त्या दहा मजली हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावर नेहेमीप्रमाणे गडबड होती. पेशन्ट ऍडमिट होत होते, काही बरे होऊन बाहेर पडत होते. काही हे जग सोडून जात होते. नर्सेस, वार्डबॉयज इकडून तिकडे धावत होते. डॉक्टर्स या पेशन्टकडून त्या पेशन्टकडे जात होते.
रसिका नर्स प्रत्येक पेशन्टचे ब्लडप्रेशर घेत होती, नाडी चेक करत होती, ऑक्सिजन लेव्हल पहात होती.एकएक पेशन्ट करत करत ती त्या आजोबांच्या जवळ आली.
'काय वर्दे आजोबा? कस वाटतय?
आजोबानी हात वर केला आणि जणू मी बरा आहे असे सांगितले.
'भूक लागली काय? मोसम्बी ज्युस आणू का?
वर्देआजोबानी मान हलवली. तशी रसिका पटकन बाहेर गेली आणि कॅन्टीनमधून ज्युस घेऊन आली. तिने चमच्याने ज्युस त्याना भरवला, तोंड पुसलं. मग त्त्यांचे प्रेशर घेतलं, पल्सरेट पाहिलं. ते टेबलावरील चार्टवर नोट केल आणि पुढच्या पेशन्टकडे गेली.
रसिका त्या वार्डमधील सर्व पेशन्टना पाहून नर्सरूम मध्ये आली. तिच्या सोबतची दुसरी नर्स कविता तिला म्हणाली..
'रसिका...त्या वर्देआजोबाना भेटलीस?
'का ग?
'अग भेटलीस म्हणजे त्त्यांचे बीपी वगैरे घेतलंस का?
'हो.. मी सर्वांनाच तपासते.
'पण त्या आजोबाबंद्दल काहीतरी वेगळे वाटतं नाही काय?
'वेगळे? हा.. एक वेगळे म्हणजे त्याना कुणी म्हणजे कुणी सुद्धा भेटायला येत नाही किंवा त्त्यांची विचारपूस करत नाही.
'तेच म्हणते आहे मी रसिका. रोज संध्याकाळी नातेवाईक किंवा पेशन्टच्या जवळच्या लोकांना भेटायची वेळ असते ना. त्या वेळी या वार्डात सर्व पेशन्टचे नातेवाईक किंवा ओळखीची माणसे येत असतात, काही जण फुले घेऊन येतात, काही जण फळे आणतात. बहुतेक पेशन्टचे नातेवाईक बाहेर घुटमळत असतात, पण वर्दे आजोबांना भेटायला कुणी येत नाही, त्त्यांचे नातेवाईक येत नाहीत. त्यान्च्या तब्येतीची चौकशी करायला साधा फोन कुणी केला नाही गेल्या पंधरा दिवसात.
'ते खरे आहे. पण मला ते अत्यन्त प्रेमळ आजोबा वाटतात.
'तुला ते प्रेमळ का वाटतात कोण जाणे. मला तो खडूस म्हातारा वाटतो. तरुणपणात तो कुणाशी बरा वागला नसणार. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याला इथे सोडला असणार.
रसिका गप्प राहिली. पण तिला का कोण जाणे. त्या आजोबाबंद्दल आपुलकी वाटतं होती. रसिका डॉ.आजगावकर सरासोबत राउंडला होती. सर प्रत्येक पेशन्टकडे जात होते. चार्टवरील नोट्स पहात होते. पेशन्टना तपासत होते, त्त्यांची चौकशी करत होते. त्याप्रमाणे औषधे लिहून देत होते. नर्स रसिकाला सूचना देत होते. आजगावकर वर्दे पेशन्टच्या बेडकडे आले..
'काय आजोबा.. कस वाटतय?
वर्दे फारसे बोलू शकत नव्हते. त्याना सतत खोकला येत होता. श्वास लागत होता. वर्देआजोबानी मोठया कष्टाने हात वर केला. डॉक्टरनी त्याना तपासले. त्त्यांची ऑक्सिजनलेव्हल थोडी कमी वाटली म्हणून त्यानी रसिकाला ऑक्सिजन लावायला सांगितला आणि ते पुढील पेशन्टकडे गेले. रसिकाने छोटा ऑक्सिजन सिलिंडर आणला आणि तिने वर्देआजोबांना लावला आणि ती तिथेच टेबलावर बसली.
आता वर्देआजोबांचा खोकला थांबला, त्याना श्वास व्यवस्थित घेता येऊ लागला. रसिकाच्या मनात येत होते. कोण हे वर्दे आजोबा? यांना कुणी ऍडमिट केले? आणि यांना भेटायला कुणीच येत नाही. असे का?
रसिकाने पाहिले.. या आजोबांची छोटी बॅग होती.
ती बेडखालीच होती. तिने ती बॅग उघडली. आत आजोबांचे दोनतीन कपडे होते आणि काही कागद होते. तिने ते कागद बाहेर काढले.. काही वर्तमानपत्रातील कात्रणे होती.एका कात्रणात वर्देआजोबांचा सत्कार होत होता.काही अधिकारी मंडळी त्याना शाल घालत होती. दुसऱ्या फोटोत काही शाळकरी मुलासमवेत वर्दे दिसत होते. एका फोटोत आग लागलेली एक शाळा दिसत होती आणि त्या आगीत घुसलेले तरुण वर्दे दिसत होते.
रसिकाला कळेना. कोण आहेत हे वर्दे? आज त्त्यांचे वय पंचाऐशी होते आणि सिव्हिअर निमोनियाने ते आजारी होते. त्त्यांची तब्येत नाजूक होती. या हॉस्पिटलमध्ये त्यान्च्यावर उपचार सुरु होते. पण त्त्यांचे कुणीच नातेवाईक कसे नाहीत? कुणी मित्र,ओळखीचे, शेजारी.. कुणीच नाही.. कसे?
रसिकाला का कोण जाणे पण तिचे आजोबा आठवले. लहानपणी मांडीवर घेऊन गोष्टी सांगायचे. चिऊमाऊची गोष्ट सांगत घास भरवायचे. आजोबा गेले आणि ते सुख गेले. हे आजोबा तरी किती दिवस काढतील? मग हे जग सोडून गेले हे नातेवाईकाना, आप्त्ना कळायला नको? कुणी तरी यांची आठवण काढतच असतील ना? कुणाला तरी ते आठवत असतील ना? काय करावे?
रसिकाला कल्पना सुचली. तिने पटकन मोबाईल बाहेर काढला. त्यावर वर्देआजोबांचा फोटो काढला. सोबत त्यान्च्या बॅगमधील जी कात्रणे होती. त्त्यांचे पण फोटो काढले.. ते सर्व एका पेजवर घेतले.. आणि त्या पेजवर लिहिले.
'हे आजोबा या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. यांचे कोण जवळचे आहेत काय?
आणि ते पेज तिने फेसबुक. इंस्टावर सेंड केले.
रसिका घरी आली. आईसोबत जेऊन आणि थोडा वेळ पुस्तक वाचून झोपी गेली. तिच्या बाजूलाच तिचा मोबाईल ठेवलेला होता. रात्री दोन वाजता तिला जाग आली..तिने सहज मोबाईल चालू केला.. तिला पण उत्सुकता होती, संध्याकाळी पाठविलेल्या मेसेजवर कोणी प्रतिक्रिया दिली की नाही.. तिने पाहिले दोन हजर पेक्षा जास्त लोकांनी मेसेज पाहिला होता आणि अनेकांनी मेसेज टाकले होते.
'वर्देसर.. तुम्ही कुठे होतात इतके दिवस?
'वर्देसर.. मी तुम्हाला भेटायला येतोय..
'सर.. तुम्ही शिकविलेले गणित अजून पक्के आहे डोक्यात.
'सर, तुमच्यामुळे मी आज या पोझीशनला आहे..
'सर, आमच्या वर्गाचे गेटटुगेदर होते, तेंव्हा तुमची नेहेमी आठवण होते.
अनेक मेसेज आले होते. रसिकाला आनंद वाटला, सरांना ओळखणारे अनेक आहेत. अनेकां पर्यत हा मेसेज पोचेल. त्यान्च्या जवळच्या लोकांना सुद्धा कळेल. सर कुठे आहेत ते.
म्हणजे सर एकटे नाहीत तर. आपण योग्य तेच केले हे समजल्याने ती परत गाढ झोपली.
दुसऱ्या दिवशी रसिका ड्युटीवर पोचली तेंव्हा अनेक स्त्रीपुरुष तिची वाट पहात होती. सर्वाना वर्देसरांना भेटायचं होत. तिने नम्रपणे सर्वाना सांगितलं. रुग्णांना भेटायची वेळ सायंकाळी पाच ते आठ आहे, त्या वेळेत या. पण बरीच मंडळी रिसेप्शनकडे आली होती. सर्वाना वर्देसरांना भेटायचं होत. पण तिथे पण त्याना तेच सांगितलं गेल. रसिका आपला ड्युटीड्रेस चढवत होती, तेंव्हा तिची मैत्रीण कविता पण तिथे होती, ड्युटीवर येताना तिनेपण हॉस्पिटलबाहेर अनेक मंडळींना वर्देसरांना भेटायचं होत हे पाहिलं होत..
