युद्ध म्हणजे फक्त बंदुका, बॉम्ब आणि रणांगणावरील शौर्य नसते. प्रत्यक्षात युद्ध जिंकण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे अर्थशास्त्र आणि लॉजिस्टिक्स. सध्या इराणभोवती चालू असलेल्या संघर्षात हे स्पष्टपणे दिसून येत आहे.
१. स्वस्त ड्रोन – महाग इंटरसेप्टर
इराणचे शाहेद ड्रोन हे स्वस्त, लहान आणि प्रभावी तंत्रज्ञान आहे. हे बनवायला इराणला काही हजार डॉलर्स खर्च येतो. पण ते ड्रोन हवेतच नष्ट करण्यासाठी अरब राष्ट्रे किंवा इतर देशांना इंटरसेप्टर मिसाईलवर अनेक पटीने जास्त खर्च करावा लागतो. सोप्या भाषेत सांगायचे तर – तुम्ही शत्रूवर १०० रुपयांचा बाण सोडता आणि तो बाण हवेत नष्ट करण्यासाठी शत्रूला ५०० रुपये खर्च करावे लागतात.
२. एअर डिफेन्सची महागडी व्यवस्था
अमेरिकेचे पेट्रियट, THAAD, किंवा इस्राईलचे आयर्न डोम यांसारख्या एअर डिफेन्स प्रणाली तयार करायला अब्जावधी डॉलर्स खर्च येतो. त्यामुळे ड्रोन आणि मिसाईलचा सतत होणारा मारा थांबवणे आर्थिकदृष्ट्या खूप महाग पडते.
३. १००% संरक्षण शक्य नसते
कोणतीही एअर डिफेन्स यंत्रणा १००% यशस्वी नसते.
जर १०० मिसाईल आणि ५०० ड्रोन हल्ला झाला तर ९०% थांबले तरी काही तरी लक्ष्यावर पोहोचतातच. आणि तेच मोठे नुकसान करू शकतात.
४. स्वस्त हल्ला – महाग नुकसान
काही हजार डॉलर्सचा ड्रोन एखाद्या तेल प्रकल्पाला किंवा औद्योगिक केंद्राला लागला तर अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे लहान तंत्रज्ञानाने मोठा आर्थिक धक्का देता येतो.
५. शस्त्रनिर्मितीतील अवलंबित्व
अरब राष्ट्रे स्वतः फार कमी शस्त्रे तयार करतात. त्यांना प्रामुख्याने अमेरिका आणि पाश्चात्य देशांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे युद्ध वाढले की त्यांना सतत बाहेरून पुरवठा घ्यावा लागतो.
६. इंटरसेप्टर मिसाईलचा कमी होणारा साठा
एअर डिफेन्स मिसाईल बनवणे अत्यंत जटिल असते. ती तयार होण्यासाठी महिने किंवा वर्षे लागतात. जर सतत वापर झाला तर साठा कमी होऊ लागतो आणि लॉजिस्टिक्सचे संकट निर्माण होते.
७. तेल आणि पर्यटन उद्योगावर परिणाम
सौदी अरेबिया, यूएई, बहारीन यांसारखी देश तेल, पर्यटन आणि विमानतळ सेवा यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. या क्षेत्रांवर हल्ले झाले तर त्यांना दररोज प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.
८. पाणी आणि वीज प्रकल्पांचे धोरणात्मक महत्त्व
अरब देशांमध्ये मोठ्या नद्या नाहीत. त्यामुळे ते समुद्राचे पाणी शुद्ध करून पिण्याचे पाणी तयार करतात. जर अशा निक्षारीकरण प्रकल्पांवर हल्ले झाले तर पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होऊ शकते.
९. हॉर्मुझ सामुद्रधुनीचे महत्त्व
जगातील सुमारे २०% तेल वाहतूक हॉर्मुझ सामुद्रधुनीतून होते. जर येथे जहाजांना धोका निर्माण झाला तर विमा कंपन्या जहाजांना विमा देण्यास टाळाटाळ करतात आणि जागतिक व्यापारावर परिणाम होतो.
१०. जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम
युद्धामुळे तेलाच्या किंमती वाढतात, वाहतूक खर्च वाढतो आणि जागतिक व्यापारावर ताण येतो. त्यामुळे एका प्रदेशातील युद्धाचा परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होतो.
११. स्वस्त तंत्रज्ञानाची नवी रणनीती
आजच्या युद्धात मोठ्या टँक किंवा महाग विमानांपेक्षा ड्रोन, सायबर हल्ले आणि स्वस्त मिसाईल अधिक प्रभावी ठरत आहेत. यामुळे युद्धाचे स्वरूप वेगाने बदलत आहे.
१२. आर्थिक थकवा – युद्धाचा खरा निर्णायक
इतिहास सांगतो की अनेक युद्धे रणांगणावर नाही तर अर्थव्यवस्था कोसळल्यामुळे संपली. दीर्घकाळ चालणारे युद्ध कोणत्याही देशासाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत कठीण असते. युद्ध म्हणजे फक्त वीरांची शौर्यकथा नाही. प्रत्यक्षात युद्ध जिंकण्यासाठी पैसा, संसाधने, पुरवठा व्यवस्था आणि आर्थिक ताकद अधिक महत्त्वाची असते. म्हणून इराण कडून बऱ्याच गोष्टी आपण भारतीय म्हणून शिकू शकतो आणि यावरून लक्षात येते की शिक्षण आणि संरक्षण व्यवस्थेवर योग्य पैसा खर्च करणे किती आवश्यक असते.(ना की लाडकी बहीण सारख्या फुकटच्या योजना) कारण अशा योजनांमुळे सरकार मतांसाठी असा अनावश्यक खर्च करून रिकामे होते आणि अचानक जर अशी युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर मग नुकसान मात्र न भरून निघणारे होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा