गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2761. संमती

 निलोफरनं त्या दिवशी बाँबच टाकला.
नजमा आणि मुल्ला नसरुद्दीन यांना समोर बसवून तिनं सांगितलं, 
“मी एका मुलाच्या प्रेमात पडलेय. तोही माझ्या प्रेमात आहे. त्याच्याशी लग्न करण्याची माझी इच्छा आहे.”
मुल्ला म्हणाला, “चांगलं आहे की ! आम्ही आधुनिक विचारांचे आईवडील आहोत. प्रेमात पडण्याचं वयच आहे तुझं. कोण आहे तो मुलगा? काय करतो?”
निलोफर म्हणाली, “तो अभिनेता आहे. नाटकात काम करतो. आता सिरियल, सिनेमातही काम शोधतोय.”
मुल्ला एकदम तडकला. म्हणाला, “अरे देवा, शोधून शोधून तुला एक भांडच सापडला प्रेम करायला ! ही नट मंडळी लुच्ची, लफंगी असतात. मी या लग्नाला संमती नाही देऊ शकत.”
निलोफर म्हणाली, “मला वाटतं, तुम्ही त्याला भेटण्याआधी, त्याला पाहण्याआधी त्याच्या बाबतीत इतक्या टोकाची मतं ठेवू नयेत. इतक्या टोकाचा निर्णयही घेऊ नये. त्याचं उद्याच नाटक आहे. मी त्याची दोन तिकिटं आणली आहेत तुमच्यासाठी. नाटक पाहा. त्याला भेटा आणि मग ठरवा.”
मुल्लानं तिला विचारलं, “त्याला भेटल्यानंतरही माझं हेच मत कायम राहिलं तर?”
निलोफर शांतपणे पण ठामपणे म्हणाली, “तर मग मला तुमच्या इच्छेविरुद्ध त्याच्याशी लग्न करावं लागेल.”
नजमा आणि मुल्ला यांनी नाटक पाहिलं. नाटकानंतर निलोफरला आवडलेल्या मुलाशी गप्पा मारल्या. नंतर मुल्ला म्हणाला, “माझी तुझ्या लग्नाला संमती आहे.”
रात्री नजमानं मुल्लाला विचारलं, “त्या मुलाला पाहताच तुमचं एवढं हृदयपरिवर्तन झालं?”
मुल्ला म्हणाला, “त्या मुलाला अभिनयातला ओ की ठो येत नाही, एवढं मला कळलं. त्याच्यात अभिनेत्याचे गुण नाहीत तर दुर्गुण कुठून येतील, या आशेवर मी तिला होकार दिलाय.
“पण दुसरंही एक कारण आहे. ती कोणत्याही परिस्थितीत, आपण नकार दिला तरी त्याच्याशी लग्न करणार आहेच. आता ती या विषयावर परत फिरणार नाही. मग तिला नकार देऊन तिच्याशी असलेला नात्याचा उरलासुरला बंध तोडून तिला एकटी का पाडू?” 
ही गोष्ट सांगून ओशो म्हणतो.
“मुलांना जन्म देणं सोपं असतं, पण आईबाप बनणं कठीण असतं.
“मुलं आईवडिलांच्या निव्वळ आज्ञेत राहिली, तर त्यांचे छापाचे गणपती बनतात. त्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्व प्राप्त व्हावं, जगाच्या बाजारात त्यांनी आईवडिलांच्या पाठबळाविनाही भक्कम उभं राहावं, असं वाटत असेल तर आईवडिलांनी काही आज्ञा अशा दिल्या पाहिजेत ज्या तोडल्यानं मुलांचं नुकसान होणार नाही. त्या आज्ञा मुलांनी तोडल्याच पाहिजेत, त्यातच त्यांचं हित आहे.”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...