'रसिका.. एका दिवसात काय जादू झाली.. कालपर्यत कुणी म्हणजे कुणीसुद्धा या वर्दे पेशन्टला भेटायला येत नव्हते आणि आज गेटबाहेर ही गर्दी. मला वाटले आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणी व्हीआयपी ऍडमिट आहे की काय? चौकशी केली तर आपल्याच वार्डमधील वर्देआजोबा.
'अग तस नाही ग कविता. माझा अंदाज होताच हे वर्देआजोबा कुणी सामान्य माणूस नाही. ते निश्चित आपल्या क्षेत्रात विशेष असणारं. मी त्त्यांची जुनी बॅग उघडली, त्यात त्त्यांची काही वर्तमानपत्रातील कात्रणे होती. ती कात्रणे आणि आजोबांचा फोटो मी सोशलमीडियावर टाकला फक्त, रात्री दोन वाजेपर्यत दोन हजारहुन जास्त लोकांनी तो पाहिला आणि मेसेजची रिघ लागली.
'ओके रसिका. तर तूझ्यामुळे तुझे लाडके आजोबा प्रकाशात आले.
'माझ्यामुळे नाही ग. तेच काही कारणांनी समाजापासून लांब राहिले असावेत, पण काही का असेना ते आपल्या जवळच्या लोकांपुढे आले, हे चांगले झाले.
रसिकाच्या फोनमध्ये अनेकांचे मेसेज येतच होते, काहीजण फोन करत होते, पण ती ड्युटीवर असल्याने तिने कुणाला उत्तरे दिली नाहीत. सायंकाळी मात्र वर्देसरांना भेटणाऱ्यांची रिघ लागली. त्त्यांचे अनेक विदयार्थी, सहशिक्षक, ते चाळीस वर्षांपूर्वी ज्या घरात रहात होते तेथले शेजारी..पण वर्देसर त्याना ओळखत नव्हते.
वर्देसरांचे सहकारी शिक्षक म्हणत होते..'जवळजवळ चाळीस वर्षे सर बेपत्ता होते. पंच्याऐशी साली सरांना शेवटचे पाहिले होते, त्यानंतर सर आज दिसत आहेत. होते कुठे सर? आणि ते नोकरी, गाव सोडून का गेले? रात्री त्त्यांचे ऐशीसालचे विदयार्थी आले. सर्वजण सरांच्या पायाकडे बसले. आता ते सर्व साठीच्या पुढे होते.
'सर म्हणजे आमचे हिरो होते. नेहेमी सायकलवरुन शाळेत यायचे, गणित अप्रतिम शिकवायचे, कबड्डी आणि खोखो खेळायचे.
'सरांची एक आठवण म्हणजे एकदा केमिस्ट्रीलॅबला आग लागलेली, आत नववीची मुले होती. सर दहावीचा वर्ग घेत होते. सरांना कळताच सर त्या आगीत घुसले आणि आपल्या जीवाची काळजी न करता त्यानी एकएक मुलाला सुखरूप बाहेर काढले.
'हो हो.. माझ्या पण ते लक्षात आहे. तेंव्हा मी आठवीत होतो. सर्व मुलांना आणि साठेबाईंना पण.. त्या त्यावेळी मुलांचं प्रॅक्टिकलं घेत होत्या.
'साठेबाई?..
त्यावेळी त्या लॅबमध्ये अडकलेल्या मुलातील गुलाब पण तिथे होती.
'मी वाचले त्या दिवशी याचे श्रेय वर्देसराबरोबर साठेबाईंना पण होत. आग सर्वत्र पसरली होती. वर्देसरांनी बऱ्याच मुलांना बाहेर काढलं होत पण मी आणि साठेबाई शेवटी होत. आणि वर्देसरांना आमच्यापर्यत पोचता येत नव्हतं. त्यावेळी साठेबाईंनी मला पोटाशी धरत खिडकीतून बाहेर उडी घेतली होती.
साठेबाई?
अनेकांना साठेबाईची पण आठवण आली. दोन वर्षांनी म्हणजे साठेबाईंचे लग्न झाले आणि त्या इंदोरला गेल्या. वर्देसरांचे अनेक विद्यार्थी त्यान्च्या आठवणी काढत होते. पण सर कुणाशी बोलत नव्हते किंवा ओळखत नव्हते. आता रोज संध्याकाळी वर्देसरांसाठी फुले, पुष्पगुच्छ येत होती. त्या वार्ड मधील इतर कुणाही पेशन्टला कधीही आली नसतील एव्हडी. रसिका ते पहात होती आणि आनंदित होत होती.
