो पास्ट आहे… आणि मी…”
पर्णिकानं फोन कट केला. तिला खूपसं चित्र क्लीअर झालं होतं. ती शांतपणे सोफ्यावर बसून राहिली. भिंतीवर बाहेरच्या झाडांच्या पानांच्या सावल्या एकमेकांत मिसळून वेगळ्याच नव्या प्रतिमा होत होत्या. मनात त्या प्रतिमा उतरायला लागल्या…
‘आई-बाबा सुद्धा…!! मुलगी उजवायची नसते आई! नातं निर्माण व्हायला, आधी मन निर्मळ लागतं, विश्वास लागतो… आणि खरं बोलायची धमक लागते… नाहीतर कुरूप होतो आपण. कुरूप… यू नो, अग्ली…! आई-बाबा, तुम्हीही का पराग सारखे कुरूप झालात?’
ती नीट त्या भिंतीवरच्या सावलीकडे बघत होती. त्या सावलीत एका फांदीवर दोन वेगवेगळी पानं हलत होती. त्या पानांच्या सावल्या मात्र एकमेकांत चुकुनही मिसळत नव्हत्या.

- उर्मी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...