गुरुवार, २५ जून, २०२६

2971. कार्य

     नातसून पहायला मिळणार, म्हणून गजाभाऊ खूष झाले होते. होणारी नातसून ऋता डॅाक्टर होती व फार गोड मुलगी होती. कुमार मनासारखी बायको मिळाल्यानं खूष होता. लग्न अगदी चार दिवसांवर आलं होतं अन् गजाभाऊंना कसंतरी होऊ लागलं.
‘बरं वाटत नाहीये’, हे बोलावं की नाही, त्यांना कळत नव्हतं. सांगून साऱ्यांचा मूड जाईल. त्यापेक्षा चार दिवस थांबू व लग्न झालं की डॉ. विनायकाकडे जाऊ असा विचार करून ते गप्प बसले होते. पण मन शांत बसू देईल तर ना ! ८५ वर्षांचं वय आहे आपलं अन् नेमकं लग्नाच्याच दिवशी काही झालं तर कार्यात अपशकुन होईल, अशी टोचणी आत सुरू झाली. एकुलत्या एका नातवाचं कार्य उत्तम पार पडलेलं बघण्याची इच्छा प्रबळ होती.  अगदी थोडासा दहीभात खाऊन ते झोपले. रात्री परत तसंच अस्वस्थ वाटू लागलं. एक अनामिक भीती आतमध्ये दाटून आली. ते रामनाम घेत तसेच पडून राहिले व सकाळी त्यांनी विनायकाला फोन केला. विनायक त्यांच्या मित्राचा मुलगा, उत्तम हृदयरोग तज्ञ होता.
“विनायक, बोलणार नव्हतो. पण लग्न आहे घरी आणि मला कसंतरी होऊ लागलंय कालपासून. तीन दिवसांवर लग्न आलंय. तोवर धडधाकट असायला हवं मला !”
त्यांच्या स्वरातली काळजी विनायकला जाणवली. 
“फिरायला जातो असं सुनबाईस सांगून चार वाजता मी तुझ्या क्लिनिकला येतो. घरच्यांना बाकी काही आत्ता सांगत नाही !”
विनायकनं होकार दिला.
चार वाजता त्यांनी ड्रायव्हरला गाडी विनायकच्या देवदत्त क्लिनिककडे नेण्यास सांगितली. विनायकानं काकांना तपासलं. काही टेस्ट्स करायचं ठरवलं.
“काका, एक दोन तास ऑब्झर्वेशन केलेलं बरं. घरी कळवा की, बाबा जेवायला थांब म्हणताहेत म्हणून मी उशीरा घरी येतो.”
त्यानं ड्रायव्हरला बजावून सांगितलं की, “गजाभाऊ व बाबांचा एक मित्र आलाय. काका दोन चार तास आमच्याच घरी थांबतील हे घरी जाऊन सांग.”
गजाभाऊ हॉस्पिटलच्या खोलीत बसले होते. अटेंडिंग डॉक्टर राऊंडला येण्याची वेळ झाली होती. त्या खोलीतला आत्ताच पैलतीराला घेऊन जाईल असा वास, त्या उदास पांढऱ्या भिंती आणि खिडकीच्या गजावर काव काव आक्रोश करणारा कावळा बघून त्यांच्या छातीतील धडधड वाढली. तिथली भगभगणारी पांढरी ट्यूब जळताना ‘गुऽऽऽ…’ असा आवाज निष्कारण करत होती.
दारात अटेंडिंग डॉक्टर उभी होती…
“आजोबा…?” ऋता आश्चर्यानं पहात होती.
“अग, तुमची मेहंदी आहे ना आज? मग तू आत्ता इथं कशी?” गजाभाऊ दचकले.
“एक इंटरेंस्टिंग केस बघायला विनय सरांनी बोलावलंय. त्यातच नेहमीची ऑन कॉल डॉक्टर नीरजा आज आली नाही, म्हणून विनय सर राऊंड करून जा म्हणाले. तुमची पण विनय सरांशी ओळख आहे?” ऋता गोंधळून गेली होती. 
गजाभाऊ गडबडले. त्यांनी तिला सर्व परिस्थिती समजावून सांगितली.
“आजोबा, आमच्या लग्नापेक्षा तुमची तब्येत महत्वाची आहे हो ! कार्यात विघ्न येईल म्हणून काय होतंय हे न सांगणं अजिबात बरोबर नाही.”
‘कुमारला काही सांगायचं नाही’, ही आजोबांनी घातलेली गळही ऋताला पटत नव्हती.
पण रात्री विनायकला घरच्यांना कळवावं लागलं. सकाळी गजाभाऊंची ॲंजिओग्राफी ठरवली होती. गजाभाऊंच्या दोन आर्टरीज ९०% ब्लॅाक झाल्या आहेत हे विनायकनं घरच्यांना सांगितलं व लगेच दुसरे दिवशी ॲंजिओप्लास्टी ठरवली.
    लग्न पुढं ढकलावं, असं सगळे म्हणत होते पण लग्न ठरल्याप्रमाणेच झालं पाहिजे असा गजाभाऊंनी हट्ट धरला होता. त्यांच्या आग्रहामुळं इकडे लग्न लागणार होतं व त्याच दिवशी सकाळी गजाभाऊंची ॲंजिओप्लास्टी होणार होती. कुमार अस्वस्थ झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी गजाभाऊंची ॲंजिओप्लास्टी उत्तम पार पडली व त्यांना एका मोठ्या खोलीत आणलं गेलं. व्हिडीओवर लग्न पहायचं म्हणून विनयनं मोठ्या स्क्रिनचा लॅपटॉप काकांसमोर  ठेवला. मुहुर्ताची वेळ जवळ येत होती. दारात गडबड ऐकू आली म्हणून गजाभाऊंनी तिकडे वळून पाहिलं. ऑफव्हाईट रंगाचा कुर्ता घालून मुंडावळ्या बांधलेला कुमार आत आला. बांगड्या किणकिणल्या… गर्भरेशमी अष्टपुत्री नेसलेली ऋता आत आली. करवल्या आल्या. गुरूजी आले. फुलांच्या टोपल्या आल्या.
“चला चला… विनायकराव, अंतरपाट धरा…”
त्याच खोलीत वधू-वर उभे राहिले. विनायक व त्याचा असिस्टंट डॉ सुबोध रेशमी कुर्ता घालून अंतरपाट धरून उभे राहिले.
गुरुजींनी मंत्रोच्चार सुरू केले…
‘स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं,
मोरेश्वरं सिध्दिदं..॥
बल्लाळं मुरूडं…’
लग्नाला आलेले पाहुणे शुभम् हॉलमधल्या भल्यामोठ्या स्क्रिनवर हा सोहळा पहात होते. लग्न लागलं. वधू वरांनी एकमेकाला हार घातले व गजाभाऊंच्या पायांशी ते आशीर्वाद घेण्यासाठी वाकले.
गजाभाऊ सद्गदित होऊन गेले होते…
“पोरांनो, शुभम् हॉलमध्ये  लग्न केलं असतंत, तर मी इथून पाहिलं असतं की रे!”
“आजोबा, आमच्या लग्नात विघ्न येऊ नये म्हणून स्वत:ला काय होतंय हे न सांगणारे आणि माझं लग्न पाहण्याची चातकासारखी वाट बघणारे माझे आजोबा हॉस्पिटलमध्ये आणि बाकी सारे शुभम् हॉलमध्ये हे कसं शक्य आहे? त्यापेक्षा उलटं केलं तर आजोबांना लग्न पाहता येईल, हे ऋतानंच सुचवलं व विनायक काकासकट सर्वांनी ही आयडिया उचलून धरली!”
कुमारचे डोळे भरून आले होते. समोर दोन वर्षांच्या कुमारला चांदोबा दाखवणारे शक्तीमान आजोबा विकल होऊन समोर बसले होते. रडणाऱ्या कुमारला अंगणात नेऊन काऊ चिऊ दाखवणारे आजोबा ! पाठ दुखत असताना घोडा-घोडा करणारे आपले आजोबा…!
“मुलांनो, लोक ‘डेस्टिनेशन वेडिंग’ म्हणून कुठंतरी छान ठिकाणी. बेटावर वगैरे जातात आणि तुम्ही मात्र या साध्या हॉस्पिटलच्या खोलीत लग्न केलंत...” आजोबा पुटपुटले.
“अहो काका, ही रूम काय वाईट आहे हो? जीवनदान मिळतं या खोलीत ! बंद झालेलं ह्रुदय धडधडू लागतं. कित्येक पेशंट यमराजाला ‘not yet’ म्हणून घरी जातात इथून. त्यांच्या कृतज्ञतेनं, आशीर्वादानं, सकारात्मकतेनं भारलेली खोली आहे ही… यासारखा व्हेन्यू नाही !” 
विनायकाचं बरोबर होतं. गजाभाऊ मनापासून हसले.
“विनायका, खरंय तुझं. खरंच रे ! कार्य म्हणजे केवळ अक्षता टाकणं नसतं.
कार्य असतं… नात्यांचा मान राखणं,
कार्य असतं…सर्वांना सामावून घेणं,
कार्य असतं… एकमेकांच्या प्रेमाचं अंशत: ऋण फेडणं.
आणि
कार्य असतं… आयुष्याचा नवा अध्याय सुरू करताना हितचिंतकांच्या आशीर्वादानं आपली ओंजळ भरून घेणं.
कार्य सिद्धीस नेण्यास ‘विनायक’ समर्थ आहेत म्हणजे काय ते कळलं आज !” काकांनी त्या स्थितीतही ‘श्लेष’ करण्याचा मोह सोडला नाही.
गजाभाऊंनी हात जोडले. “सारं कसं छान पूर्ण झालंय ! मुलांनो तुम्ही हॉलवर जा. मी विश्रांती घेतो. तिथं लोक वाट पहात असतील !”
सगळे तिथून बाहेर पडले. गजाभाऊंनी कृतज्ञतेचं पांघरूण अंगावर ओढलं. बाहेरून आलेल्या सुर्यकिरणांनी खोली उजळली होती. मुलांनी आणलेल्या फुलांचा सुवास सर्वत्र पसरला होता.
खिडकीच्या गजावर बसलेला कावळा केव्हाच उडून गेला होता व एक कोकिळ तिच्या गोड आवाजात ‘कुहू कुहू…’ करत बसली होती.
उलट्या वाट्या घातलेलं मंगळसूत्र घालून ऋता राऊंडला आलीय, हे दृश्य त्यांना दिसत होतं.
शीण व आनंद एकत्र येऊन त्यांचे डोळे मिटू लागले व तोंडातून शब्द उमटले.
“अष्टपुत्रा सौभाग्यवती भव॥ शुभं भवतु॥”


- ज्योती रानडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...