रोज संध्याकाळी इतकी माणसे येत होती म्हणूंन किंवा वर्देसराबंद्दल चर्चा होत होती म्हणून किंवा हॉस्पिटलमधील उपचारामुळे असेल पण वर्देसर थोडे थोडे त्यान्च्या विद्यार्थ्यांना ओळखू लागले होते, ओळखीचे वाटले तर हात वर करत होते, ओठावर हसू आणत होते.एक दिवस हॉस्पिटल बाहेर एक गाडी थांबली. त्यातून एक वृद्ध आणि एक तरुण स्त्री खाली उतरली. ती दोघे वर्देसर ऍडमिट होते, त्या वार्ड मध्ये आली.
नेहेमीप्रमाणे सरांचे विदयार्थी पण आले होते. त्यात ऐशीच्या बॅचमधील, एक्याऐशीच्या बॅचमधील आता ज्येष्ठ नागरिक झालेले लोक होते.
त्या दोघी विचारत विचारत वर्देसरांच्या बेडपाशी आल्या. त्या वृद्ध स्त्रीने गुलाबांची फुले आणली होती. तिने फुले बेडशेजारील टेबलावर ठेवली आणि ती वाकून सरांच्या चेहेऱ्याकडे पाहू लागली..
'ओळखले का सर मला.
सारेजण सरांच्या चेहेऱ्याकडे पहात होते. सर थोडे हसले असे सर्वाना वाटले.
'नाही ओळखले.. मी पण आता म्हातारी झाले. मी निर्मला साठे नाही का. मी होते शाळेत शिक्षिका तुमच्या वेळेस. मग माझे लग्न झाले आणि मी इंदोरला गेले. गेली पंचवीस वर्षे इंदोरला होते. माझ्या नवऱ्याच्या मृत्यनंतर या माझ्या मुलीकडे आले. माझ्या मुलीचे आणि जावयाचे हॉस्पिटल आहे या भागात. तिथे बाजूला उभी असलेले सर्व वर्देसरांचे तसेच साठेबाईंचेपण विदयार्थी होते.
'साठेबाई तुम्ही? आम्ही सर्व तुमचेच विदयार्थी.. आता ज्येष्ठ नागरिक झालोय.. किती वर्षांनी..
'होय का? मला आता आठवत नाही.. पण एक गुलाब आठवते.
गुलाब चटकन पुढे झाली. साठेबाईंना कडकडून भेटली.
'बाई.. तुम्ही? तुम्हाला मी कशी विसरेन.तुम्ही त्या आगीतून मला वाचवलेत. नाहीतर माझा कोळसा झाला असता.
'होय.. ते मला पक्क आठवतंय.. पण या वर्देनी किती मुलांना वाचवलं..माझ्या आठवणीप्रमाणे पंचवीस मुलांना.. आता वर्दे या बेडवर आहेत..
'पण बाई तुमचे लग्न झाले आणि त्यानंतर दोन महिन्यात वर्देसर शाळा आणि नोकरी सोडून गेले. आज कित्येक वर्षानंतर सर आणि त्या नंतर तुम्ही भेटलात.
'यासाठी चाळीस वर्षामागे जावे लागेल. माझ्या मुलीसमोरच मी हे सांगत आहे. माझे आणि वर्दे सरांचे एकमेकांवर प्रेम होते.
'काय? सारे ओरडले..
'प्रयोगशाळेत आग लागली आणि दुसऱ्या वर्गावर असलेल्या वर्देनी आपला जीव धोक्यात घालून मुलांना वाचवले.. या प्रसंगमुळे मला ते आवडू लागले. मी त्याना चिठ्ठी लिहिली. प्रेमाची.. प्रेमपत्र.. सरांनी पण मला चिट्ठी लिहिली. त्याना पण मी आवडत होते. आम्ही एका वर्षानंतर लग्न करायचे ठरविले आणि त्यानंतर ही नोकरी सोडून कुठल्यातरी आदिवासी भागात शिक्षणाचा प्रसार करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे वर्देसर हेमलकासा भाग पण पाहून आले होते. त्या भागातील आदिवासी मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे असे त्त्यांचे म्हणणे होते, पण..
'पण काय बाई?
'माझ्या आईवडिलांना ही बातमी समजली. त्यांनी मला कोंडून ठेवले आणि एकदिवस गुपचूप इंदोरला नेऊन माझे लग्न करून दिले.
'अरेरे..
'शेवटी माझे जबरदस्तीने का होईना लग्न झालेच. माझ्या अंदाजाने त्यामुळेच व्यथित होऊन सरांनी राजीनामा दिला असणारं आणि बहुतेक ते इतकी वर्षे त्याच आदिवासी भागात मुलांना शिक्षण देत असणारं. त्यामुळे त्त्यांचा संसार नाही.. कुणी आपतेष्ठ नाहीत..
' पण त्याना या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले कुणी?
'मी केले.. तेथे असलेला एक माणूस म्हणाला..
'बाई म्हणाल्या ते खरे आहे. हे सर हेमलकसा भागात शिक्षण देत होते. त्या भागातील मी. त्त्यांचा विदयार्थी. मी या गावात पोलीस आहे. सरांची तब्येत ढासलू लागली तेंव्हा मी त्याना माझ्या घरी आणले. माझी बायको पण त्यांचीच विदयार्थिनी. आमच्यावर आपल्या मुलाप्रमाणे त्यांनी प्रेम केल. त्याना श्वास लागायचा.. रात्र रात्र खोकला यायचा.. मी गावी गेलो तेंव्हा त्यांची ही अवस्था पाहिली आणि त्याना माझ्यासोबत आणले आणि या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.
साठेबाई पुढे झाल्या आणि त्यांनी त्या पोलिसांची पाठ थोपटली..
'फार चांगले काम केलेत तुम्ही पोलीसदादा. तुमच्यामुळे हे वर्दे मला आणि या त्यान्च्या विध्यार्थ्यांना दिसलें, भेटले आणि मला सुद्धा. अर्थात या हॉस्पिटल मधील नर्स रसिका हिचे कौतुक आणि आभार मानायला हवेत. तिने सोशलमीडियावर सरांचा फोटो आणि जुनी वर्तमानपत्रातील कात्रणे टाकली. त्यामुळे हेच वर्देसर हे लक्षात आले.
'होय होय.. खरे आहे.. या हॉस्पिटलमधील नर्स रसिका.. हिचे मोठे श्रेय आहे.
कुणीतरी रसिकाला साठेबाईसमोर आणले.. बाईंनी तिला जवळ घेतले. बाई पुढे म्हणाल्या..
'तुम्ही सर्व माझे आणि वर्देसरांचे विद्यार्थी.. मी तुम्हाला आता मघा सांगितले. सरांना आणि मला लग्न करायचे होते.. पण ते झाले नाही.. झाले ते झाले.. आता माझी एक इच्छा आहे. मी सरांचा डिस्चार्ज घेऊन माझ्या मुलीच्या घरी त्यांना नेत आहे. माझी मुलगी आणि जावई दोघेही फिजिशियन आहेत. त्यामुळे दोघेही त्यांची काळजी घेतील आणि सरांचे जे काय शेवटचे दिवस असतील, त्या काळात मी त्यांची सुश्रुषा करीन. अर्थात तुम्ही सारे सरांना भेटायला येत चला. हे पोलीसदादा नेहेमी येतीलच. ही आपली रसिका पण येईलच.
सर्वजण स्तिमीत झाले. एक अंदाजे ऐशी वर्षांची स्त्री, आपले जुने प्रेम अजून मनात ठेवते आणि या वयात आपल्या जुन्या प्रियकराची सुश्रुषा करू इच्छिते.
सर्व लोकांची मान्यता होतीच. थोडया वेळाने साठेबाईच्या मुलीने वर्देसरांचा डिस्चार्ज घेतला आणि ऍम्ब्युलन्स मधून त्यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये आणले.
वर्देसर पुढे सहा महिने जगले. या सहा महिन्यात त्त्यांचे आणि साठेबाईंचे विदयार्थी त्याना भेटत राहिले. पोलीसदादा आपल्या पत्नीसोबत येत राहिला आणि दर रविवारी रसिका गुलाबांची फुले घेऊन येत राहिली. या सहा महिन्यात साठेबाईंनी वर्देसरांना भरवले. त्त्यांचे तोंड धुतले. त्यांचे अंग स्वच्छ केले.
हॉस्पिटलमध्ये कित्येक दिवस ज्या वर्देसरांना कित्येक दिवस कुणीपण भेटायला येत नव्हते. त्याच वर्देसरांच्या अंत्ययात्रेत पाचशेपेक्षा जास्त लोक सामील झाले होते. त्यात पोलीसदादा होते आणि रसिका पण अश्रू ढालत होती.
प्रदीप केळुस्कर.. 10/04/2026
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा